आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनातलं काही:स्त्रियांचं मानसिक स्वावलंबन

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंधश्रद्धेच्या बळी स्त्रियाच असतात. ऊठ वेड्या तोड बेड्या, परंतु हातापायामधल्या बेड्यांना जर त्या फुलांचे गजरे समजायला लागल्या तर पंचाईत होते. याची सुरुवात होते ती आपल्या समाजापासून. ‘मी माता, मी कांता, शिक्षक मी, सेवक मी, कलावती शास्त्रज्ञ किती गुणे नटवते, मी विश्वाची प्रतिभा, मजमध्ये समृद्धी वसते.’ म्हणजे एका बाजूला म्हणायचं की संस्कृतीचं साक्षात रूप म्हणजे स्त्री आणि दुसऱ्या बाजूला अनुभव मात्र असा की पायातली वहाण ही पायातच बरी. एकीकडे पिंजऱ्याचं दार उघडं ठेवायचं, बाहेर आकाशामध्ये उडण्याची मोकळीक घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्यांचं मानसिक खच्चीकरण करत राहायचं, जेणेकरून स्त्रियांना आकाशामध्ये भरारी घेणं ही सोपी गोष्ट राहणार नाही. देशामधल्या सगळ्या मोठ्या नेत्या या स्त्रियाच आहेत. तामिळनाडूमधल्या जयललिता असोत, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असोत किंवा सोनिया गांधी असोत, दहावी-बारावीमध्ये बोर्डात मोठ्या संख्येने मुलीच गुणवत्तेचा झेंडा फडकावतात. आणि वास्तवात मात्र हुंड्यासाठी जाळून मारल्या जातात त्यासुद्धा स्त्रियाच. लग्न ठरल्यावर मुली सौभाग्यकांक्षिणी, लग्न झाल्यावर सौभाग्यवती, नऊ महिने त्रास सोसल्यानंतर आई...अशा विविध भूमिकांमधल्या स्त्रीच्या पतीचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर कुठल्याही शुभकार्यात त्या स्त्रीच्या उपस्थितीवर बंधनं आणली जातात. नवरा दारुडा, जुगारी कसा का असेना, पण पती हाच परमेश्वर आहे असे संस्कार स्त्रियांवर केले जातात. दैनंदिन कामे पूर्ण करत असताना स्त्रियांना अनेक प्रकारच्या आजारांना, थकव्याला तोंड द्यावं लागतं. घरामध्ये ती सगळ्यात शेवटी जेवते. जे शिल्लक असेल तेच तिने खायचं असा अनेक घरांचा नियम आजही आहे. आजही लग्नाचं अधिकृत वय १८ असताना महाराष्ट्रातील जवळजवळ ३५ ते ४०% लग्नं सोळाव्या आणि सतराव्या वर्षीच होतात. अशा मुलींच्या शरीराची, गर्भाशयाची आणि मनाची पुरेशी वाढ झालेली नसतानाही तिला बोहल्यावर चढवलं जातं. मुलगा किंवा मुलगी होणं हे तर बाईच्या हातात नसतं. जन्माला येणारा मुलगा व्हावा या हट्टापायी बाई गरोदर झाल्यानंतर सोनोग्राफी केली जाते. मुलीचा गर्भ असेल तर भ्रूणहत्या केली जाते. यामुळे स्त्री म्हणून आपण दुय्यम आहोत हे ती मान्य करते. अनेक जाहिराती आहेत, त्यामध्ये बाईचा देहच वापरला जातो. पहिल्यांदा स्त्रिया ना वडीलधाऱ्यांचा आदर करावा लागतो, कौटुंबिक प्रेम आणि जिव्हाळा कायम ठेवण्याचं कामही तिलाच करावं लागतं आणि ही सगळी तारेवरची कसरत करत असताना पुन्हा तिला स्वतःच्या विवेकाचं स्वत्वं जपावं लागतं आणि ही सगळी तारेवरची कसरत अधिक अवघड लढाई बनत असते म्हणून तिला घरातल्या सर्व सदस्यांची, मानसिक पाठबळाची आवश्यकता असते. आजची स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होते आहे, पण मानसिकदृष्ट्या स्वावलंबी कधी होणार?

पूजा कदम संपर्क : ८९२८२८२८८९

बातम्या आणखी आहेत...