आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Mercury Should Also Lean Towards Women Cricketers .. Article By Bharat Dudhate

दखल:पारडं महिला क्रिकेटपटूंच्या बाजूनेही झुकावं..

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सचिन-धोनीला निवृत्तीनंतर वाजतगाजत निरोप दिला गेला. त्यांच्या सन्मानार्थ विशेष सामन्यांचं आयोजन केलं गेलं. सत्काराचे हार-तुरे, कौतुकाची शब्दसुमनं उधळली गेली. मात्र, पुरुष क्रिकेटपटूंच्या तोडीस तोड कामगिरी करूनही मितालीच्या वाट्याला यातलं काहीच आलं नाही. ‘लेडी सचिन’ इतकं तोंडदेखलं नामाभिधान देण्यात इतिकर्तव्यता मानणारी बीसीसीआय आणि प्रसारमाध्यमांचाही बोटचेपेपणा मितालीच्या निवृत्तीवेळी दिसला...

भा रतीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रिकेटपटू मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून नुकतीच निवृत्तीची घोषणा केली. तब्बल २३ वर्षे महिला क्रिकेटवर मितालीने वर्चस्व प्रस्थापित केले होते. ‘प्रत्येक गोष्टीला अंत असतो. आता आपण थांबायला हवे असे वाटते. त्यामुळे निवृत्ती घेत आहोत,’ अशी भावना तिने निवृत्तीवेळी व्यक्त केली. आक्रमक फलंदाजी तसेच संयमी नेतृत्वाच्या बळावर मितालीने महिला क्रिकेटमध्ये वेगळे स्थान निर्माण केले. मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने केले. तिने जेव्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती त्या काळामध्ये भारतीय महिला क्रिकेटचे चित्र फारसे आशादायक नव्हते, परंतु सातत्याने मेहनत घेत भारतीय संघाकडून खेळण्याची आपल्या वडिलांची इच्छा तिने पूर्ण करून दाखवली. अवघ्या सोळाव्या वर्षी तिने भारतीय संघाकडून खेळण्यास सुरुवात केली. पुरुष खेळाडूंना मिळणारे ग्लॅमर तीदेखील काही प्रमाणात मिळवू शकली.

मितालीचा जन्म ३ डिसेंबर १९८२ मध्ये राजस्थानच्या जोधपूर येथे झाला. जन्म जोधपूर येथे झाला असला तरी तिचे मूळ गाव मात्र सिकंदराबाद. मितालीचे वडील भारतीय हवाई दलात अधिकारी, तर आई गृहिणी. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण सिकंदराबाद येथे झाले. लहानपणापासून मितालीला डान्सची प्रचंड आवड असल्यामुळे ती भरतनाट्यम शिकली. भरतनाट्यम शिकत असताना क्रिकेटदेखील खेळत होती. मोठ्या भावासोबत क्रिकेटच्या मैदानावर जाणाऱ्या मितालीलाही क्रिकेटची गोडी लागली. ती भावासोबत कॅम्पमधल्या मुलांबरोबर सराव करायची. सराव सुरू असताना प्रशिक्षकांची नजर मितालीवर पडली. तिच्या खेळाने प्रभावित झालेल्या प्रशिक्षकांनी तिच्या वडिलांची भेट घेतली. तुमच्या मुलापेक्षा मुलगी चांगली खेळते, तिच्या खेळावर फोकस करा, असे त्यांनी सुचवले. प्रशिक्षकांच्या सांगण्यावरून वडिलांनी मुलीच्या खेळावर जास्त लक्ष दिले.

मितालीने वयाच्या दहाव्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. १९९७ मध्ये ती अवघ्या १४ वर्षांची असताना तिची भारतीय विश्वचषक संघात निवड झाली. परंतु या स्पर्धेत तिला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. १९९९ मध्ये आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात मितालीला पदार्पणाची संधी मिळाली. पहिल्या सामन्यामध्ये नाबाद राहत ११४ धावांची खेळी तिने साकारली. त्यानंतर तिने कधीही मागे वळून बघितलं नाही. २००१-२००२ मध्ये तिने कसोटी पदार्पण केले. सलग सात अर्धशतके करण्याचा विक्रम मितालीच्या नावावर आहे. १० हजार धावा पूर्ण करणारी ती भारतातील पहिली तर जगातील दुसरी महिला खेळाडू आहे. भारतासाठी सर्वाधिक धावा आणि सामने खेळणारी महिला खेळाडू म्हणूनदेखील मितालीची ओळख आहे. मितालीने आजपर्यंत भारताकडून १२ कसोटी, २३२ एकदिवसीय, ८९ टी-२० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. ७ शतके व ६४ अर्धशतके तिच्या नावावर आहेत. अथक परिश्रमाने तिने हे यश संपादन केलेे. क्रिकेटविश्वामध्ये अनेक विक्रम तिच्या नावावर आहेत. ज्या काळात मितालीने खेळायला सुरुवात केली त्या वेळी महिला क्रिकेपटूंसाठी फारसा अनुकूल नव्हता. त्यांना मिळणाऱ्या सुविधादेखील तुटपुंज्या होत्या. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मितालीने क्रिकेटजगतामध्ये स्वत:चे अस्तित्व निर्माण केले.स्वत:बरोबर अनेक महिला क्रिकेटपटू तयार केल्या. अनेक युवा खेळाडू मितालीला आदर्श मानतात.

मितालीने तब्बल २३ वर्षे भारतीय महिला संघाकडून देशासाठी कामगिरी केली. तिने आता निवृत्तीची घोषणा केलीय. निवृत्तीची घोषणा करणाऱ्या पुरुष खेळाडूंसाठी बीसीसीआय विविध कार्यक्रमांचे आयोजन करते. सचिन आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या निवृत्तीच्या घोषणा आणि निवृत्तीनंतरचे काही दिवस एकदा आठवून बघा. या घोषणांनंतर बीसीसीआयने सचिन आणि धोनीला ज्या पद्धतीने वाजतगाजत निरोप दिला, त्यांच्या कारकीर्दीच्या आलेखाची पारायणं केली, त्यांच्या सन्मानार्थ सामन्यांचे आयोजन केले, सचिन-धोनीवर कौतुकाच्या शब्दसुमनांचा वर्षाव केला त्या पद्धतीची निवृत्ती मिताली ‘डिझर्व्ह’ करत नव्हती? बीसीसीआयने महिला क्रिकेटला छत्रछायेखाली घेतल्यानंतर पूर्वीच्या तुलनेत (?) महिला क्रिकेटला जरा बरे दिवस आले. मात्र एवढी एक गोष्ट सोडली तर पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंमध्ये सर्वच पातळ्यांवर केला जाणारा दुजाभाव अजिबातच नाकारता येत नाही, मग ते मानधन असो किंवा जिंकल्यानंतर बक्षीसरूपात मिळणारी रक्कम. वास्तविक पुरुष क्रिकेटपटूंच्या तुलनेत महिला खेळाडूंना मिळणाऱ्या संधी, सोयी-सुविधा, स्वातंत्र्य, कौटुंबिक-सामाजिक बंधने आणि मर्यादा, निधी तसेच बक्षिसांच्या रकमेत प्रचंड तफावत असते. हा इतिहास आजही आपण बदलू शकलेलो नाही. त्यात पुन्हा शारीरिक मर्यादांचे नैसर्गिक अडथळेही नाकारता येत नाहीत. त्यात अलीकडच्या काळात क्रीडा क्षेत्रातल्या प्रशिक्षकांकडून महिला खेळाडूंच्या केल्या जाणाऱ्या शारीरिक शोषणाची नव्यानेच भर पडलीय. मात्र, अशा साऱ्या प्रतिकूलतेकडे दुर्लक्ष करत महिला क्रिकेट संघ आणि त्यातल्या मितालीसारख्या खेळाडूंनी लक्षणीय कामगिरी करून दाखवलीय. मग जी मेहनत घेऊन पुरुष क्रिकेटपटू जगात देशाचे नाव उंचावताहेत त्याच तोलामोलाची कामगिरी करून जर महिला क्रिकेटपटूही देशाचे नाव मोठे करत असतील तर त्यांनाही तेवढ्याच सोयी-सुविधा मिळायला हव्यात. पुरुष क्रिकेटपटूंइतकेच कौतुक, आदर, मानसन्मान त्यांच्याही वाट्याला येणे अपेक्षित आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की, वास्तवात तसे होताना दिसत नाही. जे निर्भेळ कौतुक पुरुष खेळाडूंच्या वाट्याला येते ते महिला क्रिकेटरच्या पदरात का पडू नये?

भारत दुधाटे संपर्क : 9767620138

बातम्या आणखी आहेत...