आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवं कोरं:मी संदर्भ पोखरतोय : चिंतनशील कविता

(एकनाथ पगार)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

समकालीन,सामाजिक,धार्मिक,राजकीय,शैक्षणिक आणि सांस्कृतिक जगतात जे काही घडते-बिघडते आहे, या घडण्या-बिघडण्याचे साद-पडसाद पवन नालट यांच्या ‘मी संदर्भ पोखरतोय’मध्ये उमटलेले आहेत. "विचार, विवेक, अस्मिता, धर्म, स्वातंत्र्य, गुलाम, आत्मा, दंगा, माणूस, लोक, मानवता, लोकशाही, व्यवस्था, नागरिकशास्त्र,भाकरी, माध्यमं, माती, स्वप्न, न्याय-अन्याय, मानवी उन्माद, दलाल, गाव, शहर, अराजकता, वर्तमान, भिकारी, भक्त, बाई, काळोख, व्यापार....’ हे आणि असे कितीतरी शब्दबंध पवन नालट यांच्या ‘मी संदर्भ पोखरतोय’ या कवितासंग्रहाच्या आशयसामग्रीत सामावलेले आहेत, टोचणारे आहेत. राजहंस प्रकाशनातर्फे अलिकडेच दाखल झालेल्या या कवितासंग्रहाच्या कवीचा रोख सामाजिक, राजकीय परिस्थितीच्या जाचाच्या दिशेने जाणारा आहे. सभोवतालात, वर्तमानात आणि निकटच्या भूतकाळात घडलेल्या घटना, अस्ताव्यस्तता, दमन करू पाहणाऱ्या यंत्रणा आणि काळोख्या भवितव्याच्या वास्तविकतेचा शोध कवी घेत आहे. बर्हिमुखता आधिक्याने जाणवते तर अंतर्मुखता प्रकट करताना विचार-चिंतनाला महत्त्व येते, क्वचित आशादायी-आश्वासक ‘हिरवेपणा’ जाणवतो. पवन नालट यांच्या कवितांमध्ये पांढरा-काळा-तांबडा वगैरे रंगविशेषणांपैकी 'हिरवेपण' अधिक ठसठशीतपणे प्रकटते. उदा.'मी सापडेन तुम्हाला/हिरव्या वाळूवरती / अस्तित्वाची रोपे लावताना' किंवा ‘आपणच हिरवा करावा / आपल्या पांढऱ्या क्षणांचा कोरा कॅनव्हास (पृष्ठ १५५) किंवा हिरव्या क्षणांचा कोवळा दिवा करून / सोडून द्यावे ह्रदयाचे काही आलाप मनाच्या निळसर डोहात / प्रकाशाच्या पुनर्पर्वासाठी’ (पृष्ठ १५६) किंवा ‘हिरवी शेतं, पिवळी बाभळी आणि पुढ्यात वाहणारी ही पुर्णामाय/ भरभरून प्रेम करते माझ्यावर’(पृष्ठ १४४)किंवा ‘कदाचित अजूनही फुले फुलतील/ या आशेने धुंद झालेला मोगरा / पाने हिरवी करून बसला आहे,कुणाच्या तरी प्रतिक्षेत’ (पृष्ठ ११७) किंवा ‘मला विस्मरायचं नाही तांबडं फुटेस्तोवर’/मुळांनी आजन्म जपलेले हिरव्या श्वासांचे देणे’(पृष्ठ ११५). अस्तित्व प्रस्थापन, कल्पना स्फुरण-निर्मिती, जन्मक्षण, वात्सल्य, आशा-प्रतीक्षा,संजीवन अशा घटना-स्थिती-भाववृत्ती यांच्या अनुरोधाने 'हिरवा रंग' येथे आलेला आहे. वास्तवाचे अभद्रपण हिरव्याने शांत-शीतल कोवळे आणि संवेदनशील बनविण्यासाठी, मानव्य शाबूत राहण्यासाठी हिरव्याचे आकर्षण अवतरले आहे.कवी मनात अंधार प्रवेशताच नेणिवेतले हिरवेपण 'गर्द' होते.

समता, स्वातंत्र्य,बंधुता, सामाजिक न्याय, सहिष्णूता हा मूल्यविवेक या कवितांमध्ये आहे.'धर्म-राजकारण-सत्तासंबंध’ अशा व्यवस्थेवर,'विचार-विधान' यांचा प्रतिवाद उभा राहतो. विचार स्वातंत्र्य,अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांना जपणारे हे कवीमन आहे. 'दुफळी माजलेल्या दिवसांसाठी लिहितो का कविता आपण/ अजून लिहित्या माणसांना वेठबिगार केलेले नाही/व्यवस्थेच्या वतनदारांनी'(पृष्ठ १३३) दमनकारी सत्ता, सामूहिक उन्माद एकसाची करण्याचे प्रयत्न,माध्यमांचे नपुंसकत्व, भांडवलशाही पोषक लोकशाही आणि संवेदनाहिन-मूल्यहिन समष्टी यांच्या कचाट्यात सापडल्यामुळे कविता निर्मितीतून विचारसंघर्ष हा कवी करतो आहे.नागडेपणाचे संदर्भ शोधतो आहे.वाचाहिनतेला मुखरित करण्याची कवीची भूमिका आहे.राजकीय भाष्ये करणाऱ्या कवितांचे आधिक्य म्हणूनच येथे दिसते.

या कवितांमधील राजकीय भाष्यांना वास्तवातल्या भौतिकातल्या घटनांचे संदर्भ आहेत,'गोध्रा, मशिद, न्यायालयीन निर्णय, दंगली, विचारवंतांच्या हत्या आणि वर्तमानपत्रातील काळोख'अशी घटीते विचार-भावना यांना प्रज्वलित करतात. कवीमन विवेकी भूमिका घेते.उदा.'मी विवश असतो....इच्छेच्या तुटलेल्या प्रत्येक श्वासागणिक / मीही हसून बोलत असतो/ माझ्याच व्यक्तिमत्वाचं डिसेक्शन होत असताना / मला घेता येत नाही, स्वातंत्र्याचा दीर्घ श्वास / पाठीवरची झूल काढून.' (पृष्ठ १२२)'अघोरी शांतता भेदण्यासाठी 'मी संदर्भ पोखरतोय'असे आत्मविश्वासाचे सर्जक शब्दरूप म्हणून या कवितांचा 'विचार' करावा लागतो. धर्म, जातीव्यवस्था, शिक्षणव्यवस्था,सामाजिक व्यवस्था आदिंचे अवमूल्यनही कविता अस्वस्थतेचे निर्देश देतात.'बाईचं जगणं:दहा कविता'(पृष्ठ ८१)या कवितेत स्री जीवनाची दुर्दशा आली आहे . 'शाळा : काही नोंदी' (पृष्ठ ५६)मध्ये ज्ञान-शिक्षण-संस्कार-जागृती यांचे अपवर्तन निर्देशिले आहे. शाळेतले विषय 'विषवत' पध्दतीने समोर येतात. सुरुपतेऐवजी विरुपताच फक्त जाणवते. शिक्षण 'विरुपिका' निर्माण करते.' शाळा धंदा बनणे,भूगोल उन्मादी बनणे,गणिताने गरिबीचे चक्रवाढ व्याज बनणे,मातृभाषेची रजई विदीर्ण होणे,अज्ञानाची रसद अस्तित्वात येणे' अशा विरुपांची अवकळा कविला वास्तवाचे चटके देते.

'देशच झाला काळा'(पृष्ठ ३९) या कवितेत राष्ट्रीय अव’कळा’ उपरोधातून दाखवल्या आहेत. उदा.'भरवतात कुंभमेळा/मैत्री,प्रेम,बंधुभावाचा(रक्ताच्या थारोळ्यात) धर्मात जात,जातीत पोटजात/पोटजातीत गट /गटात नागरिक/ नागरिकशास्र/ शेवटी शेण खातं....मास्तर शिकवतात/नाळ तुटलेली मातृभाषा/ ओढ नसलेले गाव.....आम्ही मांडतो बाजारात/ मराठीच्या व्यथा...देश करीत असतो आर्थिक महासत्तेच्या भाकडचर्चा/ विद्यार्थी निवडत असतात खिचडीतल्या अळ्या...'/ इतके सारे होऊनही व्यवस्था मात्र मुस्कटदाबी करीत असतात. 'मौन पाळा' हा आदेशच असतो,सर्व सत्ता व्यवस्थांचा.मुस्कटदाबीला,गुलामीला नकार देण्याच्या कविवृत्त्तीतून उपरोधाचा शस्त्रासारखा वापर झाला आहे.'हमनफस : काही नोंदी' ही दीर्घ कविता मुस्लिम भावविश्व आणि परधर्मिय समाजमन यांच्यातील संस्कृती संदर्भ सूक्ष्मतेने अधोरखित करते. उदा.कवी म्हणतो,मला माहित होतं/थडग्यांवर जीव लावणारी माणसं/ सर्वच धर्मात असतात/माणसांवर जीव लावणारी माणसं/ सापडत नाहीत कुठेही(पृष्ठ १४९) 'कालबाह्य' या कवितेतील लोकसत्तेचे हाल पुढीलप्रमाणे सांगितलेले आहेत....लोकशाहीचा चेहरा हा/ जटाधारी साधूसारखा सात्विक पण/ दांभिकतेची लकेर असलेला/ वाटत असतो/ आणि त्याच्या जटा मात्र/ सदैव कुणीतरी एकाने आपल्या हाती/करकचून ओढलेल्या असतात/ त्याने जटा ओढल्या की/ लोकशाहीच्या चेहऱ्याचा थरकाप उडतो...आपण पुन्हा गुलाम झालोत/स्वातंत्र्याच्या पाशात (पृष्ठ ७२-७३) येथे 'सत्ता' शोषक होऊन अवतरते,सत्ता ज्यांनी निर्माण करून दिली ते मात्र भयाने किंकर्तव्यमूढ बनले.लोकशाहीतली प्रजा भयग्रस्त होणे,सामूहिक भयाने संवेदना बधिर होणे,कृतिशून्य बनणे,विचारशून्यता येणे अशा विकारांनी ग्रस्त झाल्याचे संसूचन या कवितांमध्ये आहे.

'पूर्णाकृती'(पृष्ठ ११२) या कवितेत प्रारंभापासूनचे सारे तपशील सपाट गद्य निवेदनासारखे येतात. मात्र अखेरीस ‘अन् तुम्ही/ठेचाळलेल्या अंगठ्यावर/उभारत असता/ असंवेदनशीलतेचा/ पूर्णाकृती पुतळा/ आमच्या स्वाभिमानाला नग्न करून’असे भावसूचक कल्पक शब्दबंध आल्याने भाषेच्या सपाटीकरणाला छेद मिळतो. 'असंवेदनशीलतेचा पूर्णाकृती पुतळा' हा शब्दबंध लक्षवेधक ठरतो. 'आसरामाय' या कवितेतही 'आसरा'(अप्सरा,मातृदेवता) या लोकदैवताशी कविचा एकेरी संवाद आहे.पूरपाण्याने वाताहात झाली, संसाराच्या कागदी नावा बुडाल्या तरी काठावरच्या मातृदेवतेच्या डोळ्यात अश्रू आले नाहीत.वात्सल्यमूर्ती-कारूण्यमूर्ती-संजीवन देवता असे महामातेचे रुप-अस्तित्व यांची वक्रोक्तीतून जाणीव कवी करून देतो. वास्तवाशी कविचे आंतरिक असे नाते आहे.'स्व'च्या सभोवतालात 'स्व' कोठे ? हा 'स्व' आपल्या काळ-संस्कृती-समाज-सत्ता यांच्याशी आपल्या अस्तित्वाचे नाते शोधतो.'स्व'ला भोवतालात विकार-विनाश-हताशा यांचेच अनुभव येतात.असे असूनही हा विचारी 'स्व' सभोवतालचे विसंवाद खोदतो,शोधतो,विकारशील वास्तवाला अस्थिर करू पाहतो.'स्व' बरोबरच 'समष्टी' च्या हतबलतेला धक्के देतो.'व्यवस्थेला भोकं पाडल्याची कहाणी सांगून सभोवतालाला विवेकाची वाट दाखवतो.', 'शब्दातून शस्त्र / पेरणारा कवी/ मातीतून महावस्त्र / देत असतो / मानवतेच्या आरस्पानी देहाला'ही कवीची भूमिका आहे,या भूमिकेशी निष्ठा राखत काव्य निर्मिती करीत आहे.भावाविष्कारापेक्षा विचार ऊर्जेला दखलपात्र करणाऱ्या या कवितांचे स्वागत आहे. व्यक्तिस्वातंत्र्याइतकेच समष्टीचे जागरण कविला महत्त्वाचे वाटते.समष्टीच्या अभ्युदयासाठी हिरवेपणाचे व्रत पवन नालट यांनी घेतलेले आहे. ■ मी संदर्भ पोखरतोय | पवन नालट ■ प्रकाशन | राजहंस प्रकाशन,पुणे ■ मुखपृष्ठ | चंद्रमोहन कुलकर्णी ■ पृष्ठे | 156 ■ मूल्य | ₹ 280/- pagareknath@yahoo.com

बातम्या आणखी आहेत...