आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादै नंदिन आयुष्यातून मुक्त होत निसर्गाच्या सान्निध्यात स्वतःला झोकून देण्यातला आनंद जिथे उपभोगता येतो, ती भूमी म्हणजे स्वप्नभूमी श्रीलंका. इथले रीतिरिवाज, राहणीमान आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीची रेलचेल पर्यटकांना आकर्षित करते. श्रीलंकेतल्या भूमीचा थंडावा तुम्हाला दुसऱ्या पारंपरिक खाद्यपदार्थांच्या जगामध्ये घेऊन जातो. इथले मुख्य अन्न तांदूळ शिजवून, त्याचा भात बनवून तुम्हाला दिले जाते. या भाताबरोबर चटणी, लोणचं, शिवाय सॅमबाॅल्स नावाचा पदार्थ देतात. हा सॅमबाॅल्स अतिशय तिखट आणि भूक वाढवणारा पदार्थ आहे. याच्यासोबत पांढरी करी देतात. ही करी खूप सुगंधित आणि चवीला सौम्य असते. यासोबतच ‘मालूम’ नावाचा पदार्थ असतो. अतिशय चविष्ट असलेला हा पदार्थ नारळ आणि विविध प्रकारच्या वनस्पतींच्या पानांपासून तयार करतात. समुद्रकिनाऱ्याजवळ वसाहत असणाऱ्या लोकांचं नारळ हे मुख्य अन्न आहे. श्रीलंका मसाल्यांसाठी प्रसिद्ध आहे. इथे वास्तव्यास असणारे नागरिक विविध देशांतून, प्रांतांतून आलेले असल्यामुळे इथल्या खानपानावर वेगवेगळ्या प्रांताची छाप दिसते. विशेषतः आपल्या इथल्या तामिळ संस्कृतीचा प्रभाव दिसतो. श्रीलंकेच्या पर्वतरांगा, समुद्रकिनारे आणि वसाहती अशा वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्यांच्या खाद्यपदार्थांमध्ये भिन्नता आढळते. पूर्वी इथे डच आणि पोर्तुगाल राज्य करायचे. त्यामुळे त्या दोन देशांच्या खाद्यपदार्थांमध्येे श्रीलंकन लोकांनी आपल्या चवीनुसार बदल करून घेतले आणि एका नवीन खाद्यपर्वाची सुरुवात झाली. भाजलेलं बीफ आणि चिकन हे पदार्थ ब्रिटिश लोकांनी, तर वाटालपम हा अतिशय प्रसिद्ध गोड पदार्थ मल्ले लोकांनी श्रीलंकेत आणला. प्राॅन्स, लाॅब्स्टर, क्रूप्स आणि असे विविध प्रकारचे मासे जसे टूना, सिर, मुले हे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या मसाल्यांत स्वादानुसार शिजवले जातात. तसेच वाळवलेले मासे आणि त्याच प्रकारे माशांचं लोणचं हे श्रीलंकेचं वैशिष्ट्य आहे. श्रीलंकेत आंबे, केळी, पपई आणि अननस विपुल प्रमाणात मिळतात. वेगवेगळ्या फळांचे रस काढून त्यात इतर स्वाद वाढवणारे जिन्नस मिसळून ते पिण्याची इथे प्रथा आहे. इथे येणाऱ्या पर्यटकांना ‘दिवालकिरी’ नावाचा वैशिष्ट्यपूर्ण ज्यूस दिला जातो. तो नारळाचं दूध आणि वूड अॅपल नावाच्या फळाच्या गरापासून तयार करतात. श्रीलंकेत विविध प्रकारचे चहासुद्धा प्रसिद्ध आहेत. येथील चहामध्ये मसाला, फळं आणि आलं (अद्रक) फ्लेवर प्रसिद्ध आहेत. ‘अरोमा’ चहासुद्धा प्रसिद्ध आहे. इथली एक गंमत सांगतो, एका हाॅटेलमध्ये माझा शो होता. पण, सततच्या प्रवासामुळे आणि शोमुुळे माझा घसा बसला होता. कुकरी शो जरी म्हटलं तरी त्यालासुद्धा रेसिपीबरोबर आवाज हा एक महत्त्वाचा घटक असतो. तिथल्या शेफला माहिती होतं की, मला तिकडचा तिखट चहा आवडतो. त्याने शोच्या आधी आल्याचा अप्रतिम तिखट चहा आणून दिला. त्यामुळे घशाला आराम पडला. शो झाल्यानंतर त्याने मला गुपित सांगितलं की, चहा आल्याचा होता, पण तिखटपणासाठी त्यानं त्यात चिमूटभर तिखटही टाकलेलं होतं. ते ऐकून मी ‘चाट’ पडलो! मग भारतात आल्यावर मीसुद्धा अशा चहाचा प्रयोग करून पाहिला. आता मी माझ्या शोमध्ये ही तिखट चहाची टिप देत असतो. जाता जाता या काही श्रीलंकन रेसिपी खास तुमच्यासाठी... पिट्टू { साहित्य : तांदळाचे पीठ 200 ग्रॅम, मीठ अर्धा चमचा, गरम पाणी 75 मि.ली., नारळाचे घट्ट दूध 180 मि.ली { कृती : तांदळाची पिठी भाजून, चाळून घ्या. त्यात मीठ आणि गरम पाणी हळूहळू घाला. हाताने चांगले मिसळून त्यात किसलेला नारळ घाला. त्यानंतर या मिश्रणाला पिट्टू बनवण्याच्या मोल्डमध्ये घालून मोल्ड गरम पाण्यात घाला. 15-20 मिनिटांत शिजल्यावर बाहेर काढून गूळ घातलेल्या नारळाच्या दुधासोबत खायला द्या. { टीप : मोल्ड उपलब्ध नसल्यास तांदळाचा गोळा लंबगोल करून कापडात गुंडाळून स्टीम करा. होपर्स (आप्पा) { साहित्य : फ्रेश यीस्ट 15 ग्रॅम, ड्राय यीस्ट 1 चमचा, गरम पाणी 125 मिली, साखर दीड चमचा, तांदळाची पिठी किंवा मैदा दीड कप (अंदाजे 185 ग्रॅम), कोकोनट मिल्क 400 मिली, मीठ 2 चमचे, साधे पाणी 500 मिली. { कृती : थोड्याशा गरम पाण्यात साखर आणि यीस्ट घालून 10 मिनिटे ठेवा. यीस्ट अॅक्टिव्हेट झाल्यावर त्यात तांदळाची पिठी, मीठ आणि 300 मिली कोकोनट मिल्क घाला. मिश्रण एकत्र करून रात्रभर आंबवण्यासाठी ठेवा. आप्पा करतेवेळी भांडे चांगले गरम करून मिश्रणात योग्य प्रमाणात पाणी मिसळून दोशाच्या मिश्रणाप्रमाणे मिश्रण करा. एक वाटी पीठ टाकून त्याला गोल फिरवून झाकून ठेवा. मंद आचेवर 2-3 मिनिटे ठेवून नंतर थोडेसे तेल टाका. गरम सूपबरोबर सर्व्ह करा. {संपर्क : manohar.vishnu@gmail.com
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.