आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मरण:वैश्विक परिवाराची आई

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या पत्नी निर्मलाताई यांचा ३ ऑगस्ट हा जन्मदिन. हा दिवस स्वाध्याय परिवार ‘वर्षामिलन दिन’ म्हणून साजरा करताे. ताईंच्या स्वाध्याय कार्यातील अमूल्य योगदानाची आठवण जागवणारा लेख...

रत्नागिरी जिल्ह्यातील गावखडी गावात ३ ऑगस्ट १९२६ रोजी निर्मलाताईंचा जन्म झाला. त्यांचे वडील भाऊसाहेब सिधये हे गिरगावातच (मुंबई) स्थायिक झाले होते. यामुळे निर्मलाताई बालपणापासूनच मुंबईतच राहिल्या. पूजनीय दादाजी आणि ताईंचा मार्च १९४४ मध्ये विवाह झाला. ताईंना आपला जन्मदिन स्वतंत्रपणे साजरा करायला आवडत नव्हते. दादांचा जन्मदिन तुम्ही ‘मनुष्य गौरव दिन’ म्हणून साजरा करता, मग त्यातच माझा जन्मदिन साजरा झाला, असे त्या स्वाध्यायींना सांगत. तरीदेखील कृतज्ञता म्हणून स्वाध्यायी ३ ऑगस्ट हा ताईंचा जन्मदिन ‘वर्षामिलन दिन’ म्हणून साजरा करतात.

‘अवघाचि संसार सुखाचा करीन’ या विचारातून ऋषी, संतांनी कार्य केल. विश्वकल्याणाच्या या परंपरेत दादांचे नावदेखील आदराने घेतले जाते. संसार करूनही परमार्थ करता येतो, याचे आदर्श मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पूजनीय पांडुरंगशास्त्री आणि निर्मलाताई आहेत. ‘आधी प्रपंच करावा नेटका। मग घ्यावे परमार्थ विवेका॥’ ही उक्ती या दोघांच्या दांपत्य जीवनातून प्रगट होते. दादा-ताईंच्या कुटुंबाने आज विश्वातील लाखो कुटुंबांत भाव, प्रेम, सौख्य, शांतीचे वातावरण निर्माण केले आहे. स्वाध्याय कार्याच्या निमित्ताने दादा अनेकदा बाहेरगावी असायचे. अशा वेळी आठवले कुटुंबाची आणि स्वाध्याय परिवाराची जबाबदारी ताईंनी समर्थपणे सांभाळली. तपोवन पद्धतीचे शिक्षण देणाऱ्या दादांच्या तत्त्वज्ञान विद्यापीठातील विद्यार्थ्यांची ताईंनी आईच्या मायेने काळजी घेतली.

दादा करत असलेल्या मानवी विकासाच्या स्वाध्याय कार्यात ताईंनी मोलाची साथ दिली. माणसे पारखण्याची विलक्षण क्षमता त्यांच्याकडे होती. कुशल गृहिणीप्रमाणे व्यवहारकुशलता त्यांच्याकडे होती. यामुळे दादांसमोर काही अडचणी निर्माण होत तेव्हा ते ताईंचा सल्ला अवश्य घेत. ताईही दादांना योग्य तो मार्ग सुचवायच्या. संसारात मन, बुद्धी आणि अहंकाराचे समर्पण किती आवश्यक आहे, हे ताईंचे जीवन बघितल्यावर लक्षात येते. संसारात भौतिक गोष्टींची अपेक्षा न ठेवता संस्कार, कुटुंबातील अतूट नाती याला त्यांना खरी आभूषणे मानली. स्वतः कर्तृत्वसिद्ध व्यक्तिमत्त्व असूनही दादांच्या कार्यात त्या समर्पित झाल्या. घर किती मोठं आहे, त्यात किती महागड्या वस्तू आहेत यामुळे घराची शोभा वाढत नसते, तर घराची शोभा त्या घरच्या गृहिणीमुळे वाढते. आठवले कुटुंब आणि आणि स्वाध्याय परिवाराची शोभा, ताईंनी आपल्या कार्यातून वाढवली.

गीतेच्या बाराव्या अध्यायात मनुष्यात शुची, दक्ष हे काही गुण आवश्यक असल्याचे भगवंतांनी सांगितले आहे. ताईंमध्ये तर शिस्त, दक्षता आणि स्वच्छता ही गुणत्रिवेणी विशेष रूपात साकारित होती. त्यांना मन, बुद्धी, विचार आणि कार्यातील शुचितेसोबतच घरातील भौतिक स्वच्छता राखायलादेखील आवडत असे. यासाठी ‘जिथल्या तिथे आणि जेव्हाचे तेव्हा’ हे महत्त्वाचे सूत्र त्या पाळायच्या. ताई सांगत की, आपले स्वयंपाकघर अन्नपूर्णा मातेचे बसण्याचे ठिकाण आहे. आपण जसे एखाद्या अस्वच्छ ठिकाणी बसत नाही, तसे अन्नपूर्णा मातेसाठी आपले स्वयंपाकघर स्वच्छ असायला हवे!’ यामुळे दरवर्षी त्यांच्या जन्मदिनी लाखो स्वाध्यायी कुटुंबे घराची स्वच्छता करतात. निर्मलाताई आणि दादांनी आदर्श दांपत्य जीवनाचा वस्तुपाठ या विश्वासमोर ठेवला. पतीला व्रत देते, त्याच्या व्रतात साथ देते ती खरी पतिव्रता अशी आपली संस्कृती. ताई पतिव्रता होत्याच पण त्याचबरोबर एक आदर्श माताही होत्या. दादांच्या शताब्दीच्या या पर्वात पूजनीय दादांना आणि पूजनीय ताईंना शतशः वंदन!

राहुल कुलकर्णी संपर्क : 94236898120

बातम्या आणखी आहेत...