आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Mukta Chaitanya Special Article Rasik | Divya Marathi Article | Marathi News | On The Occasion Of 'Hindustani Bhau' ...

रसिक स्पेशल:‘हिंदुस्थानी भाऊ’च्या निमित्ताने...

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘अमेरिकन असोसिएशन ऑफ सायकोलॉजी’च्या मते, समाजमाध्यमांच्या प्रचंड प्रभावामुळे वास्तव आणि आभास यामध्ये आपण गल्लत करायला लागलो आहोत. नाट्य (Reel) आणि व्हर्च्युअल रिअल (Real) यातली सीमारेषा झपाट्याने पुसली जाते आहे. कालपर्यंत आम्ही समाजमाध्यमांचे अभ्यासक असं म्हणत होतो, की काही दिवसांत लोकांना खरं काय आणि आभासी काय यांच्यातला फरक समजेनासा होईल. त्या वेळी वाटणारं नजीकचं भविष्य आता प्रत्यक्षात येऊन ठेपलं आहे. याची दोन ठळक उदाहरणे म्हणजे हिंदुस्थानी भाऊ आणि थेरगाव क्वीन. या दोघांवरही कायदेशीर कारवाई झाली आहे. पण, त्यापलीकडे मुद्दा ‘रील’ आणि ‘रिअल’चा आहे.

शिव्या देणारे, रावडी, जगाला सुधारण्याचा ठेका घेतलेले हीरो, हिरॉइन आपल्याला आवडतात. कुठेतरी मनातल्या मनात आपण रोल प्लेसुद्धा करत असतो. पण, सोशल मीडियाच्या जन्मानंतर आणि त्याने झपाट्याने आपल्या जगण्याचा ताबा घेतल्यानंतर आयुष्याचा रिअॅलिटी शो आपण सतत आभासी जगात दाखवत असतो आणि लोक बघत असतात. मग सोशल मीडियावरचा किंवा यूट्यूबवरचा शिव्या देणारा, धमकी किंवा अर्वाच्य भाषेत बोलणारा कुणीतरी सिनेमातल्या त्या हीरो वा हिरॉइनसारखे वाटायला लागतात. मनातल्या मनात रोल प्लेही सुरू होतो आणि सिनेमातली व्यक्तिरेखा आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ही एकच गोष्ट नाही हे विसरायला होतं. त्यांच्यातला सारखेपणा इतका जबरदस्त आहे की खरं काय आणि आभासी काय, हेच समजेनासं होऊन एका वेगळ्याच गुंत्यात आपण अडकत जातो.

‘गब्बर’ सिनेमातला अक्षयकुमारचा गब्बर बघायला ‘भारी’ वाटतोच, पण गब्बरचा अवतार यूट्यूबवर अथवा इन्स्टावर अवतरला, तर ‘लै भारी’ वाटून घेणारी युजर्सची एक मोठी फळी आहे, हे नाकारता येतच नाही. आणि अशी फळी तयार होते आहे, झालेली आहे ती निव्वळ माध्यम शिक्षणाच्या अभावामुळे. आपण जो सोशल मीडिया वापरतो, तिथे जे इन्फ्लुएन्सर्स असतात, तिथून जे पैसे मिळतात ते तिथे आपण ज्या पद्धतीने व्यक्त होतो, या सगळ्याचा बारकाईने विचार करायला लावणारं आणि सोशल मीडियावर व्हिडिओ, रिल्सच्या निमित्ताने चालणारा हा सगळा प्रकार रिअॅलिटी शोच्या जवळ जाणारा किंवा अगदी तसाच असतो. आणि तो गांभीर्याने घ्यायचा नसतो, हे सांगणारी व्यवस्था मात्र आपल्याकडे उपलब्ध नाही. दुसरीकडे, मुलांच्या हातात मोबाइल असण्याची गरजच नाही त्या वयात मुलामुलींच्या हातात त्यांचे पालक मोबाइल देतात आणि फोन देताना त्या गॅजेटविषयी, त्यातल्या आभासी जगाविषयी काहीही बोलत नाहीत. आपण एखाद्याला का फॉलो करतोय, एखादा चॅनल किंवा इन्स्टा प्रोफाइल आपल्याला का आवडतंय, याचा विचार केला पाहिजे, हे कुणीही कुणालाही सांगण्याच्या भानगडीत पडत नाही.

हिंदुस्थानी भाऊच्या हाकेला प्रतिसाद देत रस्त्यावर उतरणाऱ्या शेकडो मुलांना मूर्खात काढल्याने आणि ‘काय ही पिढी..’ म्हणून त्यांना नावं ठेवल्याने प्रश्न सुटणार आहे का? एकीकडे ही सगळी मुलं कोरोनामुळे गेली दोन वर्षे अतिशय विचित्र शैक्षणिक, कौटुंबिक, सामाजिक वातावरणातून जाताहेत, त्यांच्या मनावर येणाऱ्या ताणाविषयी मोठ्यांच्या जगाने विशेष काम केलेलं नाही. लस उपलब्ध नसताना शाळा, कॉलेज उघडण्याविषयी मोठ्यांच्या जगात सुरू असलेल्या चर्चांचा या टीनएजर्सवर काहीच परिणाम होत नसेल, असं आपल्याला वाटतंय का? समाजात आजूबाजूला बघताना कसलेही आदर्श नसणं ही किती मोठी समस्या असू शकते, हे हिंदुस्थानी भाऊच्या निमित्ताने प्रकर्षाने पुन्हा एकदा पुढे आलं आहे. याचा विचार आपण कधीतरी केला आहे का? आजूबाजूच्या जगाशी कनेक्ट तुटलेली ही पिढी त्यांचे आदर्श ऑनलाइन जगात शोधते आहे.

मग ते केपॉप आयडॉल्स असोत नाही तर हिंदुस्थानी भाऊ. ज्याला जे झेपेल त्या पद्धतीने जो तो आदर्शांची निवड करतोय. आपल्यापुढे कुणी आदर्श हवा की नको, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण, आधारासाठी, मार्गदर्शनासाठी आजूबाजूला बघितल्यावर त्यांना जे दिसतंय, दाखवलं जातंय तेच ही पिढी बघणार आहे. त्यापलीकडे जाऊन त्यांनी इतिहासातून उकरून आदर्श शोधून काढावेत आणि त्यांना डोळ्यासमोर ठेवावं अशी आपण अपेक्षा करणार का? जिथे मोठ्यांच्या जगाचाच वास्तवाशी संपर्क उरलेला नाही तिथे टीनएजर्सकडून आपण कुठल्या अपेक्षा करतोय, याचं गणित एकदा बांधायला हवंच.

हिंदुस्थानी भाऊ काय, थेरगाव क्वीन काय किंवा अजून कुणीही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर काय, या सगळ्यांकडे तरुण पिढी का आकर्षित होते आहे, याचा बारकाईने विचार केला गेला पाहिजे. यातलं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे, इतर कुठल्याही सेलिब्रिटीपेक्षा हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स टीनएजर्स आणि तरुण पिढीला जास्त खरे आणि सच्चे वाटतात. ते तितके खरे असतात का, हा विषय वेगळा आहे. पण, ते खरे आणि सच्चे वाटतात हे वास्तव आहे. ते आपल्यातलेच एक आहेत, ही भावना समाज माध्यमाच्या एकूण स्वरूपामुळे पक्की होत जाते. पालक, शिक्षक, पारंपरिक माध्यमांमधले बुद्धिजीवी किंवा टीव्ही-सिनेमातले सेलिब्रिटी यांच्यापेक्षा आपल्या जगण्याचे प्रश्न या इन्फ्लुएन्सर्सना अधिक नीट समजतात, ही भावनाही आजच्या टीनएजर्समध्ये तीव्र आहे.

त्यातही अब्युज आभासी जगात प्रचंड लोकप्रिय होतो. याला अनेक कारणं आहेत. जसं मोठ्यांच्या जगात ट्रोलिंग, प्रायव्हेट ग्रुप चॅटमधलं अब्युसिव्ह गॉसिप आणि इतर सगळ्याच गोष्टी लोकप्रिय असतात, तसंच टीनएजर्सच्या जगातही अब्युज लोकप्रिय आहे. आणि हे लोकप्रिय असणंही मोठ्यांच्या जगाकडूनच पाझरत, झिरपत तिथपर्यंत पोचलेलं आहे. जेव्हा नेते विरोधी पक्षातल्या माणसांच्या अब्रू चव्हाट्यावर आणतात आणि आपण त्याला टाळ्या वाजवून दाद देतो, सोशल मीडियावर एखादी व्यक्ती दुसऱ्या एखाद्या व्यक्तीशी असभ्य वर्तन करते आणि आपण त्याचं समर्थन करत असतो, तेव्हा हे विसरून चालणार नसतं की आपल्या घरातले, आजूबाजूचे टीनएजर्स आपल्याकडे बघत असतात, आपल्या कॉमेंट्स वाचत असतात, दुरूनच त्यांचं आपल्याकडे लक्ष असतं आणि त्यांच्या मनात अगणित नोंदी होत असतात. एखादी बलात्काराची घटना घडते आणि त्याचा लाइव्ह व्हिडिओ बघण्यासाठी मोठ्यांच्या जगाची पॉर्न साइट्सवर गर्दी होते, त्या गर्दीकडेही टीनएजर्स कुतूहलाने बघत असतात.

मध्यंतरी एका टीनएजर्सबरोबरच्या वर्कशॉपमध्ये एक पंधरा वर्षांची मुलगी म्हणाली, “लहान मुलांचे आयटम साँग्ज मोठी माणसं कशी काय एन्जॉय करतात? लहान मुलांना अशा गाण्यांवर नाचायला लावणारे आणि ते एन्जॉय करणारे सगळे आम्हाला पीडोफाइल वाटतात. हे क्रिपी आहे..”

आपल्याला कल्पना नाही इतकं बारीक लक्ष आजच्या जेन झीचं मोठ्यांच्या जगाकडे आहे. त्यांना मूर्ख म्हणून मोडीत काढण्याआधी किंवा त्यांच्याविषयी काळजीचा सूर काढण्यापूर्वी पालक, शिक्षक आणि इतर मोठ्यांचं जग या टीनएजर्सना भरवशाचं का वाटत नाही, याचा विचार केला पाहिजे. आपण असे काय वागतोय ज्यामुळे आपल्यावरचा भरवसा कमी कमी होऊ लागलाय आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सशी ही पिढी जोडली जातेय? आपण गमावलेला हा विश्वास परत मिळवायचा असेल, तर काय केलं पाहिजे, याचाही विचार तातडीने करायला हवा. पिढ्यांमधल्या सुसंवादाचे प्रश्न पुरातन असले, तरी त्यांचा पोत आताच्या घडीला जसा आहे तसा कदाचित कधीच नव्हता. त्यातल्या विसंवादाच्या जागा शोधाव्या लागतील आणि त्यावर काम करावं लागेल. आणि ही जबाबदारी फक्त मोठ्यांच्या जगाची आहे. कारण, एक तर टीनएजर्स मोठ्यांच्या जगाकडे मदत मागायला येणार नाहीत. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे, ते हिंदुस्थानी भाई किंवा तत्सम इन्फ्लुएन्सर्सच्या प्रभावाखाली येऊन आयुष्यतली महत्त्वाची वर्षे वाया घालवण्याची दाट शक्यता आहे. मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे, की किशोरावस्थेत एखाद्या निर्णयाचे तत्कालीन फायदे-तोटे लक्षात येतात, पण त्याचे दूरगामी परिणाम समजत नाहीत. त्यामुळे त्यांच्याशी सुसंवादाची आणि विश्वासाची बांधणी करण्याची संपूर्ण जबाबदारी मोठ्यांच्या जगाचीच आहे.

पण, ही जबाबदारी स्वीकरण्याइतपत मोठ्याचं जग खरंच समंजस आहे का? समाजमाध्यमांवर वावरण्याचं शहाणपण आणि सभ्यता मुळात मोठ्यांच्या जगाकडे आहे का? आदर्श सोडा, पण किमान माणूसपणाच्या पातळीवर वागण्याइतपत संवेदनशील मोठ्यांचं जग आहे का?

टीनएजर्सना जे समाजात, घरात, शाळा-कॉलेजमध्ये आणि आता सोशल मीडियावर दिसतंय, त्यातल्या बारीकसारीक गोष्टींच्या नोंदी घेऊन ते त्यांचं वर्तन ठरवू बघतायेत. विश्वास कुणावर ठेवायचा, याचे निर्णय घेताहेत. हिंदुस्थानी भाऊची लाट येईल, जाईल; पण मूलभूत प्रश्न आहे तो माध्यम शिक्षणाचा तसंच मोठ्या पिढीच्या सुसंस्कृतपणाचा. आणि या मोठ्यांच्या जगालाच तो तत्परतेने सोडवावा लागेल.

समाजात आजूबाजूला कसलेही आदर्श नसणं ही किती मोठी समस्या असू शकते, हे हिंदुस्थानी भाऊच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रकर्षाने पुढं आलं आहे. आजूबाजूच्या जगाशी कनेक्ट तुटलेली नवी पिढी त्यांचे आदर्श ऑनलाइन जगात शोधते आहे. जिथे मोठ्यांच्या जगाचाच वास्तवाशी संपर्क उरलेला नाही, तिथे टीनएजर्सकडून आपण कुठल्या अपेक्षा करतोय, याचं गणित एकदा बांधायलाच हवं. हिंदुस्थानी भाऊची लाट येईल, जाईल; पण मूलभूत प्रश्न आपल्या माध्यम शिक्षणाचा तसंच मोठ्या पिढीच्या सुसंस्कृतपणाचा आहे. आणि या मोठ्यांच्या जगालाच तो तत्परतेने सोडवावा लागेल.

(लेखिका समाजमाध्यमांच्या अभ्यासक आहेत.)

मुक्ता चैतन्य
muktaachaitanya @gmail.com

बातम्या आणखी आहेत...