आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुरिमा विशेष:माझी भाकरी... स्वावलंबन अन् समानतेची!

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण शिक्षक मुख्यालयी राहतात की नाही, यावर सध्या वादंग सुरू आहे. शिक्षक कुठेही असले, तरी ते विद्यार्थ्यांना शिक्षणाची, शाळेची ओढ वाटावी म्हणून ‘क्रिएिटव्ह’ प्रयत्न करत असतील, पटसंख्या वाढवण्यासाठी मेहनत घेत असतील आणि त्याचवेळी समानतेचं जाणीवमूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी पुढाकार घेत असतील, तर अशा शिक्षकांचे विद्यार्थी खऱ्या अर्थानं उद्याचं भविष्य असतात. सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील भक्तराज गर्जे या उपक्रमशील शिक्षकाच्या एका अनोख्या प्रयोगाविषयी...

आ धुनिक जगात आणि विशेषत: २१ व्या शतकात महिलांना समानतेची संधी प्राप्त होत आहे. तरीही ‘चूल आणि मूल’ यांची जबाबदारी मात्र महिला वर्गावरच असते. पुरुषांचा फारसा चुलीशी संबंध येत नाही. आणि विशेषत: भाकरी बनवणे हे अशक्य असते. आता शालेय जीवनातच मुलांना ‘माझी भाकरी’ देण्याच्या स्वावलंबनाचा धडा जत तालुक्यातील कलाळवाडीच्या प्राथमिक शाळेत दिला जात आहे. जत तालुक्यातील या दुष्काळी भागातील कष्टकरी समाज हा सहा ते सात महिने ऊसतोडीसाठी आपल्या गावापासून शेकडो मैल दूर वास्तव्याला जातो. या काळात घरातील वयोवृद्ध व मुलांची भोजनाची आबाळ होते. यावर या शाळेने सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचे दिसून येत आहे. या उपक्रमाची दखल जागतिक पातळीवरील माध्यमांनी घेतली आहे.

सांगली जिल्ह्यातील कुलाळवाडी (तालुका जत) येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील मुला-मुलींमध्ये समानता यावी व चुलीशी संबंध केवळ महिलांचाच असतो हा समजही नष्ट व्हावा या हेतूने शाळेतील विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचा धडा देण्यासाठीच ‘माझी भाकरी’ हा उपक्रम शिक्षक भक्तराज गर्जे यांच्या संकल्पनेतून मांडला गेला. त्यातून १८२ विद्यार्थ्यांनी भाकरी बनवण्याचे धडे गिरवले. पहिल्याच प्रयत्नात अनेक विद्यार्थ्यांनी चांगली भाकरी बनवून अनेकांना चकितही केले. याबरोबरच आपल्या घरातील पाल्य ऊसतोडीसाठी बाहेरगावी जातात त्या वेळी स्वत: बनवलेल्या गरमागरम तव्यावरच्या भाकरीचा स्वाद आपल्याला चाखता येणार आहे. या आनंदात उजळलेले चेहरेही पाहायला मिळाले.

महाराष्ट्राच्या सर्वश्रेष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या अहिराणी भाषेत ‘अरे संसार...संसार...जसा तवा चुल्ह्यावर...आधी हाताला चटके...तेव्हा मिळते भाकर’ या ओळीतूनच संसाराचा रेटा आणि जबाबदारी याची जाणीव करून दिली होती. आजपर्यंत प्रामुख्याने महिला वर्गांनाच दोन वेळचे उदरभरण करण्यासाठी हाताला चटके सोसावे लागत होते. याची साधी कल्पनाही पुरुषांना येत नव्हती. परंतु आता नवीन समाज घडत असताना ही जबाबदारी एकट्या महिला वर्गाची नाही तर साऱ्या कुटुंबाची आहे याची जाणीव या ‘माझी भाकर’ या योजनेतून प्रतीत केली जात आहे.

सांगली जिल्ह्यातील कायम दुष्काळी भाग म्हणून जत तालुक्याची ओळख आहे. या भागातून मोठ्या प्रमाणात ‘स्थलांतर’ होत आहे. शेती आहे, कष्ट करण्याची ताकद आहे, पण बळीराजाची सातत्याने अवकृपा असल्याने या भागातील बळीराजाला ऊसतोड मजुरीसाठी केवळ राज्यातीलच नव्हे, तर कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांत डेरा टाकून राहावे लागते. या काळात मिळवलेला पैसा घेऊन उर्वरित सहा महिने आपले जीवन व्यतीत करावे लागते. या काळात मुलांचे शिक्षण आणि जेवणाची मोठी आबाळ होते ही वस्तुस्थिती ध्यानात घेऊन शिक्षक भक्तराज गर्जे यांनी शिक्षणाच्या परिघाबाहेर जाऊन आपल्या भागातील विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी लक्षात घेऊनच हा अभिनव उपक्रम राबवण्याचा संकल्प सोडला. या शाळेची पटसंख्या काही वर्षापूर्वी केवळ ८० होती. त्यांच्या विविध उपक्रमांमुळे ही पटसंख्या आता २४० पर्यंत पोहोचली आहे. या उपक्रमामुळे मुलांचे स्थलांतर १०० टक्के रोखण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. ज्या वेळी आपल्या मुलांनाच घरचा स्वयंपाक करता येतो त्या वेळी त्यांचे पालक शिक्षणासाठी त्यांना आपल्या घरातच ठेवून ते मोलमजुरी करण्यासाठी निश्चिंतपणे जाऊ शकतात असा आपल्याला विश्वास वाटतो, असे मतही शिक्षक गर्जे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले.

२०१६ पासून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भाकरी बनवण्याची स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थी घरातूनच पीठ, तवा, काठवट, जळण इत्यादी साहित्य आणून शाळेच्या पटांगणावर तीन दगडांची चूल मांडून त्यांना भाकरी बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर या भाकरीचा आकार कसा असावा आणि चव कशी असावी याबाबत कोणते निकष आहेत हे त्यांना समजावून सांगण्यात येते. शाळेच्या या उपक्रमामुळे शाळेतील २४० विद्यार्थ्यांपैकी १८२ विद्यार्थी भाकरी बनवण्यात तरबेज झाले आहेत. शाळेतील विद्यार्थी बिरुदेव तांबे यांनी सांगितले की, शाळेत भाकरी बनवताना मला खूप आनंद मिळतो. माझी आई काबाडकष्ट करून आल्यानंतर घरात येऊन पुन्हा स्वयंपाक करते. तिला किती परिश्रम घ्यावे लागतात याचा अनुभवच मला आला आहे. ऊसतोडीचा हंगाम येत्या नोव्हेंबर महिन्यात सुरू झाल्यानंतर माझे आई-वडील बाहेरगावी गेल्यानंतर मी आणि माझ्या शाळेत शिकणारा माझा मोठा भाऊ आता स्वत: स्वयंंपाक करून घर चालवू, असा आत्मविश्वासही त्याने व्यक्त केला. शाळेच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही समानतेची जाणीव आता प्राप्त होत आहे.

गणेश जोशी संपर्क : samarth3101@gmail.com

बातम्या आणखी आहेत...