आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुरिमा विशेष:माझे बाबा माझे वस्ताद...

भाग्यश्री फंड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगासाठी “दंगल’ सिनेमा २०१६ मध्ये पडद्यावर आला. मुलींसाठी स्वत:चं सर्वस्व पणाला लावणाऱ्या बाबाचं सर्वांनी तोंंडभरून कौतुक केलं. मी आणि माझ्या धाकट्या बहिणीने, धनश्रीने मात्र हे सर्व खूप आधीच अनुभवलेलं आहे. “दंगल’मधला बाबा मोठ्या पडद्यावर होता. मात्र असा बाबा आम्हाला वास्तव आयुष्यात गुरू, मार्गदर्शक आणि प्रशिक्षक म्हणून लाभला.

माझे बाबा म्हणजे निवृत्त मेजर हनुमंत फंड. अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार हे त्यांचं मूळ गाव. गावातल्या जत्रांमध्ये कुस्तीचे सामने त्यांनी पाहिले आणि त्यांनाही कुस्तीप्रेमाने झपाटलं. गावातल्या समवयस्क मित्रांसोबत बाबांनी व्यायाम, डावपेच शिकायला सुरुवात केली. आजूबाजूच्या गावांमध्ये होणाऱ्या कुस्तीच्या स्पर्धाही त्यांनी गाजवल्या. माझ्या आजोबांना लेकराचं कुस्तीप्रेम समजत होतं. मात्र, घरची बेताची आर्थिक परिस्थिती, उत्पन्नाचा एकमेव मार्ग म्हणजे बेभरवशाचा शेतीव्यवसाय आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांमुळे आजोबांनी माझ्या वडिलांना नोकरी करण्याचा सल्ला दिला. वडिलांनाही या गोष्टीची जाणीव होती. त्यांनी भारतीय संरक्षण दलामध्ये भरती होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. लवकरच त्यांची ‘सीआयएफएस’मध्ये निवड झाली. एकीकडे बाबांना नोकरी मिळाल्याचा आनंद होता, तर दुसरीकडे पैलवानकी सुटल्याची खंत होती. मात्र, आपलं हे स्वप्न आपला मुलगा पूर्ण करेल ही खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली. २००३ साली माझा जन्म झाला. मुलगी जन्माला आलीय, तिला पैलवानकी कशी शिकवायची? लोक काय म्हणतील, असा विचार माझ्या बाबाच्याही मनात आला. पण, त्यांनी लोकांची पर्वा न करता मला कुस्तीचे धडे द्यायला सुरुवात केली होती. २००५ मध्ये माझ्या धाकट्या बहिणीचा, धनश्रीचा जन्म झाला. दुसरी मुलगी झाली म्हटल्यावर तर बाबांनी दोन्ही मुलींना कुस्तीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांपर्यंत पोहोचवण्याचा चंगच बांधला. आणि अभिमानाने सांगावेसे वाटते की आजघडीला आम्ही दोघी बहिणींनी राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतासाठी अनेक पदकं जिंकली आहेत.

आम्हा दोघींच्या या यशामध्ये माझ्या आई-बाबांचा आणि आजोबांचा खूप मोठा त्याग आहे. नोकरीमुळे बाबांच्या दर चार वर्षांनी बदल्या होत होत्या. मात्र त्यामुळे आमच्या शालेय शिक्षणात आणि कुस्तीच्या प्रशिक्षणात खूप खंड पडू लागला. त्याचदरम्यान दिनेश गुंड यांनी पुण्याच्या आळंदी इथे मुलींसाठी कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू केले होते. आम्ही दोन्ही बहिणींना बाबांनी त्या प्रशिक्षण केंद्रात दाखल केले. आम्हा दोघा बहिणींसोबत माझी आई आमच्यासोबत तिथे राहायची. आमच्या आहाराबाबत ती खूप जागरूक घ्यायची. मला आठवते, त्या वेळी मुलींना घरचं दूध मिळावं म्हणून माझे आजोबा टाकळी लोणार ते आळंदी असे आठवड्यातून तीनदा ये-जा करायचे. आपल्या मुलाचं स्वप्नं आपल्या नाती पूर्ण करताहेत, याचा अभिमान आम्हाला त्यांच्या डोळ्यात दिसायचा.

“दंगल’ सिनेमामुळे एकुणातच मुलींच्या क्रीडा क्षेत्रातल्या सहभागाला पालकांनी पाठिंबा द्यायला हवा, ही मानसिक रुजण्यात हातभार लागला. मात्र, विचारातला हा मोकळेपणा माझ्या वडिलांनी कैक वर्षे आधीच दाखवला होता. मला आठवतं, अनेकदा सरावासाठी महिला कुस्तीपटूंची कमतरता भासायची. अशा वेळी आखाड्यातल्या पैलवान मुलांसोबत सराव करण्यास आम्हाला वडिलांनी सांगितलं. आम्हाला सुरुवातीला ते थोडंसं विचित्र वाटलं. पण, मुलांसोबत सराव करताना आपण कुठे कमी पडतो आहोत, कुठे चुकतो आहोत, कुठे आणखी मेहनत घ्यायला हवं, याची स्पष्टता येत गेली. शिवाय, वडील मार्गदर्शक आणि प्रशिक्षक म्हणून पाठ थोपटायला आणि कान पिळायला पाठीशी होतेच. त्यामुळे सराव अधिक टोकदार होत गेला. ग्रामीण भागातल्या सामन्यांदरम्यान प्रेक्षकांमधून शेरेबाजीचाही वाईट अनुभव मिळाला. पण, त्याही वेळी आई-बाबा पाठीशी उभे राहिले. मला माझ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी विदेशात जायचं होतं. छत्तीसगडहून आम्हा मुलींचा संघ दिल्लीला पोहोचला, तेव्हा श्रीगोंद्याहून आई-बाबा दिल्लीला आले. सामन्याला निघण्याआधी मला नवीन बूट घ्यायचे होते. त्यासाठी मी आणि बाबा दिल्लीला दुकानांमधून खूप फिरलो. पण, बुटांची किंमत चार-साडेचार हजारांच्या पुढेच होती. इतके महाग बूट घेणं परवडणारं नव्हतं. मग वापरातले बूट शिवून घेण्यासाठी चांभार शोधतसुद्धा आम्ही खूप फिरलो होतो. आज आम्ही सुस्थितीत आहोत, पण अजूनही या आठवणींनी मनाचा एक कोपरा व्यापलेला आहे.. आपल्या मुलींनी जसं कुस्ती क्षेत्रात नाव कमावलं तसं इतर मुलींनाही ही संधी मिळायला, कुस्तीसारख्या मातीतल्या खेळात भारताचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हावं या हेतूने वडिलांनी श्रीगोंद्यासारख्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र सुरू केलं. आज या केंद्रात विविध राज्यांतील ५० ते ६० मुली सराव करत आहेत. कुस्ती पैलवान होऊन देशाचं नाव उंचावण्याचं आपलं स्वप्न वडिलांनी मुलासाठी बघितलं होतं. मात्र, आम्ही दोघी मुली जन्माला आल्यानंतरही त्यांच्या त्या स्वप्नात तसूभरही फरक पडला नाही. नोकरीची १७ वर्षे शिल्लक असताना, प्रमोशनचा घास हातातोंडाशी आलेला असताना वडिलांनी आमच्यावर पूर्ण लक्ष देण्यासाठी नोकरी सोडली. नोकरीच्या माध्यमातून मिळालेली सर्व रक्कम त्यांनी आम्हाला सरावासाठी आखाडा तयार करण्याकरीता गुंतवली. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात मुलींच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे असे आई-बाबा असतील, तर मुली प्रत्येक क्रीडा प्रकारात स्वत:ची मोहोर उमटवतील, असं मला मनापासून वाटतं... { संपर्क : 9850332310