आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुर्गम भागातील वाडे आणि तेथील संस्कृती फोटोत टिपायचं बऱ्याच दिवसाचं मनात होतं आणि एक दिवस कार्यक्रमाच्या निमित्ताने खेड्यात जाण्याचा योग आला. फिरत असताना बऱ्याचशा वाड्यांची पडझड झालेली दिसली, तर काही वाडे भणंग झाले होते. तेवढ्यात एका वाड्याच्या दरवाजातून प्रसन्न चेहऱ्याची आजी बाहेर आली. मला तिचाच फोटा काढण्याचा मोह झाला. तिने ओळख नसताना वाड्यात येण्याचा आग्रह धरला. मी आत गेले नि गप्पा सुरू झाल्या. मी सहज विचारलं, पूर्वी किती छान असतील ना वाडे! ती क्षणभर काहीच बोलली नाही. काय सांगू तुला म्हणून ती सांगू लागली... घरं माणसांनी भरलेली असायची. माणसा-माणसांत मेळ होता. माणसं कडक नव्हती, पण एकमेकांबद्दल दरारा असायचा. गाव कसं एक होतं. कुणाच्या घरी कार्य निघालं तर सारा गाव आपल्याच घरचं कार्य समजून पत्रावळ्या उचलण्यापर्यंतची सर्व कामे करायचा. नवरी वाटे लावायला गावातील साऱ्या बायका वेशीपर्यंत येऊन भरल्या डोळ्यांनी निरोप देत. कुणाच्या घरी दु:ख झालं तर गावात चूल पेटत नव्हती. सुखाची चांदणी निघाली की सारा गाव जागा व्हायचा, दूध-दुभत्याचे कुणी पैसे घेत नव्हते.
आपल्या घासातला घास पक्षाचाही असतो, म्हणून शेतकरी देवळात भरल्या दाण्याची कणसं टांगायचा. बाराही महिने नद्यांना पाणी होतं. स्वस्ताई होती, माणसाला-नात्याला किंमत होती. माणसं नाती जपायची. जातपात होती, पण माणसाचा-माणसावर जीव होता. आता काही राहिलं नाही. ना माणसे, ना वाडे, नाव ह्यो गाव असं म्हणून तिने भरले डोळे पदराने पुसले. माझ्या गालावरून हात फिरवून बोटे मोडली. तिने फिरवलेल्या हाताच्या स्पर्शाने मला भूतकाळात नेले. खेड्याचा मला कसलाच अनुभव नाही. पण मी मात्र अस्वस्थ होऊन बाहेर पडले. अन् त्याच वेळी मला प्रा.शशिकांत शिंदे यांची ‘माणूसपण गारठलंय’ ही कविता आठवली.
प्रत्येकाची कणगी भरून । धान्य मोप असायचं ॥ दूध-दुभतं, तूप-लोणी । याला माप नसायचं ॥ पसाभरून धान्य तर । चिमणी दारात टिपायची ॥ पै-पाहुण्यांसाठी । माय दिवसरात्र खपायची ॥
प्रियंका सातपुते संपर्क : ७३८५३७८८५६
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.