आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफुटबॉलला बहुसांस्कृतिकता आणि स्थलांतरितांच्या समावेशाचा फायदा होऊ शकतो, तर बाकीच्या समाजाने मागे का राहावे? आंतरराज्यीय आणि जागतिक स्थलांतरामुळे जगभरातील देशांच्या समृद्धीत भरच पडली आहे.
अनेक खळबळजनक चढ-उतारांच्या या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतून काही निर्विवाद निष्कर्ष काढायचे तर ते असे की, या सर्वात कठोर मेहनतीच्या खेळात आता सर्वांना समान संधी मिळत आहेत. मोरोक्कोचा नाट्यमय उदय हे याचे उदाहरण आहे. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा हा पहिला आफ्रिकन संघ ठरला. जागतिकीकरणाचे नमुने आता बदलत आहेत, त्यामुळे नवीन जागतिक व्यवस्थेला जन्म दिला जात असल्याचे याने निदर्शनास आणून दिले. खरे तर २००२ मध्येही दक्षिण कोरियाने उपांत्य फेरी गाठून सर्वांना चकित केले होते, तर तुर्कीने तिसरे स्थान पटकावले होते. कॅमेरून, सेनेगल, अल्जेरिया या आफ्रिकन संघांनी यापूर्वी धक्कादायक उलथापालथ केली आहे. १९६६ मध्ये उत्तर कोरियाने इटलीचा पराभव केला, परंतु नंतर त्यांचा विजय शल्यरहित बाण मानला गेला, तो नवीन युगाचा सूचक नव्हता. यंदाच्या विश्वचषकात मोरोक्कोचे यश वेगळे आहे. कारण मोरोक्कोच्या यशाला कारणीभूत ठरलेली व्यवस्था खेळांच्या बदलत्या स्वरूपाचे संकेत देते.
मोरोक्कोच्या यशाची सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे त्यांच्या २६ जणांच्या संघात १४ गैर-मोरक्कन होते. त्यापैकी बहुतांश युरोप आणि इतर प्रदेशांमधून स्थलांतरित समुदायाशी संबंधित आहेत. टुर्नामेंट सुरू होण्यापूर्वी चेल्सी आणि पीएसजीसारख्या मोठ्या क्लबसाठी खेळणाऱ्या केवळ हकीम झिएच आणि अश्रफ हकीमी यांना जगभरात ओळखले जात होते. पण, आता युनूस बोनो, सोफियान अब्राबात, सोफीन बुफाल हेही ओळखीचे चेहरे झाले आहेत. फुटबॉलमधील मोरक्कन स्थलांतरितांचे यश हे दर्शवते की खेळ राजकारण रोखू शकत नाही अशा सीमा ओलांडू शकतो. आज एकट्या युरोपमध्ये अंदाजे ५० लाख मोरक्कन प्रवासी आहेत. ते युरोप खंडात पसरलेल्या अडीच कोटी अरब स्थलांतरितांपैकी आहेत. त्याच्या मजबूत उपस्थितीमुळे युरोपच्या उजव्या विचारसरणीच्या नेत्यांना संशय आला आहे. अरब मुस्लिम आणि मुख्य प्रवाहातील युरोपीय समुदायांमध्ये वैर वाढत आहे. अरब स्थलांतरितांना राष्ट्रीय अस्मिता, अंतर्गत सुरक्षा आणि सामाजिक सौहार्दाला धोका म्हटले जाते.
परंतु, सुदैवाने फुटबॉलच्या सुंदर खेळात अशा कुरूप गोष्टींना स्थान नाही. क्रीडा स्पर्धा ही एखाद्याची प्रतिभा दाखवण्याची संधी असते, त्यामध्ये सर्वांना समान संधी मिळते. कतारमध्ये होत असलेल्या विश्वचषकात १२५ खेळाडू होते, जे दुसऱ्या देशात जन्मलेले आणि दुसऱ्या देशाकडून खेळत होते. ज्या युरोपीय देशांनी अलीकडच्या काळात चांगली कामगिरी केली आहे त्यांनीदेखील बहुलता स्वीकारली आहे. स्वित्झर्लंडचा कर्णधार ग्रॅनिट शाका आणि संघाचा स्टार मिडफिल्डर झेर्डन शकिरी, दोघेही अल्बेनियन वंशाचे आहेत. स्विस पथकातील अनेक सदस्यांचा जन्म परदेशात झाला आहे, हे खुल्या इमिग्रेशन धोरणांमुळे समुदाय कसे बदलले आहेत याचे द्योतक आहे. २०१४ मध्ये विश्वविजेता फ्रान्समधील बहुतांश खेळाडू स्थलांतरितांची मुले होती. २०२२ चा फ्रेंच संघही त्याला अपवाद नाही. सुपरस्टार खेळाडू कायलियन एमबाप्पेचे वडील कॅमेरोनियन वंशाचे आहेत, तर आई अल्जेरियन आहे. त्याचा प्रथम शोध फ्रेंच क्लब एएस बोंडीने घेतला. आज अनेक फ्रेंच खेळाडू या क्लब प्रणालीचे उत्पादन आहेत, जे बहुजातीय क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देते. आज इंग्लंडचा संघही एका नव्या बहुसांस्कृतिक ब्रिटनचे प्रतिनिधित्व करतो, तर १९६६चा विश्वविजेता इंग्लंड संघ सर्व गोरा होता. आज बुकायो साका, रहीम स्टर्लिंग, ज्युड बेलिंगहॅम आणि मार्कस रॅशफोर्डसारखे कृष्णवर्णीय खेळाडू तिथे खेळत आहेत. ब्राझील आणि अर्जेंटिना या दक्षिण अमेरिकन संघांचा अपवाद वगळता – जिथे आजही बहुतांश खेळाडू स्थानिक आहेत – राष्ट्रीय सीमा आता उर्वरित जगामध्ये फुटबॉलच्या मैदानावर पुसत आहेत.
मग प्रश्न असा पडतो की, फुटबॉलला बहुसांस्कृतिकता आणि स्थलांतरितांच्या समावेशाचा फायदा होऊ शकतो, तर उर्वरित समाज मागे का? सत्य हे आहे की, आंतरराज्यीय आणि जागतिक स्थलांतरामुळे जगभरातील देशांची समृद्धी वाढली आहे. फुटबॉल स्थलांतरितांच्या यशात भारत आणि जगासाठी धडे आहेत की, तुम्ही कल्पकतेने प्रतिभेच्या चळवळीला प्रोत्साहन दिले तर त्याचा फायदा तुम्हालाच होईल, इतर कोणालाच होणार नाही.
राजदीप सरदेसाई ज्येष्ठ पत्रकार rajdeepsardesai52@gmail.com (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.