आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • New Opportunities For India In Europe After The Ukraine Crisis | Article By Dr. Vedpratik Vaidic

विश्लेषण:युक्रेन संकटानंतर युरोपमध्ये भारतासाठी नवीन संधी

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीन दिवसांचा युरोप दौरा असाधारण आणि ऐतिहासिक मानला जाईल, कारण त्यांनी महत्त्वाच्या सात युरोपीय देशांच्या नेत्यांशी मुक्तपणे संवाद साधला. कोरोना महामारीनंतर ते पहिल्यांदाच इतक्या देशांमध्ये गेले होते. जर्मनी आणि फ्रान्सच्या नेत्यांनी नुकत्याच निवडणुका जिंकल्या आहेत. या वेळी त्यांची दोघांसोबत झालेली भेट द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. युक्रेनमधील युद्धादरम्यान आशियाई नेत्याच्या युरोप दौऱ्यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. युरोपमध्ये राहणाऱ्या दहा लाख भारतीयांशीही मोदींनी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. या भेटीमुळे जागतिक राजकारणात भारताचे महत्त्व आणखी वाढू शकते.

गेल्या दोन महिन्यांपासून युक्रेनवर सुरू असलेल्या रशियन हल्ल्याने संपूर्ण जग हादरले आहे. अणुयुद्धाच्या धमक्याही वेळोवेळी ऐकायला मिळतात. सर्व युरोपीय राष्ट्रे आणि अमेरिका मिळून युक्रेनला मदत करत आहेत, पण युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. अशा परिस्थितीत भारताने रशियाचा निषेध करावा, आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर त्याविरोधात मतदान करावे आणि पाश्चात्त्य निर्बंध लागू करावेत, अशी अमेरिका आणि युरोपीय देशांची इच्छा आहे. मोदींच्या या दौऱ्यात या सर्व राष्ट्रांनी आपली मागणी स्पष्टपणे मांडली, पण भारत आपल्या भूमिकेवर ठाम राहिला. आपण युक्रेनमधील युद्धबंदीचे भक्कम समर्थक आहोत, परंतु पाश्चात्त्य राष्ट्रांप्रमाणे एकतर्फी दृष्टिकोन स्वीकारणार नाही, असे संयुक्त संभाषण, परस्पर चर्चा आणि सार्वजनिकरीत्या भारताने स्पष्ट केले आहे की.

मोदींच्या भेटीपूर्वी युरोपीय राष्ट्रांच्या दबावामुळे भारत आपली वृत्ती मवाळ करील की काय, अशी भीती व्यक्त केली जात होती. खरे तर ही नाटो राष्ट्रे व अमेरिका युक्रेन संकटाला जबाबदार आहेत, त्यांनी युक्रेनला नाटोमध्ये सहभागी होण्याचे आमिष दाखवून रशियाच्या हल्ल्याचा बळी बनवले. आजही रशियाकडून मोठ्या प्रमाणावर ३५ लाख बॅरल तेल आणि गॅस घेत असलेली ही युरोपीय राष्ट्रे कोणत्या तोंडाने भारताला रशियाला विरोध करण्यास सांगू शकत होती? याच असहायतेमुळे जर्मनी आणि फ्रान्स भारतावर कोणताही दबाव टाकू शकले नाहीत.

या भेटीदरम्यान मोदींनी जर्मनी, फ्रान्स, डेन्मार्क, फिनलंड, स्वीडन, नॉर्वे व आइसलँड या सात युरोपीय देशांच्या नेत्यांशी वैयक्तिक आणि सामूहिक संवाद साधला. वैयक्तिक भेटींमध्ये मोदी परदेशी नेत्यांना ज्या उत्साहाने भेटतात तो त्यांच्यासाठी नवीन आणि आकर्षक अनुभव आहे. जर्मनीचे चान्सलर ओल्फ स्कोल्झ असो वा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, डेन्मार्कचे पंतप्रधान मॅटी फ्रेड्रिक्सन किंवा स्वीडनचे पंतप्रधान मॅकडालिना अँडरसन असोत, सगळ्यांनी पहिल्याच भेटीत मोदींशी मोकळेपणाने संवाद साधला. त्यांना मिळालेल्या दुर्मिळ भेटवस्तूंमुळेही ते सद्गदित झाले होते.

या भेटीत युरोपीय देशांमध्ये पर्यावरण-स्वच्छतेवर सखोल चर्चा झाली. पर्यायी हरित ऊर्जेबाबत अनेक करार झाले. फ्रान्स आणि जर्मनीने ‘ग्रीन हायड्रोजन टास्क फोर्स’च्या माध्यमातून भारताला सहकार्य करण्याचा संकल्प केला आणि या मोहिमेसाठी जर्मनी पुढील आठ वर्षांत १० अब्ज डॉलर्स खर्च करेल. जगातील श्रीमंत राष्ट्रांच्या तुलनेत भारतात फारच कमी प्रदूषण होते हे खरे आहे, परंतु सुमारे १४० कोटी लोकसंख्या असलेल्या या विकसनशील राष्ट्राने प्रदूषण नियंत्रणाबाबत कठोर पावले उचलली नाहीत, तर ३०-४० वर्षांनंतर प्रदूषणाचा धोका वाढेल. भारतातील लोकांना निरोगी राहणे कठीण आहे.

चीन आणि अमेरिकेच्या तुलनेत भारताचा युरोपशी व्यापार नगण्य आहे. भारत हा लोकसंख्येनुसार जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे, परंतु युरोपशी व्यापार करणाऱ्या देशांमध्ये तो १०व्या क्रमांकावर आहे. भारत आणि युरोपीय देशांमधील मुक्त-व्यापार चर्चेला १५ वर्षे झाली आहेत, परंतु मोदींच्या दौऱ्यात उभय देशांमधील संवाद लवकरच फलदायी होईल, असे दिसते. युक्रेन युद्धामुळे रशिया आणि युरोपमध्ये निर्माण झालेल्या तणावाचा अपेक्षित फायदा भारताला मिळू शकतो. या भेटीमुळे भारताची युरोपीय राष्ट्रांशी असलेली जवळीक भविष्यातही वाढू शकते. याचा फायदा आपल्याला प्रशांत महासागर क्षेत्रातही होणार असून जागतिक राजकारणातही नवे समीकरण तयार होऊ शकते. अमेरिकेचे मांडलिक होऊन राहावे, असे फ्रान्स आणि जर्मनी यांना वाटत नाही. चीनच्या आर्थिक आणि राजकीय आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत हा युरोपचा सर्वात सुरक्षित मदतनीस ठरू शकतो. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) डॉ. वेदप्रताप वैदिक भारतीय परराष्ट्र धोरण परिषदेचे अध्यक्ष dr.vaidik@gmail.com

बातम्या आणखी आहेत...