आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभ्रमाचे मिथक:पडवीतली नवी वस्ती

दत्ता पाटील18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पडवीतल्या सदरा टांगायच्या खुंटीच्या वर गांधी-नेहरूंच्या आडव्या फ्रेमीमागं बरंच गवताड चिमण्यांनी जमा केलं होतं. त्या भर्रकन् मागं गेल्या. मघाशी लांब चोचीचा छोटा पक्षी पण जागा बघून गेला होता. तो जोडीदाराला घेऊन आलाय. बाहेर झळा वाढायला लागल्या तसतशी रानातली पाखरं निवारा शोधायला हिकडं पळताहेत... येऊ द्या, मंग काय तं! आख्खी रांग हाय फोटोंची.. त्यांच्या आसऱ्याला पक्ष्यांची नवी वस्ती हुभी राहिली तरी लय झालं...

प डवीत बसलोय. समोर लांबपर्यंत पाहता येतंय. ऊन बेक्कार तापलंय. त्याच्याकडं बघत बघत मघाशी घरात रांजणातून पाणी प्यायला गेलो तेव्हा रात्री असतो तेवढा अंधार डोळ्यापुढं पसरला होता. साधं मातीचं जुनं घर होतं हे. मग वरून सिमेंटचे पत्रे टाकून डागडुजी करून दोन खोल्या नीट करून घेतल्या होत्या धा वर्षापूर्वी. दिवसभर शेतात काम करताना मध्ये मध्ये बूड टेकायला, पसरायला, रात्री उशीर झालाच तर इथंच अंग टाकायला बरं पडतं हे घर. मागं पावसाळ्यात फेसबुकला फोटो टाकून ‘अवर फार्म हाऊस’ असं लिव्हलं होतं. ‘वा वा, हे खरे सुख!’ ‘आम्हाला बोलवा की वीकेन्डला!’ ‘ॲग्रो टुरिजम चालू केले का?’ ‘किती किलोमीटर आहे मुंबईपासून?’ अशा लय कमेंट आल्या. उन्हाळ्यात शेताच्या शेवटच्या टोकावरून पाहिलं, तर हे घर लयच गरीबडं दिसतं. गावात जुनं घर पाडून नवीन दोन मजली भारी घर बांधल्यापासून तर मळ्यातलं हे घर जास्तच जुनं वाटायला लागलं.

गावात नवं घर बांधताना मळ्यातल्या ह्या जुन्या पडवीतले सगळे फोटो मात्र कोणी नेले नाही नव्या घरात. एका रांगेत सगळे एकमेकांच्या शेजारी विनातक्रार नांदत बसलेले. आपल्याकडं किंचित तिरके कललेले. तीन पिढ्यांपासून एकेक करत वाढत वाढत आता थांबलेले. काही कळकट, तर काही धुरकट.. पण दिसतात! उजवीकडून पैला नंबर फोटो छत्रपती शिवाजी महाराज अन् राजमाता जिजाऊंचा एकत्र... मंग शेजारची फ्रेम छत्रपती संभाजीराजेंची... मंग छत्रपती शाहू महाराज... बाजूला विवेकानंद... त्या बाजूला सप्तशृंगी देवी.. मंग त्रिमुखी दत्तगुरू.. वाघाच्या बछड्यांना घेऊन बसलेले चक्रधरस्वामी..

बाजूला महात्मा फुले... मंग जरा कोपरा येतो. तिथं लाकडी जुन्या पलंगाच्या बरोबर वर बापाच्या सदरा टांगायच्या खुंटीच्या पण वर महात्मा गांधी नि पंडित नेहरू एकाच फ्रेमीत.. मंग साने गुर्जी.. लोकमान्य टिळक.. शेजारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची फ्रेम... पंचायत समितीत थोरल्या भावाचा क्लासमेट राखीव जागेतून निवडून आला व्हता. त्यानं १९९० ला थोरल्या भावाला दिली व्हती ही फ्रेम. बाजूला सुभाषबाबू.. सप्ताह बसला व्हता तवा पाचशे रुपये देणगी दिली व्हती घराची. तव्हा मिळालेली विठोबा – रखुमाईची काचेतली फ्रेम.. बाजूलाच खेटून इंदिरा गांधींची पण फ्रेम आहे.. नवनाथांचा रंगीत मोठा फोटोही आहे तिथं बाजूलाच.. शेजारी चमचमत्या फ्रेममध्ये देखण्या काळ्याभोर डोळ्यांचे संत ज्ञानेश्वर माऊली आहेत.. पांढऱ्या स्वच्छ कपड्यातले नामस्मरणात तल्लीन झालेले संत तुकाराम महाराज आहेत.. मंग, थोरल्या भावाच्या लग्नातलं जुनं उंच गोदरेज कपाट आहे. त्याच्या बरोब्बर वर, धुळ्यातल्या आत्याच्या पुण्यातल्या जावयानं १९९३ मधी दिलेली श्रीमंत दगडूशेठ गणपतीची फ्रेम आहे.. गणपतीबाप्पाच्या शेजारी चंदनाच्या हारातला आमचा वैकुंठवासी आज्जा आहे.. बाजूला झेंडूच्या वाळलेल्या हारातली गं. भा. कै. आजी आहे.. तिच्या बाजूला मंग राजीव गांधी आहेत.. राजीव गांधींच्या शेजारी तरुणपणातला, स्काऊट गणवेशातला डोळे वटारलेला काळा बाप आहे.. तरुण बापाच्या बाजूलाच बेलबॉटम पँट नि बच्चन कटवाले बहिणीचे मिस्टर अर्थात १९८३ मधी कंपनीत कामगार असलेले ब्लॅक-व्हाइट दाजी आहेत..

कंपनीत सुपरवायझर झाल्यावर त्याच दाजींनी १९९५ दिलेली साईबाबांची रंगीत फ्रेम पण आहे.. बास.. इथं भिंतच संपतीय. हां, म्हंजे, दसरा-दिवाळीच्या साफसफाईत सगळे खाली उतरवले जातात.. घरातले समदे मिळून ते परत वर लावताना शिवाजी महाराज वगळता सगळ्यांच्या जागांची अदलाबदल होऊन जाते.. जसं की, वैकुंठवासी आज्जा एका दिवाळीत संत ज्ञानोबा माऊलींच्या, तर पुढच्या दिवाळीत जगद्गुरू तुकोबांच्या जागी जाऊन बसतो, तर महाराज नि जिजाऊंच्या फोटोशेजारी गं. भा. कै. आज्जी टेचात जाऊन बसते.. याशिवाय अनेकांच्या जागांची अदलाबदल होऊनही कुणाचा कुणालाच राग-लोभ नाय.. आता नव्या-जुन्या कुठल्याही “भाग्यइधात्याला” ह्या पडवीत जागा शिल्लक राहिलेली नाय...

गावातल्या घराची वास्तुशांती वडलांनी, भावानं टेचात केली. गणपतीच्या एकशे ऐंशी फ्रेमी गिफ्ट आल्या. छत्रपती शिवरायांच्या साठ आल्या. उरलेल्या एकशे सव्वीस फ्रेमींमध्ये स्वामी समर्थ, गजानन महाराज, प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले, अमरनाथ, माँ वैष्णोदेवी, तिरुपती बालाजी (एलईडी लायटिंगची फ्रेम. ही नव्या घरात लावलीय. त्यामुळं गावाकडं असून पण शहरातलं वाटायला लागलंय घर), समर्थ रामदास स्वामी अन् निरनिराळ्या मठांच्या काही पूज्य महाराज मंडळींच्या आहेत. एवढ्या फ्रेमींचं काय करायचं? इकडं जुन्या भिंतीवर जागा नाय. कारण वाडवडलांनी बरोबर तेवढीच भिंत बांधून ठेवली. नेमकीच. जागा वाढली की नवनवे देव, भाग्यइधाते गर्दी करायला बघतात, हे त्यांना कळलं होतं. आता नव्या घरात मोठी जागा हाय, पण एवढ्या आलेल्या फ्रेमी थोडीच लावणार? मग त्यातले एक-दोन बाबाबुवा देवघरात लावले. महाराजांची मोठी फ्रेम हॉलच्या भिंतीवर लावली. बाकीच्या फ्रेमी गावातल्या निरनिराळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं गिफ्ट देऊन टाकल्या.

कधीतरी हे पण घर दुरुस्तीला निघंल, तव्हा ह्या जुन्या फ्रेमींचं काय करायचं? एक दोस्त म्हटला व्हता, की मंदिरात देऊन टाकायच्या. तिथं देवाधर्माच्या देता येतील. पण हे महापुरुष? तो म्हणला, ग्रामपंचायतीचं वाचनालय चालू झालं की, तिथं देऊन टाकू. हा मुद्दा पटला. पण, दुसरा दोस्त म्हणला, सत्ता कोणाचीय तुला म्हाईताय.. ह्या महापुरुषातले त्यांच्या पार्टीच्या नेमात बसतील, तेच ते घेतील. बाकीच्यांचं काय? हा पण मुद्दा पटला. आपल्या जुन्या घरानं समद्यांना नीटनेटकं एकत्र धरून ठेवलं, पण इथून काढलं तर समदे महापुरुष वाऱ्यावर सोडल्यागत व्हईल. मग ठरवूनच टाकलं, देवाधिकांच्या फ्रेमींसाठी गावातल्या चौकाचौकात एवढ्यात लय मंदिरं झालीयत. तिथं त्या देऊन टाकू. महापुरुषांना मात्र गावानं जागाच ठिवली नाय. त्यामुळं इथला आपल्या पडवीतला एक पण महापुरुष बाहेर कोणाला द्यायचा नाय अन्‌ नवा कोणताच महापुरुष आपल्या पडवीत आणायचा नाय! ह्यो आपल्या बारदानाचा नियम म्हंजे नियम!

तळतळत्या उन्हात पण चिमण्यांचा आवाज आला. हाळाजवळच्या नळातून टपकणारं पाणी भरउन्हात पिऊन दोघी-तिघी कलकलत पडवीत आल्या. सदरा टांगायच्या खुंटीच्या वर गांधी-नेहरूंच्या आडव्या फ्रेमीमागं बरंच गवताड त्या चिमण्यांनी जमा केलेलं. भर्रकन् मागं गेल्या. मघाशी लांब चोचीचा छोटा पक्षी पण जागा बघून गेला होता. तो जोडीदाराला घेऊन आलाय. बाहेर झळा वाढायला लागल्या तसतशी रानातली पाखरं निवारा शोधायला हिकडं पळताहेत... येऊ द्या, मंग काय तं! आख्खी रांग हाय फोटोंची.. त्यांच्या आसऱ्याला पक्ष्यांची नवी वस्ती हुभी राहिली तरी लय झालं...

संभ्रमाचे मिथक
दत्ता पाटील
dattapatilnsk @gmail.com
संपर्क : ९४२२७६२७७७