आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनलॉक:‘बिहार म्हणजे संस्कृतिप्रधान राज्य...’

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘भारताचीच नव्हे, तर सबंध मानवजातीची संस्कृती बिहारनं जपली आहे. आजही बिहारमधल्या छोट्या-मोठ्या गावात बहुतेक प्रश्न हाणामारीनंच सोडवले जातात. कारण आदिमानवही तसेच प्रश्न मिटवत होते. तीच मानवजातीची खरी संस्कृती आहे. ती आपण जपली पाहिजे...’ साठ वर्षांचे श्रीप्रसादचाचा बोलत होते अन् मी सुन्न होऊन ऐकत होतो...

‘खरं पाहायला गेलं तर तुमच्या महाराष्ट्राचीही आमच्या बिहारसारखी प्रगती व्हावी म्हणून आमचे बिहारी लोक तुमच्या राज्यात येतात...’ या एका वाक्यानंच माझ्या डोळ्यावरची झोप उडाली. वेळ सकाळची होती. बिहारमधल्या गया जिल्ह्यातल्या एका बारक्या खेडेगावात मित्राच्या लग्नाला मी गेलो होतो. काळा चहा हातात घेऊन मी घरासमोरच्या बाजावर बसलो होतो, तोच श्रीप्रसाद चाचा नावाचे एक गृहस्थ माझ्यापुढं येऊन बसले. त्यांनी इकडची तिकडची चौकशी केली आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बिहारी लोक तुमच्या राज्यात येतात, असा बॉम्ब माझ्यावर फेकला. तोवर अजून दोन जण समोर येऊन बसले. एकाच्या हातात बंदूक, तर दुसऱ्याकडे तलवार. खिशाला पेन अडकवावा तशा सहजपणे कंबरेला तलवार लटकवून तो फिरत होता. बंदूक पाहून आधी मला तो बँकेतला सिक्युरिटीवाला असेल असं वाटलं. पण, तो नवरदेवाचा काका होता आणि गावातला मोठा जमीनदारही होता. दोघं शस्त्रधारी नातेवाईक समोर बसले आणि मी आवंढा गिळला... माझ्याकडं एकटक बघत ते बिहारी म्हणाले, ‘तुम्ही मनसेचे कार्यकर्ते का?’ माझ्या तर अंगावरच काटा आला. मी बळजबरी हसंत म्हणालो, ‘तुमच्याकडं थंडी जरा जास्तच आहे ना?’ एकाने लालभडक डोळ्यांनी माझ्याकडं बघत खिशातून चिलीम काढून तिच्यात गांजा भरला आणि तो चेतवला. भला मोठा झुरका घेत दुसऱ्याच्या हातात चिलीम देत म्हणाला, ‘थोरात साहेब, तुम्ही बिहारमध्ये जन्मायला पाहिजे होतं. मग तुम्हाला समजलं असतं की बिहार किती प्रामाणिक आणि शांत राज्य आहे.’ हे ऐकून मला ठसका लागला. गांजाच्या धुरामुळे ठसका लागल्याचं त्याला सांगितलं. तसा तो म्हणाला, ‘तुम्हा महाराष्ट्रीयन लोकांत प्रतिकारशक्तीच कमी आहे. याचं कारण म्हणजे तुमचा जास्तीत जास्त वेळ शिक्षण घेण्यात जातो. त्यापेक्षा तुम्ही जंगलात फिरायला पाहिजे. आदिमानव शाळेत जात नव्हते, तर त्यांना कुठले आजार होत होते का?’ त्याच्या या प्रश्नावर काय उत्तर द्यावं तेच समजेना. तसा तलवारवाला माझ्याकडं बघत म्हणाला, ‘शाळेत मुलं फक्त बसून राहतात. त्यामुळं ते आळशी बनतात. म्हणून आम्ही आमच्या घरातल्या एकाही मुलाला शाळेत पाठवत नाहीत. पेन हातात घेऊन तुम्ही लोकांना फक्त ज्ञान द्याल, पण तलवार हातात असंल तर तुम्ही लोकांना न्याय देऊ शकता..’

हे एेकून दुसऱ्यानं त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. त्याचं वाक्य खरोखरच भारी होतं. पण, पाचशे वर्षांपूर्वी हे वाक्य चाललं असतं. आजच्या काळात ते पटणं जरा कठीणच होतं. तरीही या लोकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे, असा विचार करत मी म्हणालो, ‘...पण तुमचा रामप्यारे आमच्या महाराष्ट्रात आला.

शिक्षण घेतलं. चांगल्या नोकरीला लागला. उद्या त्याचं लग्नही आहे. तो सुधारलाच की..’ तसे त्याचे काका हसत म्हणाले, ‘किती पगार आहे त्याला? महिन्याला सत्तर हजार? तो बघा आमचा लल्लन.. म्हशी धुतोय.. तो कधीच शाळेत गेला नाही. महिन्याला दोन लाख कमावतो! आणि रामप्यारे आत्ताशी पहिलं लग्न करतोय. आमच्या लल्लनची चार लग्न झालीत. आणि सगळ्या बायका नीट नांदताहेत. तुमच्या महाराष्ट्रात जाऊन रामप्यारे पार बिघडला. पण, तो आमच्या थोरल्या भावाचा एकुलता एक मुलगा. म्हणून आम्ही गप बसतो.’ मला या लोकांचं लॉजिकच कळत नव्हतं. कशाचाही कशाला संबंध जोडत होते. तसा साठ वर्षांच्या श्रीप्रसाद चाचांनी गांजाचा धूर घशात भरला आणि वैचारिक भाव चेहऱ्यावर आणत माझ्याकडं बघत हताश आवाजात बोलू लागले, ‘आम्ही बिहारी लोकांनी या देशासाठी खूप केलं. प्रत्येक राज्यात आमची लोकं गेली. प्रत्येक राज्यातल्या लोकांना सुधरवण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला. पण, कुणालाच आपली संस्कृती जपायची नसंल तर आम्ही तरी काय करणार? बंदुका, तलवारी, चाकू हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे. तो आम्ही बिहारमध्ये उघड उघड मिरवतो, तर शिकलेली लोकं या ठेव्याला नावं ठेवतात. पारंपरिक काळापासून स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते. ही जुन्या लोकांची आपल्याला दिलेली शिकवण आहे. पण, सुधारणावादी विचारांचं विष प्यायलेले लोकं स्त्रियांना समान वागणूक देऊन थेट आपल्या इतिहासालाच आव्हान देत आहेत. मद्य, गांजा, तंबाखू, सिगारेट या मन:शांतीच्या साधनांना तुम्ही नावं ठेवली. महाराष्ट्रातल्या तरी किती तरी गावांमध्ये दारुबंदी आहे. तिथं राहणारी आमची भावंडं आम्हाला ही गोष्ट सांगतात तेव्हा आमच्या काळजात किती कालवाकालव होते, याचा विचार केलाय तुम्ही? खून करणं, चोऱ्या करणं हे काही गुन्हे नाहीत. खून हा बदला असतो, तर चोरी ही गरज असते. पण, तुमच्या व्यवस्थेने मानवी जीवनधारेचे सगळे नियमच बदलून टाकले आहेत..’

तिथला गांजा खरोखरच कसला कडक असतो हे त्या वेळी मला समजलं. कारण त्याच्या वासानं अन् श्रीप्रसादचाचांच्या बोधामृतानं मलाच झिंग चढायला लागली होती. पुढं बोलायचीच भीती वाटत होती. तसा तलवारवाला काका म्हणाला, ‘तुमच्या घरी काय हत्यार बित्यार आहे की नाही?’ मी घाम पुसत म्हणालो, ‘नाय नाय, आम्ही शांतताप्रिय माणसं आहोत. आम्हाला कुठल्या हत्याराची गरज पडत नाही.’ तसा तो हसत हसत म्हणाला, ‘खूपच कॉमेडी बोलता राव तुम्ही. आमच्या गावात आहे तोवर तर एखादं हत्यार सोबत ठेवा..’ असं म्हणत तो बाजेच्या पायाशी बसला अन् खाली वाकून काहीतरी शोधू लागला. मीही खाली वाकत म्हणलं, ‘काय शोधताय काका? मदत करू का?’ तसा तो बाजेखाली शिरत म्हणाला, ‘काल एक गावठी कट्टा पडला होता हितं. थांबा, आहे का बघतो..’ असं म्हणत तो बाजेखाली घुसला आणि खालून एक पिस्तूल काढलं. त्यावरची माती झटकत म्हणाला, ‘हे घ्या. असू द्या तुमच्याकडं. परवा रात्री पडलं होतं खाली. तर काढायचं लक्षातच राहिलं नाही.’ मी नको म्हणत असताना त्यानं तो गावठी कट्टा माझ्या हातात दिला. जिवंत साप हातात धरल्यासारखा माझा हात थरथर कापत होता. तसा बंदूकवाला म्हणाला, ‘अहो, उद्या लग्न आहे आमच्या इथं. उगीच भांडणंबिंडणं झाली तर नवरदेवाचे मित्र म्हणून मुलीकडच्यांनी तुम्हाला नको मारायला. म्हणून ठेवा सोबत..’ मला आता दरदरून घाम फुटला होता. मी म्हणालो, ‘पण, ते मला का मारतील?’ तसा तो म्हातारा चाचा आपलं तत्त्वज्ञान पाजळायला लागला.. ‘शुभकार्यावेळी बळी देणे ही आपली पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. तुमच्या राज्यात बऱ्याच ठिकाणी पशुबळीही मान्य नाही. रक्तपात मान्य नाही. पण मला सांगा, आपलं रक्त आपल्या जमिनीवर पडत नाही तोवर ही जमीन पावन होते का? म्हणून मग लग्नकार्यात एखाददुसरा मुडदा पडला तर ही भूमाता वधू-वराला भरभरून आशीर्वाद देते. आता बंदुकीच्या गोळीला आणि तलवारीच्या पात्याला काय माहिती की आपण ज्याचा बळी घेणार आहोत तो नवरदेवाचा मित्र आहे का महाराष्ट्रातून आलेला कुणी संस्कृतीद्रोही आहे? ती तिचं काम करणार..’

माझ्या घशाला कोरड पडली होती. हे तिघं माझी चेष्टा तर करत नाहीत ना? असा विचार करत मी कसनुसं हसलो. पण कुणीच हसलं नाही. त्यांची चिलीम संपली तसे एक एक करत तिघंही निघून गेले. मी पळत पळत लघुशंकेला जाऊन आलो. रडवेलं तोंड घेऊन रामप्यारेला भेटलो. त्याला म्हणालो, ‘अरे, आज्जीची तब्येत खूप खराब झाली आहे. मला आजच्या आज पुण्याला जावं लागेल..’ त्याला काहीच प्रकार माहिती नव्हता. पण, माझ्या डोळ्यातले अश्रू पाहून त्याला माझ्या आज्जीची दया येऊ लागली. त्यानं ताबडतोब गया एअरपोर्टवरून महाराष्ट्राला जाण्याची माझी व्यवस्था केली. त्या रात्री सगळे जण बंदुका घेऊन घरापुढं नाचत होते. ठाय ठाय गोळ्या झाडत होते. आपली तथाकथित संस्कृती जोपायसायचं काम इमानेइतबारे करत होते. मी मात्र त्या संस्कृतीपासून पळ काढत महाराष्ट्राकडं निघालो होतो...

नितीन थोरात
nitin.thrt@gmail.com
संपर्क : 8888849567

बातम्या आणखी आहेत...