आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्लेषण:आता शिखरावरील टेक कंपन्यांच्या घसरणीचा काळ

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावर्षी टेक स्टॉक्सची जी स्थिती झाली ती पाहता, अॅक्रोनिम इन्व्हेस्टिंगच्या कल्पनेचे पुनरावलोकन करण्याची वेळ आली आहे. दशकापूर्वी ब्रिक्स नावाच्या उदयोन्मुख बाजारपेठांचा जसा पराभव झाला होता, तशीच अवस्था आता फँग नावाच्या पाच मोठ्या टेक कंपन्यांची होत आहे. या कंपन्या आहेत फेसबुक (आता मेटा), अॅमेझॉन, अॅपल, नेटफ्लिक्स आणि गुगल (आता अल्फाबेट).

असे घडते की, एखादा चर्चेचा विषय गुंतवणूकदारांच्या कल्पनेचा ताबा घेतो, ते एक गट बनवतात आणि ट्रेंडचे भांडवल करण्यासाठी त्याचे अॅक्रोनिम (समूहात समाविष्ट देशांच्या किंवा कंपन्यांच्या आद्याक्षरातून तयार केलेला नवीन शब्द) तयार करतात. उदा. ब्रिक्स किंवा फँग. काही काळ ते व्यवस्थित चालते. यातून प्रेरणा घेऊन असे आणखी काही अॅक्रोनिम उदयास येतात. ट्रेंड संपला की, त्याची मूलतत्त्वे डगमगू लागतात. चुका दिसू लागतात. परंतु, पुनर्विचार करण्याऐवजी गुंतवणूकदार आणखी नवे अॅक्रोनिम तयार करत राहतात. सरतेशेवटी मास-फाॅलोइंग असलेले काही मोजकेच उरतात.

ब्रिक्स हा शब्द २००१ मध्ये तयार झाला. त्यात सुरुवातीला ब्राझील, रशिया, भारत आणि चीनचा समावेश होता, नंतर दक्षिण आफ्रिकाही त्यात सामील झाली. उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये दशकभराच्या ऐतिहासिक तेजीनंतर वॉल स्ट्रीट विश्लेषकांनी अधिक छोट्या देशांची बरोबरी करण्यास सुरुवात केली. त्यांच्यासाठी एक नवीन संज्ञा तयार केली गेली - सिव्हेट्स, ती कोलंबिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, इजिप्त, तुर्की आणि दक्षिण आफ्रिका यांच्या नावांच्या पहिल्या अक्षरांपासून तयार झाली. त्यानंतर मिस्ट आले, त्यामध्ये मेक्सिको, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया आणि तुर्की यांचा समावेश होता. लवकरच या बाजारांत वाहणारा भांडवलाचा प्रवाह आटायला लागला.

२०११ मध्ये भारताची अर्थव्यवस्था डळमळीत होती आणि तिच्या जागतिक विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे होते, तेव्हा विक्रीशी संबंधित दिग्गजांनी सुचवले की, ब्रिक्समधील आय हे इंडियाऐवजी इंडोनेशिया केले पाहिजे. मग वस्तूंच्या किमती झपाट्याने घसरल्या आणि बाकीची ब्रिक्स अक्षरेही एक एक करून घसरायला लागली. तेव्हा कुठे गुंतवणूकदार जागे झाले. त्यापैकी एकाने ब्रिक्सला हास्यास्पद गुंतवणूक संकल्पना म्हटले. २०१० च्या दशकात देशांच्या नावांवर केंद्रित असलेले अॅक्रोनिम हळूहळू वापरातून बाहेर पडले.

मात्र, आता दुसरे चक्र सुरू झाले आहे. फेसबुक, अॅमेझॉन, नेटफ्लिक्स, गुगलसह फँगची कल्पना २०१३ मध्ये करण्यात आली. नंतर त्यात अॅपलचा एदेखील जोडला गेला. सुरुवातीला हे शेअर्सही आश्चर्यकारक गतीने पुढे गेले. मायक्रोसॉफ्ट, टेस्ला आणि एनव्हीडिया त्यात सामील झाले तेव्हा ते फँगमेंट झाले. बायडू, टेन्सेंट आणि अलीबाबा या मोठ्या चिनी कंपन्यांना मिळून बॅट असे म्हटले जाते. मग जी स्थिती पूर्वी उदयोन्मुख बाजारपेठेत होती, तीच या मोठ्या टेक कंपन्यांची होऊ लागली. चिनी नियामकांनी टेक सेक्टरवर कारवाई करण्यास सुरुवात केल्याने प्रथम बॅटची हवा गेली. काही काळानंतर अमेरिकेतील गुंतवणूकदारांच्या लक्षात आले की, टेक कंपन्या त्यांच्या वाढत्या मूल्यांकनाचे समर्थन करण्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च करत आहेत. मग एक-एक नावे घसरू लागली. प्रथम नेटफ्लिक्सचे एन गेले. मग मागे राहिले मांट म्हणजे मायक्रोसॉफ्ट, अॅपल, अल्फाबेट, एनव्हीडिया आणि टेस्ला. पण लवकरच इतरांचीही पाळी आली. जिची या वर्षातील बाजारातील कामगिरी वाईट म्हणता येणार नाही अशी गेल्या आठवड्यापर्यंत अॅपल ही एकमेव मोठी टेक कंपनी होती. म्हणजेच, अॅक्रोनिम इन्व्हेस्टिंगचा आणखी एक वाईट टप्पा. खरं तर, टेक उद्योगातील ज्या मोठी नावांनी अमेरिकेत गेल्या दशकात प्रचंड नफा कमावला होता, तेच २०२२ मधील बाजारातील घसरणीला जबाबदार ठरले आहेत.

अॅक्रोनिमची समस्या अशी की ते एकमेकांपासून भिन्न गुंतवणूक गट करतात. भांडवलशाहीच्या एका चिरस्थायी सत्याकडे ते दुर्लक्ष करतात आणि ते म्हणजे चर्न, म्हणजे ग्राहकांचा एखाद्या कंपनीसोबत व्यवसाय कमी करत जाणे. इझी-मनी आणि सरकारी पाठिंब्याने मोठ्या कंपन्या चर्नला बगल देत आणखी मोठ्या होत राहिल्या, परंतु अखेर अति-मूल्यांकन, अतिआत्मविश्वास आणि अति-गुंतवणूक त्यांच्यासाठी हानिकारकच ठरते.

प्रश्न पडतो की, मग आता काय? गेल्या आठवड्यापर्यंत नेटफ्लिक्स (जी बिग टेकचा कधीही सहज भाग नव्हती) वगळता फँगच्या इतर सर्व टेक कंपन्या अजूनही जागतिक मार्केट कॅपनुसार टॉप १० मध्ये होत्या, परंतु २०२० चे दशक आता कुठे सुरू झाले आहे. १९८० पासून जगभरातील नोंदी ठेवल्या जात आहेत. गेल्या तीन दशकांत सलग दोन दशके अव्वल दहामध्ये स्थान मिळवणाऱ्या तीनच कंपन्या आहेत, त्या म्हणजे मायक्रोसॉफ्ट, वॉलमार्ट आणि जनरल इलेक्ट्रिक. सर्वसाधारणपणे एवढ्या उंचीवर गेल्यावर कंपन्या पुढील दशकात वाईट कामगिरी करतानाच दिसतात. वर जाताना त्या खूप हाइप तयार करतात, परंतु बाजारातील हवेची दिशा बदलताच त्याच सर्वात कमकुवत असल्याचेही सिद्ध होतात.

(ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) रुचिर शर्मा ग्लोबल इन्व्हेस्टर, बेस्ट सेलिंग रायटर breakoutnations@gmail.com

बातम्या आणखी आहेत...