आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या दोन वर्षांत आपल्या जवळच्यांपासून गायक-कलाकार व अभिनेत्यांच्या अकाली आणि आकस्मिक मृत्यूच्या बातम्या आल्या आहेत. यापैकी अनेक प्रकरणांमध्ये हृदयविकाराचा झटका कारणीभूत आहे. महामारीच्या पार्श्वभूमीवर कोविड-१९ मुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढला असल्याची शंका लोकांना वाटू लागली आहे. गेल्या दोन वर्षांत लोकांमध्ये तणाव व चिंता वाढली, त्यामुळे हृदय व इतर आजारांचा धोका वाढला आहे, परंतु सध्या तरी कोविडमुळे हृदयविकार वाढले आहेत, असे मानण्याचे कोणतेही ठोस कारण नाही.
खरं तर, कोविड सुरू होण्यापूर्वीच २०१७ मध्ये इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने एका अहवालात नमूद केले होते की, १९९० ते २०१६ दरम्यान मृत्यूच्या कारणांमध्ये मोठा बदल झाला आहे. २०१६ मध्ये असंसर्गजन्य रोग हे भारतातील मृत्यूचे प्रमुख कारण झाले आणि हृदयविकाराच्या झटक्यासारखे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग हे सर्वात मोठे आणि पाचपैकी एक मृत्यूचे कारण होते. आपल्याला माहीत आहे की, वाढत्या वयाबरोबर हृदय, यकृत, मूत्रपिंड, रक्तवाहिन्या आणि शरीरातील इतर अवयव कमकुवत होऊ लागतात. जपानसारख्या जगाच्या इतर देशांमध्ये जिथे आयुर्मान जास्त आहे तिथे हृदय, मूत्रपिंड, यकृताचे आजार हे मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे. भारतात जसे आयुर्मान वाढले आहे तसे हृदयविकाराचा झटका किंवा कर्करोगाने होणारे मृत्यूही वाढले आहेत.
परंतु, अकाली मृत्यू हा नक्कीच चिंतेचा विषय आहे. याचे उत्तर बदलत्या जीवनशैलीत आहे. गेल्या काही दशकांमध्ये जंक फूड आणि बैठ्या जीवनशैलीचा परिणाम म्हणून सुमारे २०% प्रौढ लोकसंख्येला उच्च रक्तदाब आहे आणि १५% प्रौढ लोकसंख्येला मधुमेह आहे, काहींना दोन्हीही आहेत. हे हृदयविकाराचा झटका आणि इतर रोगांचा धोका वाढवणारे घटक आहेत. मग महामारीमुळे उत्पन्न कमी होणे, भविष्याची चिंता, संसर्गाची भीती अशा अनेक कारणांमुळे मानसिक तणावाची पातळी वाढली आहे. त्याच वेळी महामारीच्या दोन वर्षांत लोकांनी त्यांचे आरोग्य आणि नियमित उपचारांकडे दुर्लक्ष केले आहे.
प्रत्येक जागतिक महामारीमुळे आरोग्याविषयी सामाजिक आणि वैयक्तिक दृष्टिकोन बदलतो. १९१८-२० च्या फ्लूच्या जागतिक महामारीनंतर लोक आरोग्याविषयी जागरूक झाले आणि वैद्यकीय विज्ञान लसी, औषधे आणि उपचारांच्या शोधाला चालना मिळाली. शंभर वर्षांपूर्वीच्या जागतिक महामारीनंतर झालेल्या बदलांमुळे संसर्गजन्य रोगांना प्रतिबंध आणि जगभरातील आयुर्मान वाढले.
कोविडने आपल्याला पुन्हा एकदा आरोग्याच्या महत्त्वाची जाणीव करून दिली आहे. अशा स्थितीत ‘प्रथम सुख निरोगी शरीर’ आणि ‘उपचारापेक्षा प्रतिबंध उत्तम’ या दोन वर्षांपासून प्रचलित असलेल्या म्हणी आजच्या काळाला अचूक आहेत. नियमित व्यायाम, सात्त्विक आणि वेळेवर आहार, नियमित व पुरेशी झोप आणि सामाजिक संवाद यामुळे माणूस निरोगी राहतो आणि अनेक आजारांपासून बचाव होतो. शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा जवळचा संबंध आहे. महामारीने आपल्याला मानसिक आरोग्याची जाणीव करून दिली आहे. ज्याप्रमाणे आपण शारीरिक आजारांवर उपचार करतो त्याचप्रमाणे मानसिक आजारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. सरतेशेवटी, कोविड-१९ ची महामारी काय बदल घडवेल हे सध्या तरी सांगणे कठीण आहे, परंतु निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून प्रत्येक व्यक्ती निरोगी समाजाचा पाया रचू शकते. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) डॉ. चंद्रकांत लहारिया प्रसिद्ध डाॅक्टर c.lahariya@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.