आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘तुम्ही थोरात.. म्हणजे दौंडमधल्या पिंपळगावचे का?’ घरासमोर थांबलेले एक गृहस्थ कुतूहलानं असं म्हणाले आणि मला आनंदाचा धक्काच बसला. म्हणालो, ‘हो मी पिंपळगावचाच. पण, तुम्ही कसं काय ओळखलं ?’ तसा तो म्हणाला, ‘आवो, आपण पाहुणेच..!’ आता पाहुणा घरासमोर आलाय म्हणल्यावर त्याला बाहेर कसं थांबवायचं? हसत हसत त्याला नमस्कार केला आणि घरात घेतला. पाणी पिऊन तो फॅनखाली खुर्चीवर निवांत बसला आणि बोलू लागला. ‘समोरच्या घरी पूजा होती. तिथं आलो होतो. त्यांना म्हणलं मागचा बंगला कुणाचा? तर ते म्हणाले दौंड तालुक्यातले थोरात म्हणून आहेत कुणीतरी. थोरात म्हणलं की मला डाऊट आलाच की तुम्ही पाहुणेच असणार. म्हणून आलो चौकशी करायला..’
क्षणभर आम्ही दोघंही एकमेकांकडं पाहून स्मित केलं. काहीतरी बोलायला पाहिजे म्हणून म्हणलं, ‘सॉरी.. पण, मी तुम्हाला ओळखलं नाही. तसा तो बोलू लागला, ‘तुमच्या वडिलांचं नाव काय?’ मी म्हटलं, ‘अरुण’. तसा तो विचार करत म्हणाला, ‘म्हणजे वडिलांची सासुरवाडी काष्टी ना?’ मी होकारार्थी मान डुलवली. तो म्हणाला, ‘माझ्या साडूची मेहुणी काष्टीलाच दिलेली आहे. निवृत्तीअण्णाच्या दोन नंबरच्या सुनेची नणंद आहे ती..’
काहीच समजलं नाही. उसनं हसत मी विचारलं, ‘तुमचं गावं कोणतं?’ तसा तो हसत हसत बोलला, ‘आवं मी निंबळकचा. तुमच्या वडिलांच्या मेहुण्याच्या बायकोच्या चुलत बहिणीचं माहेर तेच.’
परत डोक्यात शिट्ट्या वाजल्या. सगळं डोक्यावरून गेलं होतं. मी म्हटलं, ‘मला नात्यातलं जास्त काही समजत नाही हो. थोडंफार समजतं.’ त्यावर तो म्हणाला, ‘म्हणजे तुमची आणि हिंगणगावच्या रामातात्याची गत सारखीच.’ प्रश्नार्थक चेहरा करत मी विचारलं, ‘कोण रामातात्या?’ तसा तो टाळी देत म्हणाला, ‘हाय का आता..? आवं, तुमचे वडील रामातात्याच्या साडूचे मेहुणे लागतात..’ पाहुणा एकापाठोपाठ एक बाउन्सर टाकत होता आणि सगळं माझ्या डोक्यावरून जात होतं. ‘सॉरी.. पण तरी पण मला नाही समजलं की रामातात्या म्हणजे कोण?’ तसा तो सावरत बसला आणि म्हणाला, ‘रामातात्या म्हणजे तुमच्या आत्याच्या नणंदेच्या मामेभावाचा पुतण्या.’ कुठून दुर्बुद्धी सुचली आणि याला घरात घेतलं, असं झालं. तरीही नीट, आणखी बारीक विचार केला, पण मेंदूला हलक्याशा मुंग्याच येऊ लागल्या. मी म्हणालो, ‘अहो, पण मला आत्याच नाही. दोन चुलते आहेत.’ तसा तो म्हणाला, ‘अहो, चुलत आत्या म्हणतोय मी. नगरला दिलेली..’ मी डोक्याला जोर लावत म्हणालो, ‘हां हां नगरची आत्या होय. पण, नगरला तीन चुलत आत्या दिल्यात. त्यातली कोणती?’ तशी त्यानं खुर्ची पुढं सरकावली अन् म्हणाला, ‘आवं, ती नाय का तिच्या मावशीच्या मावळणीचा पुतण्या पोलिसातहे..’
सिंघम पिक्चरमध्ये सिंघम जशी खुर्चीला लाथ मारतो आणि तो गुंड थेट पोलिस चौकीबाहेर पडतो. तो प्रसंग मला का आठवला कुणास ठाऊक? मी मनातल्या अस्वस्थतेला गोंजारलं अणि स्वत:ला शांत करत म्हणालो, ‘सॉरी दादा, मला नाही माहिती..’ तसा तो मला समजावण्याच्या भाषेत म्हणाला, ‘हरकत नाही. मला सांगा नगरला तुमच्या कोणत्या कोणत्या आत्या आहेत?’ ‘ज्योती आत्या, सुमन आत्या आणि माया आत्या..’ मी उत्तर दिलं. त्यावर भुवयांचा आकडा करत तो म्हणाला, ‘माया आत्याच्या नवऱ्याची चुलत बहीण जळगावला दिलीया ना, त्या मेडिकलवाल्याला ?’ आता मात्र खरंच डोकं फिरायला लागलं. याला का घरात घेतलं, असं पुन्हा एकदा वाटू लागलं. म्हटलं, ‘अहो दादा, मला खरंच माहिती नाही हो..’ तसा तो वैतागत म्हणाला, ‘बंगला बांधला तर पाहुणरावळं इसराय लागला व्हय तुम्ही? तुमच्या चुलत मामाच्या पुतणीच्या सासूचं माहेर तेच आहे की!’ ‘आत्याकडून आता हा मामाकडं कसा गेला?’ असा विचार करत मी दातओठ खात बोललो, ‘आता कोणता चुलत मामा?’ मग तो वैतागत म्हणाला, ‘लका लका लका.. स्वत:च्या मामाला ओळखत नाय व्हय तुम्ही?’ मीही वैतागलेल्या सुरात म्हणालो, ‘अहो, मला दोन सख्खे मामा आणि सात चुलत मामा आहेत. त्यातला कोणता मामा?’ तसा तो हातवारे करत म्हणाला, ‘आवं त्यांची एक मुलगी सोलापूरला दिलीया आणि दुसरी मुलगी जळगावला दिलीया तो मामा. तुमच्या आत्याची भावजय त्या साताऱ्याच्या पोरीची नणंद लागती..’ मला खरंच हसावं का रडावं, तेच कळेना. यानं नात्याचा एवढा गुंतडा करून ठेवला होता, की कसलाच मेळ बसत नव्हता. तरीही शेवटचा रिस्पेक्ट म्हणून विचार करत म्हणालो, ‘माया आत्याची भावजय म्हणताय का तुम्ही?’ तसा त्यानं कपाळावर जोरात हात मारला आणि म्हणाला, ‘पाहुणं तुम्ही पुण्यात आला. चार पुस्तकं शिकला. पैसा कमावला. बंगला बांधला. पण, पाहुण्यारावळ्यापासून पार तुटला राव. एक पाहुणा तुम्हाला नीट उमजाना. आवं, माया आत्याला भावजय तरी हाये का? तुमच्या ज्योती आत्याची भावजय नणंदहे त्या पोरीची. माया आत्या तर तुमच्या मावशीच्या दिराची मेहुणी लागती ना?’
मनातला सगळा राग बर्फासारखा गोठवत मी आहे तसा उठलो अन् माठातलं थोडं गार पाणी घशात ढकललं , थोडं डोक्यावर ओतलं... कोण कुठला हा पाहुणा आला आणि त्याला घरात घेतला असं झालं. डोकं पुसत पुन्हा हॉलमध्ये आलो आणि म्हणालो, ‘तुमचा खूप वेळ घेतला ना मी? तुम्ही पूजेला आलाय आणि तुम्हाला इथं बोलवून बोलत बसलोय मी..’ तसा तो हसत हसत उठला आणि म्हणाला, ‘आवं त्यात काय तवा? पाहुण्यांसाठी तर एवढं केलंच पाहिजे की. चला, कपडे घाला आणि पूजेला चला. पाहुण्यारावळ्यांची ओळख करून देतो..’ याला घराबाहेर काढण्याचा एवढा एकमेव उपाय होता. ‘चला, चला’ म्हणत मग मीही निघालो पाहुण्यांच्या घरी. तिथून पुढं दोन तास तो माझ्यावर नात्याचा अत्याचार करत होता आणि मी पाहुणा म्हणून गुमानं सारं सहन करत होतो. आता तो जेव्हा जेव्हा त्या पाहुण्याच्या घरी येईल तेव्हा तेव्हा माझ्या घरी येईल आणि असाच अत्याचार करत राहील, या विचारानंही अंगावर काटा येतोय...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.