आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोष्ट सांगतो ऐका...:अरे चोरा!

अरविंद जगताप10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

२३ तारखेची गोष्ट. सोमवारची. दुपारचे बारा वाजलेले. वसंतराव बारकाईने सीसीटीव्ही बघत होते. एक लाल रंगाचा शर्ट घातलेला मुलगा जाताना दिसत होता. साधारण बारा - तेरा वर्षांचा असावा. इमारतीच्या आवारात आंब्याचं झाड होतं. तो मुलगा थोडा पुढं जाऊन परत माघारी फिरला. त्यानं असं मुद्दाम केलं होतं. गेटच्या आत डोकावून कुणी बघत नाही, याची खात्री करून घेतली होती. आता तो जवळ असलेल्या एका काठीने झाडाला लागलेल्या कैऱ्या पाडायचा प्रयत्न करू लागला. साधारण दहा मिनिटं अथक प्रयत्न करूनही त्याला एकही कैरी पाडण्यात यश आलं नाही. त्याचा चेहरा कैरीपेक्षा आंबट झाला असावा. अर्थात तेवढं क्लिअर सीसीटीव्ही मध्ये दिसत नव्हतं.

पण, त्या मुलाला निराश होऊन सुस्कारा सोडायची संधी मिळाली नाही. अचानक तो घाईत निघून गेला. कदाचित इमारतीतून कुणी बाहेर पडण्याचा आवाज झाला असावा. पण, वसंतरावांना अपेक्षित असलेला चोर तो नव्हता. अर्थात त्यांना फार वेळ वाट बघावी लागली नाही. एक पैलवानासारखा दिसणारा तरुण तिथून जाताना दिसला. चालता चालता थांबला. काही वेळ इकडं-तिकडं बघत राहिला. मग त्यानं खिशातून फोन काढला. एक-दोन रिंग गेल्या असतील कदाचित. लगेच समोरून फोन उचलला गेला असणार. काही वेळ तो तरुण फोनवर बोलत राहिला. साधारण आपण कुणाची तरी वाट पाहताना उशिरा येणाऱ्या माणसाशी बोलतो, तसे हातवारे आणि हावभाव वाटले त्याचे. वसंतराव त्याच्या हालचालीकडे बारकाईनं बघत होते. चार-पाच सेकंद सीसीटीव्हीत काहीच दिसेनासं झालं. त्यामुळं वसंतराव अस्वस्थ झाले. खूप वेळ झाला आपण चहाच घेतला नाही, असं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी कपाची दांडी धरून चहाचा एक घोट घेतला आणि त्यांचा चेहरा साफ पडला. चहा न घेऊन चांगले पंधरा मिनिटं झाले, हे त्यांच्या लक्षात आलं. सीसीटीव्हीवर वेळ दिसत होती. अर्थात चहा थंड झाल्याची निराशा फार काळ टिकली नाही...

सीसीटीव्ही पुन्हा सुरू झाला. फोनवर बोलणारा तरुण आता भिंतीला टेकून उभा राहिला होता. थोड्या वेळात त्याचंही लक्ष कैऱ्याकडे गेलं. खूपदा कैरी न आवडणारे लोकही कैरी दिसली की जरा थबकतात. कैरी पाडण्याचा मोह भल्याभल्यांना होतो. पण, असे भलते विचार करण्याची ही वेळ नव्हती. आणि तो तरुण काही कैरी पाडताना दिसत नव्हता. तो एकटक बघत राहिला. त्याच्या मनात काय चालू आहे, याचा काहीच अंदाज येत नव्हता. गुन्हेगार थंड डोक्याचे असतात, हे वसंतरावांना माहीत होतं. अर्थात सिनेमामुळं. त्यांनी हजार एक तरी सिनेमे बघितले असावेत. आणि त्यातले नऊशे क्राइमवाले असतील. गुन्हेगारीची त्यांना आवड होती, असं नाही. उलट त्यांना असे सिनेमे बघून भीती वाटायची. पण, ते एक व्यसन झालं होतं त्यांचं... तर तो तरुण आता पुन्हा फोनवर बोलत होता. पुन्हा तसेच हातवारे. तो गुन्ह्यातला आपला साथीदार यायची वाट बघत असल्यासारखा दिसत होता. पण, थोड्याच वेळात एक तरुणी तिथं आली. ती रिक्षात होती. तिनं तोंडाला रुमाल लावलेला होता. ती रिक्षातून बाहेर एकदाच डोकावली. तेवढीच काय ती तिची झलक. तरुण लगेचच रिक्षात बसला. रिक्षा निघून गेली. वसंतराव ज्याची वाट बघत होते तो चोर हा पण नव्हता. वसंतराव निराश झाले.

खूप वेळ नुसती भिंत दिसत राहिली सीसीटीव्हीत. काहीच हालचाल नाही. वाऱ्याची एखादी झुळूक आली की पानांची हालचाल व्हायची. बाकी काही नाही. खरं तर एरवी वसंतरावांना झोप लागली असती. किंवा त्यांनी पुन्हा सिनेमा सुरू केला असता. पण, आज चोर येणार होता, याची त्यांना खात्री होती. आणि त्यांनी ठरवून टाकलं होतं की चोर आत आला की लपून बसायचं. चोर काय करतो, ते बघत राहायचं. खूप वेळ असा खेळ खेळायचा होता त्यांना. खूप वेळ चोराच्या हालचाली टिपायच्या होत्या. त्यामुळं ते सावध होते. चोराची वाट पाहणारा माणूस किती कमालीचा असेल! वसंतराव तसेच आहेत. ते टूथपेस्ट वाया जाऊ नये म्हणून तिला पार कुटून कुटून काढतात. त्यातली शेवटची पेस्ट वापरून घेतात. खोबऱ्याच्या तेलाची बाटली कापून त्यातलं पण तेल डोक्याला लावतात. पेपर विकत घेत नाहीत. वाचनालयात जाऊन वाचतात. आणि या सगळ्या गोष्टींसाठी ते चिडचिड करत नाहीत. आपली काटकसर ते एन्जॉय करतात. दिवसभरात आपण एखादा रुपया वाचवला तरी त्यांना प्रचंड आनंद होतो. आणि आनंदी चेहऱ्याने ते झोपी जातात. पण, आज झोप येणार नव्हती. चोर कधीही येऊ शकला असता...

आताही एक बाइक थांबलेली दिसत होती. बाइकवर दोघे होते. त्यातला मागं बसलेला उतरला. चांगली दोन-तीन मिनिटं दोघे बोलत राहिले. मग बाइकवाला निघून गेला. उतरलेला पंचविशीतला तरुण उभा राहिला. काही वेळानं त्याला उन्हाचा त्रास होऊ लागला म्हणून तो झाडाखाली येऊन उभा राहिला. त्या गल्लीत ते एकमेव झाड. त्यामुळं दिवसभर कुणी न कुणी झाडाखाली उभं असायचं. एक मोठी फांदी भिंतीला फोडून बाहेर आली होती. खरं तर फांदी आधीची. भिंत नंतर बांधलेली... तर त्या फांदीला हात धरून लोक उभे राहायचे. गल्लीतली पोरं त्या फांदीवर चढायचा प्रयत्न करायची. पण, ते तेवढं सोपं नव्हतं. शेजारच्या बंगल्यातला कुत्रा लगेच जोरजोरात भुंकायचा. म्हणून सहसा कुणी त्या वाटेला जायचं नाही. तर तो तरुण आता झाडाखाली उभा होता. त्यानं आपले हेडफोन कानाला लावले. कदाचित तो गाणं ऐकत असावा. पण, असा अचानक सावलीत उभा राहून गाणं ऐकण्याचा त्याचा काय उद्देश असावा? खूपदा लोक आपल्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी कुठली तरी प्रार्थना किंवा मंत्र म्हणतात किंवा ऐकतात.

पण, चोर असं करत नसावा. बहुतेक तो तरुण वेळ घालवायला गाणं ऐकत असेल. गाणं ही खरं तर आवड असते. वेळ घालवायची गोष्ट नसते. आणि माणसाने काही वेळ तरी विचार करण्यासाठी राखून ठेवला पाहिजे. किंवा राखून नाही ठेवला, तरी असा जो मोकळा वेळ मिळतो त्यात विचार केला पाहिजे. नाही तर मिळाली संधी की लाव हेडफोन कानाला.. असं केल्यावर आपला विचार कधी करणार? आपल्या माणसाचा विचार कधी करणार? वसंतराव विचार करत होते.. तो तरुण निघून गेला होता. आता फक्त भिंत दिसत होती. पण, वसंतराव विचारात मग्न होते. दिवसभर त्यांचं सीसीटीव्हीकडं लक्ष होतं. आता दिवसभरात दहाव्या वेळी त्यांना चहा प्यायची आठवण झाली. रात्रीचे बारा वाजून गेले होते. तेवीस तारीख संपून चोवीस तारीख चालू झाली होती...

आजही अन्वय आला नाही. मागच्या वाढदिवसालाही आला नव्हता. वसंतराव आज सत्त्याहत्तर वर्षांचे झाले. अन्वय त्यांचा एकुलता एक मुलगा. वसंतराव त्याला लाडाने ‘अरे चोरा’ म्हणायचे. अन्वय त्यांच्या नकळत त्यांची बाइक चोरून शिकला. कार पण अशीच चोरून शिकला. कॅनडाला पण असाच न सांगता गेला. म्हणजे काही महिन्यांसाठी जातो म्हणाला आणि कायमचा स्थायिक झाला. वसंतरावांना वाटतं, की तो असाच न सांगता येईल. चोरून येईल. वाढदिवसाला तरी नक्की येईल. चार वर्षे झाली.. वसंतराव दर वाढदिवसाला एकटक सीसीटीव्ही बघत असतात. एकाच आशेवर की आपला लाडका चोर येईल आणि आपण लपून बसू. आणि मोठ्याने म्हणू, ‘अरे चोरा!’

बातम्या आणखी आहेत...