आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंतन:आयुष्याच्या वाटेवर

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येकाने स्वतःसोबत इतरांच्या दुःखाचा थोडासा विचार केला तर? आपण प्रत्येक जण समोरच्या व्यक्तीचे प्रत्येक दुःख तर नाहीसे तर करू शकत नाही, पण त्याची तीव्रता मात्र नक्की कमी करू शकतो. दु:खाची तीव्रता कमी करणे आपल्या हातात नक्कीच असते. इतरांवर अवलंबून राहणे कुणालाही आवडत नाही. पण काही व्यक्ती, ज्येष्ठ, वयोवृद्ध व्यक्ती अशा असतात की त्यांना परिस्थितीमुळे इतरांंवर अवलंबून राहण्याची वेळ येते. कारण ते परिस्थितीने ग्रासलेले असतात. शरीर साथ देत नसल्यामुळे त्यांच्यावर इतरांवर अवलंबून राहण्याची वेळ येते. अशा लोकांना मुद्दाम त्रास देणे टाळले पाहिजे. कारण जी वेळ अशा व्यक्तींवर आज आलेली आहे, तशीच वेळ आपल्यावरही येऊ शकते. कुणी जात्यात असतं तर कुणी सुपात असतं, असं जीवनचक्र सतत चालू असत. जे पेराल तेच उगवते.

आपण जसे इतरांशी वागतो तसेच भोग आपल्यासमोर येऊन उभे राहतात, हाच कर्माचा सिद्धांत आहे. नंतर पश्चात्ताप करून फायदा नसतो. जीवन क्षणभंगुर आहे. अडल्या-नडल्याची मदत करणे हे पुण्याचे काम आहे. म्हणून नाती जपा. आनंदाने जगा, इतरांनाही जगू द्या. हे मान्य आहे की आपण प्रत्येक व्यक्तीला आनंदी ठेवू शकत नाही. पण प्रत्येकाच्या आनंदाचे कारण तर आपण नक्कीच बनू शकतो. फार नाही, दोन शब्द प्रेमाने तर नक्कीच बोलू शकतो. प्रेमाने बोलणे, निर्मळ हसणे, आनंदी राहणे, घरकामात मदत करणे, सुखदुःखात सहभागी होणे, स्वतःसोबत इतरांच्या मनाचाही विचार करणे, सहकार्याची भावना जपणे या सर्व गोष्टी आपल्या हातात असतात. कधी तरी मनाचा मोठेपणा दाखवता आला पाहिजे.

एकदा एक आजी-आजोबा आजारी होते. आजोबा खूप थकलेले होते. पिकलं पान कधी गळून पडेल याचा भरवसा नव्हता. स्वतःचे काम स्वतः करू शकत नव्हते. आजी मात्र जे जमेल, झेपेल तेवढी मदत करायच्या. मुलगा बाहेरच्या व्यापातून त्रस्त होऊन यायचा. तेच ते रडगाणे नको म्हणून आई तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करायच्या. सुनेकडून मात्र कुठल्याही मदतीची अपेक्षा नव्हती. मदत करण्यासाठी जो सेवाभाव लागतो तो सेवाभाव सुनेजवळ नव्हता. सासू-सासऱ्याची कधी विचारपूस नाही, त्यांनी काही खाल्लं का हे विचारण्याचीही मानसिकता नाही. जाणीवही नाही.

आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी परिस्थिती होऊन बसते. वयस्कर होणं हा काय गुन्हा आहे का? प्रत्येकाच्या आयुष्यात हा टप्पा येणार आहे हे लोक का बरं विसरत असतील? काय लागतं हो म्हाताऱ्या माणसाला? दोन वेळची चतकोर भाकरी, जन्मभर खाण्यासाठी मजा मारणारी माणसेही म्हातारपणी पथ्यपाण्यात अडकून असतात. शुगर झाली म्हणून गोड पदार्थ नाही नि बीपी झाला म्हणून चमचमीत पदार्थ नाही. जन्मभर नवे कपडे घालण्याची हौस मात्र म्हातारपणी सगळी उतरून जाते. टीचभर कपडाही अंगावर ओझे वाटायला लागतो. कुठली हौसमौज शिल्लक राहत नाही. अशा वेळी त्यांना मानसिक आधार द्यायचा सोडून, सूडबुद्धीने वागून, अासुरी आनंद मिळवून माणसं काय साध्य करतात तेच कळत नाही. घराघरात अशी दयनीय अवस्था पाचवीला पुजलीय. भावना जपा, सन्मान द्या व सन्मान घ्या, प्रेमाने वागा. जे आपल्या हातात आहे तसे आपण नक्कीच वागू शकतो. बाकी सारे काळावर सोडून देऊ. कालाय तस्मै नमः

सुचिता कुलकर्णी -जोशी संपर्क : ८२७५२३२०४५

बातम्या आणखी आहेत...