आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • One Cannot Expect Too Much From Rishi Sunak | Article By Abhijit Ayyar Mitra

विश्लेषण:ऋषी सुनक यांच्याकडून खूप अपेक्षा ठेवता येणार नाहीत

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यावर भारतात मोठा उत्सव साजरा झाला. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य आणि आपल्या पूर्वीच्या वसाहतवादी राज्यकर्त्या देशाचा भारतवंशीय आणि एक हिंदू पंतप्रधान होणे अभिमान बाळगण्यासारखे नक्कीच आहे, यात शंका नाही. तरीही त्यांनी भारतीयांसाठी आणि हिंदूंसाठी काय केले, की ते पंतप्रधान झाल्यावर आपल्याला आनंद व्हावा, असे विचारले पाहिजे. यासाठी आपल्याला काही बाबी लक्षात ठेवाव्या लागतील. पहिली म्हणजे विशेषत: जे आता नेतृत्व करण्याच्या स्थितीत आहेत अशा भारतवंशीयांचा सामान्य कल. दुसरे म्हणजे ऋषी सुनक यांच्याबद्दल ब्रिटनच्या हिंदूंचा दृष्टिकोन. तिसरे म्हणजे ब्रिटनच्या हिंदूंसाठी सुनक यांचे प्रयत्न. चौथी ब्रिटनची शासन प्रणाली त्यांना किती काम करू देईल? आणि पाचवी, हिंदूंना अनुकूल पंतप्रधान होण्याचा ब्रिटन आणि जगासाठी काय अर्थ आहे?

आज जगातील अनेक देशांत भारतीय वंशाचे लोक केंद्र किंवा राज्यात सत्तारूढ आहेत. यामध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो, गयाना, सुरीनाम, पोर्तुगाल, आयर्लंड, मॉरिशस, सेशेल्स, सिंगापूर, फिजी इ. आहेत. अमेरिकेत आजवर एकही भारतीय वंशाचा राष्ट्राध्यक्ष झालेला नाही, पण सध्याच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस या अंशतः भारतीय आहेत. हे सर्व भारतीय वंशाचे नेते हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन वंशाचे आहेत. येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की, बहुतांश हिंदू आणि ख्रिश्चन त्यांच्या जातीय अस्मिता पार्श्वभूमीत ठेवण्याचा प्रयत्न करतात, तर मुस्लिम नेते अभिमानाने ते दाखवतात. उदा. मूळचे सुदानी इल्हान उमर आणि पॅलेस्टिनी वंशाच्या रशिदा तलेब या अभिमानाने त्यांची धार्मिक ओळख प्रदर्शित करतात, तर भारतीय वंशाचे पीयूष जिंदाल आणि निक्की हेली कधीही त्यांच्या मुळाबद्दल बोलत नाहीत. ते भारतीय खाद्यपदार्थांना पारंपरिक अन्न म्हणून संबोधतात आणि त्यांच्या ख्रिश्चन धर्मांतराचा आग्रह धरतात. ब्रिटनमध्येच दिसेल की पाकिस्तानी वंशाचे खासदार नेहमी त्यांच्या मुळांबद्दल बोलतात, तर मेघनाद देसाई आणि हिंदू वंशाचे स्वराज पॉल तसे करत नाहीत. निदान ऋषी सुनक यांच्यावर तरी असा आरोप करता येत नाही, कारण ते मनगटावर कंकण बांधतात, गीतेची शपथ घेतात आणि मंदिरात जातात. तथापि, २०१९ मध्ये बोरिस जॉन्सन यांच्या विजयानंतर यातील बरेच काही सुरू झाले होते. ब्रिटनच्या हिंदूंनी निर्णायक आणि एकजुटीने मतदान केलेली ही पहिलीच निवडणूक होती. याचे कारण जेरेमी कॉर्बिन आणि मजूर पक्षाचा हिंदूफोबिया होता. ब्रिटनमध्ये हिंदू मतदारांची संख्या फक्त १.७% आहे, तर मुस्लिमांची संख्या ६% आहे. यातील बहुसंख्य भारतीय उपखंडातील आहेत. हिंदू उच्चशिक्षित आहेत आणि व्हाइट कॉलर नोकऱ्या करतात. ते चांगले पैसे कमावतात आणि प्रामुख्याने शहरी भागात राहतात, त्यामुळे त्यांची एक मजबूत व्होट बँक बनत नाही. दुसरीकडे मुस्लिम औद्योगिक उपनगरीय भागात राहतात आणि हिंदूंच्या तुलनेत खूपच कमी पैसे कमावतात. उत्सुकतेची बाब म्हणजे दोन्ही समुदाय लेबर पार्टीला मतदान करण्यास प्राधान्य देतात. पण कॉर्बिन यांनी इस्लामिक अतिरेक्यांना संरक्षण दिले आणि पाकिस्तानींना प्रोत्साहन दिले तेव्हा हे बदलले. प्रत्युत्तरादाखल हिंदूंनी संघटित होऊन आपली आर्थिक ताकद वापरली. त्यांनी मजूर पक्षाला निधी देणे बंद केले. २०१९ मध्ये हिंदूंनी संघटित होऊन मतदान केले. ऋषींना वाऱ्याची दिशा समजली होती. पण, काही अपवाद वगळता ऋषींनी हिंदू- अनुकूल प्रतिमा उंचावण्यासाठी फार काही केले नाही.

उदा. लिसेस्टरशायरमधील दंगलींबाबत त्यांनी मौन बाळगले, तर पाकिस्तानचे वर्चस्व असलेल्या ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी उलट त्या प्रकरणात बळी पडलेल्या हिंदूंनाच जबाबदार धरले. २०२४ च्या निवडणुकांसाठी हिंदूंना आपल्या बाजूने ठेवायचे असले तरी ते ६% मतदारांना दूरही करता येत नाही, हे ऋषींना माहीत आहे. ऋषींचे एक नातेवाईक हार्वर्ड विद्यापीठात शास्त्रीय ग्रंथालय चालवणाऱ्या शेल्डन पोलॉक यांना निधी देतात, ते हिंदू ग्रंथांचा नकारात्मक अर्थ काढतात. आणखी एक नातेवाईक हिंदूविरोधी माध्यम संस्थांना आर्थिक मदत करणाऱ्या संस्थांना अनुदान देतात. अलीकडेच ऋषींची २० वर्षांपूर्वीची बीबीसी व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली, त्यात ते आपल्याला गरीब नव्हे, तर श्रीमंत व शक्तिशाली मित्रांची गरज आहे, असे म्हणताना दिसतात. भारत व ब्रिटनच्या हिंदूंनी ऋषींकडून फार अपेक्षा ठेवू नयेत. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) अभिजित अय्यर मित्रा सीनियर फेलो, आयपीसीएस abhijit@ipcs.org

बातम्या आणखी आहेत...