आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा विचार:चीनच्या संकटामध्ये आपल्यासाठी दडलेली संधी

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातील कोणत्याही शहरातील सार्वजनिक भागात जाताना - मग ती किरकोळ दुकाने असोत किंवा रेल्वेस्थानके - असे दिसते की, कोविड नावाची गोष्ट कधीही घडलीच नाही. काही लोक अजूनही मास्क घातलेले दिसतात, मात्र त्यांच्यापैकी बहुतेकांचे मास्क नाक किंवा तोंडाच्या खाली लटकलेले आहेत. कुठे तरी कोपऱ्यात तुम्हाला फिजिकल डिस्टन्सिंग किंवा कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन करणारे फाटलेले पोस्टरदेखील दिसेल. पण, एकूणच भारतातील लोकांनी आता कोविडला मागे टाकले आहे. ते कार्यालयातही जातात आणि लग्न समारंभातही सहभागी होत आहेत. ते खरेदी करत आहेत किंवा काही तरी खायला बाहेर जात आहेत. ते बस, ट्रेन, फ्लाइट पकडत आहेत. मोबिलिटी डेटा गुगल केला तर लक्षात येईल की, आज बहुतेक सार्वजनिक जागा कोविडच्या आधी होत्या तितक्याच व्यग्र झाल्या आहेत. अर्थात, कोविड अजून गेलेला नाही. मृतांची संख्या वाढत नसली तरी रुग्ण वाढत आहेत. उद्या कोविड काय करेल, हे सांगता येत नाही. पण, सध्या तरी आपण पुन्हा पूर्वीसारखे झालो आहोत. दुसरीकडे आपला शेजारी देश चीन वेगळ्याच परिस्थितीला तोंड देत आहे. तिथे कोविडचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत आणि कडक लॉकडाऊन परत लागला आहे. जग त्याच्याशी लढा देत असताना चीनने कोविडला दोन वर्षे नियंत्रणात ठेवले. परंतु चीनचे तथाकथित शून्य-कोविड धोरण उपयोगी पडले नाही, अगदी न्यूझीलंडपासून ऑस्ट्रेलियापर्यंत जगात कुठेही प्रभावी ठरले नाही तसे. ज्या देशांनी कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन केले होते त्यांनाही उशिरा का होईना महामारीच्या लाटेचा सामना करावा लागला. ज्या देशांना वेळ मिळाला, ते उत्तम तयारी करून लसीकरण करू शकत होते, परंतु अखेर हा विषाणू संपूर्ण यंत्रणेतून गेला, त्यातून कोणीही वाचले नाही.

आणि आता तो चीनच्या व्यवस्थेतून जात आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात घडले त्याप्रमाणे रुग्ण वाढतील आणि नंतर कमी होऊ लागतील. भारत आणि चीनमधील संबंध कसेही असले तरी चीन लवकरात लवकर सावरावा, अशी आपली इच्छा आहे. पण, सध्या तो एका भयानक स्वप्नातून जात आहे. २.६ कोटी लोकसंख्या असलेले शांघायसारखे महानगर पूर्णपणे बंद आहे आणि लोक कित्येक आठवड्यांपासून घरात कैद आहेत. इतर अनेक शहरांमध्येही असेच आहे. व्यावसायिकांसाठीही हा कठीण काळ आहे. त्यातून पुरवठा साखळीतील समस्याही समोर आल्या आहेत, जो आज संपूर्ण जगासमोर मोठा प्रश्न बनला आहे. कामगार कारखान्यांपर्यंत पोहोचू शकत नाहीत, उत्पादन ठप्प झाले आहे आणि लोक जीवनावश्यक वस्तूंसाठी तरसत आहेत. अमेरिकेतही अनेक जीवनावश्यक वस्तूंसाठी लोकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. परंतु, प्रत्येक समस्या ही एक संधी घेऊन येते. एकासाठी समस्या ही दुसऱ्यासाठी ती समस्या सोडवण्याची संधी ठरू शकते. आज भारताकडे जागतिक पुरवठा साखळीतील समस्यांवर उपाय आहे. चीनची कार्यक्षमता, उत्पादनक्षमता, वाजवी खर्च आणि उत्कृष्ट पायाभूत सुविधांमुळे चीन जगाचा मॅन्युफॅक्चरिंग-किंग बनला होता. सर्व जग चिनी वस्तू विकत घेण्यासाठी उत्सुक होते. पण, आज चीनवर तेच अवलंबित्व सर्वांसाठी समस्या निर्माण करत आहे. मेक इन इंडिया हे आपण अनेक वर्षांपासून म्हणत आहोत, ते ऐकण्यासाठी आता जगभरातील कंपन्या तयार आहेत.

पण, आपण कोणत्याही भ्रमात राहू नये. चीनमधील सध्याचे संकट हे वर्षातून एकदा येणारी परिस्थिती आहे. त्यामुळे चीनला पर्याय म्हणून स्वत:ला सादर करण्यासाठी भारताकडे मर्यादित वेळ आणि संधी आहेत. चीनमध्येही कोविड आणि लॉकडाऊन लवकरच किंवा नंतर संपेल. मग जग चीनच्या मॅन्युफॅक्चरिंग समस्या विसरून जाईल, जसे आज भारतातील गर्दीच्या विवाह सोहळ्यांना उपस्थित असलेले काका गेल्या वर्षी कोविडमुळे झालेला विध्वंस विसरले आहेत. स्वस्त आणि टिकाऊ चिनी वस्तू पुन्हा बाजारात येण्यास सुरुवात होताच जग आपल्या मूळ पदावर येईल. त्यामुळे गुंतवणूकदारांना त्याकडे आकर्षित करण्यासाठी भारताला आजच काही तरी करावे लागेल. गेल्या आठवड्यात त्यांना जहाज भरून स्निकर्स किंवा इंजिनचे भाग हवे होते, ते त्यांना कोठून मिळतील, याबद्दल संपूर्ण जग डोके खाजवत आहे. काही तरी करण्याची हीच योग्य वेळ आहे.

अधिकाधिक कंपन्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भारताने एक मेगा-प्लॅन जाहीर केला पाहिजे. मॅन्युफॅक्चरिंगला चालना देण्यासाठी अनेक योजना यापूर्वीच जाहीर केल्या गेल्या आहेत हे खरे आहे. आज अॅपल भारतात उत्पादन करत आहे. टेस्लाची खुशामत केली जात आहे. पण चीन संकटात आहे आणि आपण व्यवसायासाठी पूर्णपणे खुले आहोत, ही अनोखी संधी पुन्हा येणार नाही. जगातील प्रत्येक कंपनीला भारतात उत्पादन सुरू करण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी आज आपण काय करत आहोत? आपण रस्त्यातील अडथळे दूर करत आहोत का? आपले वरिष्ठ अधिकारी काही तरी नवीन करण्यास प्रवृत्त आहेत का, कारण आपले पर्यवेक्षक आणि नोकरशहा कठीण परिस्थितीत काम थांबवण्यास सदैव तत्पर असतात. आपण काही नोकरशहांचे मूल्यांकन असे करू शकत नाही का की, त्यांनी किती नवीन कंपन्या सुरू करण्यात योगदान दिले आहे? (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

चेतन भगत इंग्रजीतील कादंबरीकार chetan.bhagat@gmail.com

बातम्या आणखी आहेत...