आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Our Ancient Political Philosophy Was Never Second To None | Article By Pavan K Varma

दृष्टिकोन:आपले प्राचीन राजकीय तत्त्वज्ञान कधीच कोणापेक्षाही कमी नव्हते

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडेच दिल्लीतील एका वरिष्ठ मुत्सद्द्याने मला सांगितले की, परदेशी विश्लेषकासाठी भारतातील राजकारण समजून घेणे सर्वात कठीण आहे. इथे किती तरी पक्ष, इतकी समीकरणे आणि जातीय घटक वगैरे आहेत, ते त्यांच्या समजण्यापलीकडचे आहेत. याची तुलना युरोपशी करा, तिथे प्रामुख्याने ग्रीसमध्ये प्राचीन काळापासून एक सुविचारित राजकीय तत्त्वज्ञान विकसित केले गेले होते. भारतासारख्या महान संस्कृतीत आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत राजकीय तत्त्वज्ञानाची परंपरा विकसित झाली असेल का, यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. मी त्वरित त्यांचे म्हणणे दुरुस्त केले की, युरोपियन देशांमध्ये, विशेषतः इटलीमध्ये राजकीय अस्थिरता आहे, परंतु त्याहीपेक्षा भारतामध्ये प्राचीन काळी अतिशय अत्याधुनिक राजकीय तत्त्वज्ञान होते, त्याचा प्रभाव आपली राज्यघटना आणि लोकशाही या दोन्हींवर आहे. राजकीय सिद्धांतांवरील जगातील सर्वात जुने पुस्तकांपैकी एक असलेले कौटिल्याचे ‘अर्थशास्त्र’ सुमारे २५०० वर्षांपूर्वी भारतात लिहिले गेले. युरोपीय लोकांनी कौटिल्याला भारताचा मॅकियावेली म्हटले, तर मॅकियावेलीचा जन्म कौटिल्यानंतर दोन हजार वर्षांनी झाला होता. त्याला युरोपचा कौटिल्य म्हटले पाहिजे! प्राचीन भारतात राज्यशास्त्रावर इतर अनेक महत्त्वाचे ग्रंथ होते, उदा. ‘महाभारता’चे ‘शांती पर्व’, ‘रामायणा’चे काही भाग, ‘धर्मशास्त्र’, तिरुवल्लूरचे ‘तिरुक्कुरल’ आणि नंतर गुप्त काळातील कमंडकातील ‘नीतिसारा’ आणि जैन विद्वान सोमदेव सुरी यांचे ‘नीतिवाक्यामृत’. कौटिल्याने असेही लिहिले आहे की, त्याच्या पुस्तकाच्या आधीही भारतात राजकीय तत्त्वज्ञानाचे किमान पाच प्रवाह प्रचलित होते, त्यामध्ये तेरा लेखकांचे योगदान होते.

प्राचीन भारत ‘ऋत’वर विश्वास ठेवत होता, म्हणजे सुव्यवस्था, नियम, धर्म आणि कायदा. ऋतचा विरुद्धार्थी शब्द अराजक आहे, त्याला जंगलराज म्हणता येईल. अशा स्थितीला ‘मत्स्यन्याय’ म्हटले जात असे, त्यामध्ये बलाढ्यांचे वर्चस्व होते आणि मोठे मासे छोट्या माशांना खात असत. ऋतचे पालन करून घेणे आणि अराजक टाळणे हे राजाचे कर्तव्य होते. राजा, मंत्रिमंडळ, राजधानी, प्रदेश, कोषागार, सैन्य आणि विदेशी सहयोगी-मित्र असे ‘सप्त अंग’ असलेले चांगले राज्य होते. राज्यकारभाराला प्रामुख्याने दोन पैलू होते आणि वरवर पाहता दोघेही एकमेकांच्या विरुद्ध दिसत होते, पण त्यांच्यात एकवाक्यता होती. पहिला राज्याच्या हितसंबंधांच्या रक्षणाशी संबंधित होता. तो राजाला बलवान बनवायचा आणि शत्रूंना दूर ठेवायचा. त्यासाठी राज्यसत्ता कठोर, निर्दयी आणि नैतिकतेपासून मुक्त, साम-दाम-दंड-भेडाचा वापर स्वत:च्या हितासाठी करू शकेल, हे आवश्यक होते. दुसरा पैलू अगदी उलट होता. त्यात सत्ता नियंत्रित करण्याबाबत सांगितले होते. सत्ताधारी कितीही शक्तिशाली असला तरी प्रजेच्या पाठिंब्यानेच त्याला वैधता मिळते, असे म्हटले होते. त्यांनी लोकांवर अवाजवी कर न लादणे आणि विषयांच्या आकलनाबद्दल संवेदनशील असणे आवश्यक होते. कालिदासांनी राज्यकर्त्याच्या राजधर्माची व्याख्या करताना लोकांच्या कल्याणासाठी काम करणे अपरिहार्य असल्याचे म्हटले होते. त्यांनी त्यांच्या गुणांच्या आधारे मंत्र्यांची निवड करावी. त्याच वेळी मंत्र्यांनी न घाबरता, न डगमगता आपले म्हणणे मांडावे, अशी अपेक्षा होती.

‘अर्थशास्त्र’ स्पष्ट शब्दांत सांगते की, प्रजेच्या हिताच्या विरोधात वागणे अधर्म आहे. ‘महाभारता’मध्येही जुलमी शासकाविरुद्ध बंड करण्याची मुभा आहे. उत्तराधिकारी पात्र नसल्यास त्याने सिंहासनावर बसू नये, असेही म्हटले आहे. ‘अर्थशास्त्रा’मध्ये प्रशासकीय संरचना, वित्त, लष्कर आणि परराष्ट्र धोरण यासंबंधीच्या सूचनाही आहेत. यापैकी अनेक तत्त्वे आजही प्रासंगिक आहेत, पण माझ्या परदेशी मित्रांना हे सगळं कसं कळणार? ‘अर्थशास्त्र’ सहाव्या शतकात नष्ट झाले आणि १९०५ मध्ये म्हैसूरमधील ताडपत्रीवरील हस्तलिखितातून पुन्हा प्राप्त झाले होते. त्या तुलनेत युरोपीय राजकीय विचारवंतांची पुस्तके मोठ्या प्रमाणात प्रकाशित झाली आणि जगभर वाचली गेली. दुर्दैव म्हणजे आजही भारतात आपल्या राजकीय विचारांच्या वारशाकडे फारसे लक्ष दिले जात नाही, त्यावर जवळपास शून्य शैक्षणिक संशोधन होते आणि आपल्या राजकारण्यांनाही त्यात रस राहिलेला नाही. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

पवन के. वर्मा लेखक, मुत्सद्दी, माजी राज्यसभा खासदार pavankvarma1953@gmail.com

बातम्या आणखी आहेत...