आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निमित्त:हमारा बंडू भी दहावी में ही है...

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘ओ भय्या, जरा आगे उस चिंचे के झाड के पास छोडोना! ऐसा क्या करता है?’ शेवंताआज्जी जोरजोरात बोलत होत्या. ‘सोडतो आज्जी, नका काळजी करू !’ रिक्षावाले काका अस्खलित मराठीत म्हणाले. ‘अरे भय्या! तुमकू मराठी आती है क्या ?’ यावर मात्र ते काका हसले आणि म्हणाले, ‘अहो आज्जी, माझं नाव रघुनाथ! रघुनाथ वाघमारे! मी मराठी आहे तर मराठी बोलणारच ना?’

दोन हातातल्या भाज्यांच्या पिशव्या सावरत आज्जी खाली उतरल्या आणि म्हणाल्या, ‘अहो, इथं जो तो हिंदीतच बोलतो. मला बापडीला कळायचं कसं कोण मराठी, कोण हिंदी? मराठीत बोललेलं समजलं नाही म्हणून अर्ध्यावरच उतरवून गेलात तर?’ शेवटचं वाक्य बोलेपर्यंत आज्जी सोसायटीच्या गेटपर्यंत पोहोचल्या होत्या. तिच्यासोबत आलेला छोटा राजू हे सगळं ऐकत होता. आज्जी घरात शिरल्या शिरल्या त्याने आज्जीला विचारलं, ‘आज्जी, त्या काकांशी बोलताना तुझी टंग फिसलली होती का?’ आज्जीच्या डोक्यात लख्खकन प्रकाश पडला. ‘अरे, टंग काय? फिसलली काय ? आपण मराठी आहोत ना ? मग मराठीत बोल की!’

त्याचं तरी कुठे चुकलं होतं ? त्याने घरात, आजूबाजूला, शेजारीपाजारी, शाळेत ऐकलेली भाषाच तर तो बोलत होता. इतका वेळ कोपऱ्यातल्या आरामखुर्चीत रेलून बसलेले आणि आपल्या नाकावर घसरणाऱ्या चष्म्यातून बघत आजी आणि नातवामधील एकूण संवादाचा कानोसा घेणारे आजोबा खाकरत उठले. उजव्या हाताने चष्मा सरळ करून नीट नाकावर घेत आपल्या सौभाग्यवतीकडे बघत म्हणाले, ‘अहो, आपण करू तेच पुढची पिढी करणार! आपण किती शुद्ध बोलतो? मराठी, हिंदी, इंग्रजी यांची भेळ करून आपणच जर त्यांच्या पानात वाढली तर ती पिढी त्यावरच पोसणार!’ आज्जीला पटलं. त्यामुळे पुढे आज्जी काही बोलली नाही. दुसऱ्या दिवसापासून आज्जीने एक प्रयोग करायचं ठरवलं. जिथे जिथे जाऊ तिथे मराठी बोलू. सकाळी नातवाला सोडायला म्हणून जेव्हा राजूसोबत त्या आल्या तेव्हा व्हॅनवाल्या काकांना पाहून त्या मोठ्याने म्हणाल्या, ‘नमस्कार काका, कसे आहात?’ काकांना आनंद झाला. काका म्हणाले, ‘अरे वा आज्जी! तुम्ही इतकं छान मराठी बोलता हे ऐकून बरं वाटलं! मी मस्त, मजेत आहे.’

राजूला सोडून आज्जी परत घरी आल्या तेव्हा त्यांच्या डोक्यात विचारचक्र सुरू होतं. ‘यांचं खरं आहे. आपणच हिंदीतून सुरुवात केल्यावर समोरचा माणूस मराठी आहे हे कसं कळेल? सुरुवात आपल्यापासूनच झाली पाहिजे. राजूशी बोलतानादेखील छान मराठीत बोललो तर तोदेखील छान मराठी बोलेलच ना?’ विचारचक्र सुरूच होतं तेवढ्यात घरकाम करणाऱ्या विजूमावशी आल्या. आज्जी शांत बसलेल्या पाहून त्यांनी विचारलं, ‘भाभी, तबियत खराब है क्या?’ विजूमावशीच्या प्रश्नाने खरं तर हिंदीतील प्रश्नाने त्यांची तंद्री लगेच भंग पावली. एरवी असतं तर त्यांनी ‘किधर क्या ? मेरेकु अच्छा है. थोडा विचार कर रही थी,’ असं काहीतरी उत्तर दिलं असतं. पण त्या म्हणल्या, ‘नाही गं. मी बरी आहे. विचारात मग्न होते थोडी!’ कधी कधी आपण केलेल्या प्रश्नांना किंवा विधानांना उलट उत्तराची अपेक्षा नसते. ते विधानच आपल्याला अतीव समाधान देऊन जातं. आज्जीचं तसं झालं. त्या स्वत:वरच खुश झाल्या. निश्चय केला तर आपण नक्की उत्तम मराठी बोलू शकतो. गरज नसताना चुकीचं हिंदी बोलण्यापेक्षा योग्य मराठी बोलणं कधीही चांगलं. आज्जीच्या मनात आता हे अगदी पक्कं झालं. रात्री टीव्हीवर बातम्यादेखील आज त्यांनी मराठीच लावल्या. हे सगळं आजोबांच्या नाकावरच्या चष्म्यातून आणि बेरकी डोळ्यांतून सुटलं नव्हतं. शांतपणे ते सगळं बघत होते. राजूला जवळ घेऊन आज्जी झोपी गेली.

दिवस उजाडला तशा आज्जी ‘मॉर्निंग वॉक’ला बाहेर पडल्या. आजोबांच्या एका टोमण्यानं त्यांना जणू नवसंजीवनी दिली होती. त्या चालू लागल्या तसे बागेत बोलल्या जाणाऱ्या मराठीमिश्रित हिंदीतील मराठी आणि हिंदी शब्द त्यांच्याभोवती नाचू लागले. ‘अरे दीदी, क्या बोलू तुमको ? मैं कल जरा शेजारी गयी थी, तभीच तुम्हारा फोन आके गया.’ ‘भाभी, कल स्वैपाक क्या किया था? हमारे ये बहोत तारीफ कर रहे थे.’ आज्जींना हसू आवरेना. त्या पुढे जात राहिल्या, तोच तिथे दोन बायका आणि एक मुलगा बोलत उभे असलेले त्यांना दिसले. ‘तुम्हारा नाम क्या है बेटा ?’ ‘महेश.’ ‘अरे वा! अच्छा नाम है. कितवी में हो?’ त्याची आई शेवटी त्या बाईंना म्हणाली, ‘वो दसवीं कक्षा में पढ रहा है.’ ‘अरे वा! हमारा बंडू भी दहावी मेंही है.’ आज्जींना आता कळून चुकलं, ‘थोडा वेळ जरी आपण आता इथे अधिक थांबलो तर नक्की वेड लागेल.’ त्या झपझप पावले टाकत पुढे निघाल्या. आपण का असं बोलतो ? भाषा हे संवादाचं माध्यम आहे हे खरं आहे, पण आपल्याला ती भाषा जर नीट येत नसेल तर चुकीचं तरी का बोलावं? आज्जींचं विचारचक्र सुरूच होतं. घरी आल्याबरोबर राजूने घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, “‘तू कुठे गेली होतीस आज्जी?’ ‘फिरायला!’ आज्जी हसत नातवाचा गालगुच्चा घेत म्हणाली. ‘शेजारच्या आंटी ‘शक्कर’ मागायला आल्या होत्या.’मग तू त्यांना काय सांगितलंस? ‘मी आईला सांगितलं आणि त्यांना साखर नेऊन दिली.’

भारताने पाकिस्तानवर एक डाव आणि १२५ धावांनी विजय मिळवल्यानंतर कप्तान ज्या आत्मविश्वासाने पत्रकार परिषद घेईल तितक्याच आत्मविश्वासाने राजू म्हणाला, ‘शाबास! अभिमान वाटतो तुझा!’ आपल्या संघाने मालिका विजय मिळवल्यावर प्रशिक्षकाची जी देहबोली असते त्या थाटात आज्जी म्हणाल्या. दुरून हे सगळं आपल्या नाकावरच्या चष्म्यातून बघणारे आजोबा, चष्मा उजव्या हाताच्या मधल्या बोटाने वर सरकवत म्हणाले, ‘जिंकलंत हो जिंकलंत! फक्त हे एका दिवसापुरतं न राहता कायमस्वरूपी असावं. सर्वांनीच हे लक्षात ठेवायला हवं.’ आज्जी डोळ्यांत गोड हसल्या. बाहेरगावी गेलेल्या राजूच्या बाबांना घरात शिरल्या शिरल्या हा संवाद ऐकू आल्यानं फार आनंद झाला आणि ते म्हणाले, ‘इस बात पे तो चाय बनती ही है!’ राजूने आज्जीकडे पाहिलं, आज्जीने आजोबांकडे पाहिलं, ...आणि अख्खं घर खो-खो हसत सुटलं! अनिल आठलेकर संपर्क : 9762162942

बातम्या आणखी आहेत...