आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता रणवीरसिंगने नुकतेच एका मॅगझिनसाठी बोल्ड फोटोशूट केले होते, त्यानंतर त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मुंबईत एनजीओ चालवणाऱ्या ललित टेकचंदानी यांनी त्यांच्या छायाचित्रांमुळे महिलांच्या भावना दुखावल्याची तक्रार दाखल केली होती. अशा छायाचित्रांमुळे भारतीय संस्कृती दुखावते, असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. आणखी एक मुंबईच्या वकील वेदिका चौबे यांनीही असाच एफआयआर दाखल केला आहे. त्यामुळे आपण खरेच इतके दांभिक आहोत का, असा प्रश्न विचारणे उचित ठरेल. आपली संस्कृती ही जगातील सर्वात व्यावहारिक आणि संतुलित संस्कृतींपैकी एक आहे. आपल्याकडे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ मानले गेले आहेत. हे पुरुषार्थ जीवनाबाबत एक संतुलित दृष्टिकोन समोर ठेवतात, त्यामध्ये गोष्टी वगळल्या जात नाहीत, तर समाविष्ट केल्या जातात, जेणेकरून एखादी व्यक्ती परिपूर्ण जीवन जगून आनंद आणि समाधान मिळवू शकेल.
चार पुरुषार्थांमध्ये कामाचाही समावेश असल्याने त्याचा अर्थ असा होतो की, इंद्रियांबाबत आपली नकारात्मक वृत्ती नाही. इराॅस ही ग्रीक आणि क्युपिड या रोमन देवतेप्रमाणे आपल्याकडे प्रेमाचा देव कामदेवाला मानले आहे. अथर्ववेदात त्यांचा निर्माता आणि सर्वोच्च देवता म्हणून गौरव करण्यात आला आहे. ऋग्वेदात त्याचे वर्णन देवतांनी अतुलनीय असे केले आहे. तैत्तिरीय ब्राह्मणानुसार काम हा धर्म आणि श्रद्धा यांचा पुत्र आहे. धर्म ही न्यायाची देवता आहे, तर श्रद्धा ही विश्वासाची देवी आहे. दुसरीकडे, हरिवंशामध्ये कामाचे वर्णन विष्णू आणि लक्ष्मीचे अपत्य म्हणून केले गेले आहे आणि हे कामाच्या उत्पत्तीबद्दल सर्वाधिक स्वीकारलेले मिथक आहे. तुलसीदासांच्या रामचरितमानसातही कामदेवाचे प्रभावी वर्णन आहे.
चार पुरुषार्थांमध्ये कामाला स्थान देऊन आपण प्रेम, आकांक्षा, ऐंद्रिकता या भावनांनाही मान्यता दिली आहे. यामुळेच आपल्या पुराणांमध्ये देवतांचे ब्रह्मचारी किंवा वैरागी म्हणून वर्णन केले जात नाही आणि त्यांच्या जोडीदार रूपवान दाखवल्या आहेत. त्यामुळे आपल्या कलेतही प्रखर ऐंद्रिकता आहे. महाकवी कालिदास यांचे साहित्य घ्या. किंवा भर्तृहरी, बिल्हण, जयदेव यांचे साहित्य पाहा, त्यात प्रणयाचे खुले चित्रण आहे. आपल्या उपासनास्थळांंमध्येही ऐंद्रिकता आणि आध्यात्मिकता यांचा परस्पर संबंध असल्याचे दाखवले आहे. त्यात खजुराहो आणि कोणार्क हे सर्वात प्रसिद्ध आहेत. उपासनागृृहांच्या भिंतींवर प्रणय-प्रतिमा कोरल्याचा अर्थ हात होता की आकांक्षा आपल्याकडे दिव्यत्वाच्या विस्तृत श्रेणीचा एक भाग मानल्या जातात, तथापि ते निरंकुश व्यभिचाराचे अनुमोदन नव्हते. कामसूत्रात वात्स्यायनाने सांगितले होते की, धर्म, अर्थ आणि काम योग्य प्रमाणात अंगीकारले गेले तर आपण आपोआप चौथ्या ध्येयापर्यंत म्हणजेच मोक्षापर्यंत पोहोचू. इस्लामिक पुराणमतवाद आणि वसाहतवादी काळात ब्रिटिश व्हिक्टोरियन नैतिकतेच्या प्रभावाखाली आपल्या देशातही माॅरल पोलिसिंगची वृत्ती अधिक मजबूत होत गेली, हे दुर्दैवी आहे. आकांक्षांची पूर्तता उत्साही, पण संयमीपणे साजरी करणारी आपली परंपराच आपण विसरलो आहोत. आज संस्कृतीच्या नावाखाली बागांमध्ये तरुण जोडप्यांचा छळ केला जातो, तथापि आपली संस्कृती पूर्वी कशी होती हे आपल्यालाही माहीत नाही. महिलांना भावनाशून्य वस्तू म्हणून पाहणे हेदेखील याचेच एक लक्षण आहे, त्यामुळे आपण विचार करू लागतो की, रणवीरसिंगने त्याचे शरीर दाखवले तर महिलांच्या पावित्र्याचे रक्षण करणे ही आपलीच जबाबदारी आहे! (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) पवन के. वर्मा लेखक, मुत्सद्दी, माजी राज्यसभा सदस्य pavankvarma1953@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.