आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुरिमा विशेष:पी. टी. उषा : आख्यायिका आणि आव्हानं !

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गतवर्षीचं ऑलिम्पिक भारतासाठी क्रांतीचं ठरलं. टोकियातील सात पदकं अभिमानास्पद. पण यापैकी भालाफेकीत नीरज चोप्रानं मिळवलेलं सुवर्णपदक हे अ‍ॅथलेटिक्समधील युगारंभाचं द्योतक. कारण या घटनेपर्यंत दोन हुकलेल्या पदकांच्या पुंजीची क्रीडा इतिहासात नेहमीच चर्चा व्हायची. यापैकी एक म्हणजे १९६०च्या रोम ऑलिम्पिकमधील ४०० मीटर शर्यतीत ‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग यांचं एक दशांश सेकंदानं हुकलेलं पदक आणि त्यानंतर दोन तपांनंतर इतिहासाची झालेली पुनरावृत्ती. ४०० मीटर अडथळा शर्यत लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये प्रथमच समाविष्ट करण्यात आली होती. त्यामुळेच उषाच्या पदकाविषयी भारताला मोठ्या आशा होत्या. पण तिच्या प्रयत्नांची दखल देशानं घेतली. शालेय पाठ्यपुस्तकात आणि प्रशासकीय सेवा परीक्षेच्या प्रश्नांमध्ये तिची नोंद घेतली जाते. ‘भारतीय अ‍ॅथलेटिक्सची राणी’, ‘उडनपरी’, ‘सुवर्णकन्या’, ‘रनिंग मशीन’... अशा अनेक उपाध्यांनी ती आजही ओळखली जाते. उषाच्या यशोगाथेप्रमाणेच तिची पूर्वकथासुद्धा संघर्षमय आहे. कोझिकोडच्या (केरळ) मेलाडी-पायोली भागातील कुट्टाली गावात उषाचा जन्म झाला. अठराविश्वे दारिद्र्य आणि पोषणाचा अभाव हे पाचवीलाच पुजलं होतं. बालवयातील उषाच्या अचाट गुणवत्तेच्या बळावर तिला केरळ सरकारची अडीचशे रुपये शिष्यवृत्ती मिळाली. त्यामुळेच कन्नूरच्या विशेष क्रीडा विद्यालयात ती दाखल झाली. मग १९७७च्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत ओ. एम. नाम्बियार हे उषाची क्षमता आणि गुणवत्ता पाहून भारावले आणि तिच्या प्रशिक्षकपदाची सूत्रं आपल्या हाती घेतली. हाच उषाच्या कारकीर्दीचा कलाटणी देणारा क्षण.

१९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये उषानं वयाच्या सोळाव्या वर्षी ऑलिम्पिक पदार्पण केलं. मग १९८२ ते १९९४ अशा चार आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये चार सुवर्ण आणि सात रौप्य अशा एकूण ११ पदकांची कमाई केली. याशिवाय अनेक विक्रमसुद्धा तिनं प्रस्थापित केले. १९९१ मध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील निरीक्षक व्ही. श्रीनिवासन यांच्याशी ती विवाहबद्ध झाली. त्यानंतर तिनं एका मुलाला जन्म दिला. अ‍ॅथलेटिक्समधून निवृत्तीनंतर उषानं देशासाठी अ‍ॅथलेटिक्सपटू घडवण्याचा ध्यास घेतला आणि ‘उषा स्कूल ऑफ अ‍ॅथलेटिक्स’ची निर्मिती केली. अबिथा मॅन्युएल, जिस्ना मॅथ्यू, अथुल्या उदयन अशी गुणवत्ता आता राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू लागली आहे.

सत्तेचं पाठबळ ‘आयओए’च्या अध्यक्षपदासाठी उषाचं नाव इतक्या सहजपणे आलेलं नाही. ६ जुलै २०२२ या दिवशी उषाला सत्ताधारी भाजपकडून राज्यसभेची खासदारकी बहाल करण्यात आली. त्याच वेळी या ‘उषा’कालाची प्रचिती अपेक्षित होती. काही महिन्यांपूर्वी भाजपनं पश्चिम बंगालमधील नेते आणि माजी गोलरक्षक कल्याण चौबे यांना अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्षपद सुपूर्द केलं. त्या वेळी अध्यक्षपदाच्या लढतीत चौबे यांनी भारताचा माजी तारांकित फुटबॉलपटू बायच्युंग भुतियाला नामोहरम केलं. अगदी मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीतही भाजपचं पाठबळ दिसून आलं आहे. अमोल काळे यांनी विश्वविजेत्या भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांना धूळ चारली. पण, उषाची निवड मात्र बिनविरोध झाली. हेच सत्तेचं पाठबळ तिच्या आगामी वाटचालीसाठी महत्त्वाचं ठरेल. ‘आयओए’चं आव्हान भारतीय ऑलिम्पिक संघटना ही देशातील सर्वोच्च क्रीडा संघटना गेली काही वर्षे अध्यक्ष नरिंदर बात्रा आणि सरचिटणीस राजीव मेहता यांच्या मतभेदांमुळे जशी चर्चेत होती, तशीच न्यायालयीन खटल्यांमुळे. संघटनेची निवडणूक गतवर्षी डिसेंबरमध्ये व्हायला हवी होती. परंतु राष्ट्रीय क्रीडा धोरणामुळे बदललेल्या घटनेसंदर्भात न्यायालयात खटला चालू असल्यामुळे निवडणुकीला विलंब झाला. परिणामी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं (आयओसी) ‘आयओए’ला निवडणूक घ्या, अन्यथा निलंबित केलं जाईल, असा इशारा दिला. त्यामुळेच ही निवडणूक घेतली गेली.

राष्ट्रकुल घोटाळ्याप्रकरणी २६ एप्रिल २०११ या दिवशी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना अटक झाली होती. मग डिसेंबर २०१२मध्ये ‘आयओसी’नं ‘आयओए’वर बंदीची कारवाई केली होती. भ्रष्टाचार, सरकारी हस्तक्षेप, आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष आणि अनेक सदस्यांवर असलेले गुन्हेगारीचे आरोप ही त्या वेळची कारणं होती. २०११पासून राष्ट्रीय क्रीडा धोरणाचा अंकुश देशातील सर्वच क्रीडा संघटनांवर ठेवण्याचा निर्णय संसदेत घेण्यात आला. गेल्या ११ वर्षांत या दृष्टीनं अनेक पावलं उचलली गेली. पण गेल्या वर्षभरात हे धोरण क्रीडा प्रकारांच्या आंतरराष्ट्रीय संघटनांच्या नियमांआड येत असल्याचं सिद्ध झालं आहे. फुटबॉल, हॉकी संघटनांमधील न्यायालयाचा हस्तक्षेप टाळून बंदी टाळली. क्रीडा संघटनांच्या कारभारात राजकीय नेत्यांना बंदी, पदांची वयोमर्यादा ७० आणि दोन सलग कार्यकाळ झाल्यानंतर चार वर्षांचा खंडित कालखंड असावा, हे नवे नियम क्रीडा संघटनांना जाचक वाटत आहेत. भारतीय ऑलिम्पिक संघटनेनंही त्याला विरोध दर्शवला होता. त्यामुळे ‘आयओए’ची प्रतिमा सुधारण्यासह देशातील क्रीडा संघटनांचं धोरण निश्चित करण्याचं आव्हान उषापुढे असेल.

प्रशांत केणी संपर्क : prashantkeni@gmail.com

बातम्या आणखी आहेत...