आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ती’च्या गोष्टी:पिटुकली गौतमी

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

असं का होतंय, ते कधीकधी आपलं आपल्याला समजत नाही; उदास वाटत राहतं, हरवून गेल्यासारखं आणि हरल्यासारखं देखील वाटतं. आपण तेव्हा आयुष्यात जे काही करत असतो, ते योग्य आहे ना? ते आपण का करतो आहोत? त्याने आपल्याला काय मिळणार? पुढे आपलं काय होणार? असे बेसिक प्रश्न पडू लागतात आणि या प्रश्नांच्या कोलाहलात मन पुरतं भंडावून जातं. पुढे काय करायचं, कोणता रस्ता धरायचा... काही दिसत नाही. दाट धुक्याने वेढलेलं धूसर नुसतं सगळं... अशी परिस्थिती, अशा वेळा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात कधी ना कधीतरी काय; अनेकदा येतात. मीही अशाच परिस्थितीतून जात होतो तेव्हाची ही गोष्ट. एका चिमुकलीची. मन असं गोंधळून, भंडावून गेलं असेल की, मी सहजा घरी किंवा बंद खोलीत राहत नाही. बाहेर, मोकळ्यावर जातो. त्याने जरा बरं वाटतं. विचारही खुले होण्यास मदत होते. तसा मी त्या दिवशी घराजवळच्या बागेत गेलो. छान विस्तीर्ण बाग. एका बाजूला हिरवळ असलेली मध्यम आकाराची खेळायची जागा. एका बाजूला कारंजं, छोटंसं तळं आणि त्याला लागूनच जंगल जिम, झोपाळे, घसरगुंड्या,जॉगिंग ट्रॅक इ. मी विमनस्क, हरवून गेलेल्या अवस्थेत खुल्या जागेतल्या बाकड्यावर जाऊन बसलो. कुठेतरी एकटक पाहत. काहीतरी विचार करत... किती वेळ गेला असेल माहीत नाही, पण एका मऊ, इवल्या हाताच्या स्पर्शाने माझी विचारतंद्री भंगली. समोर सहा वर्षांची चिमुकली मुलगी उभी होती. हसत होती छान. सावळ्या वर्णाची, गुलाबीसर फ्रॉक घातलेली, केसांचे दोन पोनीटेल, बोलके डोळे, छोटीशी जिवणी असलेली. ‘काका, माझा बॉल गेलाय वर. मला देतोस का प्लीज?’ तिने मला विनंती केली. त्या हसऱ्या पिटुकलीची विनंती कशी कोण नाकारणार? मी विचारलं, ‘कुठे गेलाय?’

‘तिथ्थे,’ तिने चवडे उंच करून मी बसलो होतो तिथून काही अंतरावर असलेल्या एका पत्र्याच्या शेडकडे बोट दाखवलं. त्या पत्र्यावर बॉल गेला होता. ‘तुला एवढ्या उंच बॉल टाकता येतो?’ मी आश्चर्याने विचारलं. ती म्हणाली, ‘टाकला नाईय काई, मारलाय. हे बग असा ’ असं म्हणून तिने किक मारण्याची कृती करून दाखवली. ‘फुटबॉल खेलताना किक मारली जोरात.’ ‘ओह, आवडतो का फुटबॉल खेळायला? रोनाल्डोच दिसतेएस तू!’ मी बोलून गेलो आणि तिचा बॉल काढून देण्यासाठी शेडकडे चालू लागलो. तिने नकळत माझा हात धरला. किती आश्वासक, विश्वासू स्पर्श होता तिचा! आजूबाजूला पाहिलं, तिच्यासोबत कोणी मोठं माणूस दिसत नव्हतं. म्हणजे आई-बाबा, आजोबा असं. त्या शेडकडे जात मी विचारलं, ‘तू एकटीच खेळतीएस? नाव काय तुझं?’ तिने सांगितलं, ‘गौSSतमी. आबा आहेत तिथ्थे,’ असं म्हणून तिने दुसऱ्या बाजूच्या सीनिअर सिटीजन्सच्या घोळक्याकडे बोट दाखवलं. ‘ए काका,’ ती म्हणाली, ‘मला सांग बरं, हशायचं असेल तर एकत्र भेटून का हशायचं? आं?’ मी विचारलं, ‘म्हणजे?’ ‘ते बघ, माझे आबा.’ तिने सांगितलं आणि माझ्या डोक्यात प्रकाश पडला. तिच्या आजोबांचा तिथे हास्य क्लब होता तर. ती म्हणाली, ‘मला आबांनी सांगितलं की, हशलं की शक्ती मिळते खूप आपल्याला. टॉनिक असतं ना तसं. पन मला सांग हशायला का वेळ असते? केव्हापन हसता येतं की. हे बग असं...’ असं म्हणून ती खिदळू लागली. ‘खरंय, मॅडम आपलं... पण हे लोक व्यायामपण करतात तिथे. आणि भेटले की गप्पा होतात इकडच्या तिकडच्या. बरं वाटतं त्यांना.’ गौतमी म्हणाली, ‘काका, तू पन एकटाच तर आहेस. कसं काय? तुझ्याबरोबर कोनंय? अं?’ मी म्हणालो, ‘अगं मला जाम कंटाळा आलेला. मग एकटाच आलो बागेत. खरं तर काय करावं हे नीट समजत नव्हतं. त्यामुळे मग कुठेतरी जायचं म्हणून आलो इथे, पण बरं झालं ना...’ थोडं थांबून मी हसत सांगितलं, ‘मी नसतो आलो तर गौतमी ऊर्फ रोनाल्डो कुठे भेटली असती मला?’ गौतमीला मी केलेला विनोद समजायला किंचित वेळ गेला आणि मग ती छान हसली. मी तिला शेडवरचा बॉल काढून दिला. तो हातात घेऊन ती नाचत नाचत ओरडू लागली. ‘येSS येSSS माझा बॉल मिलाला, माझा बॉल मिलाला...’ किती साधीशीच गोष्ट होती, पण त्यातून तिला किती आनंद झाला होता! आनंद मिळवायचा असेल तर कशातूनही मिळतो आणि नसेल मिळवायचा तर मग तो कशातूनही मिळत नाही म्हणजे नाही, असा विचार माझ्या डोक्यात चमकून गेला. मला वाटलं की, गौतमीबाई आता आपापल्या खेळात पुन्हा रमणार... मला जरा वाईट वाटलं. पण तोच तिने विचारलंच, ‘काका तू खरंच एकटाचेस ना?’ ‘हो गं,’ मी म्हणालो.

ती चटकन म्हणाली, ‘मग चल मी खेलते तुझ्याबरोबर. ये मला पकड...’ ती बॉल टाकून जोरात पळू लागली. ‘ये... ये... पकड की ले..’ म्हणू लागली. खिदळू लागली. मीही गो विथ द फ्लोप्रमाणे तिच्यामागे जोरात पळू लागलो. थोडा वेळ पकडापकडीचा खेळ झाल्यावर आम्ही गेलो घसरगुंडी खेळायला, मग झोक्याचा खेळ. ती चांगलेच उंच, जोरात झोके घेत होती. वरपर्यंत. प्रत्येक वेळी खालून वर जाताना खिदळत होती. त्या खिदळण्यात एक बेफिकीरी होती, जे होईल ते होईल पुढे, आत्ता मी वाऱ्यावर स्वार आहे, आत्ता मी माझी माझी आहे. झोका घेताना गौतमीने मला विचारलं, ‘काका, तुला झोका आवडतो का? हे बग असा झोका वर गेला की पोटात बुकबुकतं. खाली आला की ठमठमतं...’ आणि ती हसू लागली. त्यानंतर आम्ही कारंजं पाहिलं, तळ्यातले काळे, केशरी, पांढरे मासे पाहिले. जॉगिंग ट्रॅकवरून धावलो, चाललो. आणि शेवटी ती वेळ आलीच... निरोपाची वेळ! तिच्या आजोबांनी तिला हाक मारली. पुन्हा माझं मन झाकोळलं गेलं. टाटा करताना गौतमी म्हणाली, ‘मी आबांबरोबर रोज येते. तू पन ये. बाय. आपन खेलू मस्त. ये हां...’ निघून गेली उड्या मारत. मी तिच्याकडे पाहत बसलो. मनातलं धुकं स्वच्छ झालं होतं. उगाच सगळं धरून बसण्यात काही हाशील नव्हतं. गो विथ द फ्लो...बागेतून आत येतानाचा मी आणि बाहेर पडतानाचा मी - यांत जमीनअस्मानाचा फरक होता!

प्रणव सखदेव संपर्क : ७६२०८८१४६३

बातम्या आणखी आहेत...