आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • PK Won Many Elections, But Will They Win On Their Own? | Article By Sanjay Kumar

विश्लेषण:पीकेंनी अनेक निवडणुका जिंकून दिल्या, पण ते स्वतः जिंकतील?

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मला या लेखाची सुरुवात एका स्पष्टीकरणाने करायची आहे- हा लेख प्रशांत किशोर किंवा पीके यांच्या विरोधात नाही. पीके यांनी सूचित केलेला राजकीय प्रवास माझ्या मते त्यांच्यासाठी कठीण का असू शकतो, हे या लेखात स्पष्ट केले आहे. राजकीय रणनीतिकार म्हणून त्यांच्या क्षमतेवर कोणीही शंका घेऊ शकत नाही. त्यांनी निवडणूक जिंकण्यास मदत केलेली राजकीय पक्षांची लांबलचक यादी पुरेशी आहे. मात्र, त्यांच्यावर हा लेख लिहिण्याचे कारण म्हणजे त्यांनी आता स्पष्ट केले आहे की, ते कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करून सक्रिय राजकारणात आपली कारकीर्द सुरू करणार नसून, बिहारमध्ये स्वत:चा पक्ष काढणार आहेत. अशा स्थितीत प्रश्न पडतो की, ज्या व्यक्तीने इतक्या नेत्यांना निवडणूक जिंकून दिली, ती व्यक्ती स्वत: निवडणूक जिंकू शकेल का? ते आपला पक्ष यशस्वीपणे स्थापन करू शकतील का? मला येथे तीन कारणे सांगायची आहेत, ज्यामुळे पीकेंसाठी पुढे कठीण रस्ता आहे, असे मला वाटते. प्रथम, मागील अनुभव सांगतो की, सर्वोत्तम प्रशिक्षक कधीही चांगले खेळाडू असल्याचे सिद्ध झाले नाही. या दोन्ही भूमिका वेगळ्या आहेत आणि त्यांना भिन्न प्रतिभा आवश्यक आहे. प्रत्येक यशस्वी खेळाडूच्या मागे एक यशस्वी प्रशिक्षक असतो, पण कोणी यशस्वी प्रशिक्षक यशस्वी खेळाडू झाला आहे का? किंवा यशस्वी खेळाडूही यशस्वी प्रशिक्षक झाले का? प्रत्येक क्षेत्रात उदाहरणे सापडतील, पण क्रिकेटचे उदाहरण घेतले तर आपल्या लक्षात येईल की, यशस्वी खेळाडू आपल्या मुलांना प्रशिक्षण देऊन यशस्वी करू शकलेले नाहीत.

भूतकाळात, विविध क्षेत्रांतील अनेक यशस्वी व्यक्तींनी राजकारणात नशीब आजमावले आहे - विशेषत: चित्रपट जगतातील. काही यशस्वी झाले, काही अयशस्वी, परंतु त्यांची एक ओळख कायम राहिली. पीके हेही एक प्रसिद्ध नाव आहे, परंतु केवळ त्यांच्या क्षेत्रात. त्यांचा चेहरा सर्वसामान्यांमध्ये परिचित नाही आणि राजकारणात यशस्वी होण्यासाठी हे आवश्यक आहे. इतर क्षेत्रातील यशस्वी लोक राजकारणात ठसा उमटवू शकले नाहीत अशी अनेक उदाहरणे आहेत. निवडणूक विश्लेषक योगेंद्र यादव यांचेच उदाहरण घ्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गुरुग्राममध्ये त्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती. प्रसिद्ध पत्रकार आशुतोष यांना चांदणी चौक लोकसभा मतदारसंघातून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. भारताचे सर्वात प्रसिद्ध निवडणूक आयुक्त टी.एन. शेषनही गांधीनगरमधून १९९९ ची लोकसभा निवडणूक हरले होते. मेधा पाटकर आणि इरोम शर्मिला या कार्यकर्त्यांनीही पराभव सहन केला आहे.

दुसरे कारण म्हणजे आज भाजप प्रचंड ताकदवान आहे. कोणत्याही नव्या राजकीय संघटनेला आपल्या वर्चस्वाला आव्हान देणे अवघड आहे. अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाची स्थापना करून दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकारे स्थापन केली हे खरे आहे, परंतु त्यांना एका लोकप्रिय जनआंदोलनाचा लोकप्रिय चेहरा असल्याचा फायदा झाला हे आपण विसरू नये. यूपीए सरकारबद्दल सर्वसामान्यांमध्ये तीव्र नाराजी असताना त्यांनी पक्षाची स्थापना केली होती. पीके यांना कोणत्याही लोकप्रिय चळवळीचा चेहरा असण्याचा फायदा नाही, तसेच केंद्र सरकारही आज लोकांमध्ये अलोकप्रिय नाही. खरे तर वाढती महागाई आणि बेरोजगारी असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आज शिखरावर आहे.

प्रशांत किशोर यांनी बिहारमधून राजकीय इनिंगला सुरुवात करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, या राज्याचे राजकारण दोन पक्षांमधील लढाई बनले असून विजय-पराभव ओबीसी मतांच्या जमवाजमवीवरच ठरतो. गेल्या दशकात बिहारमध्ये दोन राजकीय आघाड्यांना ७५ टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. त्याला पीके कसे भगदाड पाडणार? ते स्वतः सवर्ण आहेत ही वस्तुस्थिती त्यांच्यासाठी बिहारमध्ये जननेता होण्यात अडथळा निर्माण करू शकते. कदाचित लालू यादव आणि रामविलास पासवान कॅन्व्हासवरून हटल्यानंतर बिहारमध्ये राजकीय पोकळी निर्माण झाली आहे आणि आता नितीश दीर्घ खेळी खेळणार नाहीत, असे त्यांना वाटत असावे. त्यांना या संधीचे सोने करायचे आहे. परंतु, तेजस्वी यादव आधीच एक नेता म्हणून उदय झाला आहे. २०२० मध्ये त्यांनी भाजप-जेडीयू युतीला ज्या प्रकारची स्पर्धा दिली, तो त्याचा पुरावा आहे. पीके यांना नवीन पक्ष स्थापन करून तरुण मतदारांना आकर्षित करायचे असेल, तर तेजस्वी यादव यांच्याशिवाय ते कठीण होईल. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) संजय कुमार प्राध्यापक व राजकीय भाष्यकार sanjay@csds.in

बातम्या आणखी आहेत...