आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कवितेतली ‘ती’:म्हणे ही बाईल मरे तरी बरे

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

“बरे झाले देवा |बाईल कर्कशा’ असे तुकाराम महाराज म्हणतात. तुकारामांची बायको आवडी. तिची ही भांडकुदळ प्रतिमा त्यांच्याच अभंगांमधून अनेक वेळा उद््धृत होते. अनेक कीर्तनकारांनी आणि सिनेमाच्या कथानकांनीही तिची तुकारामांना विठ्ठलभक्तीवरून सतत बोलणारी, चंचल अशी काहीशी उपहासात्मक, विनोदी प्रतिमा उभी केेली. परंतु, तुकारामांचं संसाराप्रति निःसंग असणं, विठ्ठलभक्तीत वेडं होणं, कुटुंबाची-मुलाबाळांची उपासमार, विरोध करणाऱ्यांंकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून, वैतागून; गरिबी, सततचे कष्ट, अवहेलना यांना कंटाळलेल्या आवडीची आणि तिच्यासारख्या इतर स्त्रियांची होणारी उद्विग्नता, चीडचीड कोणी समजून घेतली असेल काय? उलट, “विठ्या! काळ्या! तुझं मडं बशिवलं’ असं म्हणत ईश्वराला सामान्यरूपात बघणाऱ्या आवडीची भांडखोर प्रतिमा भक्ती वाङ्मयात कदाचित तुकारामांच्या औदार्यापुढे थिटीच ठरते. अशा सामान्य, संसारी स्त्रियांच्या वेगवेगळ्या प्रतिमा संताच्या अभंगरचनेत दिसतात.

जनाबाईप्रमाणे तुकारामांना समकालीन असलेली दुसरी संत कवयित्री तुकाराम शिष्या संत बहिणाबाई (इ. स. १६४८ – १७००) हे मराठी संत वाङ्मयातले एक गूढ व्यक्तीत्व, मुक्ताबाई व जनाबाईनंतर सुमारे साडेतीन शतकांनी ही विलक्षण स्त्री भेटते. अतिशय ‘अलौकिक’ व अतिशय ‘लौकिक’ अशा दुहेरी पेडांची तिच्या आयुष्याची गुंतागुंतीची वीण आहे. ती ‘महायोगिनी’ म्हणून नावाजली. इतर कवयित्रींप्रमाणे तिला गुरूचा सहवास व मार्गदर्शन लाभले नाही. तिच्या बौद्धिक उंचीची, प्रापंचिक-सामाजिक यशाची ती एकमेव वाटेकरी व म्हणून ती ‘स्वयंप्रकाशी’ आहे असे मानण्यात येते. तुकाराम शिष्य परिवारातली ही एकमेव स्त्री. पण त्या परिवाराचे छत्र न लाभलेली. आपल्या आयुष्यातील घटना सांगणारी एकमेव ‘आत्मचरित्रकार’!

“म्हणे ही बाईल मरे तरी बरे । हीस का पामरे भेटताती? आम्ही काय जाणो नाम हरिकथा । भिक्षुकांचे पंक्ती बसो आम्ही ।।” किंवा “ईस नमस्कार करितील जन । आम्ही ईस वाटो तृणापरी ।। न पाहे मी मुख सर्वथा इयेचे । हीनत्व आमुचे कोण फेडी ? भंडिमा सोसून कोण राहे येथे ? ऐसिये स्त्रियेसे कोण पाळी? इचे नाव घेती गोसावीण ऐसे । आम्हा कोण पुसे इजपुढे? पुसतची येती इशी पहा जन । आम्ही की ब्राह्मण मूर्ख जालो?”

आपल्यापेक्षा बायकोला लोकांनी श्रेष्ठ मानणे किंबहुना तिचे श्रेष्ठ असणे कुठल्याही विशेषतः मध्ययुगीन नवऱ्याला सहन होणे तेव्हा कठीणच होते. त्याच्या पौरुष्याचा तो एक प्रकारे अपमानच असे त्यांना वाटत असावे. असे अपमानाचे जिणे जगण्यापेक्षा बायकोला सोडून वनात निघून जावे किंवा तीर्थयात्रेला जाऊन वैरागी व्हावे अशा गोष्टी तिचा नवरा बोलू लागतो. त्यामुळे कोंडी होणारी स्त्री, “काय म्या करावे अदृष्टा आपण । आले जे टाकून सोसी येथे ।। स्वधर्म आपुला रक्षुनिया मने । शास्त्राच्या श्रवणे देव साधू ।।’

जे ताटात वाढून आले ते सोसावे... मनातल्या मनात आपल्या वृत्तीनुसार ‘स्वधर्म’ राखावा. पण शास्त्रांत जे सांगितले आहे तसे वर्तन करावे, अशी तडजोड करणारी स्त्री अशा विविध प्रतिमांनी बहिणाबाईंचे व्यक्तिमत्त्व त्यांच्याच कवितेतून उलगडत जाते. ‘भ्रताराची सेवा तोचि आम्हा देव । भ्रतार स्वयंमेव परब्रह्म ।। भ्रतार वचनासी उलंघीन जरी । पापें माझ्या शिरी पृथ्वीची ।। भ्रतार सेवेने सांग हा परमार्थ । भ्रतारेच स्वार्थ सर्व आहे ।। भ्रतारावाचोन अन्य देव जरी । येईल अंतरी ब्रह्महत्या ।। बहेणी म्हणे मज आज्ञाची प्रमाण । ब्रह्म सनातन स्वामीमाझा।।’ अशी शास्त्रवचने प्रमाण मानून नवऱ्याच्या आज्ञेत राहून सेवा करणारी स्त्री आणि त्याच वेळी आपल्या शरीरभोगाबद्दल बोलणारी बहिणाबाई फार खोल असे काही सुचवून जाते.

“स्त्रियेचे शरीर पराधीन देह । न चाले उपाव विरक्तीचा ।। “शरीराचे भोग वाटताती वैरी । माझी कोण करी चिंता आता ।।’ बहिणी म्हणे जैसा वोकियेला वोक । तैसे हे मायिक वाटे मना ।।’ इथे प्रपंच व परमार्थ या दोन भिन्न टोकांमध्ये कुतरओढ होणाऱ्या एका विरक्त, बुद्धिमान स्त्रीच्या शरीरभोगांचे दुःख बहिणाबाई सांगते आहे. विरक्तीमुळे व ‘असंगाशी संग’ झाल्यामुळे प्रपंचाशी मनाने बांधल्या न गेलेल्या, पण शरीराने प्रपंचाशी बांधून ठेवलेल्या स्त्रीचा हा झगडा आहे. तो प्रपंचाशी आहे म्हणण्यापेक्षा तो स्त्रीत्वाशी, त्यातही तो स्त्री देहाशी आहे. मनाने विरक्त असलेल्या विवाहित स्त्रीला आपले शरीर दुसऱ्याला भोगासाठी द्यावे लागणे ही स्त्रीच्या पराधीन देहाची विटंबना बहिणाबाईला भोगावी लागते. ही जाणीव तिच्या शब्दांतून व्यक्त होते.

अजूनही गावखेड्यात आयाबाया “शेळीचे कान गोसाव्याच्या स्वाध्यान’, “जसा भोगी तशी रात्र’ अशा काही म्हणींचा बोलण्यात वापर करताना दिसतात. त्यातही हीच हतबलता जाणवत असते. बहिणाबाईंच्या काळानंतर इतकी वर्षे उलटून गेली तरी स्त्रियांचे त्यांच्या मर्जीशिवाय आपले शरीर दुसऱ्याला भोगू देण्याचे भोग मात्र अजून संपलेले नाहीतच. मग ती वेश्यालयातली स्त्री असो, घरा-कुटुंबातली वा विविध जात-वर्ण-वर्गातली. या व्यवस्थेत ‘नकोशा’ स्पर्शाला तिला अजूनही ‘नाही’ म्हणता येत नाहीच.

कविता महाजन यांनी संपादित केलेल्या वेदिका कुमारस्वामी यांच्या ‘गावनवरी’ काव्यसंग्रहातल्या अनेक कविता अशा ‘नकोशा’ असणाऱ्या स्पर्शावर हतबल भाष्य करतात. महाकाव्यातल्या द्रौपदी, अहिल्या, वृंदा अशा देहाची विटंबना झालेल्या स्त्रियांनाच त्याग, सोशीकता आणि दैवत्वाच्या प्रतिमांनी सजवून आदर्शाच्या मखरात बसवले जाते. संत वाङ्मयाचा काळ असो वा रामायण-महाभारत काळ... स्त्री देहाची विटंबना, अवहेलना व तिची हतबलता यातून बाहेर पडणाऱ्या स्त्री प्रतिमा मात्र कुठे फारशा दिसत नाहीत. या कारणाचं मूळही पुन्हा पुरुषी-जात-वर्णभेदी समाजव्यवस्थेतच शोधावं लागतं.

सारिका उबाळे संपर्क : sarikaubale077@gmail.com

बातम्या आणखी आहेत...