आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Political Battles Intensify Over Symbols Associated With Religion And Nation| Article By Shekhar Gupta

थेट भाष्य:धर्म व राष्ट्राशी संबंधित असलेल्या प्रतीकांवरून राजकीय लढाई तीव्र

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

७५ व्या स्वातंत्र्यदिनासोबत उत्साही राष्ट्रवादावर दावा करण्याची शर्यतदेखील जोडली गेली. तिरंगा खादीचा असावा की पॉलिस्टरचा असा मुद्दा काँग्रेसने ‘हर घर तिरंगा’वर उपस्थित केला. परंतु, भाजपच्या प्रचाराला तेलंगणात केसीआर आणि दिल्ली व इतर काही ठिकाणी ‘आप’ने उत्तर दिले. ‘आप’चे उत्तर अधिक ठोस आहे, कारण काँग्रेसव्यतिरिक्त तेच अखिल भारतीय स्तरावर आव्हान देत असल्याचे दिसतात. त्याचा प्रभाव पसरत आहे. रस्त्यावर उतरून लढण्याच्या बाबतीत ते काँग्रेसपेक्षा अधिक सक्षमही दिसत आहेत. राष्ट्रवादाच्या दाव्याचा पुढचा अध्याय तिरंग्यावर लिहिला जाणार आहे, हे त्यांच्या लक्षात आले. यामध्ये संख्या आणि आकार महत्त्वाचा ठरेल. त्यामुळे राजधानी राष्ट्रध्वजाच्या रंगात रंगवण्यासाठी त्यांनी ५०० ठिकाणी तिरंगा फडकवला. या सर्वांचा आकार इतका मोठा होता की ते दुरूनही लक्ष वेधून घेत होते. संदेश स्पष्ट होता - आमचा झेंडा तुमच्यापेक्षा मोठा आहे!

तिरंग्यावरून हे भांडण म्हणजे शाळकरी मुलांच्या दोन ‘गँग’मधील भांडणासारखे नाही. तिरंगा हे विचारांच्या नव्या संघर्षाचे रूपक आहे. २०१३ नंतर मोदींच्या भाजपचे राजकारण ज्या मूळ संकल्पनेवर आधारित होते, ती होती धर्म आणि राष्ट्रवाद. जोपर्यंत प्रतिस्पर्धी पक्ष त्यावर अधिक प्रभावी दावा करत नाहीत तोपर्यंत या सर्वांचा मिलाफ बहुतांश लोकशाहीसाठी मारक ठरतो. अलीकडील वर्षांत काँग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांनी हिंदू धार्मिक भावनांवर भाजपच्या मक्तेदारीला आव्हान दिले आहे. राहुल गांधींनी अनेक मंदिरांना भेटी दिल्या, धार्मिक विधी केले, त्यांच्या लोकांनी त्यांचे जानवे आणि गोत्राचे हवाले दिले, पण हे सर्व अनेकदा क्षमायाचनेच्या भावानेच केलेले दिसते. जणू ते म्हणत होते की बघा, मीसुद्धा हिंदू आहे. यामुळे मोदींबद्दलचे हिंदूंचे आकर्षण कमी होत नाही. यामुळे एवढेच होते की, मोदींच्या पक्षाला आम्ही काँग्रेसला देवदेवतांची आठवण करून दिली आणि राजकारणात हिंदू धर्म हाही मुद्दा आहे, असे मानायला लावले, असा दावा करण्याची संधी मिळते.

अरविंद केजरीवाल या बाबतीत अधिक यशस्वी ठरले, भले त्यांना यासाठी टीव्ही स्टुडिओत जात मोबाइलवर हनुमान चालीसा पाठ करावा लागला आणि अँकरवर वर्चस्व गाजवण्यासाठी त्यांना तो पाठ आहे की नाही, असे आव्हान द्यावे लागले. आणि मग त्यांनी स्वतः हनुमान चालीसाचे पठण करून हिंदूंना खुश करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रा घडवण्याची चतुराईही त्यांनी केली. त्यांच्या सरकारने एका जाहिरातीत त्यांना ‘श्रावणबाळ’ म्हणून सादर करून सर्व काही स्पष्ट केले. ते हिंदू धर्माच्या वापराचा सामना हिंदू धर्माच्या वापरानेच करत आहेत. अतिशय चलाखी दाखवत ‘आप’ आता गुजरातमध्ये पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मंदिरे पाडण्याचा प्रश्न उपस्थित करत आहे, मग ती मंदिरे जबरदस्तीने बळकावलेल्या जमिनीवर बांधली गेलेली असली तरी.

२०१९ मध्ये मोदींनी आपला दुसरा राष्ट्रीय जनादेश जिंकल्यापासून तीन वर्षे केजरीवाल यांनी त्यांच्यावर थेट टीका करणे टाळले. ‘आप’च्या ‘ट्विटर वीरां’कडून मोदींवर अनेकदा टीका होत होती. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून केजरीवाल यांनी मोदींबाबत आपले ‘मौन व्रत’ सोडले आहे. राजकारणात हे बिहारमधील नाट्यमय वळणाइतकेच महत्त्वाचे आहे. सामाजिक न्यायाचे राजकारण करणाऱ्या ‘मंडलवाद्यांना’ बिहारने नवी ऊर्जा दिली आहे आणि धर्माच्या नावावर एकजूट झालेली मते जातीच्या नावावर तोडली जाऊ शकत होती त्या जुन्या काळात परतण्याची आशा दाखवली आहे. १९८९-९१ मधील (मंडल-कमंडल वळणावर) किंवा त्याआधीच्या १९७४-७७ मधील जे.पी. आंदोलनाप्रमाणे बिहारचा राष्ट्रीय राजकारणावर तसाच प्रभाव पडेल, असे सूचित करणारा कोणताही पुरावा सध्या उपलब्ध नाही. राष्ट्रीय सत्तेचा लढा यापुढेही धर्म (हिंदू मते) आणि राष्ट्रवादाच्या नावावर लढला जाईल. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

शेखर गुप्ता एडिटर-इन-चीफ, ‘द प्रिंट’ Twitter@ShekharGupta

बातम्या आणखी आहेत...