आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​वृत्तवेध:मुक्या बाहुलीपासून कुत्रा मरण्यापर्यंत राजकारण

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

समाज असो, गट असो वा राजकारण, तुम्ही एखाद्यावर तीव्र टीका करता तेव्हा समोरच्या व्यक्तीला त्यातून बळ मिळते. तो अधिक मजबूत होतो. इतिहास साक्षी आहे की, श्रीमती इंदिरा गांधींना एकेकाळी राम मनोहर लोहिया मुकी बाहुली आणि मोरारजीभाई देसाईंनी छोटी मुलगी म्हटले होते. पुढे त्याच इंदिराजींना ‘आयर्न लेडी’ म्हटले गेले आणि ‘इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा’च्या घोषणाही दुमदुमल्या. भारतीय जनता पक्षाने काँग्रेसला सव्वाशे वर्षांची म्हातारी म्हटल्यावर मनमोहनसिंग पुन्हा सत्तेवर आले. सध्याचे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे असेच काहीसे बोलत आहेत. गुजरात निवडणूक प्रचारात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रावणाशी केली होती. परिणाम काय झाला? या वेळी काँग्रेसला गुजरातमध्ये इतक्या कमी जागा मिळाल्या की त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळणेही कठीण झाले आहे. याच खरगेजींनी सोमवारी स्वातंत्र्यासाठी लढताना त्यांचे अनेक नेते शहीद झाले, भाजप नेत्यांच्या घरातील कुत्राही मारला गेला असेल तर सांगा, असे वक्तव्य केले आहे! आता प्रश्न पडतो की, तेव्हा भाजप नव्हताच, तर त्यांचे नेते कसे शहीद होणार? असो, ते काहीही असो, संघाच्या रूपाने तो अस्तित्वात असल्याचे मानले तरी काय झाले? स्वातंत्र्यलढ्यात त्यांच्यापैकी कुणी शहीद झाले की नाही माहीत नाही, पण कुत्रा? ही कोणती भाषा आहे? ठीक आहे, खरगेजींना हिंदी नीट येत नाही. भाषा आणि तिच्या सहवासाला खूप महत्त्व आहे, परंतु कोणतीही भाषा सार्वजनिक ठिकाणी असे अपमानास्पद शब्द वापरणे शिकवत नाही. राजकीयदृष्ट्या तुमचा राग रास्त असू शकतो. तावातावात बोलणे हीदेखील काळाची गरज असू शकते, परंतु अपशब्द वापरणे हे कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय ठरू शकत नाही. टाळ्या आणि जयजयकारात आपले नेते जोशात येतात हे खरे, पण या उत्साहात भान असायलाच हवे. जसा गुजरातमध्ये काँग्रेसच्या विरोधात मोदींनी रावणाच्या भाषणाचा वापर केला, तसा आता ते खरगे यांच्या कुत्र्याच्या उल्लेखाच्या वक्तव्याचाही वापर नक्कीच करतील. काँग्रेसच्या वतीने त्याला कोण उत्तर देणार हे अद्याप ठरलेले नाही. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी ज्या प्रकारचा संयम दाखवत आहेत तो अतुलनीय आहे. ते प्रत्येक शब्द मोजूनमापून बोलत आहेत, पण त्यांच्या मंचावर वेळोवेळी येणाऱ्या नेत्यांनी गांभीर्याकडे तितकेसे लक्ष दिले नसावे. कधी त्यांनी इतर पक्ष किंवा नेत्यांबद्दल गंभीर विधाने केली, तर कधी स्वत:च्या पक्षातील अंतर्गत बाबींना उजाळा दिला. अशा विधानांचा पक्ष आणि भारत जोडो यात्रेच्या गांभीर्यावर परिणाम होतो, हे नक्की. राहुल गांधींना हा गांभीर्याचा अभाव कधीच मान्य होणार नाही.

नवनीत गुर्जर नॅशनल एडिटर, दैनिक भास्कर navneet@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...