आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दृष्टिकोन:लोकसंख्येतील असमतोल नवीन आव्हाने घेऊन येतो

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१५ नोव्हेंबरला जगाची लोकसंख्या ८ अब्जांच्या पुढे जाईल. ऑक्टोबर १९९९ मध्ये जगात ६ अब्ज लोक होते. दोन दशकांत आपण आणखी दोन अब्ज लोक वाढवले. संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्याशास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, २०५० पर्यंत पृथ्वीवर ९.८ अब्ज आणि २१०० पर्यंत ११.२ अब्ज लोक असतील. २०५० पर्यंत भारत जगात सर्वाधिक लोकसंख्येचा देश असेल व त्याची लोकसंख्या १.६५ अब्जांच्या पुढे जाईल. या काळात चीनमधील लोकसंख्या कमी होऊन १.३ अब्ज होईल. तोपर्यंत भारतदेखील शिखरावर पोहोचलेला असेल आणि २१०० पर्यंत त्याची लोकसंख्या घटून १.१ अब्जांवर येऊ शकते.

काही लोकसंख्याशास्त्रज्ञांना लोकसंख्येची चिंता व्यर्थ वाटते. यूएन वर्ल्ड पॉप्युलेशन फंडच्या रॅचेल स्नो म्हणतात की, वास्तवात जगात लोकसंख्या वाढीचा वेग मंदावला आहे आणि लोकसंख्या घटत असलेले ५० पेक्षा जास्त देश आहेत. त्या म्हणतात, ८ अब्ज लोक म्हणजे नवीन कल्पनांच्या ८ अब्ज शक्यता, त्यामुळे मी आशावादी आहे. त्याच वेळी या वर्षाच्या सुरुवातीला कॅटो इन्स्टिट्यूटने प्रकाशित केलेले सुपरअॅबँडन्स हे नवीन पुस्तक लोकसंख्या वाढ ही चांगली गोष्ट असल्याचे सांगते. या पुस्तकाचे लेखक मार्टिन ट्युपी आणि गेल पुले म्हणतात की, सरासरी काढली तर प्रत्येक मनुष्याने त्याच्या वापरापेक्षा जास्त मूल्य निर्माण केले आहे. परंतु, या आशावादींशी सर्व सहमत नाहीत. अनेकांना वाटते (आणि ते बरोबर आहे) की, अधिक लोकसंख्येचा अर्थ अधिक अन्न गरजा, संसाधनांचे अधिक शोषण आणि पर्यावरणात अधिक कार्बन उत्सर्जन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी या चिंता व्यक्त केल्या होत्या. छोटे कुटुंब असणे हीदेखील एक प्रकारची देशभक्ती आहे, असे ते म्हणाले होते. त्याच वेळी ते म्हणाले होते की, एक नवा जीव जगात आणण्यापूर्वी एकदा थांबून आपण या अपत्याला न्याय व आवश्यक गोष्टी देऊ शकू का, असा विचार करणारे धन्य आहेत. या मुद्द्यांवर पंतप्रधानांशी अनेक सहमत असतील. पण, लोकसंख्याशास्त्र हा गुंतागुंतीचा विषय आहे. गेल्या शतकात विकसित देशांनी व चीनने वाढती लोकसंख्या धोकादायक मानून त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आज घटता जन्मदर आणि काम करणाऱ्या लोकसंख्येच्या घटत्या संख्येशी ते झगडत आहेत. दुसरीकडे मध्य पूर्व आणि आफ्रिकेत लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. २१०० पर्यंत आफ्रिकेची लोकसंख्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या ४९% इतकी असेल, असा अंदाज आहे. त्याचप्रमाणे मुस्लिम देशांतील लोकसंख्याही वाढत आहे. २०३० पर्यंत जगातील मुस्लिम लोकसंख्या २.२ अब्ज होण्याची अपेक्षा आहे. अरब जगतातील सर्वात मोठा देश इजिप्तची १९६० मध्ये २.५ कोटी लोकसंख्या होती, ती दक्षिण कोरियाएवढी होती. पण, आज जिथे दक्षिण कोरियाची लोकसंख्या दुप्पट झाली आहे, तिथे इजिप्तची लोकसंख्या चौपट होऊन ११ कोटींच्या पुढे गेली आहे.

पीईडब्ल्यू रिसर्च फाउंडेशनने अंदाज वर्तवला आहे की, २०५० पर्यंत जगातील मुस्लिम लोकसंख्या २.८ अब्ज, तर ख्रिश्चनांची संख्या २.९ अब्ज होईल. त्या तुलनेत हिंदू लोकसंख्या १.४ अब्जांपेक्षा कमी असेल. २०१० ते २०५० दरम्यान जगाची लोकसंख्या ७५ कोटी ख्रिश्चन आणि ३५ कोटी हिंदूंनी वाढेल, तर याच कालावधीत १.२ अब्ज मुस्लिम वाढलेले असतील. या चार दशकांत जगातील मुस्लिम लोकसंख्येची टक्केवारी २३.२% वरून २९.७% पर्यंत वाढेल. भारताबद्दल बोलायचे तर २०५० पर्यंत भारतातील हिंदूंची लोकसंख्या १.३ अब्ज होईल, तर तोपर्यंत येथील मुस्लिमांची संख्या ३१.१ कोटींपर्यंत पोहोचू शकेल. त्यानंतर भारत हा जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनेल.

याच संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा आग्रह पाहायला हवा, त्यात त्यांनी एकात्मिक लोकसंख्या नियंत्रण धोरण स्वीकारण्याविषयी सांगितले होते, ते सर्वांना समानतेने लागू असले पाहिजे आणि त्यातून कोणालाही सूट दिली जाऊ नये. असंतुलित लोकसंख्या-दराच्या धोक्यांकडे लक्ष वेधून भागवत यांनी पूर्व तिमोर, दक्षिण सुदान आणि कोसोवोसारख्या देशांचा उल्लेख केला आणि सांगितले की, लोकसंख्या-असंतुलनाची परिस्थिती उद्भवते तेव्हा देश फुटतात आणि नवीन देश तयार होतात. मात्र, आशेचा किरण आहे. मुस्लिम लोकसंख्येसह जगभरात लोकसंख्या-दर घटत आहे. परंतु, मुस्लिमांचा लोकसंख्या वाढीचा दर अजूनही इतर समुदायांच्या तुलनेत जास्त आहे. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) राम माधव रा. स्व. संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य office@rammadhav.in

बातम्या आणखी आहेत...