आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:ती 'ओप्रा विन्फ्रे' असली म्हणून काय झालं?

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अश्वेतवर्णीय महिला असूनही अमेरिकेत ओप्राचं यशस्वी होणं, हा नियम नसून अपवाद आहे. ओप्राच्या यशाची गोष्ट नवउदारमतवादाचं समर्थन करणाऱ्या लिबरल सत्ताधीशांकडून चवीनं चघळली जात असताना याच काळात अमेरिकेतील बहुतांश अश्वेतवर्णीयांच्या हलाखीच्या परिस्थितीत तसूभरही फरक पडलेला नाही, हे सत्यही नाकारता येणार नाही. अर्थात याला काही ओप्रा जबाबदार आहे, अशातला भाग नाही. पण स्वतः यशाची एकेक शिखरं पादाक्रांत करत जाताना या वर्णद्वेषी व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचं धारिष्ट्य आणि ठोस राजकीय भूमिका घेणं ओप्रानं सोईस्कररित्या टाळलेलं आहे.

खडतर परिस्थितीवर मात करुन यश मिळवलेल्या माणसांच्या सक्सेस स्टोरींची भुरळ आपल्याला नेहमीच पडत आलेली आहे. मेहनत आणि हुशारीच्या जोरावर असह्य गरिबीतून प्रचंड श्रीमंत आणि यशस्वी झालेल्या माणसांच्या गोष्टी कित्येक कथा, कादंबऱ्या, चित्रपटाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या आहेत. नुकत्याच प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मर्केल यांची वादळी मुलाखत घेतलेल्या अमेरिकन टेलिव्हिजन स्टार आणि अब्जाधीश उद्योगपती ओप्रा विन्फ्रे यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. अमेरिकेतील सामाजिक उतरंडीत सर्वात खालच्या स्थानी असलेल्या हा कृष्णवर्णीय स्त्रीची कथा अतिशय प्रेरणादायी अशीच आहे, यात शंका नाही. अतिशय गरिबीतील बालपण, वर्णद्धेषाचे बसलेले चटके आणि लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागलेल्या ओप्रा विन्फ्रेची कथा ही अमेरिकन ड्रीमचा चालता बोलता आविष्कार आहे. जगातील सर्वात जुन्या लोकशाहीला स्वातंत्र्य आणि समतेचं तत्व बिंववण्यासाठी ओप्रापेक्षा चांगलं उदाहरण मिळू शकत नाही. तुमच्यात जर जिद्द आणि मेहनत करायची तयारी असेल तर तुम्ही कितीही मागास सामाजिक पार्श्वभूमीतून या यश मिळतंच, असा भांडवली व्यवस्थेतील मेरिटच्या तर्काची भलामण कराणारा संदेश ओप्रा विन्फ्रेनं वेळोवेळी दिलेला आहे. अमेरिकेकडे किंवा जागतिक भांडवली व्यवस्थेकडेच पाहण्याचे साधारण दोन चष्मे आहेत. एक आहे तो वर उल्लेखलेल्या ओप्रा विन्फ्रेचा. वर्णभेद ही आता इतिहासजमा गोष्ट झालेली आहे. आधी वर्णभेद अस्तित्वात होता मात्र आता वर्णभेदासारखी कुठली गोष्ट अमेरिकेत अस्तित्वात नाही, हे जगाला पटवून देण्यासाठी श्वेतवर्णीयांकडून सर्रास ओप्रा विन्फ्रेचं उदाहरण दिलं जातं. गेलाबाजार अमेरिकेत खरंच जर वर्णद्वेष असता तर बराक ओबामासारखी कृष्णवर्णीय व्यक्ती राष्ट्राध्यक्ष बनली असती का? असा सडेतोड सवालही या व्यवस्थेच्या समर्थकांकडून विचारला जातो. ओप्रा विन्फ्रेचा अमेरिकतील आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक पटलावर इतका प्रभाव आहे की त्यासाठी अमेरिकन उद्योगविश्वात 'ओप्रा इफेक्ट' असा नवीन शब्दप्रयोगंच रूजू करण्यात आला. आपल्या संवादकौशल्याच्या बळावर अमेरिकन जनतेच्या गळ्यातील ताईत बनलेल्या ओप्रानं तिच्या ओप्रा विन्फ्रे बूक क्लबमार्फत कोणत्या पुस्तकाचं कौतुक केलं तर ते पुस्तक अमेरिकेत रातोरात बेस्टसेलर बनून जातं. ओप्रानं जाहीरात केलेलं कोणतंही उत्पादन खरेदी करण्यासाठी ग्राहकांची रांग लागलेली असते. त्यामुळे जाहिरातदारांमध्ये अजूनही तिला प्रचंड मागणी आहे.

या ओप्रा इफेक्टवरतीच जेनिस पेक या माध्यमतज्ञ महिलेनं 'एज ऑफ ओप्रा - कल्चरल आयकॉन फॉर द निओलिबरल इरा' नावाचं स्वातंत्र पुस्तकच लिहलंय. ओप्रा विन्फ्रेचा माध्यम सम्राट म्हणून झालेला उदय अमेरिकेत आणि जगभरात नवउदारमतवादाच्या झालेल्या उदयाशी समांतर असल्याचं निरीक्षण लेखिका यात नोंदवते. ''या जगात यशस्वी किंवा अयशस्वी होणं याची सर्वस्वी जबाबदारी तुमच्यावर आहे. आपल्या अपयशाची जबाबदारी व्यवस्थेवर ढकलण्यापेक्षा स्वत: स्वतःवर मेहनत करून तुम्ही यशस्वी होऊ शकता,'' असा व्यक्तीकेंद्री नवउदारमतवादी संदेश ओप्रानं जगाला दिला. त्यामुळेच अमेरिकतील लिबरल सत्ताकेंद्रानं तिला डोक्यावर घेतलं. ओप्राचं उदाहरण देऊन वर्णभेद आणि लिंगभेदावर आधारलेल्या या भांडवली व्यवस्थेतील मूलभूत दोषांवर पांघरून घालणं सत्ताधाऱ्यांना शक्य झालं. कृष्णवर्णीय आणि महिला असूनही तुम्ही अमेरिकेन व्यवस्थेत प्रचंड यशस्वी होऊ शकता, हा वास्तवापासून कोसो दूर असलेला स्वप्नाळू संदेश ओप्रानं पसरवला असा आरोपंच लेखिकेनं यात केलाय. जो दुर्दैवानं खरा म्हणावा लागेल.

कृष्णवर्णीय महिला असूनही अमेरिकेत ओप्राचं यशस्वी होणं, हा नियम नसून अपवाद आहे. ओप्राच्या यशाची गोष्ट नवउदारमतवादाचं समर्थन करणाऱ्या लिबरल सत्ताधीशांनाडून चवीनं चघळली जात असताना याच काळात अमेरिकेतील बहुतांश अश्वेतवर्णीयांच्या हलाखीच्या परिस्थितीत तसूभरही फरक पडलेला नाही, हे सत्यही नाकारता येणार नाही. अर्थात याला काही ओप्रा जबाबदार आहे, अशातला भाग नाही. पण स्वतः यशाची एकेक शिखरं पादाक्रांत करत जाताना या वर्णद्वेषी व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचं धारिष्ट्य आणि ठोस राजकीय भूमिका घेणं ओप्रानं सोईस्कररित्या टाळलेलं आहे. वास्तवापासून फारकत घेत मेहनत कराल तर तुम्ही यशस्वी होऊ शकता, असाच भावनिक संदेश देत तिनं स्वत:ची कारकीर्द घडवली. वर्णभेदाचं वास्तव नाकारात मेरिटोक्रसीच्या या घातक भांडवली मिथकाबद्दल वर्णद्वेषाविरूद्धच्या लढ्यात आयुष्य दिलेल्या जेम्स बाल्डविन या विचारवंतांनं ५० वर्षांपूर्वीच अतिशय मार्मिक शब्दात चेतावणी देऊन ठेवलेली आहे. "तुम्ही यशस्वी झालात याचा अर्थ व्यवस्थाच न्याय ठरली, असा होत नाही. कुठल्याही व्यवस्थेत हाताच्या बोटांवर मोजता येतील, अशी काही मोजकी लोक नेहमीच यशस्वी ठरली आहेत. पण त्याने व्यवस्थेतील वर्णभेदाचं आणि असमानतेचं जळजळीत वास्तव बदलता येत नाही. स्वतःच्या यशाचा गवगवा करून या अपवादाला नियम सिद्ध करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर अशा लोकांपासून आपण नेहमीच सावध राहायला हवं," असं बाल्डविन म्हणायचा.

स्वतःच्या व्यवस्थेतील दोषांवर पांघरुण घालण्यासाठी ओप्रासारख्या अपवादांचा आधार अमेरिकेनं नेहमीच घेतलेला आहे. आपल्या कृष्णवर्णीय शोषित आयडेंटीपासून दूर पळत बहुसंख्यांकवादी गोऱ्यां सत्ताधीशांना सुखावेल, अशी बोटचेपी राजकीय भूमिका घेण्याचा सोईस्कर मार्ग ओप्रासारख्या अनेक यशस्वी लोकांनी अवलंबला.अन्यथा वर्णद्वेषाविरूद्ध ठोस राजकीय भूमिका घेणारा/री कोणतीही व्यक्ती या सत्ताकेंद्राच्या डोळ्यात कायमंच खुपत आलेली आहे. याची परिणीती म्हणून ब्लॅक पॅंथरसह वर्णभेदाविरूद्धच्या चळवळीतील अनेक राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या/नेत्यांच्या झालेल्या हत्या याचा ढळढळीत पुरावा आहेत. ओबामांबाबतही अमेरिकेनं हीच चुक केली होती. ओबामांचं कृष्णवर्णीय असूनही राष्ट्रध्यक्ष होणं हा अमेरिकेतील वर्णभेदाचा अधिकृत अंत असल्याचा उत्साही निष्कर्ष त्यावेळी अनेक लिबरल राजकीय पंडितांनी काढला होता. पण आपल्या ८ वर्षांच्या कारकीर्दीत माजी राष्ट्राध्यक्षांच्याच पावलांवर पाऊल टाकत ओबामांनी कारभार हाकला. कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष निवडून आल्यानंतरही अमेरिकेतील कृष्णवर्णीयांवर होणारे वांशिक हल्ले, पोलीस बळाचा अतिरेकी वापर, अश्वेतवर्णीयांमधील गरिबीचं प्रमाण यात काहीच फरक पडला नाही. याउलट २००८ च्या वित्तीय आरिष्ट्यातून मार्ग काढण्यासाठी सामान्य नागरिकांना आणि कृष्णवर्णीयांना दिलासा देण्याऐवजी वॉल स्ट्रीटलाच बेल आऊट पॅकेजचा दिलासा देऊन देशातील आर्थिक विषमतेला आणखी बळ देण्याचं काम ओबामांनी केलं. आयडेंटिच्या जोरावर निव्वळ प्रतिनिधित्व देऊन सत्ताधारी वर्गानं आपल्याला हव्या असलेल्याच योजना त्यांच्यामार्फत राबवल्या. ओबामांच्या कृष्णवर्णीय चेहऱ्याचा वापर करून या विषमतेवर आधारलेल्या अमानवी व्यवस्थेला खोटं आशादायी मानवी रूप देण्याचा भांडवली सत्तेचा डाव फक्त यामुळे फक्त यशस्वी झाला. ओबामांच्याच कारकीर्दीत १ टक्का विरूद्ध ९९ टक्के हे वर्गलढ्याचं ब्रीदवाक्य घेऊन ऑक्युपाय वॉलस्ट्रीट आणि वर्णभेदाविरूद्धच्या ब्लॅक लाईव्हज मॅटर या दोन्ही चळवळी उदयाला आल्या, ही गोष्ट ओबामांनी अमेरिकेतील कामगारवर्गाचा आणि अश्वेतवर्णीयांचा केलेला भ्रमनिरास सिद्ध करण्यासाठी पुरेशी बोलकी आहे. या भ्रमनिरासाचीच परिणीती म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या उदयाकडे पाहता येईल.

ओप्रा, ओबामासारख्या शोषित समूहांमधून येत यशस्वी झालेल्या व्यक्ती आणि भांडवली व्यवस्थेचं त्यांचा केलेला पुरस्कार हे नेमकं कशाचं द्योतक आहे? याचा मागोवा घेणारं पुस्तकंच अमेरिकेतील आघाडीचं डाव्या विचारांचं मासिक असलेल्या जॅकोबिनच्या संपादक आणि मार्क्सवादी विचारवंत निकोल एश्चॉफ यांनी लिहलंय. 'द न्यू प्रॉफेट्स ऑफ कॅपिटल' या आपल्या पुस्तकात वंचित समूहातून येणाऱ्या पण भांडवली व्यवस्थेचंच समर्थन करणाऱ्या ओप्रा विन्फ्रेसारख्या सेलिब्रिटींवर ताशेरे ओढले आहेत. भांडवली जगातील माणसांची दुःख, अपयश, गरिबी, बेरोजगारी, परात्मभाव अशा समस्यांची उत्तरं व्यवस्थेत न शोधता स्वतःमध्ये शोधून स्वत:च मार्ग काढण्याचा संदेश देणाऱ्या ओप्रासारख्या व्यक्ती शोषणाविरुद्धच्या चळवळीसाठी हानीकारक असल्याचा दावा त्या करतात. माध्यमसम्राट म्हणून मिरवणाऱ्या ओप्रानं स्वत:च्या ताकदीचा वापर आपल्या कृष्णवर्णीय आणि स्त्री असल्याची ओळख अधोरेखित करून राजकीय भूमिका घेत चळवळीत योगदान देणं अपेक्षित होतं. पण त्याऐवजी क्षुल्लक व्यक्तीवादी विचारसरणीचा पुरस्कार करणारं व्यक्तिमत्व विकासासाठीचं ओ मॅगझिन त्या चालवत राहिल्या. ओप्रानं स्वतःची मेहनत आणि हुशारीवर आजचं स्थान कमावलेलं आहे, हे सत्य लेखिका नाकारत नाही. पण याचा अर्थ अमेरिकेतील प्रत्येक कृष्णवर्णीय महिला ओप्रासारखी अब्जाधीश होऊ शकते, असाही काढला जाऊ नये.

भांडवली व्यवस्थेत यशस्वी होण्यासाठी आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक भांडवलाची गरज पडते. आणि हे भांडवल कृष्णवर्णीय स्त्री पेक्षा श्वेतवर्णीय पुरूषाकडे कधीही जास्तच हे असेल, हे वास्तव आहे. अमेरिकन लिबर्टी ही समान संधीच्या तत्वावर आधारेली नाही, हे नाकारण्याचा कोडगेपणा कोणीही करू शकत नाही. अशात गरिबी आणि बेरोजगारीच्या व्यवस्थात्मक प्रश्नांवर उत्तर म्हणून ओप्राचा व्यक्तिमत्व विकासाचा सल्ला अतिशय तकलादू आणि आदर्शवादी असल्याचा ती म्हणते. उदारमतवादाच्या पडद्याआड भांडवलशाहीतील हे नायक/नायिका प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या भांडवली विषमता, लिंगभेद, वर्णद्वेषालाच खतपाणी घालतात. उदाहरण म्हणून निकोल यांनी ओप्रा विन्फ्रेसोबतंच बिल गेट्स, शेरिल सॅन्डबर्ग, जॉन मॅकी यांचीही उदाहरणं दिलेली आहेत.

ओप्रा विन्फ्रेप्रमाणंच बिल गेट्स यांनी आपल्या फाऊंडेशमार्फत देणग्या उभारून गरीब राष्ट्रांसाठी परोपकारी मदतकार्य केलेली आहेत. पण सामान्य जनतेला शिक्षण, आरोग्यासारख्या मूलभूत गरजा पुरवण्याचं काम सरकारचं आहे. करचोरी आणि भांडवलावरील नफा ओरबडून त्यातील थोडा वाटा अफ्रिकेतील मुलांना मोफत शिक्षण आणि लस पुरवण्यासाठी करण्याचं ओप्रा आणि बिल गेट्स यांचं परोपकारी काम प्रत्यक्षात व्यवस्थेचं अपयश झाकायला कामी येतं. अब्जाधीश व्यक्तींनी गरिब कामगारवर्गाला देणगीच्या स्वरूपात मदत केल्यानं सरकारचं उत्तरदायित्व कमी होतं. गरिबी, बेरोजगारी, बेघरपणा, भूकबळी, हवामानबदल या जागतिक समस्याचं उत्तर अब्जाधीश भांडवलदार करत असलेल्या मदतकार्यात शोधणं हा मूर्खपणा आहे. या समस्यांना जन्म देणाऱ्या व्यवस्थेतील मूलभूत दोषांवर विचार करून ते दूर करण्याचा प्रयत्न करणं, हाच यावरचा एकमेव उपाय आहे. सरकारचं जनतेवरील उत्तरदायित्व वरचेवर कमी करण्याच्या नवउदारमतवादी अजेंड्याला हातभार लावण्यासाठीच अब्जाधीश उद्योगपतींचा हा परोपकराचा खेळ सुरू असल्याचं लेखिका सप्रमाण दाखवून देते. ओप्रा विन्फ्रे अमेरिकेतील आघाडीची टीव्ही स्टार बनणं, शेरिल सॅन्डबर्ग ही महिला फेसबुकच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरवर नियुक्त होणं, अशा प्रातिनिधिक उदाहरणांना महिला सक्षमीकरण समजण्याची चूक कोणी करता कामा नये. सॅन्डबर्गसारखी महिला एखाद्या आंतरराष्ट्रीय खासगी कंपनीची सीईओ बनल्यामुळे लिंगभेदाचा प्रश्न सुटेल हा आशावादच मूर्खपणाचा असून अशा प्रातिनिधिक वैयक्तिक यशोगाथेऐवजी कामगारवर्गाचा भाग असलेल्या बहुसंख्याक महिलांना न्याय कसा मिळेल, हे पाहणं महत्वाचं असल्याचं लेखिका पटवून देते. ओप्रा विन्फ्रे यांचं कृष्णवर्णीय स्त्री असूनही अब्जाधीश होणं आणि शोषितांच्या शोषणावर व्यवस्थात्मक उत्तर न शोधता भावनिक उमाळे देत राहणं, यामागील कार्यककारणभाव समजून घेणं महत्वाचं आहे. आपल्या संवादकौशल्यांचा वापर करुन पूर्वाश्रयीच्या हलाखीच्या आयुष्याबाबत भावनिक होणाऱ्या ओप्रा आपल्या सर्वांनाच परिचीत आहे. या शोषणव्यवस्थेमागचं मूळ शोधण्याऐवजी व्यक्तीवादी प्रेरणादायी भाषणांचा भावनिक उतारा व एनजीओकरणाचा आसरा घेण्याचा ओप्राचा मार्ग शेवटी शोषक वर्गालाचा बळ देणारा आहे. कुठल्याही व्यवस्थेतील शोषणाचं मेकॅनिझम कसं काम करतं यावर पॉल फ्रेअर यांचं 'पेडॉलॉजी ऑफ द ओप्रेसड' हे गाजलेलं पुस्तक आहे. "सत्ताधारी शोषक वर्ग कधीही संपूर्ण शोषित वर्गाच्या उत्थानासाठी काम करण्याऐवजी शोषित वर्गातील निवडक लोकांना टोकन म्हणून पुढे करून व्यवस्थेतील असमानता कशी मेरिटवर तरलेली आहे, याचं खोटं चित्र उभा करण्याचा प्रयत्न सातत्यानं करत असतो. आणि या शोषणव्यवस्थेचं पुरेसं आकलन न झालेला शोषित समूहातील व्यक्ती त्याच्या संकुचितपणामुळे ही शोषणव्यवस्था बदलण्याऐवजी उद्या मी सुद्धा शोषकवर्गात स्थान मिळवेल, असं स्वप्न उराशी बाळगून असतो," असं विश्लेषण पॉल फ्रेअर यांनी आपल्या या पुस्तकात मांडलं होतं.

अमेरिकेतील लिबरल सत्ताकेंद्राची पाठराखण करत आलेली आणि या सत्ताकेंद्राला अडचणीत आणेल अशी कुठलीही राजकीय/वैचारिक भूमिका घेणं कटाक्षानं टाळत आलेली ओप्रा पॉल फ्रेअरच्या 'पेडॉलॉजी ऑफ द ओप्रेसड' ची नायिका म्हणून तंतोतंत लागू होते. ओप्राची यशोगाथा, भावनिक उमाळे आणि परोपकारी मदतकार्याचं अवाजवी कौतुक असणाऱ्या सगळ्यांनीच यातला फोलपणा लक्षात घ्यायला हवा. अमेरिकेतील वर्णद्वेष आणि लिंगभेदावर आधारलेल्या भांडवली शोषणाविरुद्ध प्रामाणिक लढा लढलेल्या सर्वांनाच त्याची किंमत चुकवावी लागली होती आणि आहे. माल्कम एक्स, मार्टिन ल्यूथर किंग पासून ते जेम्स बाल्डविन, ऐंजेला डेव्हिसपर्यंतची उदाहरणं यासाठी पुरेशी आहेत. अमेरिकेतील लिबरल सत्ताकेंद्राच्या जवळ राहून अब्जाधीश बनत ही शोषणाविरुद्धची लढाई लढली जाऊ शकत नाही. त्यासाठी या सत्ताकेंद्राशी थेट भिडण्याची आणि त्याची किंमत चुकवण्याची तयारी हवी. काही दिवसांपूर्वीच प्रिन्स हॅरी आणि मेघनच्या मुलाखतीत ओप्रा त्यांच्यासोबत वर्णभेदाबाबत बोलत असल्याबद्दलचं मीमही सोशल मीडियावर गाजत होतं. तिसऱ्या जगावर साम्राज्यवाद लादून अगणित संपत्ती लूटणारं ब्रिटनचं राजघराणं आणि अमेरिकेतील भांडवली शोषणाच्या बळावर अब्जाधीश बनलेली टीव्ही स्टार यांनी वर्णभेदावर चर्चा करणं हा शुद्ध नाटकीपणा आहे, अशी खिल्ली उडवणारं हे मीम म्हणजे ओप्रा अमेरिकेतील कृष्णवर्णीय आणि महिलांची नव्हे तर भांडवली सत्ताकेंद्राची नायिका आहे हेच सिद्ध करणारं होतं.

प्रदीप बिरादर
pradeepbiradar27595@gmail.com

बातम्या आणखी आहेत...