आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी शॉर्टफिल्म:‘ चायनासे आया है..!’

एका वर्षापूर्वीलेखक: प्राजक्त देशमुख
  • कॉपी लिंक

‘दिव्य मराठी’च्या ‘रसिक शॉर्टफिल्म फेस्टिव्हल’मध्ये राज्यभरातून शेकडो मराठी लघुपटांनी सहभाग घेतला. मान्यवर परीक्षकांनी त्यापैकी ५० सर्वोत्कृष्ट फिल्म निवडल्या. या शॉर्टफिल्म बनवण्यामागची संकल्पना आणि ती कशी साकारत गेली, याची गोष्टही तितकीच रंजक असणार, यात शंका नाही. म्हणूनच आजपासून दर आठवड्याला आम्ही या निवडक शॉर्टफिल्मची कहाणी ‘रसिक’च्या वाचकांसाठी सादर करीत आहोत. आपल्या ‘लघु’पटातून प्रेक्षकांपर्यंत मोठा आशय पोहोचवणारे निर्माते / दिग्दर्शकच ही कहाणी तुम्हाला सांगतील.

लॉकडाऊन म्हणजे नेमकं काय, हे माहीत नसण्याचे सुरूवातीचे दिवस होते. सगळीकडं एक अनिश्चितता, शुकशुकाट. वडिलांनी सांगितलं, ‘महामार्गावर गर्दीचे लोंढे वाहतायत..’ मला विश्वास बसेना. मित्र राजेश भुसारेला फोन करून विचारलं, त्यानेही तेच सांगितलं. ‘मुंबईतलं घरभाडं कसं भरायचं? रोजंदारीवरची लोकं. खायची भ्रांत, सरकारी मदतीबद्दलची साशंकता. गोंधळ आणि त्यापेक्षा अधिक भीती. शिवाय, ‘आपला प्रांत बरा, तिथे जाऊन मरू’ या भावनेतून ते आपल्या गावी निघालेत.’ बाहेर चिटपाखरू फिरकत नसताना या गर्दीच्या लोंढ्यांना परवानगी कशी मिळाली? किंवा परवानगी नसेल, तर मग या अवैध पायपिटीचं काय? पायी? गुगल मॅपवर मुंबई ते उत्तर प्रदेश, बिहार, आसाम अस्सं अंतर पाहिलं. पुन्हा राजेशला फोन फिरवला. तिकडं जाऊन प्रत्यक्ष पाहता येईल का? दुसरा फोन छायाचित्रकार अभिषेक कुलकर्णीला. त्याला म्हटलं, काय करायचं माहिती नाही, पण हे जे घडतंय ते अतर्क्य आहे, म्हणून पहाणं गरजेचंय... ‘फाळणीनंतरचं जगातलं सगळ्यात मोठं विस्थापन होतंय?’ पुढच्या क्षणाला आम्ही तिघं महामार्गावर होतो. समोरची दृश्यं. अशक्य! रात्र होत आली. आम्ही परतायचं ठरवलं आणि परतताना उद्या पहाटे पुन्हा मदतीनिशी येऊ असं ठरलं. अभिषेकसोबत बोलणं झालं, की ही पायपीट कॅमेरात जशी आहे तशी टिपू. जमल्यास बोलू. कुणाला ‘थांबा, थोडं परत मागून चालत या वगैरे’ असं मूर्खासारखं, संवेदनहीन वागायचं नाही. जे आहे ते, जसं आहे तसं टिपू. इतकंच. पहाटे कोरोनाविषयक काळजी घेऊन आम्ही पोचलो. पायपीट करणाऱ्यांचे कष्ट कमी व्हावे म्हणून पाणी, ग्लुकोज बिस्किट घेऊन पोचलो. आणि जे दृश्य दिसलं ते पाहून अवाक झालो. ‘यदि तुम्हारे घर के एक कमरे में आग लगी हो तो क्या तुम दूसरे कमरे में सो सकते हो?’ असं ज्यांना वाटत असेल, अशी असंख्य नाशिककर मंडळी ठिकठिकाणी उभी होती. कुणी पाववडे घेऊन, कुणी चपला घेऊन, कुणी औषधं घेऊन, कुणी पाणी घेऊन. पहाटे सहाला शंभर पाववडे वाटपासाठी घेऊन माणसं उभी आहेत, तर ही मंडळी उठली कितीला असतील? पाच वाजता? चार वाजता? कारण बाहेरुन आणायचा प्रश्नच येत नाही, हॉटेल्स वगैरे बंदच नाही का? माणूसपण. काही मंडळी चालून थकली म्हणून ठिकठिकाणी बसली होती. आम्ही काही लोकांसोबत दुरून बोललो. एक जण म्हणाला ‘पता नहीं कुछ वायरस आया है कहते है..?’ दुसरा म्हणाला, ‘साब, सुननेमें तो आया है कि चायनासे आया है..’ हे बोलत असताना ती मंडळी चायनीज गाड्यांसमोरच बसलेली होती, याचं त्यांना भानही नव्हतं. काही लोक मजदूर युनियनच्या पाटीजवळ, काही जण कामगार दिनाच्या शुभेच्छा फलकाला टेकून बसलेली. आम्ही सलग तीन दिवस यथाशक्ती आमच्याकडून काही मदत करायचा प्रयत्न केला. एक मजूर म्हणाला ‘इधरके लोग बहुत अच्छे है, कुछ कम पड नहीं रहा हमें’. काही कुटुंब सायकलवरून निघाली होती. मुंबई ते मुझ्झफरपूर. सायकलवर! मुंबई ते पटना. पायी! पुढे चौकात ट्रॅफिक पोलिस दिसले. त्यांनी सांगितलं, खरं तर नियमानुसार यांना अटक होऊ शकते. पण, आता आम्ही फक्त इतकं पाहतोय की महामार्गावरचा हा मजूर कुणी शहराच्या आत शिरू नये. जि. प. शाळेत येणाऱ्यांची सोय करायची होती. पण, कुणी थांबायलाच तयार नव्हतं. सगळ्यांना फक्त जायचंच होतं. ‘कुछ नहीं साब अपनी मिट्टीमे मरेंगे.’ नंतर असं वाटलं की आधीच इतकी चालून दमलेली लोकं परत निघाली आहेत, ती जिवाच्या भीतीनं. त्यांना काय चालूय याचा अंदाजच नाही. मग त्यांना आणखी बोलतं करून काय साध्य होणार? मग ठरवलं की कुणाशी बोलून त्यांच्या खपल्या नको काढायला. मग शासनाने वाटसरूंना गाड्या उपलब्ध करून दिल्या. राज्याच्या सीमेपर्यंत सोडून देणार होते. पण, उड्डाणपुलावरून चालणाऱ्या अनेक वाटसरूंना हे ठाऊकच नाही, की खाली चौकात गाड्या उभ्या आहेत. गोंधळ आणि अंतर कमी करणारा उड्डाणपूल गोंधळ आणि अंतर वाढवत होता. मग आम्ही उड्डाणपुलाच्या दोन्ही टोकाला जावून लोकांना चौकात जायला सांगू लागलो. आमचे काम किरकोळ होते. पण, आमच्यासारखे असंख्य लोक डोंगराएवढं काम करत होते. पहिल्या दिवशी घरी गेलो, तेव्हा अंगावर पांघरुण घेणंही अपराधीपणाचं वाटू लागलं. असंख्य दृश्यं डोळ्यासमोरून हटेनात. असं वाटलं, हे काय आहे? सतत वाहणारे लोंढे? एरवी कुठेच दिसत नाहीत. कारण, दिसताना चकचकीत मशीन दिसतं. मशीन जोडणारे नट-बोल्ट, चक्र आतल्या बाजूला असतात. अचानक एक विचार आला की या नद्या आहेत? पुन्हा उगमाकडे निघालेल्या? घराकडे निघालेल्यांना पाहून मला तर ‘घरीच बसा’ सांगणंही कसंतरी वाटू लागलं. आपण जे पाहिलं ती वेदना, ते शल्य, तो जिवंत टोकदार बाण होता. तो काळजापर्यंत पोचावा म्हणून शब्दांना स्वर हवे होते. मनात विचार आला किशोर कदम. किशोरदाचा आवाज म्हणजे बाऊल फिरस्ती, अगतिकता, व्याकुळता. बाण थेट रुतणार. विचार ऐकून पहिल्या फोनमध्येच किशोरदाने होकार भरला. श्रीनाथ म्हात्रेने संगीतबद्ध केलं. असा तयार झाला ‘पायपीट’ लघुपट. मग लक्षात आलं, हे शब्द, हे दृश्य फक्त कोविडकाळापुरतं मर्यादित नाही. फाळणी असो की दुसऱ्या महायुद्धातली ज्ये लोकांची वणवण. कठीण काळात आपली स्वप्नं सोडून अनिश्चित जागरणाकडे पायपीट करणाऱ्या निर्वासितांचा तो हुंकार झालाय...

बातम्या आणखी आहेत...