आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुरिमा:‘अभ्यासू’ ज्ञानदा...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मध्यंतरी समाजमाध्यमांवरून ‘काय सांगशील ज्ञानदा’बद्दल खूप सारी राळ उठवली गेली. मीम्स तयार करण्यात आले. हरेक प्रकारे या वृत्तनिवेदिकेची खिल्ली उडवली गेली. पण, जिच्या बाबतीत हे सारं घडलं ती मात्र शांत होती. कुठल्याही टीकेला तिनं प्रत्युत्तर दिलं नाही. आपल्या संयमित वर्तनातून तिनं सगळ्यांची तोंडं बंद केली. ट्रेनी रिपोर्टर ते सेलिब्रिटी न्यूज अँकर हा तिचा प्रवास थक्क करणारा आहे. तिच्यासोबत काम करताना जाणवलेली, ‘स्टार’पणापलीकडली ज्ञानदा खूप वेगळी आहे...

‘ज्ञानदा कदम’ हे एक नुसतं नाव नसून ओळख आहे. सोशल मीडियावर हजारो फॅन्स, फॉलोअर्स असणारी ज्ञानदा मराठी टीव्ही बातम्यांच्या जगातली निर्विवाद सेलिब्रिटी आहे. निर्विवाद या कारणासाठी कारण ज्ञानदा कधीही वादांच्या वाटेला गेलीच नाही. आपल्या वृत्तनिवेदनाच्या लोभस शैलीनं ज्ञानदा ही राज्यातल्या तमाम प्रेक्षकांना बहुधा आपल्याच बिल्डिंगमधली, गल्लीतली, गावातली वाटत असावी. थोरामोठ्यांना तर तिचं कौतुक आहेच, मात्र तरुणाईसाठीही ती एक ‘अचीव्हर’, एक ‘आयकॉन’ आहे. ज्ञानदाची नेहमीची बुलेटिन्स असोत, ‘ब्रेकफास्ट न्यूज’चा सेगमेंट असो किंवा ‘एबीपी माझा’च्या ज्या शोची तिच्या अँकरिंगविना कल्पना करता येत नाही तो ‘माझा कट्टा’ असो, ज्ञानदा ही आमच्या ‘एबीपी माझा’ची, आमच्या अँकरिंग टीमची ‘स्टार’ आहे.

अर्थात, ताऱ्यासारखं उजळून निघायचं असेल तर त्याच्यासारखं जळावं लागतं तरच तुमचं तेज झगमगून निघतं. ज्ञानदाचा आज ‘एबीपी माझा’सोबत १४ वर्षांचा प्रवास झालाय. २००७ च्या १ मार्चला माझ्याच बॅचमध्ये ज्ञानदाही होती. कोण होतो आम्ही? २०-२५ मधली पोरं! नव्हे, तसंच म्हणायचे आम्हाला मीडियातले सीनियर्स. ‘अरे, ती पाहा राजीव खांडेकरांची (म्हणजे आमचे संपादक!) पोरं!’, ‘या ‘स्टार’वाल्यांनी लहान मुलं घेऊन मराठी चॅनल सुरू केलंय!’ असाच सगळ्यांचा आविर्भाव असायचा. आमच्या या अशा बालगोपाळ मित्रमंडळात ज्ञानदाही होती. आज तुम्हाला ती अँकर म्हणून माहित्येय, पण तेव्हा ती ट्रेनी रिपोर्टर होती. आकाशातल्या ताऱ्याची सुरुवात ही अशी फील्डवरच्या रिपोर्टिंगमधूनच झाली बरं! थोड्याच कालावधीत ज्ञानदाच्या आत्मविश्वासपूर्ण रिपोर्टिंगमुळे तिला अँकरिंगची संधी मिळाली. चुकतमाकत, सुधारणा करत ज्ञानदाचा अँकर म्हणून प्रवास सुरू झाला. तो काळ म्हणजे दूरदर्शन स्टाइलच्या वृत्तनिवेदनातून बाहेर पडून मराठी न्यूज मीडियातील प्रयोगांचा होता. तेव्हा सुरू झालेल्या सर्वच चॅनल्समध्ये हा ताजेपणा होता. ‘एबीपी माझा’मधला असा फ्रेश चेहरा ठरली ज्ञानदा चव्हाण (आताची कदम).

अँकरिंगला आल्यानंतर ज्ञानदानं मागे वळून बघितलं नाही. नेहमीच्या बुलेटिन्सपलीकडे ‘एबीपी माझा’च्या ‘माझा सन्मान’, ‘व्हिजन महाराष्ट्राचे’, ‘माझा कट्टा’ अशा कार्यक्रमांसाठी किंवा गणेशोत्सवासाठी आऊटडोअर अँकरिंग, दिवाळीचे खास कार्यक्रम यासाठी ज्ञानदाचं असणं मस्ट ठरू लागलं. महिला उद्योजिका, कॉर्पोरेट अधिकाऱ्यांच्या मुलाखतीवर आधारित ‘महिला बिग बॉस’ या तिच्या कार्यक्रमाचंही खूप कौतुक झालं. कोणत्याही निवडणूक निकालांच्या ‘बिग डे’ला मी आणि ज्ञानदा ही जोडी आजतागायत कायम आहे.

मी तिला सेलिब्रिटी म्हणालो खरा, पण सेलिब्रिटिंमध्ये आढळणारा एकही गुण (किंवा अवगुण म्हणा हवं तर!) तिच्यात नाही. डोंबिवलीतल्या असंख्य महिला सकाळी ज्याप्रमाणे घरच्यांचं सगळं करून बाहेर पडतात, तशीच ज्ञानदाही सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडते. एका अर्थानं ती पहिल्यांदा तिच्या कुटुंबीयांची असते, मग ‘एबीपी माझा’ची! मला मराठी-हिंदी मीडियातील अनेक अँकर्स-रिपोर्टर्स माहीत आहेत, ज्यांना थोडीफार ‘ग’ची बाधा झाली असते. आपल्या सहकाऱ्यांसोबत किंवा फील्डवर असताना अन्य वाहिन्यांच्या प्रतिनिधींसोबत वागण्या-बोलण्यात त्यांच्यात एक अंतर राखलेला कृत्रिमपणा असतो. ज्ञानदा अशी कधीच वाटली नाही. छोटा किस्सा आहे. ऑफिसमध्ये काही सेलिब्रेट करायचं झालं की आम्ही केक आणतो. तेव्हा ज्ञानदा याचा नक्की विचार करील की मेकअप रूम किंवा पीसीआर (जिथून अँकर्सना कमांड दिल्या जातात) तिथे केक दिलाय का? इतक्या वर्षांत आमच्या अँकर टीममध्ये अनेक जण आले-गेले, मात्र नव्यानं आलेल्यांना ज्ञानदानं कधीही आपण ‘द ज्ञानदा’ असल्याचं जाणवू दिलं नाही. चॅनलसाठी आपलं वेगळं महत्त्व आहे म्हणून कधी टँट्रम्स दाखवणं, टंगळमंगळ करणं हे ज्ञानदाच्या गावीही नाही. बुलेटिनच्या वेळी धीरगंभीर असणारी ज्ञानदा इतर वेळी एकदम वेगळीही असते. अँकर्स म्हटलं की ‘तुम्ही काय बुवा एसीत बसून बातम्या देणारे...’ असं कधी गमतीनं, कधी आकसानं म्हटलं जातं. मात्र, आता काळ बदलतोय. अपवादात्मकरीत्या महत्त्वाच्या घटना घटल्या तर वाहिन्या त्यांच्या प्रमुख अँकर्सना फील्डवर उतरवू लागल्या आहेत. अशाच कव्हरेजचा भाग म्हणून ज्ञानदानं ‘दुष्काळ परिषद’ या ‘एबीपी माझा’च्या कार्यक्रमाचं प्रभावी अँकरिंग केलंय. २६ जानेवारीनिमित्त दरवर्षी आम्ही विशेष कार्यक्रम करतो. त्यासाठी ज्ञानदानं नाशिकमधल्या भोसला मिलिटरी स्कूलवर कार्यक्रम केला. अँकर असली तरी आजही ज्ञानदातील ‘रिपोर्टर’ जागा आहे!

ज्ञानदा आज ‘एबीपी माझा’ची अँकर टीम सांभाळते. अँकर्सचं वेळापत्रक ठरवणं, विशेष कार्यक्रमांसाठीचं नियोजन करणं, ‘एबीपी माझा’च्या डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी स्वत: आणि अँकर्सकडूनही सहभाग देणं-वाढवणं, येऊ घातलेल्या महत्त्वाच्या दिवसांसाठी (उदा. पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल) प्लॅनिंग करणं, अशा अनेक जबाबदाऱ्या ती लीलया पेलते तेव्हा १४ वर्षांपूर्वी जिला बावरलेली पाहिलं होतं ती, ऑफिसातल्या आणि बाहेरच्या मित्र-मैत्रिणींची लाडकी ‘ज्ञानू’ ती हीच का? असा प्रश्न पडतो. मध्यंतरी ज्ञानदाला कोरोना झाला होता. मात्र, तिच्यातल्या फायटरनं कोरोनावरही मात केली. म्हणूनच मला तरी ज्ञानदा ही ‘वंडर वुमन’ वाटते....कधीतरी हे ज्ञानदालाही सांगून तिला विचारलं पाहिजे.... ‘काय सांगशील ज्ञानदा?’

अँकरमधली ‘रिपोर्टर’...
अपवादात्मकरीत्या महत्त्वाच्या घटना घडल्या, तर वाहिन्या त्यांच्या प्रमुख अँकर्सना फील्डवर उतरवू लागल्या आहेत. अशाच कव्हरेजचा भाग म्हणून ज्ञानदानं ‘दुष्काळ परिषद’ या ‘एबीपी माझा’च्या कार्यक्रमाचं प्रभावी अँकरिंग केलं. २६ जानेवारीनिमित्त दरवर्षी आम्ही विशेष कार्यक्रम करतो. त्यासाठी ज्ञानदानं नाशिकमधल्या भोसला मिलिटरी स्कूलवर कार्यक्रम केला. अँकर असली तरी आजही ज्ञानदामधला ‘रिपोर्टर’ जागा आहे, त्याचंच हे द्योतक!

प्रसन्न जोशी वृत्तनिवेदक-एबीपी माझा
संपर्क : prasann.joshi@gmail.com

बातम्या आणखी आहेत...