आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोक-संचित:शोधीत विठ्ठला जाऊ आता...

प्रवीण दशरथ बांदेकर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ही पायातळीची भूमी, डोईवरचं निळंभोर आभाळ, आजी-पणजीच्या मायेच्या या नद्या अन् आज्यासारखा राखणा घरापाठचा डोंगर.. हे आपले आहेत तोवरच आपल्या अस्तित्वाला काही अर्थ आहे. या निसर्गाच्या अंगाखांद्यावर बागडणाऱ्या किड्यामुंग्यांसह सगळे जीव जगले, तरच आपलंही अस्तित्व शाबूत राहील. या अडाणी, अभावग्रस्त, फाटक्या बायाबापड्यांना जे कळतंय, ते भल्या भल्या शहाण्यासुरत्या लोकांना का कळत नसावं?

तुम्ही हे दृश्य पाहताय ना? पाहा, खेड्यापाड्यांतल्या कष्टकरी बायका कशा भररस्त्यावर ठिय्या देऊन बसल्या आहेत. बसल्या आहेत, असं तरी कसं म्हणायचं? अक्षरशः टळटळीत उन्हात, धुळीच्या त्या रस्त्यावर त्या आडव्या पडल्या आहेत. कोण आहेत या बायका? त्यांना काही लाजलज्जा आहे की नाही? डोईचा पदर खांद्यावर आला तर ते एक वेळ समजून घेता येईल या दिवसांत. पण, हे काय? चक्क रस्त्यावरच लोळतायत? जनाची सोडा, मनाचीही शरम वाटत नाहीये का? यांना काही घरदार, संस्कृतीबिंस्कृती आहे की नाही? घरच्यांचं, समाजाचं, आलेल्या गेलेल्यांचं भय आहे की नाही?

किती प्रश्न विचाराल? किती सुया टोचाल? किती इंगळ्या डसवाल? पण ज्यांचं जळत असतं, त्यांनाच हे कळू शकेल. या बायकांना काही असं उन्हातान्हात, रस्त्यात, मातीत लोळायची हौस नाही. नीतिनियम, घरंदाजपणा, संस्कार त्यांनाही कळतात. पण, परिस्थितीच अशी आली आहे की, उंबरठा ओलांडून घराबाहेर येणं त्यांना भाग पडलं आहे. कुणी आणली त्यांच्यावर ही वेळ? कुणामुळं त्यांना असं तळतळाट देत मातीत मरावं लागतंय? तर तेही आपणच आहोत. आपल्यामुळंच ही वेळ ओढवलीय या आयाबायांवर.

खरं तर, या त्याच बायका होत्या ज्या महात्मा गांधींच्या एका शब्दासाठी तेव्हाही घराचा उंबरठा ओलांडून रस्त्यावर उतरल्या होत्या. यांच्याच क्रांतिकारक सहभागामुळे ब्रिटिशांना या देशातून आपला गाशा गुंडाळावा लागला होता. पण आता त्याच बायकांवर आम्ही ही काय वेळ आणलीय? आम्हाला ही कसली अवदसा आठवलीय, आमच्या आयाबहिणींना रस्त्यावर आणण्याची? आई-आजी-पणजी इतक्याच प्रिय असलेल्या आमच्या भूमीला विकून खाण्याची?

भूमी आणि त्या भूमीशी साधर्म्य सांगणारी बाई या दोघांसाठीही अनुकूल असा काळ कधीच नव्हता याआधीही. युद्ध असो वा दुष्काळ, आपले म्हणवणारे असोत वा परके; प्रत्येक वेळी भूमीसारखी बाईच पणाला लावली जाते, वनवासात धाडली जाते. कदाचित म्हणूनच असेल, बाईनं बाकी कशापेक्षाही पायातळीच्या भूमीशी आपली मुळं घट्ट रुतवून धरली आहेत. इतिहासात अनेकदा असं दिसून आलं आहे की, आपल्या नांदत्या भूमीवर, शेतजमिनींवर, घरादारांवर ज्या ज्या वेळी काही आपत्ती आल्या, त्या त्या वेळी बायांनी पुढे सरसावत भूमीच्या रक्षणासाठी जिवाची बाजी लावली.

कोकणातल्या राजापूर तालुक्यात बारसू गावीही आजकाल हेच दृश्य आपल्याला दिसेल. आपल्या मायबाप सरकारने तिथं रिफायनरीचा – खनिज तेल शुद्धीकरण प्रकल्पाचा घाट घातलाय. त्यासाठी काही लाख करोड रुपये मंजूर केलेत. आता त्यासाठीच जबरदस्तीने तिथल्या शेतकरी, मच्छीमार असलेल्या रहिवासी गावकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या जाताहेत. गावाशी काहीही संबंध नसलेल्या काही धनदांडग्यांनी तिथल्या शेकडो एकर पडीक जमिनी हे प्रकल्पाचं जाहीर होण्याआधीच गावकऱ्यांना खोटंनाटं सांगून, फसवून अत्यल्प किमतीला विकत घेतल्या. आता त्या जमिनी शेकडो पट अधिक भावानं सरकारला या प्रकल्पासाठी विकण्यासाठी ते एका पायावर तयार आहेत. या जागेवर हा असा प्रकल्प होणार आहे, हे गावकऱ्यांना माहीत नव्हतं. पण, त्या लोकांना हे आधीच कळलं होतं. आता झालंय असं की, या जमिनींव्यतिरिक्त न विकलेल्या जमिनींचे मालक असलेलेही काही गावकरी इथं आहेत. ते आपल्या वाट्याच्या गुंठा-दोन गुंठा जमिनीवर पिढ्यान् पिढ्या कष्टानं शेती-बागायती करून प्रामाणिकपणे जगतायत. त्यांना आपल्या जमिनी प्रकल्पासाठी द्यायच्या नाहीत. बरोबरच आहे, का द्याव्यात त्यांनी त्या वडिलोपार्जित जमिनी अशा प्रदूषणकारी प्रकल्पासाठी? इथला समृद्ध निसर्ग, आंबा-काजू-रातांबा-नारळ-सुपारीच्या बागा यांना हानी पोचवणारा, मानवी जीवित आणि आरोग्याच्या मुळावर उठणारा प्रकल्प आमच्या भूमीत नको, इतकंच त्यांचं म्हणणं आहे. पण, हे सांगण्याचा, नकार देण्याचाही अधिकार या जमिनी आजवर राखल्या त्या भूमिपुत्रांना नाही. गावकऱ्यांना नको असताना, आसपासच्या ग्रामपंचायतींमध्ये तसे ठराव झाले असतानाही जबरदस्तीने हा प्रकल्प त्यांच्यावर लादण्याचं कृत्य सुरू आहे.

मग भूसंपादनासाठी आलेले शासकीय अधिकारी, पोलिस कर्मचारी आणि दलालांच्या हस्तकांना रोखण्यासाठी या गावातल्या बायकांच पुढे झाल्या. भूमीला कवटाळत त्या रस्त्यांवर, शेतांतून आडव्या पडल्या. आमच्या अंगावर खुशाल गाड्या घाला, कुदळी चालवा, आम्हाला पर्वा नाही. काय वाट्टेल ते झालं तरी आमच्या हक्काच्या जमिनी तुमच्या घशात घालू देणार नाही, असा खणखणीत इशारा त्यांनी दिला. झाडं तोडायला आलेल्यांना अडवण्यासाठी झाडांना मिठ्या मारणाऱ्या चिपको आंदोलनातील बाया, जबरदस्तीनं खाणीचं उत्खनन करण्यासाठी आलेल्या कामगारांसमोर ठिय्या देत भजनं करणाऱ्या कळणे गावच्या बाया, तारांकित हॉटेल उभारण्यासाठी किनारपट्टीवरची वस्ती हटवण्याच्या इराद्याने आलेल्या अधिकाऱ्यांसमोर उभ्या ठाकलेल्या शिरोडा-वेळागरच्या मच्छीमार बाया, अशा अनेक आंदोलनकर्त्या बायकांची आपल्याला आठवण होऊ शकते.

खरं तर, ‘निर्भय बनो, संघर्ष करो,’ असं कुणी त्यांना सांगायला गेलेलं नसतं. भीतीचा पदर कमरेला खोचून पुढे सरसावत झगडल्याशिवाय आपल्याला काहीच मिळणार नाही, हे इतक्या पिढ्यांच्या अनुभवांनंतर त्यांना माहीत झालेलं असतं. उपजतच तिच्या रक्तातून ही संघर्षरत निर्भयता वाहत आलेली असते. त्यामुळेच अनेकदा त्यांच्या घरचे जबाबदार पुरुषदेखील परिस्थितीच्या रेट्याला घाबरून मागे सरत असताना, व्यवस्थेला शरण जात असताना या बाया कणखरपणे लढत राहताना दिसतात. एरवी परक्यासमोर मान वर करून बोलायला संकोचणाऱ्या, कमालीच्या मुखदुर्बल, रोजच्या जगण्याच्या लढाईत पिचलेल्या, हरलेल्या या बायांमध्ये हे धाडस कुठून येत असावं? की त्यांना हेही निसर्गतःच कळलेलं असतं की, हे पर्यावरणाला गिळायला निघालेले प्रकल्प, खाणी, हॉटेल, रिफायनरी, अणुभट्ट्या म्हणजे शाश्वत विकास नाही, तर आपल्या आजवर जपलेल्या निसर्गासहित जगण्याच्या वाटेवरचं विनाशाचं पहिलं पाऊल आहे? ही पायातळीची भूमी, डोईवरचं निळंभोर आभाळ, आजी-पणजीच्या मायेच्या या नद्या आणि आज्यासारखा राखणा घरापाठचा डोंगर, हे आपले आहेत तोवरच आपल्या अस्तित्वाला काही अर्थ आहे. या निसर्गाच्या अंगाखांद्यावर बागडणाऱ्या किड्यामुंग्यांसह सगळे जीव जगले, तरच आपलंही अस्तित्व शाबूत राहील. या अडाणी, अभावग्रस्त, फाटक्या बायाबापड्यांना जे कळतंय, ते भल्या भल्या शहाण्यासुरत्या लोकांना का कळत नसावं?

विचार करताना मला प्रत्येक वेळी संत तुकाराम आठवतात. आपल्यावर ओढवलेल्या अशाच काहीशा जीवघेण्या परिस्थितीमुळे कुंठित होऊन ते विचारतात, काय खावे आता कोणीकडे जावे? गावात राहावे कोण्या बळे? कोपला पाटील गावचे हे लोक, आता घाली भीक कोण मज? पण, तुकोबांचा विठ्ठलावरचा भक्कम विश्वासच त्यांना त्यातून मार्ग दाखवतो. म्हणूनच शेवटी ते म्हणतात... तुका म्हणे यांचा संग नव्हे भला, शोधीत विठ्ठला जाऊ आता... मला वाटतं, या बायांचंही असंच काही तरी असलं पाहिजे. ज्याच्या बळावर गावात निर्धास्त जगता येईल, असा कुणी दिसत नाही, राज्याचा गाडा हाकणारे सगळेच कारभारी पाटील कोपलेत आणि तरीही हा निसर्गच आपल्याला तारून नेईल, त्यालाच घट्ट बिलगून राहिलं पाहिजे, तोच आपल्यासाठी ‘विठ्ठल’ आहे, याची त्यांना खात्री असणार. हाच ठाम विश्वास त्यांना लढण्याचं बळ देत असला पाहिजे.

प्रवीण दशरथ बांदेकर
samwadpravin @gmail.com