आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:अडचणीची बारभाई

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पेशवाईत राघोबांना रोखण्यासाठी बारभाईंनी (१२ कारभाऱ्यांनी) सत्ता हाती घेत अनेकांचा स्वप्नभंग केला होता. महाविकास आघाडीत अगदी तशी स्थिती आहे. आघाडीत तीन पक्ष. राष्ट्रवादी व शिवसेनेचा सुकाणू शीर्ष नेत्यांच्या हाती आहे. काँग्रेसचे तसे नाही. राज्यात काँग्रेसचा एक असा नेता नाही. प्रत्येक मंत्री सुपरमंत्री आहे. अगदी बारभाईंप्रमाणे. काँग्रेसला चेपण्याचा दोन्ही मित्रपक्षांचा प्रयत्न असतो. महत्त्वाच्या निर्णयात काँग्रेसला डावलले जाते, तरी काँग्रेस बारभाई अजेंडा रेटणे सोडत नाही. केंद्राच्या विरोधात काँग्रेसने राज्याचा कृषी कायदा करायला लावला.

केंद्राच्या कृषी कायद्याच्या वटहुकुमांना स्थगिती द्यायला लावली. ओबीसी आरक्षण ठराव, मराठा आरक्षणाचा ठराव विधिमंडळात मंजूर करण्यास काँग्रेसने भाग पाडले. आता संघर्ष आहे, पुढच्या वर्षी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी. स्वबळाचा नारा देऊन काँग्रेस दोन्ही सहकारी पक्षांना जेरीस आणते आहे. याचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसणार आहे. कारण दोघांचा मतदार एक आहे. काँग्रेसला चेपल्याशिवाय राष्ट्रवादीच्या जागा वाढणार नाहीत, हे सत्य आहे. त्यात नाना पटोलेंच्या हाती प्रदेश काँग्रेस आहे. पटोले पडले राहुल गांधीचे लाडके. त्यामुळे काँग्रेसवरचा राग काढण्यासाठी पटोले निशाणा होत आहेत. त्यांना मंत्रिपद मिळू नये, असे प्रयत्न सुरू आहेत.

विधानसभा अध्यक्षपदी दुबळी व्यक्ती यावी, अशी पवार-उद्धव यांची चाल असू शकते. कदाचित यामुळेच अध्यक्षपदाची निवड लांबते आहे. पवार सहसा रागवत नाहीत, पण पटोलेंबाबतचा त्यांचा राग अपवाद आहे. पटोलेंवर विरोधकांचे हल्ले रोजचे होते, आता मित्रपक्षांचे तीर नित्याचे झाले आहेत. एकूण काय, आघाडीत उपेक्षा झालेल्या काँग्रेसला आपल्या अस्तित्वाची जाणीव झाली आहे. आणि हेच तो मित्रपक्षांना जाणवून देत आहे.

बातम्या आणखी आहेत...