आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Opinion
  • Prof Priyadarshan Bhavare Rasik Article Sensitive Observation Of Social Events

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रंथार्थ:सामाजिक घडामोडींचा संवेदनशिलतेने घेतलेला वेध

प्रा. प्रियदर्शन भवरेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे येथील आऱ्हान बुकस्मिथस् प्रकाशनाद्वारे अलिकडेच "सोशल रिडींग्जः रेट्रोस्पेक्टिव एंड रिव्ह्यूज' या नावाने प्रसिद्ध झालेला डॉ. प्रवीण घोडेस्वार यांचा सामाजिक घटनांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा इंग्रजी भाषेतील ग्रंथ नव्या पिढीला मार्गदर्शन करणारा आहे.

पुणे येथील आऱ्हान बुकस्मिथस् प्रकाशनाद्वारे अलिकडेच "सोशल रिडींग्जः रेट्रोस्पेक्टिव एंड रिव्ह्यूज' या नावाने प्रसिद्ध झालेला डॉ. प्रवीण घोडेस्वार यांचा सामाजिक घटनांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा इंग्रजी भाषेतील ग्रंथ नव्या पिढीला मार्गदर्शन करणारा आहे. समाजात घडणाऱ्या विविध घटनांविषयी प्रगट होणे व त्यासंदर्भात एक भूमिका घेणे सध्याच्या वर्तमानात गरज बनली आहे. भूमिका नसलेला समाज गुलाम बनतो आणि ही गुलामी वर्षानुवर्ष समाजमनावर कायम राहते त्यातून बाहेर पडण्यासाठी बराचसा अवधी लागतो व त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. सध्याच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या गळचेपीच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र भूमिका घेणे हे समाजाच्या अस्तित्वासाठी अतिशय आवश्यक आहे. भूमिका घेणाऱ्या व्यक्ती मुठभर असल्या तरी हरकत नाही परंतु हेच लोक संबंध समाजाची मनोभूमिका बदलविण्यासाठी पुरेसे असतात. नव्या आर्थिक धोरणानंतरच्या काळात समाजात प्रचंड गुंतागुंत वाढली आहे त्यातून नवे नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. समाजातील हा विस्कळीतपणा समाजाच्या प्रगतीला अडथळे निर्माण करतो. समाज हा प्रवाही असला पाहिजे म्हणून या अडथळ्यांना बाजूला सारून नवा समतेचा, बंधुत्वाचा मार्ग निर्माण केला पाहिजे. समाजात घडणाऱ्या विविध बाबींचे सूक्ष्म निरीक्षण करून त्याचा योग्य अन्वयार्थ लावला पाहिजे.

प्रस्तुत पुस्तकात डॉ. घोडेस्वारांनी अशाच प्रकारच्या पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक घटनांचा आढावा घेतला आहे. यातील बरेचसे लेख यापूर्वीच इंग्रजी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहेत. त्या लेखाचे संकलन त्यांनी वाचकांसमोर ठेवले आहे. विविध सामाजिक प्रश्नाबद्दलची चर्चा व विचारमंथन या लेखाच्या माध्यमातून त्यांनी केले आहे. एकूण बत्तीस लेखांमध्ये त्यांनी विविध विषयांना स्पर्श करीत आपली विवेकशील भूमिका प्रतिपादन केली आहे. आपल्या भोवताली जे जाणवले ते त्यांनी लेखांद्वारे अधोरेखित केले आहे. हे प्रसिद्ध झालेले लेखन त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमाद्वारे एका माळेत गुंफले असून आपले सर्जनशील योगदान दिले आहे. यात काही अप्रकाशित लेखनही आहे.

वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखाला तत्कालिन सामाजिक संदर्भ असतात. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडींच्या त्या तात्कालिक प्रतिक्रिया असतात. वर्तमानपत्रात लिहिताना शब्द मर्यादेचे भान ठेवावे लागते व ते लेखन अधिकाधिक आशयपूर्ण व गंभीर झाले पाहिजे अशी अपेक्षा असते. वर्तमानपत्राच्या वाचकाला फार वैचारिक आणि गंभीर विषयावर वाचायला आवडत नाही त्यांना हलके-फुलके व सहज समजणारे पाहिजे असे असले तरी या लेखनासाठी निवडलेले विषय घोडेस्वारांनी अतिशय सोप्या व सहजरित्या प्रतिपादित केले आहेत.

या पुस्तकातील लेखाची तीन प्रकारे विभागणी असून चरित्रात्मक, दिनविशेष आणि संकीर्ण ज्यात सामाजिक प्रश्न, विविध विवादास्पद मुद्दे, सामाजिक घटना, शासकीय निर्णय इ. संदर्भात असलेले वैयक्तिक आकलन या अनुषंगाने त्यांनी आपल्या लेखाची मांडणी केली आहे. डॉ. घोडेस्वार यांचे हे इंग्रजीतील पहिलेच पुस्तक आहे. समकालीन दिनविशेषाच्या अनुषंगाने बरेचसे लिखाण केले आहे. यातील काही लेख हे तत्कालीन घडामोडीच्या बाबतच्या प्रतिक्रिया वा दृष्टीकोण आहेत. यातील बरेचसे लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे असून बाबासाहेबांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाबद्दल व तसेच त्यांच्या राष्ट्र उभारणीसाठीच्या योगदानाबद्दल आहेत. डॉ. आंबेडकरांचे या देशाच्या जडणघडणीतील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांच्या संदर्भातील लेख प्रस्तुत पुस्तकात अधिक असल्याचे लेखक म्हणतात. डॉ.आंबेडकरांचा सामाजिक व राजकीय संघर्ष व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आदी बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. भारतीय स्त्रीवादाचे जनक म्हणून महात्मा फुले यांचे योगदान, पितृसत्तेला आव्हान देणारा क्रांतिकारक म्हणून महात्मा फुले, स्त्री हक्काचे संरक्षक डॉ. आंबेडकर, पत्रकारितेला डॉ. आंबेडकरांचे योगदान, डॉ. आंबेडकरांचे जातविरहित समाजाचे स्वप्न, डॉ.आंबेडकरांचा लोकशाही विषयक दृष्टिकोन, भारतातील दलित राजकारणाचे जनक, डॉ. आंबेडकर मनुस्मृती का जाळली? आंबेडकरांच्या पत्रकारितेची शंभर वर्ष, शाहीर अमरशेख, विद्या बाळ, बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा प्रेरणादायक प्रवास, आदिवासीच्या विकासात अडथळा आणणारी धोरणे, एक निवडणूक-एक देश हे धोरण गरजेचे आहे का? भारतातील कुपोषणाची समस्या, राज्यघटनेतील मूलभूत तत्त्वे, भारतीय विद्यापीठ संघटना, महाराष्ट्र शासनाचा शाळेत राज्यघटनेची प्रास्ताविका वाचण्याचा निर्णय, मुलांच्या मनोरंजनाची व्यापक धोरणं बनविण्याची गरज, मातृभाषेचे महत्व, गुरु -शिक्षक- प्राध्यापक -सर-शिक्षक इ. बाबतची भूमिका, धम्मचक्र प्रवर्तन दिवस, राष्ट्रीय सेवा योजनेचे ५० वर्ष, स्त्री हक्क आणि मानवी हक्क अशा विविध पैलूंवर आपली भूमिका सविस्तर मांडली आहे. मॉब लिंचींग संदर्भातील लेख अंतर्मुख करणारा असून या बाबत कडक कायद्याची गरज असल्याचे ते नमूद करतात. भारतीय लोकसंख्याला बळ देणारा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे या देशातील तरुण यावरील लेखही नवा दृष्टिकोन देणारा आहे.

समाजात घडणाऱ्या उलथापालथीवर समाजातील सुशिक्षित वर्गाने आपली भूमिका विशद केली पाहिजे. ती त्यांची जबाबदारीच आहे कारण सुशिक्षित वर्ग हाच खऱ्या अर्थाने त्या देशाला पर्यायाने समाजाला विधायक दिशा देण्याचे कार्य करतो. सोप्या भाषेतून लिहिणे हे खरे तर कठीण काम मात्र प्रस्तुत पुस्तकातील इंग्रजी भाषा अतिशय साधी सोपी असून सहज कळेल अशी आहे. वृत्तपत्रीय लेख असल्यामुळे वाचकाकडून ते सहज वाचले जातात. सामाजिक संवेदनशीलता जपणारे लेखकच अशा पद्धतीची लेखन कृती करू शकतात. मराठी पुस्तकाचे वाचन करण्याबरोबरच इंग्रजी पुस्तकाचे ही वाचन केल्याने आपली मातृभाषा अधिक समृद्ध होते.

समाजाची मनोभूमिका ठरविण्याचे सामर्थ्य वर्तमानपत्रात असते. पुस्तके वाचण्यापेक्षा समाज वर्तमानपत्रे अधिक प्रमाणात वाचतो. वाचणाऱ्यांची संख्या लाखोंनी असते त्यामुळे वर्तमानपत्रातील लेखाद्वारे स्वच्छ व निकोप विचारसरणीची बीजे समाजात रुजविण्यासाठी मोलाची भूमिका बजावतात. वर्तमानपत्रे सहज प्राप्त होणारे असल्यामुळे यात प्रसिद्ध झालेले लिखाण समाजाची विचारप्रणाली घडविणारे असते म्हणूनच अनेक समाजसुधारकांनी वर्तमानपत्राला आपल्या सामाजिक प्रबोधनाचं एक महत्त्वाचं आयुध मानले आहे. अगदी मोजक्या व नेमक्या आणि आशयपूर्ण भाषेत कमीत कमी शब्दात मांडण्याचे कौशल्य हे लेख लिहिणाऱ्याकडे असायला हवे. मातृभाषा मराठी असणाऱ्याना मराठी भाषेतून लिहिणे हे नक्कीच सोपे आहे मात्र इंग्रजीतून अपेक्षित असा आशय वाचकांसमोर नेणे ही फार मोठी जबाबदारी आहे. हे शाब्दिक कौशल्य लेखकाने यशस्वीपणे पेलले आहे त्याबद्दल त्याचे कौतुकच आहे. यातील लेख वाचकाला विचारप्रवृत्त करण्यास भाग पाडतील. सामाजिक शोषणाला वाचा फोडण्यासाठी इंग्रजीतून लिहिणे आता गरजेचे आहे. इंग्रजी ही वैश्विक भाषा असल्यामूळे आपले प्रश्न जागतिक पटलावर लवकर आणता येतात. लेखकाकडून यासंदर्भाने अधिक अपेक्षा आहे. प्रस्तुत पुस्तकाचे वाचक नक्कीच स्वागत करतील अशी आशा आहे.

'सोशल रिडींग्जः रेट्रोस्पेक्टिव एंड रिव्ह्यूज'

लेखक: डॉ.प्रवीण घोडेस्वार

आऱ्हान बुकस्मिथस् प्रकाशन, पुणे

पृष्ठसंख्या: १३२, किमत: २०० रुपये

संपर्क - ९४०५९१३२९७