आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएक महान शिक्षणतज्ज्ञ, दूरदर्शी समाजसुधारक, कवयित्री, पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका, संप घडवणारी पहिली स्त्री, सत्यशोधक समाजाची कार्यकर्ती अशा विविध भूमिका सावित्रीबाई फुले यांनी एकाच आयुष्यात यशस्वी केल्या. त्यांचे हे सोशल इंजिनिअरिंग आजच्या काळात देखील समस्त महिलांसाठी आदर्श आहे. सावित्रीबाईंनी मुलींना फक्त शिकवलेच नाही, तर त्यांना निर्भय बनवले, स्वतंत्र विचार करायला आणि स्वतंत्र निर्णय घ्यायला सुद्धा शिकवले. सावित्रीबाईंचे जीवन खऱ्या अर्थाने सर्वांसाठीच आदर्शवत आहे. आज सावित्रीबाईंच्या जयंतीप्रसंगी सर्वच महिलांनी एकदा एकूणच आपल्या आयुष्याचा प्रवास आठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रिया हिरिरीने भाग घेत आहेत. प्रगती करत आहेत. घराबाहेर सर्व क्षेत्रे काबीज करणाऱ्या स्त्रिया स्वतःकडे किती हिरिरीने, गांभीर्याने पाहतात, स्वतःचे आरोग्य, आवडीनिवडी यांना किती महत्त्व देतात, असा प्रश्न निर्माण होतो. महिला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मुलांच्या, पतीच्या आणि इतर कौटुंबिक सदस्यांच्या सेवेत स्वतःला गुंतवून घेतात. कुटुंबाविषयी नितांत समर्पणाची जबाबदारी पार पाडतात. पण हे सर्व करताना पुरेशा व्यायामाअभावी स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होत जाते आणि मग वाढत्या वयानुसार आरोग्याच्या समस्या भेडसावायला लागतात. संपूर्ण राष्ट्रीय आरोग्याचा विचार करता महिलांचे आरोग्य या घटकाला त्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे नाकारून चालणार नाही. या देशातील महिलांचे आरोग्य चांगले राहिले, तर त्याचा सकारात्मक परिणाम निश्चितपणे देशाच्या सर्वांगीण विकासावर होऊ शकेल. महिलांचा विकास लहानपणापासूनच व्हायला हवा. तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची जपणूक होणे आवश्यक आहे. बालपणी मिळणारा योग्य तो पोषक आहार या महिलेचे पुढील आयुष्य व आरोग्य ठरवत असतो. स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढले असल्याने गर्भलिंग चाचणींवरही प्रतिबंध आणावा लागला. मात्र तरीही हे सर्व थांबले आहे का, हा खरा प्रश्न आहे. गर्भाचे नीट पोषण झाले नाही तर जन्माला येणारी बालिकाही कमी वजनाची आणि कुपोषित असेल. आईचे चांगले पोषण झाले नसेल तर तिचे दूध नवजात बालिकेला नीट मिळत नाही. मग तिची पूर्ण वाढ कशी होणार? तिच्या शरीराची प्रतिकारशक्ती कशी विकसित होणार? गर्भाचे नीट पोषण न होणे, पुढे मातेचे दूध योग्य तेवढे न मिळणे, बालिका थोडी मोठी झाली की तिच्या शरीराच्या वाढीला आवश्यक आहेे असा आिण योग्य तेवढा आहार न मिळणे यामुळे बालपणी ती बालिका खुरटलेली राहते. मग तारुण्यावस्थेत पदार्पण केल्यावर तिच्यामध्ये काय सुधारणा दिसणार? हे सर्व थांबवायचे असेल तर महिलांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर स्वत:च्या आरोग्याविषयी जागृती निर्माण करावी लागेल. घरातील गृहिणींचे आरोग्य उत्तम असेल तर ती इतरांकडे नीटपणे लक्ष देऊ शकत. परंतु, तीच स्वतः काही समस्यांनी बेजार झाली तर संपूर्ण कुटुंब अवस्थ होते. जवळपास सर्वच कुटुंबांचा हा अनुभव असतो. महिलांची मानसिकता बऱ्याच वेळा आजारपण अंगावर काढण्याची असते. तो बळावला तरच त्या वैद्यकीय सल्ला घेण्यास तयार होतात. त्याही दृष्टीने त्यांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. कारण कुटुंबाची काळजी घेणारी महिला कायम आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. ती जागृत व्हावी आणि समाजात महिलांच्या आरोग्याबाबत संवेदनशीलता निर्माण व्हावी, हे गरजेचे आहे. आहार, चांगल्या सवयी, योगा आणि वैद्यकीय सल्ला या चतु:सूत्रीवर महिलांचे आरोग्य टिकणे आवश्यक आहे. समाजातील रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, वैद्यकीय सुविधांचा अभाव आणि वैयक्तिक आरोग्याकडे दुर्लक्ष इत्यादी कारणांमुळे महिला आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. महिलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढत आहे. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे कर्करोग, मधुमेह, हृदयरोग या अनेक आजारांना महिलांना तोंड द्यावे लागत आहे. महिलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण मोठे आहे. आयर्न, हिमोग्लोबिन याची कमतरता मोठ्या प्रमाणावर महिलांमध्ये आढळून येत आहे. आजच्या महिला चूल आणि मूल या पलीकडे गेल्या आहेत. घराबाहेर पडून स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या धकाधकीच्या जीवनात महिलांनी कामासोबत आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या काम करतात. स्त्रियांचे मानसिक आरोग्य, जननसंस्थेचे आजार, कॅन्सर आणि रजोनिवृत्तीच्या वेळी होणारा त्रास आदींबाबत स्वत:च्या आरोग्याच्या महत्त्व ओळखून सजगता दाखविल्यास अनेक महिला संभाव्य आजाराचा धोका आणि प्रसंगी आपला जीवही वाचवू शकतात. बहुतांश महिला आजारपण अंगावर काढतात. त्यामुळे समस्या आणखी जटिल होत जातात. मग कुटुंबाच्या देखभालीत कमी पडल्याने मानसिक ताणतणाव वाढत जातो. त्यातून स्वभाव चिडचिडा होणे, राग येणे सुरू होते. हळूहळू मानसिकदृष्ट्या एकटेपणाची भावना वाढून जाते. त्यामध्ये डिप्रेशन येते, मग या सर्वांमधून बाहेर पडण्यासाठी वैद्यकीय खर्च करावा लागतो. पण, मग हे सगळे टाळता येऊ शकत नाही का? तर त्यासाठी महिलांनी थोडे स्वार्थी होऊन स्वतःसाठी वेळ द्यायला हवा. केंद्र शासनाच्या प्रिंसिपल सायंटिफिक अॅडव्हाजर कार्यालयातर्फे विविध संस्थांच्या मदतीने ‘मानस’ अॅप विकसित करण्यात आले आहे. वय वर्ष पंधरा ते पस्तीस वयोगटातील मुली-महिलांसाठी हेे अॅप अत्यंत उपयुक्त ठरणारे आहे. आपले मानसिक आरोग्य उत्तम राखणे हे शारीरिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे आहे. या लेखाच्या माध्यमातून मी महिलांना आवाहन करेन की त्यांनी स्वत: या अॅपचा उपयोग करावाच, शिवाय आपल्या कुटुुंबातील आणि इतर परिचितांनाही त्याबाबत माहिती द्यावी.शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी जॉगिंग, योगासने आदी व्यायाम प्रकार करावेत किंवा स्वतःच्या जीवनशैलीचा तो एक भाग बनवून घ्यावा. अनेक आजार तर हार्माेन्सच्या असंतुलानाने सुरू होतात. नियमित योगाभ्यास केल्यास या समस्या सुटू शकतात. मात्र, समस्या निर्माण होण्याआधी सावध होणे गरजेचे असते. म्हणून प्रत्येक महिलेने योगाभ्यासाला महत्त्व देऊन निरामय आयुष्य जगावे. सावित्रीबाईंनी असंख्य हालअपेष्टा सोसून महिलांसाठी शिक्षणाची कवाडे उघडली. त्यामुळे आज त्या प्रगतिपथावर आहेत. ही प्रगती सांभाळायची असेल, तर प्रत्येकीला आरोग्याची जपणूक करावी लागेल. तसे होणे हेच सावित्रीबाईंना खरे अभिवादन ठरेल. (लेखिका महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू आहेत.)
लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प. वि. से. प., अ. वि. से. प., वि. से. प.,
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.