आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Rahul Bansode Rasik Article : Vatsyayankrit Definition Of Sexual Pleasure ...

रसिक स्पेशल:लैंगिक सुखाची वात्स्यायनकृत व्याख्या...

राहुल बनसोडे7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूरमध्ये पॉर्न क्लीप पाहून सेक्स करताना काहीतरी विचित्र प्रयोग करणाऱ्या व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागल्याची घटना नुकतीच माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर या परपिडेतून आनंद मिळवण्याच्या किंवा वेदना सहन करून कामसुख मिळवण्याच्या प्रकारावर चर्चा सुरू झाली आहे. स्त्री-पुरुष समागम ही प्रजोत्पादनाच्या उद्देशाने घडून येणारी क्रिया. परंतु, या क्रियेपलीकडे जाऊन लैंगिकता आणि लैंगिक सुखाच्या कल्पनेनेही माणसाचे जगणे व्यापलेले आहे. अर्थात, लैंगिक सुख हेच आणि एवढेच माणसाचे जगणे नसले तरीही ते टाळून जगण्यालाही पूर्णत्व नाही, या विचारांतून खरं तर लैंगिक स्वातंत्र्याच्या, ‘सेक्शुअल फ्रीडम’च्या संकल्पनेची रूजवात झाली.

‘सेक्स फ्रीडम' वा लैंगिक स्वातंत्र्य हा विषय मुख्यधारेतल्या सार्वजनिक चर्चेत असणे, हे प्रगत समाजाचे लक्षण आहे. अर्थात, सेक्सविषयी खुलेपणाने विचार आणि चर्चा करण्याइतपत वैयक्तिक स्वातंत्र्य जसे गरजेचे आहे, तसे सामाजिक स्वातंत्र्यही गरजेचे आहे, आणि या दोन्ही स्वातंत्र्याच्या व्याख्यांच्या मुळाशी आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य आहे. सेक्सचा उद्देश केवळ प्रजननापुरता न रहाता, त्याचे मनोरंजनात्मक, सामाजिक आणि अध्यात्मिक आयाम शोधण्यासाठी एखाद्या संस्कृतीचा आर्थिक आणि सामाजिक इतिहास शोधणेही गरजेचे आहे.

जंगलातले भटके आयुष्य सोडून मानवप्राणी एकाच जागी वस्ती करून राहू लागला. ज्या वस्तीतून पुढे त्याचे लैंगिक व्यवहार बदलत गेले. त्याला निरनिराळे आयाम प्राप्त होऊ लागले. शेतीच्या शोधाने शोषणाची व्यवस्था जन्माला घातली, तशी व्यापक संस्कृतीही जन्माला घातली. ‘सिव्हिलायझेशन’ या इंग्रजी शब्दाला सभ्यता हा मराठी शब्द योजल्यास या सभ्यतेच्या सेक्शुअ‍ॅलिटीचा म्हणजेच लैंगिकतेचा इतिहास शोधताना हाती लागणारी तथ्ये ही माणसाच्या आत्मशोधासाठी आणि क्वचित अध्यात्मिक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीही उपयोगाची ठरतात.

सभ्यतेच्या इतिहासात सेक्सविषयी सर्वांगाने विचार करुन त्याचे प्रतिबिंब साहित्य, संगीत आणि कलांमध्ये सर्वप्रथम मांडण्याचे श्रेय निर्विवादपणे भारताकडे जाते. इंडस सभ्यतेच्या पडझडीनंतरच्या काळात गतसंस्कृतीतून महत्त्वाचे धडे घेऊन नव्याने उभ्या राहिलेल्या भारतीय सभ्यतांनी, सेक्सला संस्कृतीच्या केंद्रस्थानी ठेवले. हे जग नेमके कसे अस्तित्वात आले असावे, या कळीच्या प्रश्नाचा वेध घेताना, त्याच्या मुळाशी भारतीय सभ्यतांनी योनी आणि लिंगाची उपयोजना केली. कुठल्याही जिवंत गोष्टीच्या मुळाशी समागम असतो, हे मूलतत्व त्यामागे होते. भारतीय सभ्यतांनी सेक्सला निषिद्ध वा चोरुन लपून करण्याची गोष्ट न ठेवता, तिचा खुलेपणाने स्वीकार करून सबंध संस्कृतीची मोटच सेक्सभोवती बांधली असण्याची शक्यताही इथेच आकारास येते. भारतीय इतिहासातील सामान्य माणसाच्या सेक्शुअ‍ॅलिटीचा अभ्यास करावयाचा झाल्यास तो दस्तावेज भारताच्या इतिहासाच्या विविध कालखंडात तपासणे, गरजेचे ठरते. साडेतीन हजार वर्षांपूर्वीच्या लोहयुगात कौशल्य स्थापन केल्यानंतर मौर्य आणि सातवहान वंशाचा इसवीसनपूर्व दोनशे ते इसवी सन बाराव्या शतकापर्यंतचा अभिजात कालखंड, इसवीसन बाराशे ते पंधराशे सव्वीस मधला मध्ययुगीन काळ आणि इसवीसन पंधराशे सव्वीस ते इसवीसन अठराशे सत्तावन्नपर्यंतचा पूर्वाधुनिक कालखंड, अशा तीन भागांत ही विभागणी करता येते. या तीनही काळात सेक्शुअ‍ॅलिटीच्या भारतीय व्याख्या सतत बदलत्या राहिल्या आहेत. संकुचित धार्मिक प्रभावाने चालणाऱ्या व्यवस्थांमध्ये लैंगिक स्वातंत्र्यावर आलेल्या मर्यादांना विरोध करीत लैंगिक उदारमतवादी तत्वज्ञानाची धार्मिक मांडणी होणे आणि हा उदारमतवाद टोकाला जाऊन समाजाची वाटचाल पुन्हा संकुचित धारणांकडे होणे, अशी आवर्तने आपल्याला या अडीच हजार वर्षांच्या काळात झालेली पहावयास मिळतात.

भारतीय तत्त्वज्ञानांतल्या अनेक शास्त्रांच्या आद्यनिर्मितीचे श्रेय हे कुणा एका व्यक्तीला न देता, ते विद्वानांच्या अनेक व्यक्तीसमूहांना दिले जायला हवे. तरीही सामान्य लोकांना समजेल, अशा सोप्या भाषेत आणि परिपूर्णरित्या मांडण्याचे अवघड नि ऐतिहासिक काम केले ते, वात्सायनाच्या ‘कामसूत्रा’ने. जगात सर्वात जास्त वाचले गेलेले निधर्मी पुस्तक म्हणून ज्याचा उल्लेख होतो, तो ‘कामसूत्र’ ग्रंथ इसवीसनपूर्व चारशे ते इसवीसन दोनशे या कालखंडाच्या दरम्यान लिहिला गेला असावा.

माणसाच्या गेल्या कित्येक वर्षांच्या इतिहासाकडे नजर टाकल्यास अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजा भागल्यानंतर माणूस मनोरंजनाकडे वळतो, असे दिसून येते. मनोरंजनाचा दुसरा महत्त्वाचा मार्ग, हा अर्थातच लैंगिक सुखाच्या मार्गाने जातो. मूलभूत गरजा पूर्ण होत नसणाऱ्या समाजातही सेक्स असतो, परंतु त्याला मनोरंजनाची किनार क्वचितच असते, तो बहुतांशी नैसर्गिक शरीर व्यवहाराप्रमाणे चालतो, आणि वैयक्तिक पातळीवर आनंद मिळत असला, तरी त्याचे सामाजिक संदर्भ हे अतिशय त्रोटक असतात. एकीकडे रशिया आणि अमेरिकेच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतर त्या देशातल्या नागरिकांना अर्थातच मनोरंजन हवे होते, ज्यात सेक्सचाही समावेश होता. या प्रगतीशील मानवतावादी समाजरचनेमध्ये सेक्सकडे फक्त प्रजननाची एक प्रक्रिया म्हणून न पहाता,त्यात माणसाच्या भौतिक सुखाचा विचार प्रामुख्याने करण्यात आला. साठच्या दशकात अमेरिकेत सुरु झालेल्या ‘आत्मसुखाच्या' शोधातून सेक्सचा मुलभूत उद्देश प्रजनन नसून, तो माणसाच्या सुखाशी निगडीत आहे, हा प्रतिवाद सामोर आला. तशा सेक्सविषयीच्या सार्वजनिक धारणा वेगाने बदलू लागल्या. यातूनच मग लैंगिकतेची क्रांती (सेक्शुअल रिव्होल्युशन) किंवा लैंगिक स्वातंत्र्य लढ्याचा (सेक्शुअल लिबरेशन) जन्म झाला. लैंगिक स्वातंत्र्य लढ्याच्या या प्रारंभिक काळात गर्भनिरोधक गोळ्या आणि निरोधचा प्रसार, सार्वजनिक ठिकाणची अर्धनग्नता वा नग्नतेची मोकळीक, पोर्नोग्राफी, विवाहपूर्व शरीरसंबध, समलैंगिक शरीरसंबध या गोष्टींचा समावेश होता. स्वेच्छेने केला जाणारा गर्भपात, हे या क्रांतीचे शेवटचे टोक होते.

या काळात भारतीय उपखंडातल्या देशांची विकासप्रक्रिया मात्र अन्न- वस्त्र आणि निवारा या मूलभूत प्रश्नांभोवतीच अडकून पडलेली होती. भारताच्या संदर्भात नोंदवायचे तर अमेरिकेत लैंगिक स्वातंत्र्यक्रांतीची सुरुवात आणि भारतात हरीतक्रांतीची सुरुवात जवळजवळ एकाचवेळी झाली होती. काळ पुढे सरकू लागला आणि नव्वदच्या उत्तरार्धात भारतातले राजकारण अमुलाग्र बदलण्यास सुरुवात झाली. याकाळात उदारमतवादी मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार करताना भारतीय बाजारात फक्त परदेशी वस्तू वा भांडवलशाहीच येणार नव्हती, तर त्या भांडवलशाहीच्या मुळाशी असणारे लैंगिक स्वातंत्र्यही प्रवेश करणार होते.

भारतात मोबाईल सेवेची सुरुवात १९९५ मध्ये झाली, तरी ती जास्त लोकांना परवडण्याच्या पातळीवर येण्यासाठी २००२ साल उजाडावे लागले. व्यापक तत्त्वावर ही एक संपर्कक्रांती होती, पण या संपर्कात सहभाग घेणारी माणसांच्या निरनिराळ्या नात्यांसाठी त्याचा अर्थ वेगवेगळा होता. २००२ मध्ये सुरु झालेल्या प्रारंभिक क्रांतीचे दुसरे पाऊल पडता पडता आणखी एक दशक जावे लागले. २०१३ सालच्या दिवाळीत काही कंपन्यांनी माफक दरात स्मार्टफोन्स उपलब्ध करुन दिले आणि स्मार्टफोन्सची संख्या एकदमच दुप्पट झाली. भारतात स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या संख्येने दहा कोटींचा आकडा पार केला. आता तरुण-वृद्ध असे मिळून फक्त पुरुषच नाही तर स्त्रियाही, आपला मानसिक अवकाश मोबाइलमध्ये शोधू शकत होत्या. सेक्शुअ‍ॅलिटीचा अधूनमधून सुप्त असुप्तपणे विचार करणारी कोट्यावधींची एक मोठी लोकसंख्या आपल्या हातात फोन घेऊन उभी होती, ज्यांचे आयुष्य पूर्णतः बदलून टाकण्यासाठी एकमेवक गोष्टीची गरज होती ती म्हणजे स्वस्त डेटा.

स्वस्त डेटाने अनेक भारतीयांच्या सुप्त लैंगिक भावनांना वाट करुन दिली. ही वाट मिळाल्यानंतर भारतीयांच्या नैतिकतेचे नेमके अर्थ काय आहेत, हे मनोरंजन क्षेत्रांतल्या कंपन्यांना समजले. वरवर भारतीय समाज सार्वजनिक पातळीवर सेक्स बाबतीत बराचसा सभ्य वाटत असला, तरी त्याच्या वैयक्तिक पातळीवर सेक्सविषयी धारणा काय आहेत, याचा मोठ्या प्रमाणात डेटा बाहेर येऊ लागला होता. इंटरनेट पोर्नच्या बाजारात सर्वात मोठी कंपनी ‘पोर्नहब’च्या २०१७ सालच्या सर्वेक्षणानुसार भारत हा सर्वाधिक पोर्न पहाणाऱ्या देशांच्या यादीत तिसऱ्या स्थानी होता, त्यात पोर्न पहाणाऱ्यांत स्त्रियांची संख्या एकूण दर्शकांच्या तीस टक्क्यांपेक्षा अधिक नोंदली गेली. भारतीयांच्या पोर्न पहाण्याच्या आणि लैंगिकतेच्या इतर सवयींचा नेमका अभ्यास केल्यानंतर त्याचा परिणाम इतर माध्यमांमध्ये लवकरच पडू लागला होता.आपल्या व्यक्तिगत फोनवर कामूक कंटेट पाहून सरसावलेले कितीतरी प्रौढ लोक आता टीव्हीच्या मोठ्या पडद्यावर आपल्या जोडीदारासोबत सेक्शुअ‍ल कंटेट एकत्र बसून पहाण्यास सरावली आहेत. स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये कुठलाही आडपडदा न रहाता या जोडप्याला एकत्र बसून आनंद घेता येईल ,अशा नव्या कुटुंबप्रधान पोर्नची निर्मिती भारतात सुरु झाली अाहे. त्याचे विविध प्रकार या वर्षाच्या सुरुवातीपासून भारतीय स्मार्ट टिव्हीवर दिसू लागले. इंटरनेटवर सेन्सॉरशिपचे बंधन नसल्याने आणि नवा टीव्ही या इंटरनेटवर चालणारा असल्याने आगोदर सेन्सॉरशीपमुळे शक्य नसलेल्या, कितीतरी कल्पनांना मूर्त रुप देण्यासाठी निरनिराळे प्रॉडक्शन हाऊसेस पुढे सरसावले.

सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी ‘कामसूत्र’ लिहून वात्सायनाने सुरु केलेली सेक्सक्रांती आता स्मार्टफोन आणि आर्टिफिशीयल इंटेलिजेन्सच्या नव्या युगात प्रवेश करीत आहे. या आभासी पण पूर्णतः मुक्त लैंगिक स्वातंत्र्यात माणसाच्या लैंगिक भावनांचे नेमके काय होणार आहे हा प्रश्न अनेकांना पडतो आहे. बाजारात माणसासारखे हुबेहूब सेक्स रोबोटस आले आहेत. त्यातले काही रोबोटस मर्यादित प्रमाणात का होईना, पण माणसांप्रमाणे संवाद साधू लागले आहेत. लैंगिक स्वातंत्र्याच्या समांतर काळात स्त्रीस्वातंत्र्याचा लढा काही ठिकाणी पुरुषांचे अस्तित्व आणि गरज पूर्णतः नाकारु लागला आहे. या वर्तमान काळाचे कामसूत्र लिहिणे माणसाला शक्य नसले, तरी ते यंत्राला सहजशक्य आहे. येऊ घातलेल्या रोबोयुगाच्या कामसूत्रात नेमका कुठल्या गोष्टींचा समावेश असावा, याबाबत वात्स्यायनाचा वारसा सांगणाऱ्या भारताने अजून व्यापक विचार सुरु केलेला नाही. अशा प्रसंगी मन, मेंदू आणि भावनांची कामरत झालेल्या स्त्री-पुरुषांनी साधलेली एकतानता ही सर्वोच्च लैंगिक सुखाची वात्स्यायनकृत व्याख्या आहे. त्या व्याख्येचा कालसुसंगत विस्तार घडवून लैंगिक स्वातंत्र्याचा नवा जाहीरनामा भारताला लिहावा लागणार आहे.

rahulbaba@gmail.com

बातम्या आणखी आहेत...