आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Rajeev Malhotra Writer And Thinker | Divya Marathi 'Charcha' Sadar,  Western Thought And Naredra Modi 

चर्चा:पाश्चिमात्यांचे विचार आयात करून आपण नेते होणार नाही

राजीव मल्होत्रा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विश्वगुरू होणे तर दूर, भारतीय विश्वशिष्य झाले आहेत. त्यांनी त्यांची टीकात्मक विचार करण्याची क्षमता बाजूला ठेवली आहे आणि पाश्चिमात्य अकादमी जे काही सांगतात ते सत्य म्हणून स्वीकारण्यात खुश आहेत.

भारतीय अभिमानाने सांगतात की, त्यांचे राष्ट्र आणि त्यांचा वारसा विश्वगुरू आहे, म्हणजेच ते संपूर्ण जगाचे गुरू किंवा बौद्धिक मार्गदर्शक आहेत. सुखद अनुभूती देणाऱ्या या विचाराच्या समर्थनार्थ ते योगाची लोकप्रियता, भारतीय उद्योजक व डॉक्टरांचे जागतिक यश आणि जागतिक स्तरावर पंतप्रधान मोदींची प्रासंगिकता यांचा उल्लेख करतात. भारताचे युग सुरू झाले असून खऱ्या अर्थाने विश्वगुरू म्हणून पुन्हा एकदा प्रस्थापित झाल्याचे अनेकांना वाटते.

परंतु, संयमाने संतुलित दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे. गुरू म्हणजे ज्ञान देणारा आणि विश्वगुरू म्हणजे संपूर्ण जगाला ज्ञान देणारा. म्हणून ज्यांचे आत्मसात केलेले ज्ञान जगाने स्वीकारले आणि अंगीकारले आहे, शक्यतो ज्यात अनेक जागतिक समस्यांवर उपाय सापडतात, त्यांना विश्वगुरू म्हणणे योग्य ठरेल. परंतु, त्यांच्यावर आधारित सामाजिक व राजकीय सिद्धांत आणि धोरणांच्या क्षेत्रात पाश्चिमात्य अकादमींचा प्रभाव भारतापेक्षा खूपच जास्त आहे. बाकी जग काय विचार करते हे विसरून भारत स्वतः त्यांनी सुचवलेल्या मार्गावर चालतो. यामध्ये भारतीय भांडवलदार, उद्योगपती ते भारत सरकार, मीडिया, शिक्षणतज्ज्ञ आणि आता शालेय शिक्षणाचाही समावेश आहे. एकीकडे आपण भारतीय समाजाच्या अभ्यासासाठी विचार आयात करतो आणि त्याच वेळी विश्वगुरू आहोत या भ्रमात राहतो, हे कसे शक्य आहे?

भौतिकशास्त्र, अभियांत्रिकी आणि वैद्यक यांसारख्या क्षेत्रांत हार्वर्डसारख्या विद्यापीठांच्या प्रमुख भूमिकेवर मी शंका घेत नाही. एसटीईएम (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित) विषयांमध्ये या विद्यापीठाच्या योगदानाची मी प्रशंसा करतो आणि या ज्ञानाचे स्वागत करतो. परंतु, विश्वगुरू हे पद सामान्यतः सभ्यता-संस्कृतीच्या संदर्भात वापरले जाते आणि त्याचा अर्थ संपूर्ण जगाच्या निर्मितीमध्ये दिलेले सभ्यता-संबंधित योगदान असा होतो. अशा प्रकारे पाहिल्यास आपल्याला दिसून येते की, हार्वर्डसारख्या पाश्चात्त्य अकादमी मानवता, सामाजिक विज्ञान आणि उदारमतवादी कला या विभागांमध्ये अतिशय प्रभावशाली विचारधारा निर्माण करण्यात मोठी भूमिका बजावत आहेत. भारत आणि तिथल्या हिंदू संस्कृतीबद्दल काय आणि कसा विचार करायचा हे त्या जगाला शिकवत आहेत. त्या भारतातील छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास करतात. भारताशी संबंधित अभिलेखागारांचा सर्वात मोठा संग्रह आणि ‘बिग डेटा’ गोळा करून त्याचा बौद्धिक संपदा म्हणून वापर करण्याची त्यांची आकांक्षा आहे. हार्वर्डचे शाळा, केंद्रे आणि विभागांचे नेटवर्क या विषयांवर पीएचडीच्या निरंतर उत्पादनामध्ये एक प्रमुख भूमिका बजावते आणि त्याच्या कार्यक्रमांमध्ये सादर केलेले विद्वान आणि त्यांच्या कार्यावर हार्वर्डचा शिक्का त्यांची जागतिक स्वीकृती व वापर सुनिश्चित करतो.

चिंतेची बाब म्हणजे या उत्पादनाचे समीक्षकीय विश्लेषण करण्याऐवजी आणि आवश्यक तेथे आव्हान देण्याऐवजी किंवा भारताचे ‘ग्रँड नॅरेटिव्ह’ परदेशी संस्थेकडे सोपवल्याचा निषेध करण्याऐवजी भारतीयांत हार्वर्ड ब्रँडशी संलग्न होण्याच्या संधी शोधण्याची स्पर्धा दिसते. गुरू-शिष्य परंपरेप्रमाणे हार्वर्डचे माजी विद्यार्थी नेटवर्क त्याच्या तत्त्वांचा प्रचार व बचाव करण्यासाठी कार्य करतात आणि या नेटवर्कला आता थेट ‘वंश’ म्हणून संबोधले जात आहे. हार्वर्डमध्ये शिक्षण घेण्याच्या कोणत्याही संधीवर भारतीय केवळ आनंदाने उडी मारत नाहीत, तर भरपूर पैसा खर्च करून ब्रेनवॉश करण्यासाठी स्वतःला झोकून देण्यास तयार आहेत. सरकारही या आत्मघातकी आकर्षणापासून अस्पर्श नाही, म्हणूनच ते आपल्या नोकरशहांना हार्वर्डमध्ये करदात्यांच्या पैशातून प्रशिक्षण देते. या भयानक परिसंस्थेमुळे आणि वाढत्या सक्रियतेवर लक्ष केंद्रित केल्यामुळे भारताच्या विचारसरणीवर परिणाम होत आहे.

(ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) सामाजिक आणि राजकीय सिद्धांतांच्या क्षेत्रात पाश्चात्त्य अकादमींचा प्रभाव मोठा आहे.

राजीव मल्होत्रा लेखक आणि विचारवंत rajivmalhotra2007@gmail.com चर्चा