आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक:रमाई : माझ्या भीमाची कमाई

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नऊ कोटींची माता झाली
उदार अंत:करणाची,
रमाई झाली स्फूर्तिज्योती
भीमराव आंबेडकरांची..!

ए का गीतकाराने माता रमाईंचा त्याग, त्यांचं समर्पण ज्या काव्यपंक्तींमधून व्यक्त केलं त्या या ओळी. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चार दशकांच्या सार्वजनिक जीवनात ही ‘माउली नऊ कोटी जनतेची सावली’ कशी झाली..? याची गुंफण या गीतातून केलेली आहे. अजाणत्या वयात बाबासाहेब आणि रमाईंचं लग्न झालं. पौगंडावस्थेतील भीमराव पुढे जाऊन दु:खी-कष्टी, श्रमिक, शेतकरी, शेतमजूर, पीडित, उपेक्षित, वंचितांचा तारणहार होतील, याची दोघांनाही जरासुद्धा कल्पना नव्हती. दोघांच्या संंसाराचा गाडा सुरू झाला अन् हळूहळू दोघांमधील प्रेमाचं नातं फुललं. रमाई आणि बाबासाहेबांचं वैवाहिक जीवन केवळ ३१ वर्षांचं होतं. पण या ३१ वर्षांच्या दरम्यान बाबासाहेबांना रमाईने दिलेल्या खंबीर सोबतीमुळे त्यांचा भीमराव ते प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर असा जीवनप्रवास घडला. भीमरावांचं संपूर्ण आयुष्य माता रमाईंनी उजळून टाकलं. मुंबईतील शिक्षणानंतर बाबासाहेब पहिल्यांदा कोलंबियाला गेले, त्या वेळी रमाईंचंं वय फक्त २४-२५ वर्षांचं होतं. जेव्हा संंसार करण्याची वेळ आली, तेव्हा रमाईंना सोडून बाबासाहेबांना कोलंबियाला जावं लागलं होतं. या कठीण काळातच रमाईंनीं आपला पहिला मुलगा गंगाधर याला गमावलं. राजरत्न, मुलगी इंदू यांच्यावर एकटीनं अंत्यविधी करण्यासारख्या दुर्धर प्रसंगाला त्यांना ऐन तारुण्यातच सामोरं जावं लागलं. त्या वेळी कोलंबियामध्ये बाबासाहेब एम. ए. पीएच. डी. करत होते. अर्थशास्त्रातील डीएससी या डॉक्टरेटसाठी ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये असताना इकडे रमाईंनी एकटीने संसाराचा गाडा ओढला. समोर आलेल्या परिस्थितीला हसतमुखानं सामोरं जात त्यांनी प्रसंगी गोवऱ्या विकून प्रपंच चालवला. गरिबीचे चटके सहन करत बाबासाहेबांचा संसार नेटानं केला, पण कधीही बाबासाहेबांकडं तक्रार केली नाही की परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली नाही. स्वकर्तृत्वावर सार्वजनिक जीवनात बाबासाहेबांचं व्यक्तिमत्त्व आकारला येण्याचा तो उमेदीचा काळ होता. त्या काळात रमाईंची यशस्वी साथ त्यांना मिळाली नसती, तर कदाचित भीमराव हे बाबासाहेब झाले नसते. पर्यायानं बाबासाहेबांना समाज परिवर्तनाचं कार्यही करता आलं नसतं.
कर्नाटकातील निपाणी गावाचा किस्सा अंगावर शहारे आणणारा आहे. बाबासाहेब विदेशात जाण्यापूर्वी रमाईला निपाणी येथील वराळे कुटुंबीयांकडे सोडत असत. गरीब मुलांसाठी वराळे एक हॉस्टेल चालवत होते. हॉस्टेलच्या आवारात लहान मुलं नेहमी खेळायला यायची. रमाई त्यांच्याकडं पाहून आनंदित होत. एकदा दोन-तीन दिवस झाले, तरी मुलं खेळायला आलीच नाहीत, हे रमाईंच्या लक्षात आलं. त्यांनी वराळेंना विचारलं, ‘दोन दिवस झाले, मुलं खेळायला का नाही येत?’ त्यावर वराळे म्हणाले, ‘हॉस्टेल चालवण्यासाठी मेसचे अनुदान दरमहा मिळते. पण, अद्याप ते मिळाले नाही. त्यामुळं मुलं उपाशी आहेत. पुढील काही दिवस ते उपाशीच राहतील. अनुदान मिळालं की, त्यांच्या जेवणाची सोय होईल. त्यानंतरच ते खेळायला येऊ शकतील..!’ हे ऐकल्यावर रमाईला धक्का बसला. त्या आपल्या खोलीत गेल्या अन् धाय मोकलून रडायला लागल्या. त्यांना काय करावं काहीच सुचत नव्हतं. वराळेंनी त्यांची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण रमाईंचं रडणं थांबत नव्हतं. शेवटी त्यांनी आपल्या गळ्यातील मंगळसूत्र वराळेंकडे सुपूर्द केलं अन् म्हणाल्या, ‘हा दागिना मोडून मुलांच्या जेवणाची सोय करा. अनुदानाची अजिबात वाट पाहू नका.’ वराळेंनी त्यागमूर्ती रमाईंच्या या औदार्याचं कौतुक करत मुलांच्या जेवणाची त्याच दिवशी सोय केली. औरंगाबादेतही रमाईंचं काही काळ वास्तव्य होतं. तिथेेही त्या वराळे यांच्या घरी होत्या. संसाराचा गाडा चालवत असताना त्यांना श्वसनविकार जडला. त्या वेळी बाबासाहेबांनी त्यांची शुश्रूषा केली. बाबासाहेब त्यांना प्रेमानं ‘रामू’, तर त्या बाबासाहेबांना ‘साहेब’ म्हणायच्या. बाबासाहेबांनी मुंबईत राजगृह नावाचे घर बांधले. पण, तिथं रमाईंना राहण्याचा फार योग आला नाही. ३७ वर्षांत बाबासाहेबांच्या संपूर्ण कार्यात रमाईंनी हातभार लावला. स्वत: प्रतिकूल परिस्थितीचे चटके सहन केले, पण कधीही बाबासाहेबांना त्याची जाणीव करून दिली नाही. आपल्याकडील ग्रंथांसाठी बाबासाहेबांनी राजगृह बनवले. श्वसनविकारामुळे रमाईंचे निधन झाल्यानंतर बाबासाहेब एकाकी पडले. त्यांनी सांसारिक जीवनातून मुक्त होण्यासाठी काही काळ बौद्ध भिक्षू म्हणून परिव्रजा घेतली होती. बाबासाहेबांच्या जीवनातील रमाई हीच खरी कमाई होती...

अनिता देवळे संपर्क : 9309215126

बातम्या आणखी आहेत...