आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित:निसर्गातली रंगपंचमी

श्रीपाद टेंबे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बसस्टॉपवर बराच वेळ बसची वाट बघून कंटाळलो होतो. इतक्यात ‘लालपरी’ येताना दिसली. झाडाच्या सावलीखाली थांबलेली मंडळी पुढे आली. जो तो मिळेल त्या जागी स्थानापन्न झाला. मी पण एका सीटवर जाऊन बसलो आणि धूळ उडवत बस सुरू झाली. खिडकीतून दिसणारा निसर्ग मला ओळख देत होता. दूरवर फुललेला गुलमोहर, पळस केशरी रंगाने लक्ष वेधत होता. पिवळ्या फुलांनी लगडलेला सोन-बहावा नजरेत भरत होता. एसटीने घरघर करत घाट आल्याची जाणीव करून दिली आणि माझी नजर खालच्या दरीत दिसणाऱ्या गुलाबी थव्यांवर स्थिरावली. एखाद्या वृक्षावर पक्ष्यांचे थवे विसावलेले असावेत, असाच भास होत होता. त्या निष्पर्ण काटेरी वृक्षाला गुलाबी रंगाचे पेले लटकले होते. तो परिसर गुलालाची उधळण करीत होता. दूरवर असलेली काटेसावर नजर खिळवून ठेवत होती. एरवीचा काटेरीपणा गुलाबी शाल पांघरून तिने लपवला होता. मूळचा राकटपणा सोडून ती सौंदर्यवती झाली होती! नजरेच्या टप्प्यात सगळीकडे दिसणारी निसर्गाची रंगपंचमी मला अनेक वर्षे मागे घेऊन गेली. तीच वळणे, त्याच वाटा, तीच शांतता! सोनबहाव्याच्या पिवळ्या सोनेरी रंगावर रेंगाळणारी नाजूक फुलपाखरे बघून एक मात्र नक्की झालं, की फुलपाखरे अजूनही फुलांच्या प्रेमात पडतात. सोनेरी-पिवळा म्हणजे काय, हे फक्त सोनबहाव्याकडे पाहूनच कळते. हे बहर पावसाच्या आगमनाची वर्दी देत असतात. गुलमोहर कधी लालबुंद फेटा उडवत असतो, तर कधी तांबड्या रंगाच्या वेगवेगळ्या छटांची उधळण करतो. आता माझी नजर हिरव्या वनराईचा भाग बनून फुलणाऱ्या, हिरव्या पुष्पसृष्टीवर स्थिरावली. साग, बोरी, बाभळी, जांभूळ या लहान-मोठ्या वनराईवरचा फुलोरा साद घालतो आहे, असे वाटले. ठिकठिकाणी उक्षीच्या मखमली कोवळ्या पानांतून हिरवे झुपके झुलत होते. चांदण्याच्या आकाराची असंख्य फुले एकत्रपणे झुपक्यांनी झोके घेत होती.

इतक्यात मी सुरंगीच्या झाडाजवळ येऊन पोहोचलो. सुरंगी ही एकमेव फुले, जी झाडांच्या खोडातून जन्म घेतात. खोडाच्या सालींच्या भेगांमधून पांढऱ्या शुभ्र काळ्या बाहेर डोकावू लागतात. काही दिवसांतच पिवळे केसर गच्च भरलेल्या मोत्यांसारख्या कळ्या उमलू लागतात. पाकळ्या उमलून आतला ओळ केसर परिसर सुगंधित करतो. फक्त तीन दिवस हे वृक्ष सोन्यामोत्यांचा साज घेऊन निसर्गाच्या रंगोत्सवात सामील होतात. अगदी बेधुंद होऊन रंगांची उधळण करतात. वातावरणात प्राण ओतणारी बकुळीची फुले वहीच्या पानांमध्ये वर्षानुवर्षे जपून ठेवली जायची. मी एका वेगळ्याच अद्भुत दुनियेची सफर करून आलो होतो. मनाचे दार हळूवारपणे उघडून मी आज निसर्गाची रंगपंचमी अनुभवली होती...

{ संपर्क : ९१५८०८८०४२.

बातम्या आणखी आहेत...