आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:नव्या आशेचा हुंकार...!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांची वेगळी शान असते. देशभरात या पुरस्कारांचे औत्सुक्य असते. हे सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या सहा वर्षांत या पुरस्कारांचा साचा, स्वरूप आणि निवड बदलत गेली आहे. आता तर देशातील कोणताही नागरिक योग्य वाटणाऱ्या व्यक्तीची शिफारस करू शकतो. त्या अर्थाने पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री यामधील निदान पद्मश्री या किताबाचे वेगाने लोकशाहीकरण होते आहे. ही अत्यंत समाधानाची आणि स्वागतार्ह बाब आहे. जोगते-जोगतिणी समाजाचे प्रतिनिधित्व करणारी मंजम्मा जोगती, ज्या व्यवस्थेने सांस्कृतिक परिघाच्या आजूबाजूलाही फिरकू दिले नाही, त्या "लौंडा नाच' या लोककला प्रकाराला मानाचा सन्मान मिळवून देणारे रामचंदर माझी आणि आदिवासी ठाकर समाजातील चित्रकथी तसेच कळसूत्री बाहुल्या नाचविणारे आणि कथाकथन करणारे बाहुलेकार परशुराम गंगावणे या यंदाच्या पद्मश्री पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या कलाकारांचे खडतर आयुष्य, कल्पकता, ध्यास आणि निष्ठा हे सारेच थक्क करणारे आहे...

मंजम्मा जोगती... (मिनाज लाटकर minaj.latkar@dbcorp.in)

दोन वर्षांपूर्वी प्रख्यात दाक्षिणात्य गायक-संगीतकार-लेखक टी. एम कृष्णा यांनी कलेचे खऱ्या अर्थाने लोकशाहीकरण करण्याचा एक प्रयत्न केला होता. लोकशाहीमध्ये अनुस्यूत समतेच्या मू्ल्यावर श्रद्धा असल्यामुळेच त्यांना संगीत प्रकारात निर्माण केलेल्या श्रेणीदेखील मान्य नाहीत. शास्त्रीय संगीत हे अव्वल दर्जाचे संगीत आणि इतर कलाप्रकार दुय्यम असा एक समज रूढ आहे. पण कृष्णा हा रुढ समज जबाबदारीने नाकारतात. आपण जरी अमुक एका प्रकाराला शास्त्रीय दर्जा देत असू आणि दुसऱ्या एका प्रकाराला लोकसंगीत म्हणत असू, तरीही सादरीकरणाच्या पातळीवर ते एक आहेत, हा संदेश देताना चेन्नई येथील एका प्रतिष्ठित कार्यक्रमात टी एम कृष्णा यांनी कर्नाटकात राहणाऱ्या जोगप्पा या तृतीयपंथी समुदायाच्या लोककलावंतासह कार्यक्रम सादर केला. खरं तर जोगप्पा यांच्याबरोबर कृष्णा यांचा सह-गायनाचा कार्यक्रम, हा देखील एक पारंपरिक चौकटी उद्ध्वस्त करणारा महत्वाचा प्रयोग होता. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात जोगप्पा समुदाय राहतो. हा समूह येलम्मा नावाच्या देवीची भक्ती करतो. त्यांची बहुतांश गाणी ही याच देवीला उद्देशून असतात. या समूहाचे काही नियम कडक आहेत. सर्वांना ते पाळावेच लागतात. अशा प्रसंगी टी. एम कृष्णा यांचा संगीताला सर्वसमावेशक करण्याचा आणि समाजात तृतीयपंथींविषयी निर्माण झालेली तेढ आणि संशय कमी करण्याचा प्रयत्न हा एक मैलाचा दगड ठरला.

याच जोगप्पा समुदयाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि जोगती नृत्य आणि जनपद गाण्यांच्या जतन-संवर्धन आणि प्रसारासाठी मंजम्मा जोगती यांना यंदाचा भारत सरकारचा सर्वोच्च म्हणून गणला जाणारा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. लोककलेसाठी पद्म पुरस्कार मिळवणाऱ्या मंजम्मा हा पहिल्या ट्रान्सवुमन ठरल्या आहेत.

""अलिकडेच एक फोन आला होता. पलीकडून हिंदीत बोलत होते आणि मला ते कळत नव्हतं. फक्त "पद्मश्री' हा शब्द कळला. मला वाटलं की,कुणीतरी चेष्टा करत असतील पण नंतर अकादमीच्या लोकांनी सांगितलं तेव्हा समजलं की ज्या कलेचा वसा मी आयुष्यभर घेतलाय त्या कलेच्या सन्मानासाठी मला भारताचा सर्वोच्च पुरस्कार पद्मश्रीने सन्मानित केलं जातयं. माझ्यासाठी हा खूप मोठा धक्काच होता. मला अजूनही विश्वास बसत नाहीये.'' पद्मश्रीचा किताब जाहीर झाल्यानंतरची मंजम्मा जोगतीची पहिली प्रतिक्रीया होती, 'प्रत्येक माणूस हा माणूसचं असतो तो कमी जास्त नसतो कला ही कलाच असते. कोणताही कलाकार हा कमीजास्त नसतो. माझ्यासारख्या अनेकांसाठी कला ही त्यांे आयुष्य आहे. पण आपल्याकडे फक्त स्त्री आणि पुरुषांनाच माणूस समजलं जातं हे बदललं पाहिजे'.

अज्ञान व अंधश्रद्धा यांना बळी पडून देवाला सोडलेले पुरुष व स्त्रिया म्हणजे जोगते व जोगतिणी. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सर्वत्र या अंधश्रद्धेला बळी पडणाऱ्यांची संख्या कमी-अधिक फरकाने आहे; पण या अंधश्रद्धेचे लोण सर्वाधिक पसरले आहे ते कर्नाटक व महाराष्ट्र यांच्यामधील सिमेच्या आसपासच्या प्रदेशात. ही अंधश्रद्धा घोर अज्ञान व टोकाचे दारिद्य्र यातून जन्म घेते आणि व्यक्तीची, तिच्या कुटुंबीयांची टोकाची अवहेलना व शोषण करते. देवाचं कार्य म्हणून धार्मिक लेप चढवलेली ही परंपरा म्हणजे एकप्रकारचे शोषणच... हा संघर्ष मंजम्मा यांनाही चुकलेला नव्हता.

६०च्या दशकाच्या सुरुवातील मंजम्मा जोगती या आपल्या आई-वडीलांसाठी मंजूनाथ शेट्टी होत्या. वयाच्या १५व्या वर्षी त्यांना आपण एक स्त्री असल्याची जाणीव होऊ लागली. 'तिथूनच माझ्या वाईट दिवसांची सुरुवात झाली' असं मंजम्मा म्हणतात. मुलगा म्हणून मला वाढवत असलेले माझे कुटुंबीय माझ्या शारिरीक हालचालींमधला बदल बघून माझ्यात एक आत्मा शिरला आहे असं समजून एका खांबाला बांधून मला सोट्याने मारायचे. इतकं की मी बेशुद्ध व्हायचे. इतका मार खाऊनही माझ्यातला आत्मा काही निघून गेला नाही. तेव्हापासून घरच्यांनी माझ्याशी बोलणचं बंद केलं. काय करायंच मला काहीच कळतं नव्हत. मी रस्त्यावर भीक मागून काही पैसे जमवले आणि विष विकत घेऊन प्यायले. नंतर काय झालं मला काहीच आठवत नाही. हॉस्पिटलच्या बेडवर मी पडून होते. माझी काळजी घेणारे कोणीच नव्हते. त्यानंतर माझं काय करायचं यासाठी गावात एक पंचायत भरवली. तिथं सहमतीने ठरवण्यात आलं की मला मंदिरात सोडायचं. घरचे मला १९७५ साली एका मंदिराच्या पुजाऱ्याकडे घेऊन गेले. ""हा देवीचा आशीर्वाद आहे, आता याला देवीकडे वाहिलं पाहिजे'' अशा समजूनने मला त्यादिवशी घरचे मला मंदिरात सोडून गेले ते कायमचेच... तिथे बरेच जोगते-जोगतीण होत्या, त्यांच्यासोबतच मी राहायला लागली. शेवटी आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून मी जगायचं ठरवलं.पण तिथली मला बराच त्रास होतं होता. माझं बरचं वेगवेगळ्या पद्धतीने शोषण केले जात होते.हे बघून वडीलांनी मला त्यांच्या कारखान्याजवळच्या मंदिरात मला आणलं. मग मी तिथे राहून भिक्षा मागत होते.

मंजम्मा सागते, जोगती म्हणून जगत असताना लैंगिक शोषण, सामाजिक बहिष्कार, गरीबी अशा सर्व पातळ्यांवर संघर्ष करत जगत असताना, माझा नर्तकी म्हणून प्रवास सुरु झाला. मरियम्मनहल्ली गावाच्या एका बसस्टॉपवर एका मुलीला तिचे वडील नृत्य शिकवताना मी पाहिलं. मला नृत्य करायची आवड लहानपणापासूनच होती. मी त्यांना अगदी घाबरत विचारले, मलाही शिकवणार का? त्यांनी लगेच होकार दिला. त्या क्षणापासून जोगती नृत्य कलाकार कल्लावा जोगती हे माझे वडिल आणि गुरु झाले. त्यांच्याकडून मी 'चौदकी पाडा' हा एक लोककला नृत्य प्रकार शिकले. या कलेमुळे पर्याप्त कमाईचे एक साधन मला मिळत गेले. माझा रंग काळा आहे. कला सादर करताना मी बराच मेकअप करते. तेव्हा मला वाटतं की मी खूप सुंदर दिसते. हे नृत्य करताना मला स्वत:ला एक आनंद मिळतो आणि माझ्या मनावर झालेल्या खोलवर जखमांचा विसर पडतो.

मंजम्माचा जोगतीण, जोगप्पा असा कलावंतांचा ग्रुप आहे. पूर्वी कल्लावा हे त्यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करायचे. त्यांच्या निधनानंतर मंजम्माने तो सगळा कार्यभार सांभाळला. कर्नाटक आणि कर्नाटकाच्या बाहेरच्या अनेकांना हा नृत्यप्रकार मंजम्माने शिकवला आहे. कल्लवा यांच्या मदतीनेच मंजम्मा यांनी थिएटर जॉइन केले होते. तिथे त्यांनी भस्मासुर, किचक आणि तारकासुर यांच्या पुरुष भूमिका साकारल्या आहेत.'थिएटरमध्ये काम करताना मला पुरुष भूमिका दिल्या जातात आणि मी त्या निष्ठेने निभावते' असे मंजम्मा हसत सांगतात.

एक प्रतिष्ठित थिएटर कलाकार असूनही मंजम्माकडे राहण्यासाठी छप्पर नव्हते. त्या त्यांच्या गुरुच्या झोपडीत राहत होत्या. जोगतीणींना ही मान सन्मानानं जगता यावं, माणूस म्हणून नीट राहता यावं यासाठी मंजम्मा यांनी स्वत:च घर घेण्याचा निर्णय घेतला. आपण समाजातील उपेक्षित घटकांमध्ये येतो त्यामुळे आपल्याला घर घेण्यासाठी अनेक सरकारी योजनांची मदत होईल या आशेने त्यांनी बरेच प्रयत्न केले पण तिथं कोणतीही तरतुद ही नव्हती शिवाय काही मदतही मिळाली नाही. त्याचवेळी मंजम्माच्या विद्यार्थ्यांनी क्राउड फंडिग वेबसाइट किट्टोची मदत घेण्याचा मार्ग सुचवला. विद्यार्थ्यांच्या मदतीने त्यांनी फंडिगसाठी एक अभियान सुरु केले. या अभियानातून त्यांना ४ लाख ८६ हजार रुपये जमा केले. मंजम्मा म्हणतात, मी आयुष्यात इतके पैसे पहिल्यांदा बघितले. लोकांच्या या मदतीने आणि प्रेमाने मी खूप भाऊक झालीय. इतकं प्रेम मला आयुष्यात पहिल्यांदा मिळालं होतं. पण अजूनही माझं घर अपूर्णच आहे.

मंजम्मा या उत्कृष्ट नृत्य करत असल्यामुळे कर्नाटक राज्यात आणि राज्याबाहेरही त्यांच्या नृत्याच्या चर्चा होऊ लागल्या. याच सादरीकरणातून त्या बऱ्याच लोकप्रिय होत गेल्या.कर्नाटक आणि कर्नाटकाच्या बाहेरूनही त्यांच्या कार्यक्रसांठी त्यांना बोलवलं जात होते. इतकचं नाही तर जोगतीण, जोगप्पा अशा सर्व समुदायासोबत स्टेज शेयर करत मंजम्मा लोककलेचे सादरीकरण करायच्या. लोककला ही एक सांस्कृतिक चळवळ असून त्याचे संवर्धन झालं पाहिजे आणि लोककलाकारांना सन्मानानं जगता आलं पाहिजे यासाठीही त्या प्रयत्नशील होत्या. याचीच दखल घेऊन २००६ मध्ये कर्नाटक जनपत अकादमीच्या पुरस्कारानी त्यांना सन्मानित करण्यात आलयं. २०१० मध्ये कर्नाटक सरकारने त्यांना राज्योत्सव पुरस्काराने सन्मानित केले.जनपत अकादमी ही लोककलाकार आणि लोककला यांच्या जतन आणि सर्वंधन करण्यासाठी बनवलेली संस्था आहे. १३ वर्षानंतर याच संस्थेच्या अध्यक्षपदावर मंजम्मा त्यांची नियुक्ती करण्यात आली. जनपत अकादमीच्या अध्यक्ष पदावर नियुक्त होणाऱ्या मंजम्मा या पहिल्या ट्रान्सवुमन आहेत.

यानंतर मंजम्मा फक्त लोककला सादरीकरण करत थांबल्या नाहीत तर लोककलेकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. हे करत असताना त्या म्हणतात की, 'मी कार्यकर्ती नाहीये तर मी कलाकार आहे आणि मला माझ्या कलेच्या भविष्याची आणि कलाकारांची खूप काळजी वाटते. त्यामुळेच या कलेच्या भविष्यासाठी आणि कलाकारांच्या भविष्यासाठी मला यापुढे काम करायचंय, त्यांना समाजात प्रतिष्ठेसह स्थैर्य मिळवून द्यायचं आहे'.

परशुराम गंगावणे...

प्रा. डॉ. प्रकाश खांडगे prakash.khandge@gmail.com

परशुराम गंगावणे हे माझे ज्येष्ठ स्नेही. त्यांच्या कलांगणमध्ये अनेक वेळा गप्पांच्या मैफिली झाल्या आणि त्यातून चित्रकथी परंपरा आणि कळसूत्री बाहुल्यांची परंपरा या दोन्ही परंपरांचा वेध घेता आला. मराठी रंगभूमीचे आद्य प्रवर्तक विष्णुदास भावे यांच्या १८४३ साली सांगली मुक्कामी रंगभूमीवर आलेल्या सीतास्वयंवर नाटकावर कळसूत्री बाहुल्या, चित्रकथी परंपरा, भागवत मेळे, यक्षगान, तमाशा या कलांचा विलक्षण प्रभाव होता. चित्रकथी आणि कळसूत्री बाहुल्या या मराठी रंगभूमीचा पूर्वरंग होतं असे म्हंटले तर त्यात वावगे ठरणार नाही. चित्रकथी परंपरा आणि कळसूत्री बाहुल्या या परशुराम गंगावणे यांचा जीवनश्वास आणि जीवनध्यास आहे.

परशुराम गंगावणे हे पिंगुळीतील गुढीपूरचे. त्यांची कलांगण नावाची संस्था असून या संस्थेद्वारे ते पर्यटकांसाठी चित्रकथी आणि बोलक्या बाहुल्यांचे खेळ करतात. चित्रकथीचा वारसा त्यांच्या घरी पिढ्यानपिढ्यांचा आहे. चित्रकथी परंपरा ही साधारणत: साडेतीनशे वर्षांपूर्वीची असून ठाकर समाजामध्येच ही परंपरा सुरू झाली. कागदावरील रंगीत चित्रे दाखवून वीणा, खुडुक (डमरू सदृश छोटे तालवाद्य) यांच्या साथीने कथाकथन करणारे चित्रकथी हे लोकसंस्कृतीचे उपासक आहेत. पिंगुळी शैली आणि पैठणी शैली अशा चित्रकथीच्या दोन शैली असून पैठणी शैली कालौघात अस्तंगत झाली, मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गुढीपूर येथे पिंगुळी शैली अस्तित्वात आहे.

चित्रकथी सादरीकरणात निरूपण,संवाद, गायन अशा त्रिसूत्रीतून रामायण, महाभारत आणि पुराणे यातील कथांचे कथन होते. तसेच लाकडी बाहुल्या अथवा चर्म बाहुल्या तयार करून या बाहुल्यांचे खेळ दाखविले जातात. त्यामुळे परशुराम गंगावणे यांना चित्रकथी कलावंत तसेच बाहुलेकर असेही म्हणतात. त्यांच्या कथाकथानात सहजस्फूर्तता व उत्स्फूर्तता असते. चित्रकथी मांडी घालून बसतात. पोथी बांधण्याच्या फळीपुढे तो चित्रे ठेवतो. खांद्यावर वीणा, डाव्या हातात टाळ घेऊन तो उजव्या हाताने चित्रे बदलतो. दोन चित्रांच्या मधील प्रसंगांमध्ये तो एखाद्या अभंगाचे चरण लावून नीतिबोध करतो. रिद्धी -सिद्धीसह गणेशाचे अवतरण, गणेशाचे वंदन, सरस्वतीचे आगमन, सरस्वतीकडून उपदेश, रामायणातील, महाभारतातील कथाकथन असे चित्रकथीचे स्वरूप असते. रिद्धी -सिद्धीसह गणेशाचे चित्र प्रारंभी फळीवर ठेवण्यात येते, तेव्हा चित्रकथी गायनाला सुरुवात करतो, ती अशी...

देपायाची जोड। मोरया दे पायाची जोड।

तुज वीणकवणा। शरण मी जावू। नाम तुझे बहु गोड।

गणेशवंदना करताना चित्रकथी गणेशाची ओवी गातो, ती अशी

देवागौरीहरा, तुझे चरणी नमन माझे।

मजमती आहे थोडी।

परि दाविलीसी ज्ञानमार्गाची गोडी।

देव गणपती नर्तन करून त्या ठिकाणी आलेले आहेत आणि ते आपल्या हातामध्ये मोदक घेऊन सेवन करीत आहेत. एवढ्यात एक भक्त धावा करून गजाननाकडे आलेला आहे आणि म्हणत आहे,) भक्त:- आपल्याकडे ज्या १४ विद्या आणि ६४ कला आहेत, त्या मला पाहिजेत.गजानन:- अरे कविजन भक्त, तुला माझ्याकडून १४ विद्या आणि ६४ कला पाहिजे का? तर तुला माझ्या काही प्रश्नांची उत्तर द्यायला लागतील. भक्त:- काय असतील ते प्रश्न? गजानन:-शब्द दोन म्हणजे काय? मार्ग दोन म्हणजे काय? पत्री दोन म्हणजे काय? काव्यामधली ती दोन काव्ये कुठली? ते दोन कवी कुठले? तू याची उत्तरे मला दे.भक्त:- हे बघ, शब्द दोन म्हणजे खरे आणि खोटे. मार्ग दोन म्हणजे मनुष्य जन्माला येतो तो एक मार्ग आणि मरण पावतो तो दुसरा. तुळसपत्री आणि बेलपत्री या दोन पत्री आहेत. तसेच दोन कवी म्हणजे काय... महाभारत सांगणारे व्यास आणि रामायण सांगणारे वाल्मिकी ऋषी अशी त्यांची उत्तरे आहेत.

कळसूत्री बाहुल्यांच्या खेळातला सूत्रधार बाहुल्यांच्या दोऱ्या आपल्या हातात घेऊन त्या खेळातील संचालन करतो. "बालरामायण ' हे रंगभूमीवर कळसूत्री बाहुल्या आणणारे संस्कृत भाषेतील एकमेव नाटक होय. या कळसूत्री बाहुल्यांचे अवयव हव्या त्या दिशेला फिरवता यावे, म्हणून त्यांच्या अंगांतून तारा नेलेल्या असतात. या तारांनाच कळसूत्र असे म्हणतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करताना मालवणी बोलीचा वापर करण्यात येतो. "कळसूत्री बाहुल्यांसाठी सहा ते आठ लोकांचा संच असतो. रात्रभर पूर्वरंग आणि उत्तररंग या स्वरूपात हा कार्यक्रम चालतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ या तालुक्यातील चित्रकथी आणि कळसूत्री बाहुल्यांची परंपरा हा लोकसंस्कृतीचा अतिशय महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाश्रय लाभलेली ही कला काळाच्या ओघात नाहीशी झाली. मात्र परशुराम गंगावणे यांनी गेले ४५ वर्षे हे आदिवासी ठाकर समाजाच्या पारंपारीक लोककला जतन व प्रसार करण्याचे काम करीत आहे. अतिशय कठिण परिस्थीतीमध्ये त्यांनी ही लोककला जपून ठेवली. ठाकर आदिवासी कलाअंगण म्युझियम अँड आर्ट गॅलरी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाहिले आदिवासी लोककला संग्रहालय गंगावणे यांनी ३ मे २००६ पासून गुरांच्या गोठ्यामध्ये सुरु केले. या संग्रहालयात सिंधुदुर्गचा ठाकर आदिवासी समाजाच्या पारंपरिक लोककला, कळसूत्री बाहुल्या, चित्रकथी, बाहुल्या, पांगुळबैल, डोनावाद्य वादन, गोंधळ, पोतराज अशा लोककलांची मांडणी केली आहे. गंगावणे यांनी विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण या चॅरीटेबल ट्रस्ट ्या माध्यमातून "बेटी बचाओ बेटी पढाओ', 'व्यसनमुक्ती', 'स्वच्छ भारत अभियान', एचआव्ही जागृती' अशा अनेक विषयांवर कळसुत्री बाहुल्यांच्या माध्यमातून कार्यक्रम केले आहेत. या लोककला जतन व संवर्धन करण्याचे काम पारंपरिक लोककलाकार परशुराम गंगावणे व त्यांचे दोन्ही चिरंजीव एकनाथ गंगावणे व चेतन गंगावणे करीत आहेत. त्यामुळेच भारत सरकारचा सांस्कृतिक विभागामार्फत त्यांना चित्रकथी व कळसूत्री बाहुल्यांसाठी गुरू म्हणून नेमले आहे. यासाठी भारत सरकारचा गुरू शिष्य परंपरा योजनेअंतर्गत त्यांनी ८ कार्यशाळेतून १५०हून अधिक विद्यार्थी तयार केले आहेत.त्यांच्या या प्रयत्नांना यश म्हणून इयत्ता १० वी च्या इतिहास विषयात चित्रकथी आणि कळसूत्री बाहुल्या यांचा एक भाग आलेला आहे. या संग्रहालयाला देश विदेशी पर्यटक, भारतात पर्यटक घेऊन फिरणारी डेक्कन ओरिसी ट्रेन मधील पर्यटक, अनेक पीएच. डी करणारे अभ्यासक, शाळेच्या शैक्षणिक सहली कलाअंगणला भेटी देत असतात. गंगावणे यांना महाराष्ट्र पर्यटनचा सिंधुदुर्ग पर्यटन मित्र पुरस्कार, अन्य राज्य पुरस्कार तसेच इतर राज्यांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा हा "सांस्कृतिक पर्यटन' म्हणून पुढे यावा यासाठी परशुराम गंगावणे हे ठाकर आदिवासी कलाअंगणच्या माध्यमातून कार्यरत आहेत. पद्मश्री जाहीर झाल्याबद्दल परशुराम गंगावणे यांचे अभिनंदन...

(लेखक ज्येष्ठ लोककला आणि लोकसाहित्याचे संशोधक आहेत.)

रामचंद्र मांझी...

प्रशांत पवार shivaprash@gmail.com

आईये, आईये... अब आप के सामने आ रही है अपने जमाने के

शिरीदेवी

ना ना

तो, अमिताभ बच्चन

अरे ना रे माधे

वो तो अपने रामचंदर मांझी है रे...

प्रचंड टाळ्या आणि शिट्यांच्या कडकडाटात घागरा-चोळी, कानात झुमके, गळ्यात नेकलेस, माथ्यावर बिंदी आणि ओठांना लालभडक लिपस्टिक अशा पेहरावात स्टेजवर तब्बल ९३ वर्षांचा ‘लौंडा' रामचंदर मांझी यांची एन्ट्री होते. आपल्या खास भोजपुरी शैलीत रामचंदर गाऊ लागतात, ढोलकच्या ठेक्यावर कमरेला लटके देत नृत्य करू लागतात. गाण्याचे बोल असतात...

घर में रहे दूध पांच सेर, केहू जोरन दिहल एक धार.

का पंचाईत होखत बा, घीव साफे भईल हमार...

याचा अर्थ, माझ्या घरी जर पाच शेर दूध असेल आणि जर का कुणी त्यात विरजण घातले, तर यात पंचायतीचा काय संबंध? त्यातून तयार होणारे तूप हे सरळ सरळ माझेच असणार आहे.

जिचा नवरा कामाचे निमित्त सांगून घरदार सोडून पळून गेलाय, तिथे जाऊन त्याने दुसरे संधान बांधले आहे आणि अशा परिस्थितीत त्याची पत्नी इतर कोणाकडून गरोदर राहिली तर... इतकाच कुतूहल चाळवणारा या गाण्याचा अर्थ नाहीये, तर मी कुणाशी संबंध ठेवावेत हा फक्त माझा प्रश्न असून माझ्या गर्भावर पूर्णपणे माझाच हक्क आहे, त्यात पंचायतीला नाक खुपसायचं काहीएक कारण नाहीये, असा थेट सवाल एका स्त्रीने व्यवस्थेला विचारला आहे! आणि हा सवाल केव्हा विचारलाय, तर जेव्हा ‘द सेकंड सेक्स' (१९४९) हे सिमोन द बोव्हारचं क्रांतिकारक मानलं जाणारं पुस्तकही प्रकाशित झालेलं नव्हतं अशा काळात.

स्त्रीचा वेष धारण करून रामचंदर मांझी हे जे गाणं सादर करतात, ते गाणं लिहिलेलं असतं, त्यांचे गुरु भिखारी ठाकूर यांनी आणि मांझी ज्या पद्धतीने हे गाणं आणि नृत्य सादर करतात त्या सादरीकरणाला संबंध बिहारमध्ये ओळखलं जातं "नाच'या नावाने. "नाच' म्हणजे, केवळ नृत्य नव्हे, तर स्त्रियांसारखी वेशभूषा करून गाणं, नृत्य आणि पौराणिक कथांचे सादरीकरण अशा एकत्रित लोककलेच्या फॉर्मला "नाच' म्हटलं जातं. वयाच्या १२ व्या वर्षापासून ते आजतायागत तोंडाला पावडर आणि लिपस्टिक लावून "नाच' करणाऱ्या रामचंदर मांझी यांची अनेक वर्षापासूनची तपश्चर्या अखेर यावेळी फळाला आली, जेव्हा त्यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला... हा सन्मान फक्त रामचंदर मांझीचा नाहीये तर हा सन्मान ज्यांनी "नाच' जन्माला घातला, ते त्यांचे गुरू ज्यांना ‘बिहारचे शेक्सपिअर’ म्हणून ओळखले जाते, त्या भिखारी ठाकूर यांचा आहे! अश्लील, बिभत्स अशी निर्भत्सना करत दलितांच्या, उपेक्षितांच्या, शोषितांच्या या "नाच' नावाच्या लोककलेला "लौंडा नाच' असे हिणवत ज्या व्यवस्थेने सांस्कृतिक परिघाच्या आजूबाजूलाही फिरकू दिले नाही त्या "लौंडा नाच'चा हा सन्मान आहे...

दलित समाजाचे रामचंदर मांझी वयाच्या अकराव्या वर्षी भिखारी ठाकूर यांच्या पथकात सहभागी झाले होते. "माझं सगळं आयुष्य मी भिखारी ठाकूर आणि "नाच'ला समर्पित केलं होतं. इतकं की माझ्या लग्नाच्या दिवशीही मी कार्यक्रम सादर करून आलो होतो आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशीही "नाच' करायला गेलो होतो. सुरैय्या, मधुबाला, साधना या जुन्या नट्यांसोबत मी "नाच' केलाय. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी, जयप्रकाश नारायण, जगजीवन राम, नितीश कुमार, शरद यादव, रामविलास पासवान यांच्यासमोर माझे कार्यक्रम झाले असले तरी, राजकीय नेत्यांमध्ये लालुप्रसाद यादव यांनी मात्र माझ्यावर खूप प्रेम केलं. जेव्हाही लालुप्रसाद मला भेटत, तेव्हा ते नेहमी हेच म्हणायचे की, रामचंदरजी आप जबतक जियें, भिखारी ठाकूरको जिंदा रखें. मात्र इतकं करूनही माझ्या कुटुंबाने मात्र आजपर्यंत माझा कार्यक्रम पाहिलेला नाही. याच कारण आमच्या या कलेकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन'

आपल्या सबंध आयुष्याचा विस्तारपट उलगडून सांगताना रामचंदर मांझी यांच्या बोलण्यातून त्यांचे गुरू भिखारी ठाकूरबद्दल प्रचंड आदर व्यक्त होत असतो. आणि का नाही होणार, ज्या भिखारी ठाकूरला भोजपुरीचे शेक्सपिअर आणि तुलसीदास म्हणून संबोधिले जाते, ज्या महापंडित राहुल सांकृत्यायनने त्यांचा "अनगढ हिरा' म्हणून गौरव केला आहे त्या लोककवी भिखारी ठाकूरमुळेच तर आज भोजपुरीचे सांस्कृतिक स्थान उभे राहिलेे आहे. प्रख्यात कवी केदारनाथ सिंह म्हणतात... ‘ठनकता था गेंहुअन, तो नाच के किसी अंधेरे कोने से, धीरे धीरे उठती थी, एक लंबी और अकेली भिखारी ठाकूर की आवाज.’

बिहारच्या छपरा येथे नाभिक समाजात जन्मलेले भिखारी ठाकूर रोजगाराच्या शोधात इतर बिहारी-युपी तरुणांप्रमाणेच कोलकाताला आणि त्यानंतर पुरी येथे स्थलांतरित होतो काय... तिथली लोक संस्कृती, तिथल्या लोककला पाहून भारावून जातो काय, बिहारमधल्या सांस्कृतिक दारिद्र्याबद्दल आसवं गाळतो काय, आणि पुन्हा बिहारला परतून पुरुषांनीच स्त्रियांच्या भूमिका साकारणारे स्वत:चे एक सांस्कृतिक विश्व जन्माला घालतो काय... दलितांचं, वंचितांचं जीणं एका वेगळ्याच कलेच्या माध्यमातून समाजासमोर प्रस्तुत करतो काय, सारंचं थक्क करणारं. ‘बिदेसिया' (परमुलुखात गेलेल्या कर्त्या पुरुषाची आळवणी करताना स्त्री मनाचं दु:ख, वेदना हुरहूर आदी भावनांचं दर्शन घडवणारा कलाप्रकार) ही भिकारी ठाकूर यांची नृत्य-नाट्य असलेली एक अजरामर १९१७ मध्ये सादर केेलेली कलाकृती. उत्तरेकडे असा एकही कलावंत नसेल, ज्याने रंगमंचावर "बिदेसिया' केलं नसेल... "बिदेसिया'च्या आजवर किती आवृत्त्या निघाल्या हेदेखील कोणी ठामपणे सांगू शकत नाही.

"बिदेसिया'चा एक अनोखा किस्सा रामचंदर मांझी सांगतात. भिखारी ठाकूर यांचे "नाच पथक' प्रचंड लोकप्रिय झाले होते, आणि देशभरात अनेक ठिकाणी "बिदेसिया'चे प्रयोग व्हायचे. असाच एक प्रयोग कोलकाताला पार पडला आणि दुसऱ्याच दिवशी पोलिस येऊन धडकले. भिखारी ठाकूर यांच्याविरुद्ध कोलकाताच्या काही मिल मालकांनी पोलीस तक्रार केली होती की, "बिदेसिया'या नृत्य नाटिकेमुळे आमच्या कंपन्यांना टाळं लावण्याची वेळ आली आहे, कारण हे नाटक बघून आमच्या मिलचे कामगार घरच्या ओढीने न सांगताच थेट त्यांच्या गावी निघून जातात. अशाप्रकारच्या तक्रारीमुळे पोलीसही बुचकळ्यात पडले होते. पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने मग फर्मान सोडले की बघूया तरी "बिदेसिया'काय आहे. पोलीस स्थानकातच मग स्टेज उभारण्यात आले, आणि "बिदेसिया'चा प्रयोग पार पडला. प्रयोग संपला, तेव्हा तो पोलीस अधिकारी मोठमोठ्याने रडू लागला आणि भिखारी ठाकूरला म्हणाला, उद्याच मी माझ्या गावी, माझ्या कुटुंबाकडे निघून जाणार आहे...

"बिदेसिया' पाठोपाठ भिखारी ठाकूर यांच्या प्रतिभेतून आणखी काही कलाकृती साकारल्या गेल्या. स्त्रियांच्या अधिकारांवर आधारित "गबरघिचोर', बालविवाह आणि भ्रूणहत्येविरोधात "बेटी बचवा' आणि वृद्धाश्रमवर आधारलेले "बूढशाला का बेयान'... आणि परखड सामाजिक भाष्य करणाऱ्या या कलाकृतींचा काळ होता विसाव्या शतकातला...

अब देखल जाय कि गाय वास्ते गौशाला खुल गइल

गरीब वास्ते धर्मशाला खुल गइल, गंवार वास्ते पाठशाला खुल गइल.

बड़ा अच्छा भइल. अब बूढ़ खातिर बूढ़शाला खुल जाइत, बहुत अच्छा रहल ह;

काहे कि बूढ़ के बड़ा तकलीफ बीतत बा.. बूढ़ के खइला के फिकिर ना रहे.

गायींसाठी गोशाळा सुरू झाल्या, गरिबांसाठी धर्मशाळा... निरक्षरांसाठी शाळा सुरू झाल्या आता वृद्धांसाठी वृद्धाश्रम सुरू झाले तर किती बरं होईल... असा विचार भिखारी ठाकूर यांनी त्यावेळी मांडला होता. रोजगारासाठी, पैसे कमवण्यासाठी गावातले तरुण आता इतर राज्यात कायमचेच स्थलांतरित झाल्यामुळे, गावात फक्त हालअपेष्टांचा सामना करत वृद्ध आईवडीलच मागे राहिले आहेत ही सल त्यांना त्रास देत होती.

भिखारी ठाकूर यांच्या इतके प्रखर सामाजिक भाष्य करणाऱ्या कलाकृती असतानाही त्यांच्या कलेला कधीही अभिजात दर्जा दिला गेला नाही. भिखारी ठाकूर यांचा वारसा पुढे चालवणाऱ्या रामचंदर मांझी यांच्यासारख्या अनेक कलाकारांना कायम दुर्लक्षित केले गेले. एकेकाळी जवळपास दीडशे ते दोनशे "नाच पथक' एका मोठ्या वर्ग समूहाचे मनोरंजन करत असताना, त्यांच्या सामाजिक जाणिवांना जागृत करत असतानाही ही कला कायम बहिष्कृतच राहिली. आता आतापर्यंत या रामचंदर मांझीना कोणीही ओळखत नव्हतं. "नाच'ची परंपरा जपणारे, ऑर्केस्ट्राकरण झालेला "लौंडा नाच' आजही पारंपरिक पद्धतीनेच सादर करणारे रामचंदर मांझी यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळावा, यासाठी त्यांचे अनेक शिष्य गेल्या काही वर्षांपासून अथक प्रयत्न करीत होते. भिखारी ठाकूरसोबत ज्या कलाकारांनी काम केलंय त्यापैकी आता फक्त रामचंदर मांझी हेच हयात आहेत, त्यामुळे अशा कलाकाराचे दस्ताऐवजीकरण व्हावे, त्यांच्या या कलेचे जतन-संवर्धन व्हावे, असे खरं तर कुणालाच वाटू नये? असे कुणाला वाटणारही नाही, कारण जिथे रामचंदरच्या गुरूला म्हणजे भिखारी ठाकूर यांनाच इथल्या समाज व्यवस्थेने लाथाडले तिथे रामचंदरची काय कथा? या सगळ्याचे मूळ हे जातीच्या उतरंडीत आहे. श्लील-अश्लीलतेत आहे. अभिजात-अभिरुचिहीन या तुलनेत आहे. सांस्कृतिक पर्यावरणारक्षकांमध्ये आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ‘लौंडा' या शब्दामध्ये आहे!

भारतीय जातिव्यवस्थेने सांस्कृतिक क्षेत्राला दिलेल्या वळणांकडे पाहिले, असता कला क्षेत्रातले जातवास्तव अधिक ठळकपणे दिसते. भारतातल्या उच्च समजल्या जाणाऱ्या जातींनी ज्या दुय्यम दर्जाच्या कला आहेत, त्या समाजातल्या खालच्या जातींमध्ये वाटून आपल्या सांस्कृतिक आचरणात जातवर्चस्वाची झूल शाबूत राहील, याची सतत दक्षता घेतली आहे. भारतात कुठेही गेलो तरी लोककला प्रवाहित करणारे कलावंत, हे खालच्या जातीतलेच दिसतात. पण, लोककला जर आजच्या आधुनिक कलांच्या उद््गात्या असतील, तर भारतीय लोककलांची सतत उपेक्षा का होत राहिली?

बिहारचा "लौंडा नाच' याच सांस्कृतिक राजकारणात जखडला गेलाय. "मुन्नी बदनाम हुई' या गाण्यानंतर उत्तरेकडे "लौंडा बदनाम हुआ, नसिबन तेरे लिए' या ताराबानो फैजाबादीच्या भोजपुरी गाण्याने लोकप्रियतेचा कळस गाठला. गाण्याचे हेच शब्द नेमके "लौंडा नाच'ला तंतोतंत लागू पडतात. "लौंडा' या शब्दाचा सरळसरळ अर्थ म्हणजे मुलगा. बिहार, उत्तरप्रदेशसारख्या राज्यात जी मुलं बायकांप्रमाणे वेशभूषा करून नाच-गाणी करतात, त्यांना "लौंडा' म्हणूनच ओळखलं जातं, आणि त्या नृत्याच्या प्रकाराला "लौंडा नाच' म्हणून. आता एकदा का "लौंडा' म्हटलं की, त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार हे निश्चितच आणि झालंही नेमकं तसंच. त्यात खतपाणी घालण्याचं काम अगदी प्रकाश झा (हमरी चढ़ल बा जवनिया गवना ले जा राजा जी - चित्रपट ‘दामुल’) आणि अनुराग कश्यप (गँग्स ऑफ वासेपुर) या फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांपासून लालूप्रसाद यादव, मुलायम सिंह यादव या राजकीय दिग्गजांनीदेखील केलं. लालूप्रसाद यादवांचे "लौंडा नाच'वरचे प्रमे जगजाहीर आहे. त्यांच्या अनेक राजकीय रॅलीची आणि सभांची सुरुवात "लौंडा नाच'नेच होत असे. इतका मोठा लोकाश्रय आणि राजाश्रय मिळूनही, असं नेमकं काय झालं, की लोककलावंत म्हणून सुरूवात करणाऱ्या या कलाकारांचा प्रवास "लौंडा' या अश्लील आणि बदनामीकारक शब्दापर्यंत येऊन थांबला.

"तेहलका' या मासिकात "लौंडा नाच'वर एक रिपोर्ट प्रसिद्ध झाला होता. ज्येष्ठ नाटककार आणि लोककला अभ्यासक हसन इमाम या संदर्भात म्हणतात, की "लौंडा नाच' असा कुठलाही फॉर्म लोककलेमध्ये कधीच नव्हता. इतिहासातही तसे दाखले मिळत नाहीत. १९व्या शतकांपासून आजही भारताच्या गावांगावांमध्ये जी नाटके होतात, रामलीला, रामायण, महाभारताचे प्रसंग नाच-गाण्यातून सादर केले जातात, त्यात अनेक तरुणांनी स्त्रीपात्र रंगवले आहे, त्या सगळ्यांना आपण "लौंडा' म्हणतो का? मनोहर श्याम जोशी, बालगंधर्व इतकेच नव्हे तर हबीब तनवीर, रतन थिय्याम यांच्या नाटकातही पुरुषांनी स्त्रियांच्या भूमिका साकारल्या आहेत... बिरजू महाराज किंवा इतर अनेक दिग्गज कथ्थक नर्तक जे महिला नर्तकींप्रमाणे नृत्य सादर करतात त्यांनाही आपण "लौंडा' म्हणणार का?

पूर्वी राजदरबारात नर्तकी नाचायच्या. पण, राजे-महाराजांचे युग संपले आणि तवायफ, कोठेवाली, बायजींचे युग सुरू झाले. सामंती वर्चस्ववादी पुरुषी मानसिकतेने पैशाच्या-बळाच्या जोरावर त्यांना आपल्या ताब्यात ठेवले. इतर समाजातील महिलांना तर धर्मशास्त्राने नाच-गाणं सादर करण्याची परवानगीच नाकारली होती. त्यामुळे एक खूप मोठा उपेक्षित, शोषित वर्ग नृत्यासारख्या मनोरंजनापासून वंचित राहिला होता. या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी, त्यावर मात करण्यासाठी एका वेगळ्या शैलीचा जन्म झाला... पुरुषांनीच स्त्रिया बनून नाच-गाणं करण्याचा. अल्पावधीतच कलेचा हा फॉर्म इतका लोकप्रिय झाला, की त्यातून अनेक नाच-गाण्याची पथके तयार झाली, नाच-गाण्यांचा आनंद लुटण्याची मक्तेदारी ज्या सावकार-जमिनदारांकडे होती त्याला फक्त या कलेने आव्हानच नाही दिले, तर स्वत:चे नायक जन्माला घातले. संस्कृतीच्या ठेकेदाऱ्यांना, सांस्कृतिक पर्यावरणरक्षकांना अर्थातच हे मान्य होणारं नव्हतं आणि मग या कलेला सामाजिक मान्यता मिळू नये म्हणून सुरू झालं सांस्कृतिक राजकारण. या कलेला हिणवण्यासाठी , त्यावर अश्लिलतेचा शिक्का मारण्यासाठी "लौंडा नाच' हा शब्द खास तयार करण्यात आला आणि मग काय...? शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या लोककलेला आता इतक्या वर्षानंतर म्हणजे २०१८ मध्ये संगीत नाटक अकादमीने पुरस्कृत करून सामाजिक मान्यता देण्याचा प्रयत्न झाला यातच सगळं काही आलं!

एकेकाळी सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करणारी, ही कला आता खरोखरच अश्लील संवाद, अचकट-विचकट हावभाव अशा स्वरुपात सादर केली जाते. पूर्णपणे ऑर्केस्ट्राकरण झालेल्या या जमान्यात पारंपरिक कलावंत भरडले जात आहेत. आणि म्हणूनच पारंपरिक नाच करणाऱ्या अनेक कलावंतांनी त्याकडे पाठ फिरवायला सुरूवात केली आहे. २००० नंतर इथली अनेक नाच पथके बंद पडली. आता आसाम, बांगलादेश, नेपाळमधून मुली येतात. रामचंदर मांझी म्हणतात, आजकल के युवा गहराई से बहुत कम सोचते है... इसी कारण उन्हें, सस्ता मनोरंजन पसन्द है... भिखारी ठाकूर के नाटक आपको सोचने पर मज़बूर करते हैं...

"लौंडा नाच'अशी सतत हेटाळणी होत असल्यामुळे आपल्या अखेरच्या काळात भिखारी ठाकूर म्हणतात...

अबहीं नाम भईल बा थोरा, जब यह छूट जाई तन मोरा

तेकरा बाद पचास बरिसा, तेकरा बाद बीस दस तीसा

तेकरा बाद नाम हो जईहन, पंडित कवि सज्जन जस गईहन’

आता कुठे जरासं नाव झालं आहे... जेव्हा हे शरीर मोकळं होईल, तेव्हा कदाचित पन्नास वर्षांनंतर किंवा दहा-वीस वर्षांनंतर नामांकित झालेलो असेन... पंडित, कवी आणि सज्जन मंडळी माझ्या यशाचे गोडवे गात असतील...

असं खरंच होतंय का?

(पुर्नप्रकाशित दिव्य मराठी रसिक २०१८)

बातम्या आणखी आहेत...