आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गझलेच्या गावात:​​​​​​​गझलेतील गोडवा

4 महिन्यांपूर्वीलेखक: बदीऊज्जमा बिराजदार (साबिर सोलापुरी)
  • कॉपी लिंक

घासात गोडवा... वासात गोडवा... श्वासात गोडवा... ध्यासात गोडवा... बोलण्यात गोडवा... वागण्यात गोडवा... कामात गोडवा... नामात गोडवा... प्रेमात गोडवा… काकणात गोडवा... पैंजणात गोडवा... स्पर्शात गोडवा... हर्षात गोडवा... गोडव्याचा आस्वाद घेण्याच्या अशा कितीतरी असतात जागा... जगताना करू नये उगाच त्रागा…

जगानं आपले गोडवे गायला पाहिजे असं वाटत असेल तर आपण आधी गोड बोलायला शिकलं पाहिजे. आपण गोड बोललो की आपल्यालाही गोड शब्द ऐकायला मिळतात. त्यासाठी मनाच्या गोडाऊनमध्ये गोडवा साठवून ठेवायलाच हवा. गोडीगुलाबीनं सहजीवनही गोड होत जातं. ज्याच्या वाणीत माधुर्याचा रस असतो तोच जीवनात सरस ठरतो. गोडीतूनच सद् व्यवहार घडत असतो. कोणत्याही माणसांच्या बाह्यरूपावर भाळून न जाता त्याच्या अंतःकरणातील गोडव्याची पारख करता आली पाहिजे. कोकिळेचं सौंदर्य तिच्या रूपात नाही तर तिच्या गोड गळ्यात आहे. हे लक्षात घ्यायला हवं. आपलं ध्येय मधमाशीसारखं असलं की जीवनही फुलासारखं फुलत जातं. मधातलं बोलणं सगळ्यांना सुखावतं. गोड शब्दांचे सगळेच भुकेले असतात. म्हणून शब्द जपून वापरत ते मधूर स्वरात उच्चारावेत. पाकातल्या पुरीसारखं मधाळ बोलणाऱ्यांच्या मुठीत जग सामावतं. गोडव्यात इतकं सामर्थ्य असतं. पुष्कळ वेळा आपल्याला याची माहिती नसते की वाणीतला, शब्दातला गोडवा लोहचुंबकाचं काम करत असतं तो माणसांना ताबडतोबीनं आपल्याकडं खेचून घेतं. लोकांना आपलंसं करायचं असेल तर सदैव गोड गोड बोलत राहा. गोडबोलणं ही यशस्वी जीवनाची जणू गुरुकिल्लीच आहे. गोडवा बोलण्यात तर असतोच असतो पण वागणुकीतूनही तो जाणवायला हवा. गोडवा संपला की जीवन आळणी होऊन जातं.

गझलेच्या ज्या शेरांमध्ये गोडवा भरलेला असतो ते शेर रसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहातात. 'गोडवा' या विषयाच्या अनुषंगानं आशयाच्या अंगानं इथं गझलकारांचे शेर घेण्यात येताहेत.

ज्याच्या बोलण्यात गोडवा असतो वागण्यात नम्रतेची मिठास असते. त्याच्याविषयी लोकही सद्भावना बाळगून असतात. द्वेष, घृणा, कडवटपणा कुणालाच नको असतो. तुमचा एखादा गोडबोल निराश माणसासाठी लाखमोलाचा ठरतो. गोडीगुलाबीनं जगण्यात जी मौज असते की कटूतेत कधीच नसते. नेहमी कडवट बोलणाऱ्या माणसाला सदिच्छा देणं तर सोडाच त्याच्या सावलीला सुद्धा उभं राहावं कोणी पसंत नाही करत. लोक त्याच्यापासून फटकून वागू लागतात. सतत कडवटपणा उगाळत बसणारा माणूस जगात एकाकी पडतो. जो गोडव्यापासून फारकत घेतो. त्याच्या वाट्याला दुसरं काय येणार? सुरेश भट यांचा अनुभवी शेर हेच सांगतो

लाभली ज्याला सदिच्छा तो न दर्जेदार मी एवढा माझ्यात आता गोडवा आहे कुठे?

उत्कट प्रेम हे निर्व्याज असतं त्यात देण्या-घेण्याची, परतफेडीची भाषा नसते. परंतु प्रेमातला गोडवा वाढविण्यासाठी थोडीशी हमरीतुमरी करावी लागतं. वरवरचं रुसावं-फुगावं लागतं. 'तुम रूठी रहो मै मनाता रहू' असं म्हणत प्रियेचा रुसवा काढल्यानं प्रेमातला गोडवा आणखी वाढतच जातो. ज्या प्रेमात लटके रुसवे-फुगवे नाहीत. किरकोळसुद्धा कुरबुरी नाहीत. एकमेकांना मनवणं नाही. समजावणं नाही मग अशा प्रेमात गोडवा तरी कसा भरणार? प्रेमात गोडवा वाढण्यासाठी सारं काही माफ असतं. काही सोसावं लागलं तरी बेहत्तर पण प्रेमातला गोडवा वाढायला हवा. प्रेमातला गोडवा वाढला की जबाबदारी वाढते. तरीही हा गोडवा वाढायलाच हवा. अशी प्रियकराची मनोकामना असते. ए. के. शेख यांचा शेर याचीच प्रांजळ कबुली देतो.

गोडवा प्रेमातला जर का हवा वाढायला भांडुनी थोडेच लटके अन् रुसावे लागते

प्रीतीचा गोडवा कोणत्या प्रियकराला आवडत नाही? प्रीतीचा गोडवा आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी तो श्वास रोखून न्याहाळत असतो. प्रेमकहाणीत नेहमी असंच तर घडत आलंय्. प्रेमात सगळ्याच प्रेमीची अवस्था अशीच होऊन जाते. त्यात नवलाई नाही. प्रीती करत असताना ही रटाळ न होऊ देता ती क्षणोक्षणी मधाळ कशी होत जाईल. त्यातला गोडवा तीळमात्र आटणार नाही. याची दक्षता घेणंही आवश्यक असतं नाहीतर मग पश्चातापाची पाळी आल्याशिवाय नाही राहात. प्रेमात युद्धासारखं कठोर होऊन नाही चालत. इथं लोण्यापेक्षा मऊ हृदय ठेवावं लागतं. ज्यामुळं प्रियाही विस्मयचकित व्हायला हवी. प्रेमातल्या कहाणीची ही तर खरी निशाणी असते. ज्ञानेश्वर वांढरे यांनी हाच आशय त्यांच्या शेरातून मांडलाय.

गोडवा प्रीतीचा मागतो रोजचा श्वास रोखून न्याहाळतो का असा

काही पोटशूळ असणारी खोडसाळ अन कडू राशीची माणसंही आपल्या शेजारी-पाजारी राहात असतात. त्यांना शेजारील उभयंतामधला शब्दांचा गोडवा जाणवत नाही. खरंतर पाहावत नाही. त्यांच्या पूर्वग्रह दूषित नजरेला फक्त आग आणि धूर दिसत असतो. अशा माणसांना तुपात तळा की साखरेत घोळा त्यांचा स्वभाव कडू तो कडूच राहातो. गोड आंबा अन् कडूलिंब यांच्यात मूलभूत फरक असतो. स्वभावाला औषध नसतं हेच खरं! आपल्या गोडपणात बिब्बा टाकणाऱ्या अशा तऱ्हेच्या कडू शेजार-पाजाऱ्यांपासून सावध राहायला पाहिजे. अन् आपल्या शब्दातला गोडवा जपला पाहिजे असं राजा मिसर प्रियेला सुचवताहेत.

मधाळे गोडवा जेव्हा तुझ्या-माझ्यात शब्दांचा कडू शेजार-पाजारी म्हणाले पेटले काही

गोड बोलणं ही सहज घडणारी प्रक्रिया असते. त्यासाठी महतप्रयास करावं नाही लागत. गोड बोलण्यासाठी कोणतंही मूल्य अदा करावं नाही लागत. फक्त सत्याची कास धरावी लागते. जी वाणी सत्याची बूज राखते त्या वाणीला सत्यच सांभाळते. सत्याची ही ताकद असते. उलटपक्षी खोटंनाटं बोलणं, छक्केपंजे करणं, लोकांना टोप्या घालणं निर्दयीपणं त्यांची मान कापणं अशा लोकांची जात वेगळीच असते. त्यांच्या शब्दात चुकूनही कधी गोडवा भेटणार नाही. कमालीच्या कडवटपणानं ती माणसं भरलेली असतात. एकीकडं जिभेवर खडीसाखर ठेवणारे तर दुसरीकडं शब्दात विखार, अंगार ठेवणारे लोक असतात. या दोन्हीतल्या तफावतीवर नितीन भट लिहितात.

गोड बोलणाऱ्यांना जमते गोड बोलणे मान कापणाऱ्यांची असते जात वेगळी

काही दुःखं अशीही असतात की ती सोबत आशा घेऊन येतात. त्यामुळं दुःख हे डोंगर नाही वाटत. त्यांच्या सानिध्यातला गोडवा दु:खी मनाला सुखाचा, आशेचा किरण दाखवत असतो. दुःख विरहाचं असो की दारिद्र्याचं खूप उचंबळून आलं की क्षणात डोळे पाणावतात. आसवांची ओघळ गालांवरून सरसरत येते. हा काळ कसोटी पाहणारा असतो. अशा प्रसंगी घाबरून खचून, पिचून न जाता दुःखाला सामोरं जावं लागतं. जर एखादं दुःख आशा घेऊन येणारं असेल तर मग त्या दुःखाला गळ्याला लावून घेतलं पाहिजे. उराउरी भेटलं पाहिजे. या दुःखातच आपली उद्याच्या जगण्याची आशा असते. शेवटी माणूस आशेवर तर जगत असतो. आशाच नसती तर जीवन पार काळवंडून गेलं असतं. माणूस जगण्याची हिंमतच करू शकला नसता. म्हणून आशा घेऊन येणाऱ्या दुःखाचे गझलेतून गोडवे गायले पाहिजे. असा संदेश प्रा. गिरीश खारकर यांच्या शेरातून मिळतो.

दुःख आले घेउनी आशा इथे हाय, गाते गोडवे माझी गझल

माणसासारखं मातीपाशी दुटप्पीपणा धूर्तपणा नसतो. माती कधीच कुणाविषयी कटुता नाही बाळगत. मातीच्या प्रत्येक कणाकणात गोडवा भरलेला असतो. मातीला श्रमाची, घामाची चांगली पारख असते. म्हणून ती पिकात आपला अंगभूत गोडवा भरत असते. म्हणून तर कष्टाचा घास गोड लागतो. कष्टाच्या भाकरीची गोडी लाभलेली असते तिची चव अन्य कुठेही चाखायला नाही मिळत. कष्टाच्या भाकरीची गोडी वाममार्गानं मिळविलेल्या पक्वान्नापेक्षा कितीतरी पटीनं अधिक असते. मातीच्या मायेचा थेंबही सागराच्या अमृतापेक्षा जास्त गोड असतो. मातीच्या गोडव्याची ही खरी कमाल असते. गो. शि. म्हसकर आपल्या शेरातून मातीचा गोडपणा टिपतात.

गोड देते घास माती पोसते पोटास माती

तुमचा एक रसाळ, मधाळ विचार कित्येक कडवट विचारांना, धारणांना नाहीसा करतो. म्हणून प्रत्येकांशी गोड बोलत राहाणं निकडीचं आहे. गझलकारांनी गोडव्याचे जे महत्त्व विशद केलंय. याचा अर्थच असा की, गोड बोलण्यानं वाणीवर संस्कार घडतो. वाणी शुद्ध होते. म्हणून वाणीत गोडवा रुजवणं लाभदायी ठरतं.

contact@sabirsolapuri.com

बातम्या आणखी आहेत...