आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:विनातुरुंगाचे यबर कैदी...

3 महिन्यांपूर्वीलेखक: राहुल बनसोडे
  • कॉपी लिंक

लोकाधिकार कार्यकर्त्यांविना, पत्रकारांविना, विरोधी पक्षाविना, निवडणुकांविना कुणी राजशकट हाकलू पाहात असेल तर ते शहाणपणाचे कसे नसते हे सांगून गेली शंभर वर्षे विचारवंताच्या लेखण्या झिजल्या पण तरीही काही लोकांचे हुकूमशाहीविषयीचे आकर्षण आणि आस्था तसुभरही कमी होत नाही. समाजात हे आकर्षण जोवर शिल्लक राहाते तोवर ते विशेष प्रतिभा नसणाऱ्या पण प्रतिमेने मोठ्या असणाऱ्या आत्मपुजक नेत्यांना लोकं निवडून देतच रहातात आणि असे आत्मपुजक नेते सत्तेत आले म्हणजे ही प्रतिभेशिवाय मिळविलेली सत्ता हातची जाऊ नये म्हणून जंग जंग पछाडत रहातात. आपल्याविरुद्ध सतत कुणीतरी कटकारस्थानच करत असतो असा संशय ह्या सत्ताधाऱ्यांना असतो आणि अशा संशयाची परिणीती मग पिगॅससच्या खरेदीत होते.

नीव, शालेव हुलिओ आणि ओम्री लेव्ही हे इस्त्रायलचे दोन तरुण तडफदार तंत्रज्ञ. २०१० साली एका छोट्याशा कोंबडीच्या खुराड्यात बसून त्यांनी पिगॅसस अॅप बनवणारी एनएसओ ही कंपनी स्थापन केली होती. त्यांच्या नावाची अद्याक्षरं घेऊन त्यांनी कंपनीचं नाव ठेवलं NSO. एखाद्या फोनवर पिगॅससची लिंक पाठवून दुरूनच तो फोन नियंत्रित करणे या अॅपद्वारे शक्य होते. या तंत्राचा वापर करून एखाद्या फोन कंपनीला वापरकर्त्याचा फोन दुरुस्त करणे शक्य झाले होते. इस्त्रायलचे गुप्तचर जरा अधिकच हुशार त्यामुळे गुन्हेगार व्यक्तीच्या फोनवर कब्जा करून त्याने यापूर्वी केलेल्या आणि भविष्यात करू पाहणाऱ्या संभाव्य गुन्ह्यांची माहिती मिळवणे या पिगॅसस अॅपद्वारा सहज शक्य होईल हे त्यांच्या लक्षात आले आणि इस्त्रायलच्या या दोन तंत्रज्ञांना त्यांनी पिगॅसस तंत्र हेरगिरीच्या अंगाने अधिक विकसित करण्यास सांगितले. तिथून एनएसओचा प्रवास सुरू झाला. आज एनएसओ कंबीकडे सातशेहून अधिक लोकांची फौज आहे आणि या कंपनीचे बाजारमूल्य दीड बिलियन डॉलर्स इतके आहे. पिगॅसस हे ग्रीक पौराणिक कथांमधील एक घोड्याचे पात्र आङे, ज्याला पंख असून उडताही येऊ शकते. ग्रीक पुराणात "ट्रोजन वॉर' म्हणजेच अखियन्स लोकांनी ट्रॉय शहरावर केलेला हल्ला आणि भव्य लाकडी घोड्यात बसून शहरात केलेली घुसखोरीची गोष्ट आहे. शालेव या तंत्रज्ञाच्या मतानुसार पिगॅसस हा त्या ट्रॉयच्या युद्धाच्या घोड्यासारखाच आहे, फक्त तो रस्त्यावरून घुसखोरी करत नाही तर आपल्या पंखांच्या सहाय्याने उडत येतो आणि शत्रुच्या प्रदेशात घुसखोरी करतो. पिगॅसस हा उडता घोडा शालेवच्या मते दैवी आहे.

पिगॅसस नावाच्या या उडत्या घोड्याने जगभरात आपली वेगवान घोडदौड सुरू केली. इस्त्रायलच्या सायबर शस्त्रास्त्र कंपनी एनएसओने आपले पिगॅसस हे हेरगिरी करणारे अस्त्र ज्या देशांना विकले होते त्या देशांनी या अस्त्राचा वापर आपल्याच नागरिकांवर, मानवाधिकार कार्यकर्त्यांवर, धनाढ्य व्यापाऱ्यांवर, निवडणूक अधिकाऱ्यांवर आणि पत्रकारांवर केल्याची माहिती बाहेर आली. प्रत्यक्ष जमिनी हल्ले आणि हवाई हल्ल्यांसाठी आधुनिक शस्त्रास्त्रे विकण्यात इस्त्रायल अगोदरपासूनच अग्रेसर आहे. ह्याशिवाय अशा हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त सुरक्षा यंत्रणा विकण्यातही इस्त्रायलचा हात कुणी धरु शकणार नाही. पण गेली दहा वर्षे सायबर तंत्रज्ञानावर विशेष मेहनत घेऊन इस्त्रायलने अनेक सायबर क्षेपणास्त्रे विकसित केली आणि अशाच क्षेपणास्त्रांविरुद्ध बचावात्मक यंत्रणाही उभी केली आहे. एकूणातच इस्त्रायल एकाचवेळी रोग आणि त्यावरची औषधे दोन्ही विकत असते.

पिगॅससचा मुळ उद्देश हा एखाद्या देशावरचा हल्ला थोपविणे, दहशतवादी आणि गंभीर गुन्हे करणाऱ्यांचा छडा लावण्यासाठी केला जाणे अपेक्षित होता आणि त्याच्या वापराने असंख्य देशांना मदत झाली आहे, अजुनही होते आहे. शालेव हुलिओच्या मते ज्या देशांनी हे तंत्र विकत घेतले आहे त्यांना आपल्या देशाची सुरक्षितता म्हणजे नेमके काय ह्याबद्दल व्यवस्थित माहिती नसावी... पिगॅससचा सार्वजनिक वापर हा चांगल्या कामासाठी अपेक्षित असतांना हे चांगले काम म्हणजे नेमके काय हे काही शासनकर्त्यांना कळलेले नाही. पिगॅससच्या मदतीने जगभरातील जवळपास पन्नास हजार मोबाईल फोनमध्ये घुसखोरी करण्याचे प्रयत्न झाले आहेत आणि त्याची यादी पहाता ही यंत्रणा पत्रकारांविरुद्धदेखील वापरली गेल्याची माहिती समोर आली आहे. ह्याविषयी "वॉशिंग्टन पोस्ट' ह्या आंतरराष्ट्रीय दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत, एका जरी माणसाला त्रास देण्यासाठी पिगॅससचा वापर केला गेला असेल तर ते लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे शालेव ह्यांनी म्हटले आहे. ज्या देशांनी आमच्या स्पायवेअरचा गैरवापर केला आहे त्यांनी आमच्या विश्वासघात केला असून अशा देशांना दिली जाणारी सेवा आम्ही खंडीत करु शकतो असे शालेव ह्यांनी म्हटले आहे. पण ह्या देशांनी स्पायवेअरचा वापर नेमका कसा केला आहे याची माहिती घेण्याची कुठलीही सोय एनएसओकडे नाही हेदेखील तितकेच खरे आहे. वस्तुतः अशी सोय नसल्यानेच अनेक देशांनी हे स्पायवेअर एनएसओकडून विकत घेतले.

वर्षभरापूर्वी आपण जर सायबर महायुद्धाच्या उंबरठ्यावर होतो तर पिगॅससच्या निमित्ताने हा उबरठा ओलांडून विध्वंसाच्या नव्या जगात जाण्यासाठी आपण आतुर झालो आहोत की काय असे वाटू शकते. कारण ज्या व्यक्तींवर या अस्त्राचा वापर केला गेला आहे त्या व्यक्ती समाजरचनेसाठी आणि प्रगतीसाठी अत्यावश्यक असतात. लोकाधिकार कार्यकर्त्यांविना, पत्रकारांविना, विरोधी पक्षाविना, निवडणुकांविना कुणी राजशकट हाकलू पाहात असेल तर ते शहाणपणाचे कसे नसते हे सांगून सांगून गेली शंभर वर्षे विचारवंताच्या लेखण्या झिजल्या पण तरीही काही लोकांचे हुकूमशाहीविषयीचे आकर्षण आणि आस्था तसुभरही कमी होत नाही. समाजात हे आकर्षण जोवर शिल्लक राहाते तोवर ते विशेष प्रतिभा नसणाऱ्या पण प्रतिमेने मोठ्या असणाऱ्या आत्मपुजक नेत्यांना लोकं निवडून देतच रहातात आणि असे आत्मपुजक नेते सत्तेत आले म्हणजे ही प्रतिभेशिवाय मिळविलेली सत्ता हातची जाऊ नये म्हणून जंग जंग पछाडत रहातात. आपल्याविरुद्ध सतत कुणीतरी कटकारस्थानच करत असतो असा संशय ह्या सत्ताधाऱ्यांना असतो आणि अशा संशयाची परिणीती मग पिगॅससच्या खरेदीत होते.

फॉर्बीडन स्टोरीज ही आघाडीचे शोधपत्रकार आणि चित्रपटनिर्माते लॉरेंट रिचर्ड यांनी २०१७ साली स्थापन केलेली ना-नफा तत्त्वावर चालणारी संस्था आहे. या संस्थेचे प्रमुख उद्देश अशा बातम्या देणे आहे, ज्या बातम्या मिळविताना पत्रकारांना धमक्या मिळतात वा त्यांना अटक केली जाऊ शकते किंवा मग थेट त्यांच्या जीवावरच बेतू शकते. अशी शोध पत्रकारिता करताना समजा एखाद्या पत्रकाराचा मृत्यु झाल्यास त्याचे काम त्याच्यासोबतच न संपता दुसऱ्या पत्रकाराला त्या बातमीवर पुढे काम करणे शक्य होते. बातमी देणाऱ्याच्या जीवावर बेतू शकते अशी कुठलीही बातमी आणि ती बातमी शोधणाऱ्या पत्रकारांसाठी सुरक्षित इंटरनेट संसाधने उपलब्ध करुन देणे हे फॉर्बीडन स्टोरीजचे मुख्य काम. प्रोजेक्ट पिगॅसस हा शोधपत्रकारितेतला आंतरराष्ट्रीय प्रकल्प असून इस्त्रायलस्थीत एनएसओ कंपनीने बनविलेल्या पिगॅसस या स्पायवेअरचा वापर पत्रकार, विरोधी पक्षनेते, सामाजिक कार्यकर्ते, आणि व्यापाऱ्यांवर हेरगिरी करण्यासाठी कसा केला गेला ह्याविषयी लोकांना माहिती देण्यासाठी हा प्रजोक्ट स्थापण्यात आला. वॉशिंग्टन पोस्ट, द गार्डीयन यासह एकूण १६ वृत्तसंस्थानी प्रोजेक्ट पिगॅससच्या मदतीने पहिली माहिती १८ जुलै २०२१ पासून आपापल्या वृत्तपत्रांमध्ये टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. हे वृत्त देणाऱ्या संस्थाच्या अनेक पत्रकारांवरही पिगॅससचा वापर करुन पाळत ठेवण्याचे प्रयत्न झाले आहेत. या पाळतीची माहिती "अॅम्नेस्टी इंटरनॅशनल' ह्या ब्रिटनस्थीत मानवाधिकाराविषयी काम करणाऱ्या गैरसरकारी संस्थेच्या हाती लागल्यानंतर त्यांनी फॉर्बीडन स्टोरीजच्या माध्यमातून ही माहिती जगापुढे आणण्याचे ठरविले. ज्या चोवीस देशांमध्ये पिगॅससचा वापर करुन पत्रकारांवर पाळत ठेवण्यात आली होती त्यांची संख्या आजमितीस दोनशेच्या आसपास असून त्यात अनेक महत्त्वाची नावे आहेत. ह्याशिवाय याच स्पायवेअरचा वापर करुन काही देशांच्या राष्ट्रप्रमुखांवर, काही देशातल्या विरोधी पक्षांतल्या महत्त्वाच्या नेत्यांवर, गुप्तचर यंत्रणांतल्या निवृत्त अधिकाऱ्यांवर, निवडणूक अधिकाऱ्यांवर पाळत ठेवण्याचे प्रयत्न झाले आहे किंवा प्रत्यक्ष पाळत ठेवली गेली आहे.

पिगॅसस हे एक स्पायवेअर आहे. तुम्हाला कुठलीही कल्पना न देता आणि तुमची कुठलीही परवानगी न घेता तुमच्या मोबाईलमध्ये हे अॅप इन्स्टॉल केले जाऊ शकते. आपल्या फोनमध्ये असे काही अॅप इन्स्टॉल केले गेले आहे ह्याची पुसटशी कल्पनाही वापरकर्त्याला नसते. अॅप तुमच्या मोबाईलवर असला तरी त्याचा वापरकर्ता दुसराच कुणीतरी असतो जो तुमच्या नकळत तुमचा फोन हवा तसा हॅक शकतो. २०१६ सालपर्यंत पिगॅससचा वापर करुन दुसऱ्यांच्या मोबाईलवरचे एसएमएस वाचणे, कॉल्स ट्रॅक करणे, पासवर्ड गोळा करणे आणि फोनच्या लोकेशनची माहिती घेणे शक्य होत होते. गेल्या आठवड्यात फॉर्बीडन स्टोरीज संस्थेने जाहीर केलेल्या माहितीनुसार आताचे हे स्पायवेअर अधिक अद्ययावत झाले असून त्याच्या क्षमता वाढविण्यात आल्या आहेत. ह्या क्षमतांकडे लक्ष देता पिगॅससच्या मदतीने एखाद्याच्या फोनमध्ये हेरगिरी करुन आपण त्या माणसाला आयुष्यातून उठवू शकतो इतपत हे स्पायवेअर स्मार्ट झाले आहे. पिगॅससचा वापर करुन सौदी पत्रकार जमाल खशोगी यांची ऑक्टोबर २, २०१८ रोजी हत्त्या केली गेली असल्याचा अमेरिकी गुप्तचर संस्था सीआयएचा कयास आहे. ही हत्त्या सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बीन सलमान यांच्या परवानगीने केली असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. मोहम्मद बीन सलमान यांनी पिगॅससचा वापर आणखी एका माणसावर केलाय आणि तो सध्या जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे. आता हे राजपुत्र अॅमेझॉनचे मालक जेफ बिझोज यांना पिगॅससची स्पायवेअर लिंक का पाठवत असतील? तर त्याचे उत्तर सोपे आहे. "तसे केले जाऊ शकते म्हणून'. एकुण माननीय राजपुत्र मोहम्मद बीन सलमान ह्यांना पिगॅसस हे श्रीमंताचे खेळणे वाटत असेल, तर अशा मानसिकतेतून काय भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते ह्याची कल्पनाच केलेली बरी.

मुळात अशा संहारक खेळण्यांची सत्ताधिशांना भुरळ का पडत असावी? ह्या प्रश्नाचे उत्तर तसे स्वाभाविक आहे. जगभरात पन्नासहून अधिक वर्षे राज्य केल्यानंतर उदारमतवादी लोकशाही संकल्पनांची पिछेहाट होत आहे. गेली वीस वर्षे जगभरातले राजकारण आपण विरुद्ध 'ते' असे झाले आहे. दुभंगलेल्या समाजव्यवस्थेत राजकारण करणे आणि बहुमताने निवडून येणे तसे सोपे असते, जर तुम्ही बहुसंख्यकांमध्ये इतरांविषयी द्वेष पसरवून तो कायम ठेऊ शकला तर... परंतू द्वेषाच्या राजकारणाची अडचण ही की तुमचे अनेक विरोधक सतत तयार होत राहतात. त्या विरोधकांना काबूत ठेवण्यात कधीकधी सत्तेचा फार मोठा वेळ वाया जात रहातो. एखाद्या देशाने द्वेषाचे राजकारण स्विकारले असेल तर तिथे माणसामाणसांतले शत्रुत्व वाढायला लागते. सत्तेतल्या मोठ्या लोकांचे हजारो शत्रू असतात तर लहान लोकांचे पाच-दहा. समाजातल्या अत्यंत सामान्य माणसाचेही जेंव्हा किमान दोन-तीन शत्रू असतात तेंव्हा एकूण समाजच अस्वस्थ असतो आणि आपला बराचसा वेळ दुश्मनी निभावण्यातच घालवत असतो. मग अशा समाजात आपल्या शत्रूची बित्तंबातमी मिळविणे हा एक मुख्य उद्योग बनतो आणि अशी बित्तंबातमी मिळविण्यासाठी लोक हवा तितका खर्च करायला तयार असतात. आज पिगॅसससारख्या शस्त्राची किंमत दहा लोकांवर हल्ला करुन त्यांना आपले सायबरकैदी बनविण्यासाठी काही लाख रुपये आहे आणि देशोदेशींच्या लोकशाही वा हुकुमशाही मान्यताप्राप्त सरकारांशिवाय हे स्पायवेअर कुणालाही विकत घेता येत नाही. त्यामुळे सध्यातरी हा प्रश्न जागतिक मानवाधिकार, शांतता आणि लोकशाहीच्या मुत्सद्देगिरीचा आहे. पिगॅसस जे काही करते आहे ते समाजमाध्यमांतल्या अनेक कंपन्या थोड्याबहुत प्रमाणांत नेहमी करत होत्या आणि तुमची खाजगी माहिती मशिन्सला पुरवून तुमच्याच विरोधात वापरली जाऊ शकते ह्याविषयी वेळोवेळी "दिव्य मराठी -रसिक'मध्ये चर्चा केली जात होती. ही माहिती जशी आर्टीफीशियल इंटेलिजन्सला मिळते तशी ती एखाद्या माणसाला आणि प्रसंगी तुमच्या शत्रुलाही मिळू शकते ह्याबद्दल मात्र बरेचसे लोक अनभिज्ञ होते. आपले प्रतिस्पर्धी वा शत्रु पिगॅससचा वापर करुन आपल्यावर थेट पाळत ठेवत आहेत हे समजल्यानंतर अनेक देशांतल्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. त्यापैकी काही लोक सत्तेतले आहेत तर काही लोक विरोधी पक्षातले, त्यामुळे बऱ्याच वर्षांनी काहीतरी सकल सामाजिक प्रश्नांची उकल काढण्याचे आव्हान देशादेशांसमोर ठाकले आहे. पिगॅससचा वापर करुन ज्या मानवाधिकार कार्यकर्त्यांवर पाळत ठेवली गेली त्यांना त्यांचा संघर्ष किती आणिबाणीचा आहे हे कळू लागले आहे, तर ज्या पत्रकारांवर पाळत ठेवली गेली त्यांना सत्य जगासमोर ठेवण्याची काय किंमत द्यावी लागू शकते ह्याची स्पष्ट कल्पना आली आहे. पिगॅसस प्रकरण बाहेर येणे हे कुठल्याच सत्तेच्या वा तिच्या विरोधकांच्या फायद्याचे नाही. भविष्यात एखाद्या राजकीय पक्षाला ह्याचा फायदा मिळवून घेता येईलच, पण सध्याच्या काळात हे प्रकरण उघडकीस आले नसते तर बरे झाले असते अशीच प्रतिक्रीया इथे द्यावीशी वाटते.

‘पिगॅसस’ कसे वापरले जाते

२०११ पासून नऊ देशांमध्ये पत्रकारांच्या विरोधात वापरल्या जाणाऱ्या स्पायवेअरच्या ३८ प्रकरणांची कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट्स या संस्थेने नोंद केली आहे. इलेक्ट्रॉनिक फ्रंटियर फाऊंडेशन (ईएफएफ) येथील सायबरसिक्युरिटीच्या संचालिका इवा गॅलपेरिन या पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या विरोधात मेक्सिको, विएतनाम तसेच इतरत्रही करण्यात आलेले सायबर हल्ले ओळखणाऱ्या पहिल्या काही संशोधकांपैकी एक होत्या. त्या सांगतात,“२०११ मध्ये इमेलमार्फत मालवेअर तुमच्या संगणकावर इन्स्टॉल केले जात असत. २०१४ नंतर सगळ्यांकडेच स्मार्टफोन आल्यामुळे फोनवरून पत्रकारांवर हेरगिरी करणे हे अधिक प्रमाणात केले जाऊ लागले. पत्रकारांना एखाद्या संभाव्य घोटाळ्याची किंवा त्यांच्या कुटुंबियांची विशिष्ट माहिती देण्याच्या मिषाने जाळ्यात अडकवले जाऊ लागले. लक्ष्य असलेल्या व्यक्तीने पुरवलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांच्या फोनवर मालवेअर इन्स्टॉल केले जाते.” मात्र आता स्मार्टवर ‘पिगॅसस’ स्पायवेअर इन्स्टॉल करण्याची प्रक्रिया अधिक चलाखीने केली जाऊ लागली आहे. आता त्या व्यक्तीला क्लिक करणेही आवश्यक नसते. त्यामुळे या हल्ल्यांची जटिलता आणखी वाढली आहे. फोनवर यशस्वीरित्या इन्स्टॉल केल्यानंतर ‘पिगॅसस’ स्पायवेअर एनएसओ ग्राहकांना त्यांच्या साधनांचा पूर्ण ऍक्सेस देते त्यामुळे सिग्नल, व्हॉट्सॅप किंवा टेलिग्रामसारख्या एनक्रिप्टेड मेसेजिंग ऍपवरील संदेशही वाचता येतात. फोन शट ऑफ होईपर्यंत ‘पिगॅसस’ केव्हाही सक्रिय केले जाऊ शकते. फोन ऑन झाल्यानंतर ते पुन्हा सक्रिय करता येते. ऍमनेस्टी इंटरनॅशनलच्या सिक्युरिटी लॅबचे संचालक क्लॉडिओ ग्वारनेरी यांच्या मते ‘पिगॅसस’ ऑपरेटर दुरूनच फोनवर ऑडिओ व व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे, मेसेजिंग ऍपमधील डेटा घेणे, लोकेशन ट्रॅक करण्यासाठी जीपीएस वापरणे, पासवर्ड व ऑथेंटिकेशन की बद्दल माहिती घेणे अशा अनेक गोष्टी करू शकतात. हेरगिरी करणारी सरकारे हेरगिरी उघड होऊ नये याकरिता फोन संसर्गित करून चटकन माहिती घेऊन बाहेर पडणे असे धोरण अवलंबत आहेत असेही ते म्हणाले. rahulbaba@gmail.com

बातम्या आणखी आहेत...