आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मरण:पुस्तकांतला माणूस...

3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रवीण दशरथ बांदेकर
  • कॉपी लिंक

काळसेकरांची लौकिक जगाला असलेली ओळख कवी, संपादक, अनुवादक, पुस्तकप्रेमी, पुस्तक संग्राहक आणि एक अफाट क्षमतेचा वाचक अशी असली, तरी त्यांच्यापाशी या सगळ्या गोष्टींपेक्षा अधिकचे असे काही तरी होते. एक माणूस म्हणून जगत असताना आपल्याला चिकटलेल्या या सगळ्या ओळखींपलीकडेही काही तरी शिल्लक उरत असतं. अनेकांपाशी त्याचाच अभाव असतो. नेमकं तेच काही तरी काळसेकरांपाशी होतं...

कवी सतीश काळसेकर गेल्याची बातमी आली आणि त्यांना ओळखणाऱ्या प्रत्येकालाच जणू आपल्या घरातला, आपल्या कुटुंबातलाच कुणी एक जाणता गेल्याची भावना झाली. समाज माध्यमांवरून त्यांना श्रद्धांजली वाहणाऱ्या, त्यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या पोस्टस्वर एक नजर टाकली, तरी याची कल्पना येऊ शकते. या माध्यमातून काळसेकरांविषयी लिहिणाऱ्यांमध्ये त्यांच्या समकालीन असलेल्या डहाकेंसारख्या कवींपासून ते काल-परवाच ज्यांचं पुस्तक प्रकाशित झालंय अशा नवोदित कवींपर्यंत अनेक प्रकारचे लोक दिसतील. प्रत्येकाची त्यांच्याविषयीची भावना एक चांगला माणूस गमावल्याची, सच्चा ग्रंथप्रेमी हरपल्याची आणि चांगल्या लेखनाला मनापासून दाद देणारा जाणता वाचक गेल्याची अशीच होती. काळसेकरांची लौकिक जगाला असलेली ओळख कवी, संपादक, अनुवादक, पुस्तकप्रेमी, पुस्तक संग्राहक आणि एक अफाट क्षमतेचा वाचक अशी असली, तरी त्यांच्यापाशी या सगळ्या गोष्टींपेक्षा अधिकचे असे काही तरी होते. कवी तर अनेक जण असतात, चांगली दृष्टी असलेले संपादकही अनेक असतात, भाषेची उत्तम जाण असलेले अनुवादक, पुस्तकांवर जीव ओवाळून टाकणारे ग्रंथप्रेमी, आणि तहानभूक हरपून वाचन करणारेही असंख्य लोक आपल्या आजूबाजूला दिसतील. पण, एक माणूस म्हणून जगत असताना आपल्याला चिकटलेल्या या सगळ्या ओळखींपलीकडेही काही तरी शिल्लक उरत असतं. अनेकांपाशी त्याचाच तर अभाव असतो. नेमकं तेच काही तरी काळसेकरांपाशी होतं. ते असं काय होतं किंवा असावं? याचा शोध घेताना जाणवतं की कुठेतरी आपल्या सहिष्णु आणि मानवतावादी संतपरंपरेला जोडून घेणारं असं काही तरी ते होतं. काळसेकर ‘वैश्विक भातृभाव’ असा एक शब्द अनेकदा वापरत असत. तसंच काही तरी ते असावं. त्यात माणसांना त्यांच्या सगळ्या बऱ्या-वाईट गोष्टींसह समजून घेण्याची, आपल्याशी जोडून घेण्याची आंतरिक आस्थेची एक वृत्ती असू शकते. ती काळसेकरांपाशी भरपूर प्रमाणात होती. आजचा काळ हा आपल्या आपल्या जातीपातींच्या, आपापल्या गावातील वा प्रदेशांमधील लोकांना वर उचलून घेण्याचा आहे. अशा काळातही काळसेकरांनी कधी अशा गोष्टींचा विचार न करता केवळ तो चांगला लिहिणारा आहे, होतकरू आहे, एवढ्याच एका कारणासाठी आवर्जून प्रोत्साहन दिलेलं दिसेल. त्यांच्याविषयी, त्यांच्या कवितेविषयी त्यांच्या पाठीमागून टिंगलटवाळी करणारे, टीका करणारेही अनेक जण होते. काळसेकरांनाही त्याची कल्पना होती. पण, अशा माणसांविषयीही कधी कटुतेचा वा रागाचा शब्द त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाला नव्हता. काळसेकरांना असं कुणाविषयी सांगू गेलं की ते म्हणत, “तीही आपलीच भावंडं आहेत रे, मतभेद असू शकतात, शेवटी आपण सगळी माणसंच आहोत ना. तो अमका तमका लॅटिन अमेरिकन लेखक काय म्हणतो माहीत आहे का? तू वाचलंस का ते त्याचं नवं आलेलं पुस्तक? अरे काय अफलातून लिहिलं आहे, तुला सांगतो..” थोडक्यात काय, आपल्या एखाद्याविषयीच्या तक्रारीसुद्धा शेवटी त्यांच्या माणूसपणाच्या विशाल पुस्तकातच हरवून जायच्या. मला वाटतं, हेच ते दुर्मिळ असं काहीतरी होतं, जे त्यांना इतर कवी-लेखकांपेक्षा त्यांची अशी वेगळी ओळख दाखवून देणारं होतं. काळसेकरांशी गप्पा मारताना, त्यांच्या कविता वाचताना आणि त्यांच्याविषयी त्यांच्या जवळच्या सुहृदांकडून ऐकताना लक्षात येतं, या माणसाने जगण्यावर, माणसांवर, पुस्तकांवर किती मनापासून प्रेम केलंय! बरं, नुसतंच प्रेम नाही केलेलं, हा माणूस स्वतःही किती अफाट आयुष्य जगलाय, हेही कळत जातं. लघुअनियतकालिकांच्या चळवळीतला काळसेकरांचा सहभाग असो की डाव्या चळवळीतला, लोकवाङ्मय गृहाकडून पुस्तकं प्रकाशित करणं असो की हिमालयाच्या विविध भागांमध्ये मित्रांसह ट्रेकिंग करणं असो, काळसेकर वाट्याला आलेल्या किंवा त्यांनी स्वतःहून निवडलेल्या आयुष्यातील या प्रत्येक कृतीप्रसंगी समरसून तो तो क्षण जगले आहेत. कविता लिहिणं, पुस्तकं जमवणं आणि वाचणं, मित्रांशी गप्पा मारणं, भटकंती करणं या गोष्टींइतकंच काळसेकरांनी खाण्यापिण्यातल्या असंख्य गोष्टींवरही मनापासून प्रेम केलं. विशिष्टच काही हवं असा आग्रह जरी धरला नसला, तरी कोकणी मसाल्यांत बनवलेले पदार्थ खाणं त्यांना विशेष आवडत असे. त्यांना त्यांचं कोकणातल्या काळसे गावचं बालपण, आईच्या हातचं माशांचं कालवण किंवा सागोती वगैरे आठवत असे. त्यांचा मित्रगोतावळा देशभर पसरलेला असल्याने सगळीकडच्या चवीढवी त्यांनी चाखल्या होत्या. पण, कोकणात आल्यावर आम्हा मित्रांच्या घरी माशांचे विविध प्रकार खातांना, ‘कुणी काहीही म्हणो, पण आपल्या मालवणी जेवणाची सर कशालाच नाही हां!’ असं ते सांगायला विसरत नसत. गमतीचा भाग सोडून दिला तरी काळसेकरांमधला हा कोकणी वृत्तीचा माणूस त्यांच्या नंतरच्या कवितांमधूनही दाखवून देता येतो. ‘वयाला साजेसे’ या कवितेत ते म्हणतात, ‘माझे आई, बदलता आली नाही मातीत पुरलेली माझ्या नाळेची जमीन / आणि फेडता आले नाही तुझ्या गर्भाशयाचे अंगावरले कर्ज अजून... ’ अशा ओळी वाचताना देशभर प्रांतोप्रांती भटकून आणि जगभरातले महाकवी पचवूनही या कवीची आंतरिक नाळ अजूनही मातीशी घट्ट जोडलेली आहे, हे आपसूकच लक्षात येते. काळसेकरांविषयी विचार करत असताना राहून राहून एकच गोष्ट मनात येत राहतेय, लिहिणारे अनेक जण असतात, पण लिहिण्याइतकंच लिहिणाऱ्यांवर आणि त्यांच्या पुस्तकांवर प्रेम करणारा, पुस्तकांइतकाच माणसांचाही लोभी असलेला, माणसांइतकाच झाडापोडांना, चराचराला, निसर्गाला जीव लावणारा कवी काळसेकरांनंतर आजच्या वर्तमानात विरळाच म्हणावा लागेल. पुस्तकातल्या माणसांइतकंच माणसांतलं पुस्तक वाचू पाहणाऱ्या या पुस्तकप्रेमीला अखेरचा सलाम! आमेन! samwadpravin@gmail.com

बातम्या आणखी आहेत...