आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:गोष्ट "राज कुंद्रा'च्या अगोदरची...

3 महिन्यांपूर्वीलेखक: अमोल उदगीरकर
  • कॉपी लिंक

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योगपती राज कुंद्राला पॉर्न चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली अटक झाल्याने पॉर्न इंडस्ट्रीचा मुद्दा भलताच गाजत आहे. नवीन तंत्रज्ञान आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर करून राज कुंद्राने पॉर्न इंडस्ट्रीची मोठी साखळी उभारली आहे. "बी' ग्रेड चित्रपटांनी जो पाया रचला त्यावरच आज भारतात पॉर्न इंडस्ट्रीचा डोलारा उभा आहे. राज कुंद्राच्या निमित्ताने ज्यांनी भारतात "बी' ग्रेड चित्रपटांची लाट सुरू केली त्यावर "दिव्य मराठी दिवाळी अंक २०१५' मध्ये प्रकाशित झालेल्या अमोल उदगीरकर यांच्या एका लेखाचा हा संपादित अंश...

पडद्यावर चित्रपट सुरू आहे, पण प्रेक्षकांना काही देणंघेणं दिसत नाहीये... थिएटरमध्ये गच्च काळोख भरून राहिला आहे...सोबतीला एक अगम्य कुबट वास. पडदा पण फाटलेला... हजर असलेले प्रेक्षक कोपऱ्याच्या ‘सीटा’ पकडून आहेत... त्यात आपल्या शारीरिक गरजांचे काय करावं, हे न समजून तिथे आलेले काही टीनएजर्स, कचरा वेचणारे लोक आणि तत्सम खालच्या आर्थिक वर्गातून आलेले लोक यांचाच मुख्यत्वे प्रेक्षकांमध्ये समावेश आहे... स्त्रियांचं प्रमाण एकदम नगण्य. एखादं दुसरी भडक मेकअप केलेली बाई हजर आहे, तीसुद्धा एखाद्या फाटक्या व्यक्तीसोबत... त्या जोडीला चित्रपट बघण्यापेक्षा त्या गच्च काळोखात इतर गोष्टी करण्यातच जास्त रस आहे... इतक्यात पडद्यावर एखादा ‘तसला’ सीन सुरू होतो आणि एकटे एकटे आलेलं पब्लिक सरसावून बसतं... तो सीन संपतो आणि त्या पब्लिकचा रस संपतो. मध्यंतरापर्यंतच अर्धं थिएटर रिकामं होतं. शो संपतो... आक्रसलेलं थिएटर पुन्हा त्याच नवीन खेळासाठी सज्ज होतं... हे चित्र कुठलाही ‘कच्ची कली’, ‘डाकू हसीनाबाई’ किंवा ‘रेशमा की जवानी’ नामक चित्रपट दाखवणाऱ्या जीर्ण शीर्ण चित्रपटगृहात दिसतं. कुठल्याही चकचकीत मल्टिप्लेक्समध्ये असणाऱ्या दृश्याच्या एकदम उलट. सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांची पण एक विशिष्ट उतरंड आहे. या उतरंडीत सर्वात खालच्या स्थानी आहेत ते ‘बी ग्रेड चित्रपट’ दाखवणारे चित्रपट. जगभरात ‘बी ग्रेड’ चित्रपट म्हणजे, अतिशय कमी पैशात बनलेले, आशय-विषय सामान्य असलेले चित्रपट. पण आपल्याकडे या व्याख्येत अजून एक महत्त्वाचा घटक समाविष्ट होतो, तो म्हणजे, सर्वसामान्य प्रेक्षकांना आवडतो म्हणून मुळातच नसलेल्या कथेत टाकलेला, ‘सेक्शुअल कंटेंट’. या प्रकारच्या चित्रपटांना कुठल्याही प्रकारच्या वैश्विक जाणिवा नसतात. गेला बाजार चित्रपट माध्यमाची सामाजिक बांधिलकी वगैरे शब्दबंबाळ विषयांशी त्यांचा दुरान्वयेही संबंध नसतो. ‘मागणी तसा पुरवठा’ या अर्थशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाशी प्रामाणिक राहून प्रेक्षकांना आवडेल, ते देण्याचं असिधाराव्रत पाळत बी ग्रेड चित्रपट निर्माता - दिग्दर्शक कार्यरत असतात. भारताला बी ग्रेड सिनेमांचा फार जुना इतिहास आहे. बी. आर. इशारा, आय. एस. जोहर, विनोद तलवार वगैरेे मंडळी यात आघाडीवर होती. लैंगिक जाणिवांबद्दल अतिशय भंपक असलेल्या भारतीय समाजात लैंगिक उपासमार होणारे असंख्य लोक असणार आणि आपण त्यांना हवे ते मोठ्या पडद्यावर दाखवायचे, हे त्यामागचे सूत्र होते. नंतर या क्षेत्रात रामसे बंधूंचं आगमन झालं आणि या खेळाचे नियमच बदलून गेले. रामसे यांना चित्रपटांचा मोठा शौक होता. त्यांनी ‘शहीद ए आझम भगतसिंग’, ‘रुस्तुम सोहराब’सारख्या मोठ्या बजेटची चित्रपट निर्मिती केली; पण दैवाचे फासे फिरले. हे चित्रपट पडले. दिवाळखोरीची वेळ आली. यातून मार्ग कसा काढायचा? रामसेनी प्रोड्यूस केलेल्या ‘एक नन्ही मुन्नी लडकी थी’ चित्रपटात एक प्रसंग होता. चित्रपटात मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत असणारे पृथ्वीराज कपूर एक भीतिदायक मुखवटा घालून चोरी करतात आणि मुमताज या अभिनेत्रीला घाबरवतात, असा तो प्रसंग त्या चित्रपटात होता. या ‘भयानक’ प्रसंगातून रामसेंना प्रेरणा मिळाली. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अढळ स्थान मिळवून बसलेला आणि नंतर ‘कल्ट’ झालेल्या ‘दो गज जमीन के नीचे’ या भयपटाची निर्मिती केली. केवळ पंधरा लोकांच्या ‘क्रू’ने हा चित्रपट अवघ्या एका महिन्यात हातावेगळा केला. तिकीट खिडकीवर चित्रपट धो धो चालला आणि बी ग्रेड फिल्म्समधले ‘रामसे युग’ सुरू झाले. नंतर रामसे बंधूंनी ‘दरवाजा’सारखे तब्बल ३० लो बजेट भयपट प्रोड्यूस केले. तत्कालीन बी ग्रेड चित्रपट निर्मात्यांपैकी अजून एक महत्त्वाचं नाव म्हणजे जोगिंदर. ६५ वर्षांचा जोगिंदर २००९ मध्ये आपल्या जुहूमधील घरात मरण पावला, तेव्हा वर्तमानपत्रांत आतल्या पानावर त्याच्या मृत्यूची सिंगल कॉलम बातमी आली होती. पण एकेकाळी या जोगिंदरने सातत्याने बी ग्रेड हिट चित्रपट दिले होते. जोगिंदर हा एकाच वेळेस निर्माता, दिग्दर्शक, लेखक, संकलक आणि अनेक अशा जबाबदाऱ्या पार पाडायचा. तो ‘रंगा खुश’ या आपल्या पडद्यावर साकारलेल्या चरित्र भूमिकेच्या नावाने पण ओळखला जायचा. ‘Its so bad that it’s good’ या सिंड्रोमची रेलचेल त्याच्या चित्रपटात होती. ‘प्यासा शैतान’, ‘रंगा खुश’, ‘बिंदिया और बंदुक’ हे त्याचे काही गाजलेले चित्रपट. रद्दड कथा, उन्मुक्त अंगप्रदर्शन, दर पाच मिनिटाला येणारी गाणी ही जोगिंदरच्या चित्रपटांची काही व्यवच्छेदक लक्षणं. बी. आर. इशारा हे या प्रभावळीमधले अजून एक मोठं नाव. भारतीय चित्रपटामध्ये सेक्स आणि अतिशय बोल्ड संवाद आणण्याचं श्रेय बी. आर. इशारांचे. पु .ल . देशपांडे यांच्या भाषेत भालचंद्र नेमाडेंच्या ‘कोसला’ने मराठी सारस्वतांना डुलक्या घेताना पकडले, अगदी त्याचप्रमाणे पोरकट आणि सपक प्रेमकथांच्या विळख्यात अडकलेल्या बॉलीवूडला बी. आर. इशारा यांच्या ‘चेतना’ चित्रपटाने गदागदा हलवून झोपेतून उठवले. ‘चेतना’ चित्रपटाच्या पोस्टरवर शरीराचं प्रदर्शन करणारी रेहाना म्हणजे, मोठा बॉम्बगोळा होता. बी. आर. इशारांचे चित्रपट कमी बजेटचेे आणि बोल्ड कंटेंटवाले असले तरी त्या चित्रपटाना किमान कथानक असायचं. सामाजिक संदेश असायचा. समाजात असणाऱ्या सेक्सविषयक दुहेरी मापदंडांवर कोरडे ओढलेले असायचे. रामसे बंधू जर बी ग्रेड फिल्मचा भूतकाळ असतील, तर कांती शहा हा वर्तमानकाळ आहे. अनेक लोक त्याला ‘बी ग्रेड फिल्म्सचा करण जोहर’ म्हणूनही हिणवतात. कांती शहाने तब्बल ९० चित्रपटांची लेखन-निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. ‘डाकू मुन्नीबाई’, ‘गरम’, ‘कांती शहा के अंगूर’, ‘लोहा’, ‘शीला की जवानी’ या सेमी पोर्न चित्रपटांचा लेखक-दिग्दर्शक म्हणून तो सिंगल-स्क्रीन चित्रपटाच्या बाजारात खूप प्रसिद्ध आहे. छोट्या आणि सेमी-अर्बन भागात कांती शहाच्या चित्रपटांना आजही लाखोंचा चाहता वर्ग आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, असे म्हणतात. कांती शहाला तुम्ही यशस्वी मानत असाल, तर त्याच्या यशामागे पण एक स्त्री आहे. सपना तन्वीर. ही कांती शहाची बायको. पण ती कांती शहाच्या नुसते पाठीमागे उभी राहून थांबली नाही, तर त्याच्या चित्रपटांमध्ये तिने कॅमेऱ्यासमोर पण भरपूर ‘योगदान’ दिले आहे. कांती शहाच्या जवळपास प्रत्येक चित्रपटात तिने मुख्य अभिनेत्रीची भूमिका पार पाडली आहे. तिचा स्वतःचा असा एक फॅन बेस आहे. चित्रपट बघायला येणाऱ्या दर्शकांची एक सोशिओलॉजी असते. सलमान खानच्या चित्रपटात टाळ्या-शिट्ट्यांचा गजर चालू असतो. त्यातून त्याच्या चित्रपटांचा प्रेक्षक वर्ग कुठल्या वयोगटातला आहे, कुठल्या सामाजिक वर्गातून आला आहे, याचा अंदाज बांधता येतो. हॉलीवूड चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग म्हणजे, व्हाइट कॉलर, बहुधा उच्चवर्गातून आलेला, असा एक ‘स्टिरिओटाइप’ आहे. अर्थातच, हे काही आखीव नियम नाहीत, तर ढोबळमानाने मांडलेले अंदाज आहेत. बी ग्रेड फिल्म आणि या फिल्म्स ज्या चित्रपटगृहात लागतात, त्या थिएटरची पण स्वतःची ‘सोशिओलॉजी आहे. साधारणपणे या प्रकारच्या चित्रपटांना येणारा प्रेक्षक, हा समाजाच्या खालच्या आर्थिक स्तरातला. शारीरिक श्रम करून जगणारा असतो. स्वस्तात दोन घडी विरंगुळा म्हणून तो इथे येतो. मल्टिप्लेक्स आणि मोठे चकचकीत मॉल, इथे त्याला कागदोपत्री नसली तरी अघोषित प्रवेशबंदी असते. या प्रेक्षकाला बी ग्रेड फिल्म्स दाखवणाऱ्या चित्रपटगृहात राजरोस जाता येतं. कुठेही पाय पसरून बसता येतं. या चित्रपटांच्या प्रेक्षकांत टीनएजर्सचा अधिक भरणा असतो. देहविक्री करणाऱ्या स्त्रिया, असतातं. मध्येच एखादं समलैंगिक जोडपं येतं. समाजात ज्या गोष्टी राजरोस करायला परवानगी नाही त्या करण्याची परवानगी हा चित्रपटातला कुबट काळोख देतो. एकप्रकारे ही चित्रपटगृहे आपल्या समाजव्यवस्थेच्या ‘संकटकालीन खिडक्या’ असतात. आपल्या समाजाबद्दल आणि त्याच्या संस्कारीपणाबद्दल ज्यांच्या भ्रामक कल्पना आहेत, त्यांना या परिसरात फिरवून आणावे. त्यांची संस्कारीपणाची पुटं गळून पडतील. समाजातला मध्यमवर्ग या थिएटरकडे लांबूनच पाहत असतो. मनात प्रचंड औत्सुक्य असलं, तरी चेहऱ्यावर तुच्छता दाखवायचं कसब यांना साधलेलं असतं. हे लोक कधी इकडे फिरकत नाहीत. चुकून कुणी फिरकलाच, तर कुणी पाहिलं, तर लोक काय म्हणतील या टिपिकल मध्यमवर्गीय गंडाने तोंड लपवत फिरतात... पण, काळ बदलत आहे. चित्रपटसृष्टीची गणितं पण बदलत चालली आहेत. माहिती-तंत्रज्ञानाच्या प्रगतीपाठोपाठ आलेल्या मल्टिप्लेक्स संस्कृतीने सर्व समीकरणं बदलून टाकली आहेत. त्याचा फटका ‘बी ग्रेड’ फिल्म इंडस्ट्रीला बसला आहे. कोट्यवधी रुपयांचं बजेट असणारे मल्टिप्लेक्स आणि हे जीर्णशीर्ण सिंगल स्क्रीन थिएटर्स हा लढाच खूप विषम शक्तींमधला लढा आहे. खूपसा ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ वर्गातला लढा. डिजिटल क्रांतीच्या या काळात बी ग्रेड फिल्म इंडस्ट्रीला निभाव लागणं अवघड होत जाणार आहे. कदाचित पुढच्या दशकापर्यंत ही इंडस्ट्री व्यावसायिकदृष्ट्या नामशेषही झाली असेल. १९९२ पासून सुुरू झालेल्या आर्थिक उदारीकरणाचे देशावर अनेक चांगले आणि काही वाईट परिणाम झाले. परिणामापैकी एक म्हणजे, तंत्रज्ञानात भोवंडून टाकणाऱ्या गतीने होणारे बदल. दूरसंचार क्षेत्रात तर अभूतपूर्व बदल झाले. विशेषतः २००० सालानंतर या क्षेत्रात अनेक बदल होऊन हे क्षेत्र पीपल फ्रेंडली बनले. बहुतेक लोकांच्या हाती मोबाइल खेळू लागले. त्यामध्ये इंटरनेटची सोय होती. याचाही जीवघेणा फटका बी ग्रेड फिल्म इंडस्ट्रीला बसला. यापूर्वी असे चित्रपट किंवा त्यातले विशिष्ट ‘प्रसंग’ बघायला लोकांना थिएटरमध्ये किंवा एखाद्या व्हिडिओ पार्लरकडे जावं लागत असे. आता हे सगळं मोबाइलवर उपलब्ध झाले आहे. त्यामुळे बी ग्रेड फिल्म बघण्याचा प्रेक्षकांचा ओघ आटू लागला आहे. या सगळ्याला भारतीय लोकांच्या वर्णगंडाचा एक पैलू आहे. भारतीय पुरुषाच्या मनाला असणार गोऱ्या कातडीचं आकर्षण हे आपल्या वर्णवादी समाजाचं एक उघड गुपित आहे. भारतात आता वेगवेळ्या पोर्न साइट्स उपलब्ध आहेत. गोरी कातडी आणि गोऱ्या स्त्रिया यांचं आकर्षण असणारा भारतीय पुरुष आता भारतीय बी ग्रेड चित्रपटातल्या भारतीय अभिनेत्रींना पाहण्यास फारसा उत्सुक नाही. सनी लियोनसारखी पोर्न चित्रपटात काम केलेली अभिनेत्री भारतात येते, आणि लगेच बॉलीवूडमध्ये जम बसवते ही एका रात्रीत घडणारी घटना नाही. त्या अगोदर झालेल्या मोबाइल क्रांतीने तिला अगोदरच घराघरात पोहोचवले होते. २००० सालानंतर झालेल्या दूरसंपर्क क्रांतीला लागलेलं सनी लियोन हे एक फळ आहे. हा विषय तसा ‘टॅबू’ म्हणून गणला गेला असल्याने चार लोकांत या विषयावर बोलता येत नाही. पण बोलता येत नाही, म्हणून या विषयाचं गांभीर्य कमी होत नाही की वास्तव लपत नाही. भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा पहिल्या मानाच्या प्रभावळीत या चित्रपटांना जागा नसेल; पण सर्वात शेवटच्या रांगेत तरी हजारी मनसबदार म्हणून एक मानाचे पान त्याच्यासाठी नक्कीच राखून ठेवलेलं असेल. amoludgirkar@gmail.com

बातम्या आणखी आहेत...