आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गझलेच्या गावात:गझलेतील रक्षाबंधन

2 महिन्यांपूर्वीलेखक: बदीऊज्जमा बिराजदार (साबिर सोलापुरी)
  • कॉपी लिंक

आज रक्षाबंधनाचा सण आहे. बहीण-भावाच्या आयुष्यातील हा सौख्याचा दिवस आहे. बहीण भावाच्या हातावर राखी बांधते. राखीच्या धाग्यातून स्नेहाळ संबंध विकसित होत जातात. रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहीण-भावाच्या पवित्र नात्याला गझलकारांनी शेरांतून उजागर केलंय.

कौटुंबीक जीवनात विविध नात्यांचा गोतावळा निर्माण झालेला असतो. त्यामुळे जगणं गजबजून जातं. नात्यांच्या या भाऊगर्दीत बहिणीचं नातंही तितकंच महत्त्वाचं असतं. बहीण-भावाच्या नात्यात पावित्र्य असतं. बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी भावाच्या खांद्यावर असते. म्हणून आपण राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा सण दरवर्षी उत्साहात साजरा करतो. या सणाला बहीण भावाच्या हातावर राखी बांधते. राखीच्या धाग्यातून स्नेहाळ संबंध विकसित होत जातात. तिलक निरांजनाचं ताट घेऊन बहीण आपल्या लाडक्या भाऊरायास मायेनं ओवाळते. भाऊराया आनंदित होऊन बहिणीला भेट म्हणून ओवाळणी देतो. बहीण-भावाच्या आयुष्यातील हा सौख्याचा दिवस असतो. हा अत्यंत सुखद अनुभव असतो. दिवसागणिक एकमेकांविषयी अंतरंगातील प्रेम वाढत जाते. गझलकारांच्या बहुमुखी प्रतिभेस अन्य विषयाप्रमाणे कोणताही सणवार वर्ज्य नाही. रक्षाबंधनावर अनेक गझलकारांनी गझला लिहिलेल्या आहेत. त्यातील शेरांचा या लेखात अंतर्भाव करण्यात आलाय. निव्वळ रक्ताचीच नाती असतात असं नाही. रक्ताबरोबरच मानलेली नातीही असतात. ही नाती जगणं सूरमयी करत असतात. मानलेली नातीही महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतात. अशी नाती निखळ जिव्हाळ्यातून निर्माण झालेली असतात. ही नाती अंत:करणानं अंत:करणाला बांधणारी असतात. त्यातलं निर्व्याज प्रेम, आपुलकी शब्दातीत असते. त्यात कोणत्याही प्रकारचा दिखावा नसतो. प्रदर्शन नसतं. एखादी व्यक्ती अनाहूतपणे आपल्या जीवनात येते. आपल्यालाही नकळत बघता-बघता त्यांच्याशी आपलं घट्ट ऋणानुबंध निर्माण होतं. विचार जुळतात. परस्परांविषयी आदरभाव वृद्धिंगत होत जातो. यातून बहीण-भावाचं पवित्र नातं आकारला येतं. ही जगण्यातली खरी मिळकत असते. आपल्या जादूई स्वराच्या चांदण्यानं रसिकांची मनं उजळणाऱ्या सदाबहार गायिका आशा भोसले अन् गझलसम्राट सुरेश भट यांच्यातही असंच बहीण-भावाचं नातं होतं. आशा भोसले या सुरेश भटांना दादा म्हणत असत, अन् दादाही त्यांना ताई म्हणूनच संबोधत. शब्द-स्वराचं हे रसिकमान्य नातं होतं. दादांच्या अनेक गीतांना-गझलांना आशाताईंनी आपला सुमधुर कंठ दिलाय. इतकेच नव्हे तर 'सप्तरंग' या दादांच्या कवितासंग्रहास त्यांनी प्रस्तावनाही लिहिलीय. त्यात दादांच्या स्वभाव वैशिष्ट्यांसह अनेक आठवणी सांगितल्यात. दादांनीही आशाताईंच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर गझल लिहून त्यांना जणू ओवाळणीच दिलीय. हा कंठ तुझा अलबेला! हा रंग तुझा मतवाला तलवार तुझ्या गाण्याची बिजलीसम चमकत राहो! रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या ओतप्रोत जिव्हाळ्याचा सण आहे. या पवित्र सणाला दोघांनाही एकमेकांची आवर्जून आठवण होतेच. परंतु ज्या भावाला एखादी बहीणच नसते. तो दुर्दैवी असतो. त्याला हा सण काहीसा सुनासुना वाटतो. या दिवशी राखीचं मोल काय असतं हे त्या हातांना ही उमजतं. आज मला कोण ओवाळतील, ओवाळणीसाठी माझ्याशी लाडीकपणे कोण भांडतील या प्रश्नानं तो भाऊ कमालीचा कासावीस होऊन जातो. त्याचं मन कातर होतं. आजच्या पवित्र दिनी बहिणीचं नसणं हा जीवनातला किती दुःखद प्रसंग असतो. याची त्याला पावलोपावली प्रकर्षानं जाणीव होत राहते. ती नसतानाही तिच्या असण्याचा भास होत राहतो. उदासीच्या छटा मनभर व्यापतात. ज्याला बहीण नसते अशा भावाची व्यथा वैभव कुलकर्णी यांनी यांच्या शेरातून व्यक्त केलीय. त्या हातांना राखीची किंमत कळते ज्या भावाला बहीण नसते एखादी राखीचा धागा हा नुसता धागा नसतोच मुळी. त्या धाग्याला घट्ट मायेचे, निखळ प्रेमाचे अन् सर्वस्वी जबाबदारीचे पीळ असतात. हा धागा बहिणीचे जन्मभर रक्षण करण्याची भावाला सतत जाणीव करून देत असतो. बहिणीनं भावाच्या हातावर बांधलेली राखी म्हणजे फक्त धागा अन् बेगड नसते. ती राखी असते पवित्र नात्याचं, प्रेमाचं प्रतीक. जगणं अन् जग सुंदर करणारा हा बहीण-भावाचा सण असतो. कोमल नात्याचे सैल धागे घट्ट जुळविण्याचा हा दिवस असतो. नितीन देशमुख यांच्या शेरातून नेमकी हीच जाणीव प्रकट होतेय. हा राखीचा धागा नुसता धागा नाही जन्मभराची माझी जबाबदारी आहे रक्षाबंधनाच्या सणानं भावाच्या सामर्थ्याला सत्व लाभतं. म्हणून त्याचे मनगट सजते. बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते म्हणजेच ती दोऱ्यानं विश्वासाचा धागा विणते. ही नात्यांची वीण दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट होत जाते. ही वीण कधीही सैलसर होणार नाही. याची हमी भाऊराया आपल्या लाडक्या बहिणीस देत असतो. राखीचा धागा विश्वासाचा, भरवशाचा असतो. रक्षाबंधनाचा हा सण म्हणजे बहिणीच्या रक्षणाचं भावावर बंधन असतं. भाऊ कर्तव्यभावनेनं बांधला गेलेला असतो. बहिणीनं हातावर बांधलेली राखी भावाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देत असते. ही जाणीव बळकट होत जाते. त्याचा भावाला कधीच विसर नाही पडत. अभिजीत काळे म्हणतात, सामर्थ्याला सत्व लाभते मनगट सजते दोऱ्याने ती विश्वासाचा धागा विणते रक्षाबंधनाच्या सणास बहिणीला भावाच्या भेटीची मोठी आतुरता लागून राहिलेली असते. सकाळपासूनच बहीण-भावाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असते. भिरभिरत्या नजरेनं पाहात असते. आज माझा बंधुराया येणार आहे. माझ्या हातून राखी बांधून घेणार आहे. मला ओवाळणी देणार आहे. या विचारानं ती मनातून सुखावून जाते. वेड्या बहिणीची ही वेडी माया असते. हा दोघांसाठी सद्भावनेचा दिवस असतो. बहीण-भावाला वंदन करण्यासाठी आसुसलेली असते. बहिणीच्या या अंतरिक भावना अनिल जाधव अशा पद्धतीनं मांडतात. तुझ्या नि माझ्या प्रेमाचा रे, सण हा रक्षाबंधन रक्षण कर तू भावा माझे, करिते तुजला वंदन! रक्षाबंधनाला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. खास बहीण-भावाच्या पवित्र नात्यास अधोरेखीत करणाऱ्या या सणाला मोठी परंपरा आहे. या पवित्र बंधनातूनच द्रौपदीनेही भगवान श्रीकृष्णाच्या हातावर चिंधी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. हे सर्वश्रुत आहे. यातूनच भारताची महान अन् वैविध्यपूर्ण संस्कृती जगाच्या पटलावर आली. रक्षाबंधनास भावनिक अन् सांस्कृतिक दृष्ट्याही महत्त्वाचं स्थान लाभलंय. वर्षानुवर्षे हा सण सहर्ष साजरा होत आलाय्. यातलं अनोखेपण तिळमात्र संपलेलं नाही. आशिष कुळकर्णी यांनी त्यांच्या शेरातून रक्षाबंधनाचं सांस्कृतिकदृष्ट्या पावित्र्य विशद केलंय. जोडतो आहे पवित्र बंधनातून जुन्या संस्कृतीला द्रौपदीने बांधली चिंधी कृष्णाला रक्षाबंधनाला नारळी पौर्णिमा हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी समुद्रकिनारी राहाणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला श्रीफळ अर्पण करतात. विशेषतः याच दिवशी मासेमारी करणारे महाराष्ट्रातील कोळी बांधव अन् समुद्राशी निगडीत असलेल्या व्यवसायांतील अन्य लोकही समुद्राची पूजाअर्चा करून त्यास नारळ अर्पण करतात. पावसाळ्यात बंद असलेले मासे पकडणे या दिवसापासून पुनश्च सुरु होते. ज्या कुटुंबात रोजच्या खाण्यात नारळ नसतो, त्याही मराठी घरांमधून त्यादिवशी नारळी भात, नारळाच्या वड्या यांसारखे खाद्यपदार्थ बनवतात. या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे बहीण भावाच्या हातावर राखी बांधते. यावरून या पौर्णिमेला राखीपौर्णिमा असे म्हणतात. त्याचप्रमाणे नारळी पौर्णिमाही म्हणतात. नारळी पौर्णिमेला धीवरच्या म्हणजे कोळी बांधवांच्या प्रेमाला भरते येते. याकडं प्रकाश क्षिरसागर यांनी लक्ष वेधलंय. अर्पितो दर्यास आम्ही श्रीफळाला आदराने नित्यनेमे मासळीची धीवराला प्रेमभरती! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहीण-भावाच्या पवित्र नात्याला गझलकारांनी शेरांतून उजागर केलय्. त्याप्रमाणे नारळी पौर्णिमेचं महत्त्वही विशद केलंय. contact@sabirsolapuri.com

बातम्या आणखी आहेत...