आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Rasik Special Marathi Bhasha Divas | Digital Marathi Article Marathi | Vishvanath Garud Special Article For Marathi Language Day Digital Marathi

‘डिजिटल’ मराठी:मातृभाषेला नवमाध्यमांत चांगले दिवस

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओंकार पुण्यामध्ये एका आयटी कंपनीत काम करतो. कंपनीच्या टार्गेट्समुळे दिवसभर खूप तणावात असतो. पण, रात्री झोपण्यापूर्वी तो नेहमी समाज माध्यमांवरचे काही मजेशीर व्हिडिओ बघतो. त्यामुळे त्याचा दिवसभरातील ताण काहीसा हलका होतो आणि शांत झोप लागते. हे व्हिडिओ तयार करणारे पदवीधरही नाहीत, ही गोष्ट वेगळी.. रतन हे एक ज्येष्ठ पत्रकार. गेली २५ वर्षे ते वृत्तपत्रामध्ये काम करतात. पण, गेल्या ३-४ वर्षांत त्यांना एक वेगळीच सवय लागली. आपल्या वृत्तपत्रातील अग्रलेख ऑनलाइन माध्यमावर प्रसिद्ध झाल्यानंतर त्याखाली आलेल्या मजेशीर, खोचक, नेमक्या प्रतिक्रिया वाचण्याची. अनेक वेळा अग्रलेखातून जेवढी माहिती मिळते, त्यापेक्षा एकदम हटके दृष्टिकोन त्याखाली असलेल्या प्रतिक्रियांमधून मिळतो आणि म्हणूनच रतन यांना या प्रतिक्रिया वाचायला आवडतात.

ही झाली काही उदाहरणे. समाज माध्यमांनी १० वर्षांत काय दिले, याचा शोध घेताना एकच उत्तर समोर येते, ते म्हणजे प्रत्येकाला व्यक्त होण्याची समान संधी मिळाली.

काही ठराविक लोकांनीच व्यक्त व्हायचे आणि इतरांना उपदेश देत राहायचे, हा काळ संपला, हे मान्य करावेच लागेल. आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर व्यक्त होण्याची संधी आता प्रत्येकाला मिळाली आहे. आणि अनेकांनी न घाबरता व्यक्त होऊन आपली मते बिनधास्तपणे मांडलीही आहेत. आता अशी संधी मिळायला हवी की नको, काही जणांच्या एकतर्फी विचारांमुळे समाजाचे नुकसान होते, कोणीही उठतो काहीही लिहितो, भाषा बघा त्यांची किती वाईट आहे.. वगैरे प्रश्न उपस्थित होतात. ते नाकारताही येणार नाहीत. पण, हे प्रश्न उपस्थित होतात म्हणून सगळ्यांना व्यक्त होण्याची संधी नाकारणे तितकेच अतिरेकी आहे. तंत्रज्ञानातील बदलांमुळे उपलब्ध झालेल्या सुविधा सगळ्यांसाठी एकसारख्याच आहेत.

आता त्यांचा वापर कसा करायचा, हे ज्याचे त्याने ठरवायचे. लाखो लोक या सुविधांचा वापर करून व्यक्त होतात, त्या वेळी त्याचे प्रमाणीकरण करणे केवळ अशक्य आहे. विविधतेने नटलेल्या आपल्या देशात तर हे कायमस्वरूपी आव्हानच असणार. मग समोरच्याला काय सांगायचे आहे, ते समजून घेण्याचा प्रयत्न वाचक किंवा श्रोते म्हणून आपण अधिक प्रामाणिकपणे केला पाहिजे. सांगणाऱ्याची भाषा, त्याचे हावभाव, देहबोली, दिसणं हे सर्व मुद्दे दुय्यम ठेवले पाहिजेत. समाज माध्यमांमध्ये ज्यांना ‘इन्फ्लुएन्सर्स’ म्हणतात, त्यांना एकदा नीट बघा. त्यातील सगळे दिसायला छान असतात किंवा अस्खलितपणे बोलतात, असे मुळीच नाही. पण, तरीही त्यांची व्यक्त होण्याची पद्धत, त्यांनी उपस्थित केलेले विषय आवडतात म्हणून लोक त्यांना फॉलो करू लागतात आणि ते प्रसिद्ध होतात.

मोबाइलवर एखादा रेसिपी शो पाहत असताना व्हिडिओतील ताई एखादी रेसिपी कशी दाखवत आहेत, या नव्या माध्यमाशी त्यांनी कसे जुळवून घेतले आहे, हे बघायचे की बोलताना त्या ‘आणि’ म्हणतात की ‘आनि’ यावरून टिंगलटवाळी करत बसायचे, हे ज्याचे त्याने ठरवायचे. समाज माध्यमांचा इतिहास असे सांगतो की टिंगलटवाळी करणारे फार काही साध्य करू शकत नाहीत. पण, जे सतत नवं काही तरी देण्याचा प्रयत्न करतात, लोकांना काय हवंय, हे समजून घेऊन त्यावर काम करत राहतात तेच या माध्यमात यशस्वी होतात. दुसरीकडे, ज्यांना यशस्वी होता येत नाही ते कायम समोरचा कसा चुकीचा आहे, हेच सांगत राहतात.

वृत्तपत्रांमध्ये ‘वाचकांचा पत्रव्यवहार’ असे सदर असते. ८०-९० च्या काळात राज्यातील किंवा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील एखाद्या विषयावर वाचकांना काही मत मांडायचे असेल, तर थोडक्यात मुद्दा मांडणारे पत्र लिहून ते वृत्तपत्राच्या कार्यालयात पाठवायला लागायचे. या सदरात कोणती पत्रे प्रसिद्ध करायची, हे ठरवण्याचे काम संपादकीय विभागातील वरिष्ठ पत्रकार करायचे. आज २०२२ मध्ये असे काहीही करण्याची गरजच उरत नाही. समाज माध्यमांमुळे वाचकांना थेटपणे आपले मत संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचवता येते. काही वेळा एखाद्या सामान्य वाचकाचे मत किंवा व्हिडिओ व्हायरल होऊन ती व्यक्ती संपूर्ण देशात प्रसिद्ध होण्याची शक्यताही राहतेच. अशा वेळी आशयच महत्त्वाचा ठरतो. तिथे छिद्रान्वेषीपणे चुका शोधण्यात खरं तर काही हशील नसते.

समाज माध्यमामुळे आणखी एक गोष्ट प्रकर्षाने घडली, ती म्हणजे आशयामध्ये वैविध्य आले. वेगवेगळ्या भागातील, गाव-खेड्यातील, सामान्य कुटुंबातील, चाळीतील, सोसायटीतील, नळावरची आणि चौकाचौकातील अशी वेगवेगळ्या ठिकाणची माहिती उघडपणे सगळ्यांपर्यंत जायला लागली. तुम्हाला आवडलं तर फॉलो करा, नाही आवडलं तर ब्लॉक करा. स्वातंत्र्य वाचकांच्या हातात आलं. पण, त्यामुळे वेगवेगळे विषय पुढे येऊ लागले. ज्या विषयावर बोलायला माध्यमेही सरसावत नव्हती, त्यावर सामान्य माणसे बोलायला लागली. तंत्रज्ञानाचा वापर करून आपापल्या परीने पुढे सरकायला लागली.

समाज माध्यमांच्या अवकाशात मराठीने नक्कीच उत्तुंग झेप घेतली आहे. गुगलच्या एका अभ्यासानुसार, २०२३ पर्यंत प्रादेशिक भाषाच नवमाध्यमामध्ये वेगाने पुढे जातील. कितीही उच्चशिक्षित असले, तरी लोकांना त्यांच्या मातृभाषेत व्यक्त व्हायलाच जास्त आवडते. त्यामुळे मराठीतून लिहिते होणाऱ्यांना येत्या काळात आणखी चांगले दिवस येणार आहेत. समाज माध्यमांमध्ये सध्या जे सुरू आहे, त्यातील चांगल्याचा पुरस्कार सजग नागरिक म्हणून आपणच केला पाहिजे आणि जे चुकीचे आहे त्याला तिथेच विरोधही केला पाहिजे. मात्र, हे सगळं सुरू असताना आशय किंवा मुद्दा हाच महत्त्वाचा घटक असला पाहिजे. भाषा, सादरीकरणामध्ये सुधारणेला संधी असते आणि ती कायमच उपलब्ध राहते, हे विसरून चालणार नाही.

समाज माध्यमांच्या अवकाशात ‘मराठी’ने नक्कीच मोठी झेप घेतली आहे. ‘गुगल’च्या एका अभ्यासानुसार, २०२३ पर्यंत प्रादेशिक भाषाच नवमाध्यमांमध्ये वेगाने पुढे जातील. कितीही उच्चशिक्षित असले, तरी लोकांना त्यांच्या मातृभाषेत व्यक्त व्हायलाच जास्त आवडते. त्यामुळे डिजिटल माध्यमांत मराठीतून लिहिते होणाऱ्यांना आणखी चांगले दिवस येणार आहेत.

विश्वनाथ गरुड
संपर्क : 9881098120
gwishwan@gmail.com

बातम्या आणखी आहेत...