आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवं कोरं:​​​​​​​पाणजंजाळ : शहारे आणणारा थरारक अनुभव

एका वर्षापूर्वीलेखक: प्रदीप वानखेडे
  • कॉपी लिंक

सामाजिक विषयावरची एखादी कादंबरी यशस्वी होईलच याची ठोस हमी देता येत नाही. परंतु सुरेश पाटील हे त्याला अपवाद ठरले आहेत असंच म्हणावं लागेल. त्यांच्या ‘दाह’, ‘नक्षलबारी’ या कादंबऱ्यांचा पट विशाल व पात्रांची संख्याही मोठी होती. तरीही त्या भेदक व बाजूबंद ठरल्या. पाटील यांची याच पठडीतील अलीकडेच प्रकाशित झालेली ‘पाणजंजाळ’ ही कादंबरीही रसरशीत व अंगावर शहारे आणणारी आहे.

नुकत्याच झालेल्या ढगफुटीत संपूर्ण कोकण उद्धवस्त झालं. "तळीये' गावावर तर डोंगर चाल करून आला. त्याखाली असंख्य निष्पाप जीव गाडले गेले. राज्यात अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या. या निमित्तानं सुरेश पाटील यांच्या "पाणजंजाळ' या कादंबरीतील पैंजणवाडीची आठवण होऊन अंगावर शहारे आले. एखादा लेखक निसर्ग, समाजमन जाणून घेताना एखाद्या विषयाशी किती तादात्म्य पावतो, याचं मराठी साहित्यातील हे दूर्मिळ उदाहरण म्हणायवा हवं.

ऐतिहासिक, पौराणिक विषयांमध्ये वाचकाला बांधून ठेवण्याची अंगभूत क्षमता असते. सामाजिक विषयांच्या बाबतीत तसं म्हणता येत नाही. सामाजिक विषयावरची एखादी कादंबरी यशस्वी होईलच याची ठोस हमी देता येत नाही. परंतु सुरेश पाटील हे त्याला अपवाद ठरले आहेत असंच म्हणावं लागेल. त्यांच्या ‘दाह’, ‘नक्षलबारी’ या कादंबऱ्यांचा पट विशाल व पात्रांची संख्याही मोठी होती. तरीही त्या भेदक व बाजूबंद ठरल्या. पाटील यांची याच पठडीतील अलीकडेच प्रकाशित झालेली ‘पाणजंजाळ’ ही कादंबरीही रसरशीत व अंगावर शहारे आणणारी आहे. ही कादंबरी कमालीची चित्रदर्शी व गतीमान झाली आहे. आपण कादंबरी वाचत आहोत, की कादंबरीतील प्रसंग आपल्या साक्षीने घडत आहेत असा प्रश्न पडत राहतो! विषयात असलेली अंगभूत ऊर्जा, सखोल व अभ्यासपूर्ण आक्रमक मांडणी यामुळे कादंबरी महापुराच्या लाटेसारखीच अंगावर येत राहते.

महापूर, अतिवृष्टी म्हटलं तर अपरिमित नुकसान आलं, उद्ध्वस्त झालेले संसार आले, मानसिक-भावनिकदृष्ट्या खचलेली माणसं आली; पण ‘पाणजंजाळ’ इथंच थांबत नाही. जणू काही अतिवृष्टी, महापुरात हे घडणारच असतं हे गृहीत धरून कादंबरी दुःखाचा बांध ओलांडून पुढे झेप घेते. हे का घडतं इथंपासून त्यावरचे उपाय काय, हेही कथानकाच्या ओघात ही कादंबरी सांगते. लेखकाची ही विधायक भूमिका अचंबित करणारी आहे. अतिवृष्टी पूर्वी होत नव्हती की महापूर येत नव्हते? पण आज त्याचं स्वरूप कमालीचं बदललेलं आहे. फसलेली नियोजनं, सिकुडलेल्या नद्या, मानवी वसतींनी ओढ्याओहोळांचे घेतलेले बळी, संपत्तीच्या हव्यासानं जंगलंही पादाक्रांत करणारा नगरविकास, संपत्तीच्या पाठीमागे लागलेले राजकारणी-सत्ताधारी, बिल्डर लॉबी, आदी घटकांमुळे दुःखाचा हा मळवट जनतेच्या भाळी लिहिला गेला आहे. हे वास्तव मांडताना लेखणी कमालीची धारदार व आक्रमक झाली असून सर्वसामान्यांच्या दुःखावरची खपली काढण्याचं काम ती करते. ‘पाणी जगण्याला बळ देतं, तसं मृत्यूलाही कारणीभूत ठरतं’ याचा प्रत्यय पदोपदी येतच असतो. हाच विचार घेऊन कादंबरी पैंजणवाडीसारख्या ग्रामपातळीपासून कन्याकुमारी ते काश्मीर, ईशान्यपूर्वेकडील राज्यापर्यंतचा विविधांगी विशाल पट मांडते. तो विचारप्रवर्तक तसा मती गुंग करणारा आहे. अती पाऊस मुंबई बुडवतो. चेन्नई, बेंगलुरू, दिल्ली, जयपूरसारख्या शहरांची कथा यापेक्षा वेगळी नाही. भारतात दरवर्षी बहुसंख्य राज्यांना महापुराचे, अतिवृष्टीचे फटके बसतात. हे आजच का घडतं, हा लेखकाचा सवाल काळजाचा ठाव घेणारा आहे. पर्यावरणासंबंधीचे विविध अभ्यास अहवाल अडगळीत टाकण्याच्या प्रवृत्तीवरही ओढण्यात आलेले कोरडे मनाला भावतात. कादंबरीच्या सुरुवातीलाच अवघ्या दोन परिच्छेदांमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागात एकाचवेळी बदललेल्या वेगवेगळ्या वातावरणाचा घेतलेला धांडोळा विषयाचं गांभीर्य व लेखकाची प्रगल्भता दाखवण्यास पुरेसं आहे. वातावरणातील बदल व त्यातून येत असलेलं महापुरासारखं संकट हा सध्या जगभरात चिंतेचा विषय ठरला आहे. अतिप्रगत अमेरिका, जर्मनी, चीन, फ्रान्स, स्पेन... असं त्याला कोणत्याही देशाचं वावडं नाही. त्यामुळेच कादंबरी स्थानिक परिप्रेक्ष्यात बंदिस्त न राहता तिला आपोआपच वैश्विक परिमाण लाभते. कादंबरी प्रयोगशील, सर्जनशील आहे. कथानकाच्या अनुषंगाने नदीचा महापूर व मानवी भावभावना यांची घालण्यात आलेली सांगड अंतर्मनाचा ठाव घेते. मराठी साहित्यात हा प्रकार तसा नवीनच म्हणावा लागेल. नैसर्गिक महापूर हा तसा क्लिष्ट विषय; परंतू लेखकानं इथं मानवी भावभावनांच "माध्यम' वापरून त्याची सांगड महापूराशी घातल्याने कादंबरी रसरशीत व समतोल झाली आहे. या निमित्ताने निसर्गालाही भावना असतात व निसर्गाशी खेळ मांडला तर काय होतं, याचं चित्रण थिजून टाकतं. जे आपण कालच्या पावसात चिपळूणसह कोकण किनारपट्टी व पश्चिम महाराष्ट्रात अनुभवलं. भावनिक महापुरात व्यक्तिगत जीवन उद्ध्वस्त करण्याची ताकद असते, तर नदीचा महापूर सगळंच उद्ध्वस्त करतो या समांतर विचारधारेवर कादंबरीचा होत असलेला हा प्रवास प्रचंड दाहक आहे. माणसामध्ये प्रेम, वात्सल्य, स्पर्धा, संघर्ष, विषयलोलुपता अशा अनेक भावभावना नांदत असतात. तर, तापमानात वाढ, अतिवृष्टी, वादळं, हाडं गोठवणारी थंडी, महापूर अशा निसर्गाच्याही नाना कळा अनुभवास येतात. या मात्रांमधील संतुलन कमी-जास्त झालं तर ते दोन्हीकडेही विध्वंसक ठरतं. मानवी भावभावना व निसर्गाचा हा खेळ यांचा सुरेख मेळ, गुंफण इथं पाहायला मिळते. मृत्यूही माणसाचा पाठलाग करतो, हे यवनी सैनिकांच्या रुपातील कादंबरीतील आणखी एक सूत्र विषयाच्या परिणामकतेला उठावच देते. कादंबरीला पोलीस विभागाची पार्श्वभूमी असून खाकी वर्दीत फुलणारं प्रेम, त्याचे कंगोरे अंतर्मनाला भिडतात. बलराज हा कादंबरीचा नायक असून तो पीएसआय आहे. प्रिया व गौरी या कादंबरीच्या नायिका. या त्रिकोणाभोवती फिरणाऱ्या या भावनिक महापुरामध्ये संवेदना गोठवण्याची ताकद आहे. त्याला निसर्गाच्या तांडवाची, रौद्र रूपाची फोडणी मिळाल्याने तो अधिकच प्रबळ झाला आहे. प्रेमाच्या या त्रिकोणामध्ये उठणारा प्रसंगोचित मानवी भावभावनांचा कल्लोळ हा मानसशास्त्रीयदृष्ट्या कादंबरीला अधिकाधिक उंचीवर घेऊन जातो. अनाहूत भीतीनं पलायन करणाऱ्या नवऱ्याला हात देणारी त्याची पत्नी अर्चना, म्हाताऱ्या आजोबाची काळजी घेणारी इवलुशी शकू, मध्यरात्री भीतीनं उठून आपल्या लेकीच्या कुशीत शिरलेली राधाई, मुंबईसारख्या बलाढ्य शहरात नदीचं पाणी घरात शिरेल काय या चिंतेत असलेला लाला खडपे, वडिलांच्या काळजीनं गलितगात्र झालेली प्रिया, लेकाच्या लग्नाची आस लावून असलेला गोविंदासारखा बाप, मरणाच्या भीतीनं गारठलेला अमित मोदी... अशी विविध भावभावनांनी लिप्त असलेली माणसं ही कादंबरीच्या मर्मबंदातील ठेवच म्हणावी लागेल. जमिनीत मुरणाऱ्या पाण्यासारखी त्यांच्याकडे अंतर्मनात उतरण्याची क्षमता असून ती कधी मनाचा ताबा घेतात हे कळतही नाही. महापुराच्या बुडाशी हात घालून त्याची अभ्यासपूर्ण मांडणी करताना लेखकाने घेतलेले कष्ट मनाचा तळ व्यापून राहतात. श्रावणातील ऊन-पावसासारखाच कधी सुंदर तर कधी काळजाला घरं पाडणारा हा खेळ आहे. मानवानं कितीही प्रगती केली तरी निसर्गापुढं मानव हा कस्पटासमान असल्याचं दुःख मात्र कादंबरी वाचताना सातत्याने टोचत राहतं. कादंबरीतील भाषाही अत्यंत रसाळ असून तिला अंगभूत गोडवा आहे. ‘घरच्या सौभाग्यवतीपेक्षा ठेवलेल्या आवाचा रुबाब हा नेहमीच मोठा असतो’, ‘काळजात रुतलेले हे खुंटे उपसता उपसत नव्हते’, ‘बदनामीची रांग... तिथं माणसाला चटकन स्थान मिळतं!’, ‘मायेच्या या ओलसरपणानं गौरी खुळावली.’ कादंबरीचा मुकुटमणी ठरणाऱ्या या भाषेत महापुरात वाहणाऱ्या ओंडक्यासारखी वाचकाला आपल्या प्रवाहात घेण्याची ताकद आहे. ‘जिल्हाधिकारी पदावर असाच एक ढोलकीच्या तालावरचा नाच्या होता. त्याच्यासमोर जायचं तर छातीवर पदर घेऊनच जावं लागायचं. वखवखलेलं जनावरच ते!’ हा आग ओकणाऱ्या भाषेचा लहेजा एकीकडे, तर ‘या चिंतेतून तुलाच मार्ग काढायचा आहे. मन भिजलं, गारठलं तरी त्याला उब देण्याचं काम आपणच करायचं असतं...’ अशी मनाला उभारी देणारी, गारवा शिंपडणारी भाषा दुसरीकडे. धरतीच्या पोटातून उगवणाऱ्या विविध प्रकारच्या अंकुरासारखीच भाषेची ही टवटवीत प्रसव. प्रसंगोचित भाषेचे, संवादाचे असे प्रयोग हे कादंबरीचं आणखी एक बलस्थान आहे. महापूर, अतिवृष्टी हे तसे बातम्यांचे विषय; परंतु कादंबरीत त्याला कुठंही पत्रकारिता वा अॅकॅडेमिक भाषेचा, स्वरूपाचा गंध नाही हेही लेखकाचं कौशल्यच म्हणावं लागेल. महापूर, अतिवृष्टीसारखा गंभीर विषय हाताळताना लेखकानं प्रसंगोपात दाखवलेली सजगता व गांभीर्य मोलाचं आहे. या लेखनामध्ये नवी प्रेरणा आहे, परिचयाचं असूनही अलक्षित दुःखाचे कढ आहेत. असा आशयाची व्यापकता असलेला परखड, सर्वस्पर्शी, जातिवंत व टोकदार आविष्कार क्वचितच पाहायला मिळतो. कादंबरीतील अवाढव्य निसर्ग हाही स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरावा. अत्यंत सूक्ष्मपणे मांडलेली निसर्गाची रूपं मती गुंग करतात. इथं निसर्ग फक्त वर्णनाच्या पातळीवर न राहाता त्याच्या सान्निध्यात वाढलेल्या संस्कृतीलाही काखोटीला मारून कादंबरी मार्गक्रमणा करते. त्यातून लेखकाची सामाजिक जाण व भान किती व्यापक आहे हे कळून येतं. पैंजणवाडीच्या दरीत मोराच्या पिसाऱ्यासारखं रिंगण धरणारा पाऊस मनःचक्षूसमोरून हलता हलत नाही. रोरावणाऱ्या नद्या, अवखळ ओढ्यांचा आक्रोश, झाडाझुडपांच्या पानावर तडतडणारं पावसाचं साग्रसंगीत, बेभान वाऱ्याचा अंगावर काटा मारणारा हैदोस, शिवाय सह्याद्रीच्या डोंगरदऱ्या मनाला भुरळ तर घालतातच; परंतु या पार्श्वभूमीवर उभा राहिलेली कथानकातील गुंतागुंत खिळवून ठेवते. नैसर्गिक सौंदर्य आणि विध्वंस यांचा हा खेळ मनाला चटका लावणारा आहे. ज्या घटकामुळे दुःख झालं, आयुष्याचा पोत बदलला त्याचाच आयुधासारखा वापर करून दुःखं हलकं करण्याची प्रिया, तसंच गौरीची रित हा कादंबरीतील मानसशास्त्रीय पातळीवरचा प्रयोगही परमोच्च बिंदू ठरावा. कादंबरीतील प्रत्येक पात्र हे मानसशास्त्रीय विश्लेषण वा अभ्यासाचा विषय होऊ शकतं. या कादंबरीकडे विशेष मापदंडाच्या परिप्रेक्ष्यात पाहून चालणार नाही. बहुपदरी व अवाढव्य काम आहे हे. सद्यविषयावर असलेल्या या कादंबरीनं मराठी साहित्याचं दालन समृद्ध करण्याचं, उजळवण्याचं मोलाच काम केलं आहे, हे मात्र निर्विवाद. कादंबरी - पाणजंजाळ लेखक - सुरेश पाटील प्रकाशक - संस्कृती प्रकाशन पाने - 512, किंमत - 650 रु. pradipwankhede52@gmail.com

बातम्या आणखी आहेत...