आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवं कोरं:"टिश्यू पेपर' संग्रही का ठेवावा...?

3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रशांत पवार
  • कॉपी लिंक

टिश्यू पेपर... म्हटलं तर हा सारं काही मुकाट्याने शोषून घेतो आणि त्यातच संपतो. हा सोसण्याचा, संपण्याचा, संपून पुन्हा नव्याने उभारी घेण्याच्या प्रवासात समाजाच्या नजरेला कधीही न दिसलेलं जग पुढे आणण्याचा प्रयत्न रमेश रावळकरांनी त्यांच्या "टिश्यू पेपर' या कादंबरीतून केला आहे.भारतासारख्या देशातील दोन वर्गातील दरी पाहायची असेल, तर आपल्या जवळपासचे परमीट रूम, बार, हॉटेल हे एक उत्तम अनुभवक्षेत्र असते. अशा ठिकाणी काम करणाऱ्या कामगाराच्या आयुष्याचा पट रमेश रावळकर यांनी "टिश्यू पेपर' या कादंबरीत चित्रित केलेला आहे.

२४ जून २०१८ ची सकाळ... रविवार असल्याने अगदी आरामात उठलो आणि फोन ऑन केला. एकापाठोपाठ एक वॉट्सअपचे मेसेज वाजायला लागले आणि हे प्रमाण नेहमीपेक्षा कित्येकपटीने अधिक असल्याचे मला लगेचच जाणवायला लागले. नमुन्यादाखल हे काही मेसेज... ""मी आपले सदर नियमित वाचत होतो. रविवार "रसिक' पुरवणीची उत्कंठतेने वाट पाहत असायचो. आपले सदर आजपासून बंद होत आहे, हे वाचून मनाला एकप्रकारची हुरहूर लागली आहे. आता रविवारच्या "रसिक' पुरवणीची उत्कंठतेने वाट पाहणे थांबले आहे...'' - अरुण कोकाटे ""अलविदा सर...तुमचे लिखाण महाराष्ट्राच्या तमाम रसिकांच्या मनावर "रसिक"ने कोरलं..तुमचे लेख वाचताना खूप गहिवरून यायचे सर, पण एक चांगली मालिका वाचायला मिळाली त्याबद्दल 'दै दिव्य मराठी' चे ही आभार.''- जर्नादन इंगळे ""सर नमस्कार. वर्षभर आपले लेख वाचले.आज शेवटचं सदर वाचतांना आत खुप तुटलं. आपण खुप भरभरुन दिलं.पुस्तक रुपात आपला हा ठेवा जवळ ठेवायला आवडेल.पुस्तकाची वाट पाहातोय.शुभेच्छा'' - श्रीकृष्ण सुतवणे ""सुप्रभात सर. नेहमी प्रमाणे आज मॉर्निंग वॉकला गेले होते. पेपरस्टॉल वर गेले आणि लोकसत्ता घेतला, तेवढ्यात माझं लक्ष दिव्य मराठीच्या "रसिक' पुरवणीकडे गेलं आणि त्यात पाहिलं की तुम्ही शेवटच्या लेखाने सदराचा समारोप केला आहे. हे लक्षात येताच माझी उत्सुकता वाढली आणि त्या काकांकडे "दिव्य मराठी' मागितला. पण माझ्या लक्षात आले की तेवढे पैसे खिशातच नव्हते. मग मी तिथेच बसून तुमचे सदर वाचले. वाचताना माझी अस्वस्थता पेपरस्टॉल वाल्या काकांना दिसत होती. तुमचे सदर वाचून मी लोकसत्ता घेऊन घरी पोहचले आणि लोकसत्ता उघडल्यानंतर माझ्या लक्षात आले की काकांनी गुपचूप रसिक पुरवणीही टाकली होती. - आरती हुल्ले आणि आता हा शेवटचा मेसेज... नमस्कार सर, मी चंद्रकांत... हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री घेतली आणि आता क्रुझवर जॉब करतोय. मात्र तरीही जुने दिवस अंगावर शहारे आणतात. अतिशय गरिब परिस्थितीमुळे दिवसभर कॉलेज आणि रात्री मिळेल त्या हॉटेलमध्ये काम करत करत शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला खुप लाज वाटायची की आपण हे काय करतोय. कालांतराने तुमचे सदर वाचायला मिळाले. बरं झालं सर हे तुम्ही लिहिलत, कारण तुम्ही फक्त तुमच्याच नाही तर माझ्या मनातलं लिहून काढलं. माणूस परिस्थितीने घडतो. आज मी क्रुझवर मोठ्या पदावर कार्यरत आहे. जवळपास ३५ देश फिरलोय, अनेक परदेशी भाषा शिकलोय. माझी तुम्हाला एकच विनंती आहे सर. तुमच्या या सदराचे तुम्ही एक कॉफी टेबल बुक काढा. मी माझ्या क्रुझवर ते कॉफी टेबल बुक ठेवीन आणि प्रत्येकाला ते वाचायला सांगेन. - चंद्रकांत वर उल्लेख केलेल्या मेसेजमध्ये "सर'म्हणून जो उल्लेख आहे तो मी नाही. मात्र तरीही असे किमान शेदोनशे मेसेज माझ्या संग्रही आहेत आणि मी ते मुद्दाम संग्रही ठेवले आहेत. कारण माझ्यासाठी हा विलक्षण अनुभव होता. पत्रकारितेच्या जवळपास २७ वर्षात असा अनुभव मला आजपर्यंत आला नव्हता. आता जरा आणखी मागे जातो... मे २०१७... रोजचे मेल चेक करत असताना एका अनोळखी व्यक्तीच्या मेलवर माझी नजर गेली. आदरणीय सर, मी आपल्या "रसिक' पुरवणीचा नियमीत वाचक आहे. मी शिक्षणाच्या निमित्ताने गावाकडून औरंगबादला दाखल झालो. मी जवळपास दीड तप हॉटेलमध्ये नोकरी करत होतो. माझं शिक्षणदेखील हॉटेल लाईननेच पूर्ण केलं. हॉटेलमधली खरकटी भांडी धुणं, किचन हेल्पर म्हणून काम करणं, टॉयलेट, फरशी, टेबल पुसणं, टेबलवरचे खरकटी ताटं उचलणं, कस्टमरला सर्व्हिस देणं, यासह मी हॉटेल बारबालांसोबतही काम केलं. हॉटेलात काम करताना, शिकण्याची भूक कधीच कमी झाली नाही.वेटरचे काम करत करत मराठी विषयात एम.ए.,बी.एड्.,पीएच्.डी.केली. प्राध्यापक पदाला आवश्यक नेट परीक्षा पास झालो. वेटरचे काम करत असताना मी वेगवेगळ्या अनुभवातून गेलो आहे. वेटरचे आयुष्य कसे असते याचे अनुभवपर कथन आपल्या रसिक पुरवणीत यावे अशी माझी मनोमन इच्छा आहे, कृपया माझे सदर सुरू करावे ही विनंती. (सोबत पहिला लेख पाठवत आहे. कृपया वाचून प्रतिक्रिया कळवावी) आपला रमेश रावळकर वर उल्लेख केलेल्या मेसेजमध्ये "सर'म्हणून जो उल्लेख आहे तो ह्याच रमेश रावळकरांचा आहे. हे काहीतरी वेगळं होतं... मी लगेचच त्यांनी पाठवलेला लेख वाचायला घेतला. लेखाचे शिर्षक होते "टिश्यू पेपर'... वेटर, हेल्पर इथल्या सगळ्यांच्याच बुडाशी असतो दुःखानं डबडब भरलेला भला मोठा एक डोह तेव्हा तिन्ही देवांच्या नावानं किती लावली उदबत्ती, खंडोबाच्या नावानं जागवली सगळी रात अथवा पिराच्या नावाचा मागितला गदा तरी आमचं गाऱ्हाणं पोहोचलं नाही कधीच लोककल्याणाच्या बोंबा मारणाऱ्या मसिहापर्यंत..

अशा कवितेने सुरूवात करून रमेश रावळकरांनी हॉटेलमध्ये आपण जे पदार्थ थाळीमध्ये टाकून देतो त्या उरलेल्या अन्नाचे पुढे काय होतं यावर अतिशय रंजक असा लेख लिहून पाठवला होता. टिश्यू पेपर... म्हटलं तर हा सारं काही मुकाट्याने शोषून घेतो आणि त्यातच संपतो. हा सोसण्याचा, संपण्याचा, संपून पुन्हा नव्याने उभारी घेण्याच्या प्रवासात समाजाच्या नजरेला कधीही न दिसलेलं जग पुढे आणण्याचा रमेश रावळकरांचा खटाटोप आमच्या पूर्ण रसिकच्या संपादकीय टीमला विलक्षण भावला होता. आणि त्याच आठवड्यापासून त्यांचे "टिश्यू पेपर'नावाचे सदर सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतला. वर्षभर हे सदर चालले, जवळपास ५२ लेख रावळकरांनी रसिक पुरवणीत लिहिले. वर्षभरानंतर ज्यावेळी हे सदर थांबले तेव्हाचा आम्हा संपादकीय टीमला आलेला अनुभव हा आश्चर्यचकीत करणारा होता. रावळकरांचे सदर थांबवू नये अशी विनंती करणारे, धमकी देणारे अनेक मेसेज आम्हाला आले. आता तीन वर्षांनंतर "रसिक' पुरवणीतील याच याच कथात्म लेखांची पुण्याच्या राजहंस प्रकाशन संस्थेकडून "टिश्यू पेपर' ही रमेश रावळकरांची कादंबरी प्रसिद्ध झाली आहे. मराठी साहित्यात ज्या विषयावर फार लिहिले किंवा बोलले गेले नाही अशा विषयावरची ही एक महत्त्वाची कलाकृती आहे. ही कादंबरी म्हणजे रमेश रावळकरांच्याच्या जगण्याचा शब्दमय कोलाज आहे. 'टिश्यू पेपर' या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या रमेश रावळकरांच्या कादंबरीमध्ये प्रख्यात कादंबरीकार राजन गवस यांनी "ब्लर्ब' लिहिला आहे. रावळकरांच्या सदरावर वाचकांनी इतके उदंड प्रेम का केले याचे उत्तर राजन गवस यांच्या या उताऱ्यावरून लक्षात येईल. गवस म्हणतात, परमीट रूम, बार, हॉटेल ही छंदीफंदी लोकांची भुरळ घालणारी दुनिया. हे एक स्वतंत्र जग असते, तिथे झगमगाट, उच्चभ्रूंचा वावर आणि अय्याशी फेर धरत असते; तर दुसऱ्या बाजूला रोजीरोटीला महाग झालेले गोरगरीब, शोषित, पीडित लोक या दुनियेत स्वतःला हरप्रकारे जाळून नेस्तनाबूत करत असतात. भारतासारख्या देशातील दोन वर्गातील दरी पाहायची असेल, तर आपल्या जवळपासचे परमीट रूम, बार, हॉटेल हे एक उत्तम अनुभवक्षेत्र असते. अशा ठिकाणी काम करणाऱ्या कामगाराच्या आयुष्याचा पट रमेश रावळकर यांनी "टिश्यू पेपर' या कादंबरीत चित्रित केलेला आहे. नाचणारी गाणारी, पिणारी-पाजणारी, बेहोश होणारी, सांभाळणारी, स्वतःला गाडून घेऊन पुन्हा उगवणारी आणि दुसऱ्यांना जगवणारी एक जीवनेच्छा इथे प्रवाहित होताना दिसते. माणूस होण्यासाठी ज्यांना ज्यांना डागण्या देणे गरजेचे आहे; त्या सर्वांना डागण्या देत कधी खोलवर जखम करत ही कादंबरी आपल्याला अस्सल साहित्यकृती वाचल्याचा अनुभव देते. प्रत्यक्ष जगलेले जीवनानुभव साहित्यात जसेच्या तसे ओतून एक जिवंत कलाकृती निर्माण करण्याचा प्रयत्न रमेश रावळकर यांनी 'टिश्यू पेपर' या कादंबरीत केलेला आहे. "टिश्यू पेपर'मधील मोरीवाली बाई, वस्ताद (कुक), हेल्पर, वेटर, कॅप्टन, मॅनेजर, शेठ आणि कस्टमर या सगळ्याच व्यक्तिरेखा रावळकरांनी नव्याने जिवंत केल्या. त्या सगळ्यांविषयी लिहिले म्हणजे त्यांचे दुःख, समस्या कमी होतील, असे मुळीच नव्हते परंतू त्या निमित्ताने त्यांचे भावविश्व व तो भोवताल त्यांनी उजेडात आणता आला. हे सगळं मांडताना मनाची जी घालमेल व्हायची त्याबद्दल रावळकर सांगतात,""मला स्वतःला खोदत न्यावं लागलं. मनातल्या गाठीचे बंध सोडावे लागले. इतकं खोदूनसुद्धा कुठेच थंडगार पाण्याचे झरे सापडले नाहीत. हॉटेलमधल्या माणसांचं हे जगणं जात, धर्मनिरपेक्ष असतं. इथं अठरा पगड जातीचे कस्टमर येतात. आम्ही सर्व जण कस्टमर नावाच्या माणसात देवत्व शोधतो. हॉटेलवासीय माणूसपणाचं तत्त्व शोधत माणुसकीचं सत्त्व आम्ही आपल्या अंगाखांद्यावर मिरवत असतो. हॉटेलमध्ये नोकरी करतो म्हटल्यावर अनेक जण नाकं मुरडतात, हीन नजरेनं बघतात. गोड बोलतात, ते ‘गुड सर्व्हिस’ मिळेपर्यंत. नंतर वेटरशी काही संबंध नसतो. झिंगलेले कस्टमर ऑर्डरला थोडा उशीर झाला, तर मायबहिणी उधडतात.काही मोजके कस्टमर वगळता हेल्पर, वेटरविषयी ग्राहकांच्या मनात कधीच फारशी आस्था नसते. त्यामुळे हॉटेलमधल्या या सगळ्या व्यक्तिरेखा आणि त्यांचं जगणं मराठी वाङ््मयाच्या नकाशावर कोणी आणले नाही, याची मला सतत बोचणी होती. ही सगळी माणसं साहित्याचा विषय व्हावीत, असे मला मनोमन वाटायचे. शोषितांच्या जगण्याचा एक भयावह प्रवास रावळकरांनी त्यांच्या "टिश्यू पेपर' या कादबंरीत मांडला आहे. मराठी साहित्य क्षेत्रात अपवादानेच असे चित्रण वाचायला मिळते. "वेटर' ते "रायटर' हा रावळकरांचा प्रवास रसिकच्या वाचकांनी दिलेल्या बळामुळे इथवर पोहचला आहे. "दिव्य मराठी रसिक'तर्फे आणि आमच्या रजारो वाचकांतर्फे आम्ही रमेश रावळकरांच्या "टिश्यू पेपर' या कादंबरीचे मनापासून स्वागत करतोय. टिश्यू पेपर (कादंबरी लेखक - रमेश रावळकर प्रकाशक - राजहंस प्रकाशन, पुणे मुखपृष्ठ व रेखाटने - अन्वर हुसेन पाने - ३३३ किंमत - ४०० रुपये shivaprash@gmail.com

बातम्या आणखी आहेत...